07 March 2021

News Flash

क्रौर्याचा कळस!

दुसऱ्या दिवशी तिचे पालक तिचा शोध घेत मंदिराजवळ आले होते. त्यांनी सांजीरामकडे चौकशीही केली.

प्रतिनिधिक छायाचित्र

जम्मू-काश्मीरमधील कथुआ आणि उत्तर प्रदेशमधील उन्नाव. एके ठिकाणी एका निरागस बालिकेवर पाशवी अत्याचारांनंतर तिची हत्या. दुसरीकडे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तिच्या वडिलांचा मृत्यू, कुटुंबावरील अत्याचार. अशा सर्वच घटनांतील पाशवी क्रौर्य अंगावर काटा आणणारे असते. मानवतेला लाज आणणारे असते. या दोन घटनांनीही तो क्रौर्याचा भेसूर चेहरा दाखवून दिला. त्याहून भयंकर म्हणजे, अशा घटनांकडेही आपण केवळ राजकीय आणि धार्मिक चष्म्यातूनच पाहू लागलो आहोत हे कटू वास्तवही त्यांनी समोर आणले.. सुसंस्कृततेसमोरच आव्हान निर्माण करणाऱ्या त्या दोन घटनांची ही कहाणी.. कोणत्याही भाष्याविना.. कारण यावर भाष्य करायचे आहे ते ज्याचे त्याने, आपल्या मनात.

ती आठ वर्षांची चिमुरडी. ती जन्मली त्याच काळात तिच्या मामाने, मोहम्मद युसूफने त्याची दोन्ही मुले एका बस अपघातात गमावली होती. त्या दु:खावर फुंकर म्हणून त्याने त्या चिमुरडीला दत्तक घेतले. तिचे पालक म्हणतात, हरणासारखी धावायची ती. म्हणूनच असेल कदाचित, पण घोडय़ांना चारण्यासाठी जंगलात न्यायचे काम तिच्यावर सोपविलेले होते. मोठय़ा आनंदाने ते काम करायची ती. त्या दिवशी – तारीख होती १० जानेवारी २०१८ – नेहमीप्रमाणेच ती दुपारी साडेबाराच्या सुमारास घोडे घेऊन जवळच्या जंगलात गेली. दुपारचे साडेचार वाजले. घोडे तबेल्याकडे परतले. तिचा मात्र पत्ताच नव्हता. घरच्यांनी खूप शोधले तिला. पण, तिचा ठावठिकाणा काही लागला नाही.

अखेर दोन दिवसांनी तिच्या मामाने हिरानगर पोलीस ठाणे गाठले. मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. आठ वर्षांची ती बालिका. ती हरवल्याची तक्रार नोंदवून घेताना तिथलाच एक पोलीस म्हणाला – ‘एखाद्या मुलासोबत पळून गेली असेल, बघा.’ मोहम्मद युसूफला वेगळीच धास्ती होती. गुंडांनी तिचे अपहरण केले असावे, अशी भीती त्यांना वाटत होती. तब्बल सात दिवसांनी, १७ जानेवारी रोजी तिचा मृतदेह जंगलात आढळला. जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्य़ातील रासना भागातील ही घटना. रासनामध्ये बकरवाल मुस्लिमांचे वास्तव्य आहे. ही जमात भटकी. जम्मू-काश्मीरमध्ये त्यांची लोकसंख्या फारतर ६० हजारांच्या घरात. कोणाच्या अध्यात ना मध्यात असे हे लोक. त्यातल्या एका बालिकेची अशी क्रूर हत्या कोणी आणि का केली असेल? पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून त्याची माहिती मिळते. त्या आरोपपत्रानुसार-

हा कट रचला होता सांजीराम या निवृत्त महसूल अधिकाऱ्याने. कारण – रासना भागातून बकरवाल समाजाला हुसकावून लावायचे होते त्याला. त्यासाठी त्याने विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया आणि आपल्या अल्पवयीन भाचा संतोष (नाव बदललेले) यांची मदत घेतली. ती बालिका घोडे चारण्यासाठी जंगलात जाते. तिला पळवून आण, असे सांजीरामने संतोषला ७ जानेवारी रोजी सांगितले. मग त्या अपहरणाची पूर्वतयारी करण्यात आली. तीन दिवसांनी घोडे चारायला आलेली  ती बालिका जंगलात वाट हरवलेले आपले घोडे पाहिलेत का, अशी विचारणा वीणा देवी नावाच्या एका महिलेकडे करत असल्याचे संतोषने पाहिले. तो लगेच मंदिराची चावी आणि गुंगीच्या तीन गोळ्या घेऊन तिच्याकडे गेला. तुझे घोडे शोधून देतो, असे प्रलोभन दाखवून त्याने तिला जंगलात नेले. सोबत परवेशकुमार ऊर्फ मन्नू यालाही घेतले. आपण संकटात सापडल्याचे लक्षात येताच तिने सर्व बळ एकवटून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण संतोषने तिचे तोंड दाबून तिला खाली पाडले. मन्नूने तिचे पाय पकडले. तिच्या तोंडात जबरदस्तीने गुंगीच्या गोळ्या कोंबण्यात आल्या. ती बेशुद्ध  पडल्यानंतर संतोषने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मन्नूने बलात्काराचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर त्यांनी तिला मंदिरात नेले. तिथे एक मोठे टेबल होते. त्याच्याखाली त्यांनी तिला ठेवले.

दुसऱ्या दिवशी तिचे पालक तिचा शोध घेत मंदिराजवळ आले होते. त्यांनी सांजीरामकडे चौकशीही केली. ती कुण्या नातेवाइकाकडे गेली असेल, असे सांगून सांजीरामने वेळ मारून नेली. दुपारी बारा वाजता दीपक खजुरिया हा सांजीरामच्या घरी आला. संतोषला घेऊन तो मंदिराकडे गेला. मंदिरात पोहोचल्यानंतर दीपकने गुंगीच्या दहा गोळ्यांचे पाकीट काढले. या दोघांनी तिच्या तोंडात पुन्हा दोन गोळ्या कोंबल्या. त्यानंतर मंदिराचे दार बंद करून दोघेही तिथून निघून गेले. पाचच्या सुमारास संतोष हा मंदिरात दिवाबत्ती लावण्यासाठी गेला. त्या वेळी त्याने पाहिले तेव्हा ती बेशुद्धावस्थेतच होती.

त्यांच्या क्रौर्याचा कहर म्हणजे, ११ जानेवारी रोजी या संतोषने सांजीरामचा मुलगा विशाल जनगोत्र याला फोन करून मेरठहून बोलावून घेतले. म्हणाला, वासना शमवायची असेल, तर कथुआमध्ये ये. १२ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता विशाल रासना येथे पोहोचला. सकाळी सोडआठ वाजता संतोष मंदिरात गेला आणि त्याने त्या चिमुरडय़ा बालिकेला गुंगीच्या आणखी तीन गोळ्या दिल्या. इकडे तिचे पालक तिचा शोध घेऊन थकले होते. त्याच दिवशी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

सांजीरामने काही पोलिसांनाही या कटात सहभागी करून घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांचा आर्थिक व्यवहारही उघड झाला आहे. आरोपींना वाचविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता यांना ठरावीक रक्कम द्यावी लागेल, असे हेडकॉन्स्टेबल तिलक राज याने सांजीरामला सांगितले होते. १२ जानेवारीलाच संतोषची आई त्रिप्तादेवी ही आपला भाऊ सांजीरामकडे आली होती.  सांजीरामने दीड लाख रुपयांचे पाकीट त्रिप्तादेवी यांच्या हातावर ठेवले आणि ही रक्कम हेडकॉन्स्टेबल तिलक राज याच्याकडे सोपविण्यास सांगितले. त्रिप्तादेवी यांनी ही रक्कम तिलक राजकडे दिली. तिलक राज आणि त्रिप्तादेवी हे दामियाल येथील सरकारी प्राथमिक शाळेत एकाच वर्गात शिकत होते.

१३ जानेवारी रोजी संतोष, विशाल आणि सांजीराम हे मंदिरात गेले. तिथे सांजीराम आणि संतोषने काही धार्मिक विधी केले. त्या वेळी मन्नूही तिथे आला. हे धार्मिक विधी झाल्यानंतर संतोष आणि विशाल या दोघांनी त्या बालिकेवर मंदिरातच बलात्कार केला. तिला पुन्हा गुंगीच्या तीन गोळ्या दिल्या.  आपण विशालसह मंदिरात तिच्यावर बलात्कार केल्याचे संतोषने सांजीरामला सांगितले.

या बालिकेची हत्या करायचे त्यांनी आधीच ठरवले होते. त्यानुसार मन्नू, विशाल आणि संतोष या तिघांनी तिला मंदिराबाहेर काढले. जवळच्या नाल्याजवळ नेले. तेवढय़ात दीपकही तिथे पोहोचला. तिची हत्या करण्याआधी मलाही तिच्यावर बलात्कार करायचाय, असा हट्ट त्याने धरला. तेव्हा पुन्हा एकदा त्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार झाला.  आता तिला ठार मारायचे होते. दीपकने तिची मान आपल्या डाव्या मांडीवर ठेवून दाबण्याचा प्रयत्न केला. पण तिच्यात धुगधुगी होती. तेव्हा संतोष सरसावला. त्याने त्या बालिकेच्या पाठीवर गुडघ्याने जोर देऊन दुपट्टय़ाने गळा आवळून तिची हत्या केली. पण अजूनही क्रौर्याची परिसीमा झालेली नाही. ती आठ वर्षांची कोवळ्या फुलासारखी निरागस बालिका. ती मेली की नाही, याची खात्री करून घेण्यासाठी संतोष नावाच्या त्या नराधमाने तिचे डोके दगडाने चेचले.

यानंतर तिचा मृतदेह हिरानगरमधील कालव्यात फेकून देण्यात येणार होता. पण गाडीची व्यवस्था झाली नाही. त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लावेपर्यंत तो सुरक्षित जागा म्हणून मंदिरातच ठेवण्याचे ठरले. त्यानुसार संतोष, विशाल, दीपक आणि मन्नू यांनी तो मंदिरात आणला. पण मंदिरात काही धार्मिक कार्यक्रमानिमित्त भाविक येणार होते. तेव्हा सांजीरामने त्यांना तो मृतदेह जंगलात फेकून देण्याची सूचना केली. संतोष आणि विशाल या दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे दोघेही मंदिरात गेले. संतोषने मृतदेह आपल्या खांद्यावर घेतला आणि विशालने मंदिराचे दार बंद केले. संतोषने जंगलात मृतदेह फेकला. तेव्हा विशाल पहारेकऱ्याचे काम करीत होता. हे सारे झाल्यावर विशाल मेरठला गेला. आता पोलिसांचे तोंड बंद करायचे होते. सांजीरामने पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता याच्यासाठी तिलक राजमार्फत आणखी दीड लाखाचा हप्ता दिला. त्यांच्या दृष्टीने आता प्रकरण संपले होते.

पण त्यांचे पाप उघडय़ावर येणारच होते. एक गावकरी त्याच्या मेंढय़ांचा शोध घेत जंगलात फिरत असताना त्याला तो मृतदेह दिसला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. त्या निरागस बालिकेच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला होता. बकरवाल समाजही या हत्येने हादरून गेला होता. त्यांनी गुन्हेगारांना पकडावे या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. पोलिसांवर दबाव वाढत चालला होता. हेडकॉन्स्टेबल तिलक राज सांजीरामला जाऊन भेटला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. तेव्हा एका आरोपीला ताब्यात दे. म्हणजे प्रकरण शांत पडेल, असे त्या पोलिसाने सांजीरामला सांगितले. पण एकाला पकडले तर सगळेच बिंग फुटेल. तेव्हा सांजीरामने तिलक राजच्या हातात आणखी एक लाख रुपये ठेवले. पण दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी संतोषला ताब्यात घेतले. ते समजताच सांजीरामच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने धावतच पोलीस ठाणे गाठले. संतोषची भेट घेतली. तुलाही लवकरच या गुन्ह्य़ातून मुक्त करतो. पण यात विशालचा (हा सांजीरामचा मुलगा) सहभाग असल्याची माहिती देऊ नको, असे त्याने संतोषला सांगितले. तसे प्रयत्नही त्याने सुरू केले होते. पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता याने संतोषला गुन्हय़ातून मुक्त  करण्यासाठी दुसऱ्याच एका व्यक्तीला त्यात गोवण्याचा प्रयत्न केला. त्याला चौकशीसाठी बोलावण्यातही आले. पण संतोषच फुटला. त्याने त्या बालिकेच्या अपहरण आणि हत्येची कबुली कथुआच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांसमोर दिली. त्यामुळे आनंद दत्ताचा प्रयत्न असफल ठरला. या प्रकरणात स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न आनंद दत्ताने केला. त्यासाठी तपासाचा बनावही रचण्यात आला. एकूणच हे प्रकरण कमकुवत करण्याच्या हेतूने आनंद दत्ता याने तपासकार्यात त्रुटी ठेवल्या.

कथुआच्या रासना भागात बकरवाल समाजाच्या वस्तीलाच सांजीरामचा विरोध होता, हे तपासात उघड झाले आहे. आपल्या जमिनीवर बकरवाल समाजातील नागरिकांचे घोडे, मेंढय़ांना चरायला देऊ नका आणि इतर कोणतीही मदत त्यांना करू नका, असे सांजीरामने आपल्या समाजातील लोकांना सांगितले होते. गेल्या डिसेंबरमध्ये रशीद बकरीवाल यांच्या बकऱ्या सांजीरामने आपल्या ताब्यात ठेवल्या होत्या. आपल्या घराजवळच्या तळ्यावर बकऱ्यांना पाणी पिऊ दिल्याने एक हजार रुपये दंड घेतल्यानंतरच सांजीरामने बकऱ्या परत केल्या. याशिवाय सांजीरामने आपल्या घराशेजारच्या जंगलात गुरे चरविल्याने मोहम्मद युसूफ बकरवाल यांना एक हजाराचा दंड केला होता.

रासनामध्ये बकरवाल समाजाच्या वस्तीला हेडकॉन्स्टेबल तिलक राज आणि दीपक खजुरिया यांचाही आक्षेप होता, असे तपासात पुढे आले आहे. दीपक खजुरिया याचा बकरवाल समाजातील काहींशी वादही होता. बकरवाल हे गाईंची हत्या करतात, अमली पदार्थाची तस्करी करीत असल्याचा समज एका विशिष्ट समाजाचा होता. या दोन समाजातील वादांमुळे परस्परांविरोधात परिसरातील पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हेही नोंदले गेले आहेत. पण हे वितुष्ट त्या चिमुरडीला कसे माहीत असणार? तिला न्याय देण्याच्या मागणीसाठी बकरवाल समाजाने, तर आरोपींच्या समर्थनार्थ हिंदू एकता मंचने मोर्चे काढले. हिंदू एकता मंचच्या मोर्चाला जम्मू-काश्मीरमधील भाजपचे मंत्री लालसिंग आणि चंदेरप्रकाश गंगा यांनीही पाठिंबा दिला.

या प्रकरणात पोलिसांनी ९ एप्रिल रोजी आरोपपत्र दाखल केले. मात्र आरोपपत्र दाखल करण्यास वकिलांनी विरोध केला. या वकिलांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्या बालिकेच्या बाजूने खटला लढविणाऱ्या दीपिका राजवत यांनी आपल्याला बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी धमकावल्याचा आरोप केला आहे. आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे काढणाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या भाजपच्या दोन मंत्र्यांनी राजीनामेही दिले आहेत.

आता कदाचित त्या बालिकेला न्याय मिळेलही, पण या क्रौर्याच्या जखमा भरून निघणे अवघडच. बकरवाल समाजातील जमिला या महिलेची प्रतिक्रिया बोलकी आहे. त्या म्हणतात, आमची मुले पाळीव जनावरांसोबत खेळतात-बागडतात. आम्हाला फक्त जंगली प्राण्यांची भीती होती. आता माणसांचीही भीती वाटू लागली आहे.

सत्तेचा मदांध पाया..

कथुआतील ती बालिका आणि उन्नावमधील ती अल्पवयीन मुलगी. त्यांच्यावरील अत्याचारांच्या केवळ तपशिलातच फरक आहे. त्या बालिकेची हत्या करण्यात आली. उन्नावच्या माखी गावातली ती मुलगी गेल्या वर्षभरापासून रोज नवे मरण मरते आहे. राजकारण, सत्ता आणि त्यातून आलेला पाशवीपणा.. ती रोज भोगते आहे. तिच्यावरील अत्याचारांची कोणी दखलही घेतली नसती. पण तिने तिच्या कुटुंबासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि आणखी एक क्रौर्य देशासमोर आले. त्याने माणसातल्या पशूंचे चेहरे समाजाला दिसले. सत्तेची मस्ती दिसली आणि व्यवस्थेची नपुंसकताही..

काय आहे तिची कहाणी?

जून २०१७ मध्ये आपण नोकरीच्या शोधात असताना भाजप आमदार कुलदीपसिंग सेनगर, त्यांचा भाऊ अतुल सिंह याच्यासह त्यांच्या इतर साथीदारांनी आठवडय़ाहून अधिक काळ आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा या मुलीचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा तर नोंदवला. मात्र, त्यात आमदार कुलदीपसिंग सेनगर याच्या नावाचा उल्लेखच केला नव्हता. कुलदीपसिंग सेनगरविरोधातही गुन्हा नोंदविण्याची मागणी करणाऱ्या पीडितेच्या कुटुंबाला पोलिसांनी पोलीस ठाण्यातून हाकलून लावल्याचा आरोप आहे. स्थानिक पोलीस प्रशासन सेनगर कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असल्याचे लक्षात येताच पीडित मुलीने सेनगरविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्याच्या मागणीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री कार्यालयाला पत्रे पाठवली. मात्र, त्यावर काहीच कारवाई झाली नाही. दरम्यान सेनगर याने या प्रकरणाचा पाठपुरावा सोडून देण्याची धमकी पीडित मुलीला दिली. अखेर सेनगर याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी पीडितेच्या आईने मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. मात्र, त्यानंतरही उन्नाव पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. उलट सेनगरच्या कुटुंबाने पीडितेच्या कुटुंबाला धमकावण्याचे सत्र सुरूच ठेवले. ३ एप्रिल रोजी पीडित मुलीचे वडील सुरेंद्र सिंग यांना सेनगरचा भाऊ अतुल सिंह आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अमानुष मारहाण केली. सुरेंद्र यांना झाडाला बांधण्यात आले आणि लाठय़ाकाठय़ा, पट्टे, लोखंडी दांडय़ाने त्यांचे कुटुंब आणि गावातील जनतेसमोर बेशुद्ध होइपर्यंत मारण्यात आले. मारहाणप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. मात्र, लेखी तक्रारीत सेनगरचा भाऊ अतुलच्या नावाचा उल्लेख करूनही पोलिसांनी त्याचे नाव वगळले. सुरेंद्र सिंग यांनी मारहाण करणाऱ्यांमध्ये अतुलचेही नाव घेतल्याची एक चित्रफीत समोर आली आहे. मात्र, न्याय मागणाऱ्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले. पोलिसांनी सुरेंद्र सिंह यांना बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्यांची कोठडीत हत्या होईल, अशी भीती त्यांच्या कुटुंबाला होती. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, इतक्या गंभीर जखमा असूनही त्यांना रुग्णालयात दाखल करून घेण्याची गरज डॉक्टरांना वाटली नाही. त्यामुळे त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.

या साऱ्या प्रकारामुळे पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी ८ एप्रिलला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लखनौमधील निवासस्थानाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. दुसऱ्याच दिवशी पीडित मुलीचे वडील सुरेंद्र सिंह यांचा कोठडीत मृत्यू झाला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलीस प्रशासनावर दबाव आल्याने सेनगरचा भाऊ अतुल याला अटक करण्यात आली. मुख्यमंत्र्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश द्यावे लागले. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकही नेमण्यात आले. ११ एप्रिल रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने पीडितेवरील बलात्कार आणि तिच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी स्वत:हून दखल घेतली. न्यायालयाने पोलीस आणि राज्य सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १२ एप्रिल रोजी आमदार सेनगर याच्याविरोधात अपहरण, बलात्कार आणि पोस्कोअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटल्याने योगी आदित्यनाथ सरकारने या प्रकरण्याच्या सीबीआय चौकशीची शिफारस केली. सीबीआयने १३ एप्रिल रोजी आमदार कुलदीपसिंग सेनगर याला अटक केली. सीबीआयने याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे नोंदवले आहेत. पीडितेचा बलात्काराचा आरोप, तिच्या वडिलांचा कोठडीतील मृत्यू आणि त्याच्याविरोधात नोंदविण्यात आलेला बेकायदा शस्त्र बाळगल्याचे प्रकरण. या प्रकरणी सेनगरची चौकशी सुरू आहे.

त्या बालिकेला न्याय मिळेलही, पण या क्रौर्याच्या जखमा भरून निघणे अवघडच. यावरची एका महिलेची प्रतिक्रिया बोलकी आहे. त्या म्हणतात, आमची मुले पाळीव जनावरांसोबत खेळतात. आम्हाला  जंगली प्राण्यांची भीती होती. आता माणसांचीही भीती वाटू लागली आहे.

सुनील कांबळी sunil.kambli@ expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2018 1:53 am

Web Title: sunil kambli article on kathua and unnao rape cases
Next Stories
1 स्वरयोगिनी
2 जातवास्तवावर विवेकी हल्ला
3 डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातील भारतासाठी व्रतस्थ वाटचाल
Just Now!
X