15 December 2018

News Flash

जे खळांची व्यंकटी सांडो..

विषय - समाजातील खाप

स्वानंद गांगल, ठाणे तृतीय क्रमांक विजेता

विषय – समाजातील खाप

ता लिबानची बंधने झुगारून शिक्षणाच्या अधिकाराला स्वीकारल्यामुळे मलालावर गोळ्या झाडण्यात आल्या. राजस्थानमध्ये लग्नानंतर मुलगी उच्च शिक्षण घेण्यासाठी गेल्यामुळे तिच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले. यामध्ये मला ‘मानसिकता’ हे एकच साम्य दिसते. ही ‘मानसिकता’ नेमकी काय आहे, तर ती म्हणजे समाजाच्या प्रगतिशील विचारांना चाप लावणारी ‘खाप’ मानसिकता.  समांतर न्यायव्यवस्था चालविणारी ही व्यवस्था आजच्या लोकशाही पद्धतीला घातक नाही का?

कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला कोणाच्याही लग्नाच्या निर्णयात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. अशा अनेक निर्णयांच्या चपराकी सर्वोच्च न्यायालयाने खाप व्यवस्थेला दिल्या होत्या. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी खापवाले म्हणतात, ‘समाजातला लैंगिक  समतोल बिघडविण्यासाठी आम्ही मुलीच जन्माला येऊ देणार नाही’. त्यामुळे असे विचार मांडून खाप व्यवस्था सर्वोच्च न्यायव्यवस्थेला आवाहन देत आहे की काय, असा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे कित्येक वर्षे हे डबके साचलेय, ते का साचले, या प्रश्नाचे एक उत्तर डबक्यात ‘कमळ’ उगवते, असेही असेल. मात्र विनोदाचा भाग वगळता याआधी कोणत्याच सरकारने खापला ‘चाप’ का नाही बसविला? कारण मतपेढीचे राजकारण हे खूप मोठय़ा प्रमाणात खाप पंचायतीच्या जोरावर चालू असते.

ज्या वेळी समूहवाद हा व्यक्तिस्वातंत्र्यापेक्षा मोठा होतो. तेव्हा तिथे खाप दिसतो. ‘आन-बान-शान’ला धोका निर्माण झाल्यामुळे ‘पद्मावत’ चित्रपटाला झालेला विरोध असू दे किंवा पगंबरांवर चित्रपट काढला म्हणून इराणीयन दिग्दर्शक माजीद माजदीला आणि त्या चित्रपटाला संगीत दिल्याने ए. आर. रेहमानला झालेला विरोध असू दे, वा काही वर्षांपूवी पॅरिसमध्ये ‘चार्ली हेब्दो’च्या कार्यालयावर झालेला हल्ला असू दे, ही सगळी खाप मानसिकतेची उदाहरणे. ज्या वेळी अस्मिता, अहंभाव मोठा होत जातो तेव्हा ही खाप मानसिकता वाढत जाते. आज ‘ऑनर किलिंग’चा विचार करताना सर्वप्रथम डोळ्यासमोर खाप येतात. दोन-तीन वर्षांपूर्वी आलेल्या ‘सराट’ चित्रपटात कु ठेही खाप पंचायत दाखवली नव्हती. मात्र त्यात ‘ऑनर किलिंग’ होतच. मग हे भारतातच आहे का? तर तसेही नाही आहे. ‘ऑनर किलिंग’च्या घटना या आफ्रिका, अमेरिका, युरोपातही पाहायला मिळतात. इथे आपल्याकडे त्या जातीवरून होतात, तिथे कदाचित धर्मावरून किंवा वंशावरून होत असतील. पण मानसिकता तीच असते.  ही मानसिकता जेवढी  कमी होईल हे वैश्विक समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पण मुद्दा आहे ती होणार कशी?

याचे एक उत्तर आपल्याला मिळू शकते ते म्हणजे शिक्षण. मात्र केवळ शिक्षणामुळे ती कमी होईल का? कारण याला खतपाणी घालणारे आपल्याला काही सुशिक्षित लोकही दिसतात. शिक्षण हे महत्त्वाचे आहेच, पण त्यासोबत प्रबोधन होणेदेखील महत्त्वाचे असते. सुशिक्षित माणूस सुसंस्कृत किंवा सुजाण असतोच असे नाही. ज्या वेळी शिक्षण आणि प्रबोधन या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जातील, त्या वेळी ती गोष्ट समाजाच्या दृष्टीने खूप चांगली ठरेल. याचा मला माउलींच्या पसायदानाशी संदर्भ जोडावासा वाटतो. कारण मानसिकतेत बदल करायचा आहे. पण मानसिकता वाईट आहे, माणूस नाही. माणूस हा चांगलाच असतो. त्याची विचारप्रवृत्ती वाईट असते. म्हणून माउली पसायदानात म्हणतात, ‘जे खळांची व्यंकटी सांडो’. ‘खळ सांडो’ नाहीत, तर ‘खळांची व्यंकटी सांडो’. तो खळ आहे कारण त्यामध्ये ती व्यंकटी आहे. ती सांडल्यावर तो चांगलाच होणार आहे. ‘तया सत्कर्मी रति वाढो’ आणि ‘भूतां परस्परे पडो, मैत्र जीवांचे’. येथे एवढाच आशावाद व्यक्त करतो.

(संपादित)

First Published on February 25, 2018 3:25 am

Web Title: swanand gangal speech in loksatta oratory competition