‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे’ या कवी बाकीबाब यांच्या ओळींप्रमाणे ज्यांना जगाच्या नवनिर्मितीचे डोहाळे लागलेले आहेत, असे गुणी तरुण ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’च्या मंचावर उपस्थित होते. कुणी उद्योग जगतात नव्या भराऱ्या घेणारे, तर कुणी संशोधनात बुडून गेलेले, कु णी खेळाच्या मैदानावर पुढे, तर कु णी शब्दकळेचे देखणे लालित्य मिरवणारे, कु णी सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेणारे, तर कु णी प्रशासनातून परिवर्तन घडवू पाहणारे. या सगळ्या तेजांकितांची ओळख ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी…

सिद्धार्थ जाधव (मनोरंजन) नाटकवेडा सुपरस्टार

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
prashant damle birthday special article
प्रशांत दामले : ‘बेस्ट’मध्ये नोकरी ते रंगभूमीचा ‘विक्रमादित्य’, व्यवहार कुशल निर्मात्याचा बहुरुपी प्रवास
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

रंगरूपाच्या चौकटी ओलांडत आपल्या ऊर्जेने आणि आगळ्यावेगळ्या शैलीने प्रेक्षकांना वेड लावणारा एक नाट्यवेडा मराठी सुपरस्टार म्हणजे सिद्धार्थ जाधव.

माटुंग्याच्या रुपारेल महाविद्यालयातील कलाविश्वातून जणू त्याच्या नाट्यप्रवेशाची नांदीच झाली. एकांकिकाविश्वात सिद्धार्थ जाधव हे नाव गाजू लागले. वयाच्या १७ व्या वर्षी त्याने व्यावसायिक रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. विनय आपटेंचे ‘तुमचा मुलगा करतो काय?’ हे त्याचे पहिले व्यावसायिक नाटक. तर केदार शिंदेंच्या ‘लोचा झाला रे’ या नाटकाने त्याला खरी ओळख मिळवून दिली. या नाटकात त्याने साकारलेल्या आदिमानवाच्या भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले. नायकाच्या तथाकथित चौकटीत न बसणारं रंगरूप असल्याने सिद्धार्थने सुरुवातीला केवळ अभिनयाच्या प्रेमाखातर  मिळेल त्या भूमिका केल्या. अनेक चित्रपटांतून साहाय्यक भूमिका साकारल्या. पण अखेर मनाजोगत्या आणि मध्यवर्ती भूमिका त्याला मिळू लागल्या आणि मराठी सिनेमाला उत्तम अभिनय करणारा आणखी एक सुपरस्टार मिळाला. ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘जत्रा’ यांसारख्या सिनेमांतून याची सुरुवात झाली. ‘दे धक्का’पासून ते आत्ताआत्ताच्या ‘धुरळा’पर्यंत साधारण ६० हून अधिक चित्रपटांत त्याने काम केले आहे. यादरम्यान अनेक पुरस्कारही पटकावले आहेत. अनेक एकांकिका, सहा व्यावसायिक मराठी नाटके, सुमारे १५ मराठी-हिंदी मालिका, मराठी आणि हिंदी चित्रपट अशी त्याची कारकीर्द आर्हे.  ंहदी सिने-मालिकाविश्वातही त्याने आपल्या कामाच ठसा उमटवला आहे.

अभिनयासोबत सामाजिक कामांमध्येही तो सक्रिय सहभागी असतो. महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या व्यसनमुक्ती अभियानाचा ‘सदिच्छा दूत’ म्हणून त्याने काम केले आहे.

रुपाली सुरासे (विज्ञान) शेतीतील तंत्रनवलाई

शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी लाभलेल्या रुपाली सुरासे यांना शेतीविषयीची आवड वारशानेच मिळाली होती. त्यांनी पिकांचे वर्गीकरण आणि त्यावरील रोगांची माहिती देणारे नवतंत्रज्ञान विकसित केले. ‘सॅटेलाईट सिग्नेचर’ या संगणकीकृत उपक्रमाच्या आधारे पिकांचे वर्गीकरण आणि त्यावरील रोग यांची माहिती मिळविता येऊ शकते. या संशोधनामध्ये ज्वारी, बाजरी, मूग आणि उडीद या पिकांचा समावेश आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पिकांचे वर्गीकरण करणे आणि त्यावरील रोगांची माहिती मिळवणे, त्याचप्रमाणे दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान नेमके मोजता येणे शक्य होईल, तसेच पीकविमा पद्धतीतही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यात या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल असा विश्वास संशोधक व्यक्त करतात. तब्बल पाच वर्षे रुपाली या प्रकल्पावर काम करत होत्या. हायपर स्पेक्ट्रल सिग्नेचर व सॅटेलाइटचा वापर करून हे नवतंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. कृषीविकासासाठी या नव्या शोधाचा उपयोग होऊ शकेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगणक विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभागातील संशोधक म्हणून काम पाहणाऱ्या रुपाली सुरासे-कुहिरे यांची दखल भारतीय विज्ञान परिषदेकडूनही घेण्यात आली आहे. परिषदेतर्फे त्यांना २०२० सालचा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार जाहीर झाला आहे.

गणराज जैन  (समाजकारण) भूतदयेचा  पाणवठा

अ नाथ माणसांसाठी अनाथाश्रम असतात. पण प्राण्यांचे काय? अपघातात जखमी झालेल्या प्राण्यांना कुणीच वाली नसतो. मात्र अशा प्राण्यांना हक्काचा निवारा देते- गणराज जैन यांची ‘पाणवठा’ ही संस्था. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर नोकरीऐवजी गणराज यांनी समाजसेवा करायची ठरवली. अनाथ प्राण्यांसाठी ‘पाणवठा’ ही संस्था स्थापन केली. १४ वर्षांपूर्वी जेव्हा ही संस्था उभी केली तेव्हा अशा प्रकारे प्राण्यांची काळजी घेणारी ती एकमेव संस्था होती. त्यामुळे अडचणीही खूप होत्या. पण गणराज डगमगले नाहीत. याच दरम्यान त्यांनी अपघातात जखमी होणाऱ्या प्राण्यांसाठी ‘सफर’ हे उपचार केंद्र सुरूकेले. या केंद्राच्या माध्यमातून आत्तापर्यंत कुत्रा, मांजर, गाय, घोडा, गाढव, मगर, मोर, पोपट, माकड, खवलेमांजर, भेकर अशा जवळपास ४५०० पेक्षा अधिक प्राणी-पक्ष्यांवर यशस्वी उपचार केले आहेत. याचबरोबर २०१३मध्ये ‘सावली गोशाळा’ सुरू केली. या गोशाळेच्या माध्यमातून  त्यांनी आत्तापर्यंत १६७ गाई गरजू शेतकऱ्यांना मोफत दिल्या आहेत.

गणराज केवळ प्राण्यांसाठी संस्था काढून थांबले नाहीत, तर प्राण्यांची काळजी घेणे का आवश्यक आहे याविषयी त्यांनी प्रबोधनही सुरू केले. प्राण्यांचे महत्त्व, सर्प : समज-गैरसमज या विषयांवर त्यांनी आजवर ३०० पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत. जंगलातील वणव्यांविषयी जनजागृती केली आहे. या साऱ्या धडपडीतून  त्यांनी आपल्यासारखेच अनेक सर्पमित्र, निसर्गप्रेमी तयार केले आहेत. या कामाची दखल अनेक सामाजिक संस्थांनी घेतली असून, आजवर त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

ताई पवार   (राजकारण) : ‘कर्ती ’ गावप्रमुख

राजकारणातील महिलांचा टक्का अजूनही समाधानकारक नाही. त्यातही अनेकदा पदावरील महिलेच्या आडून तिच्या घरातील पुरुषच कारभार पाहतो असे दिसून येते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ताई पवार यांचे उदाहरण वेगळे ठरते. त्या खालापूर तालुक्यातील मोहपाडा गावच्या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी ही वाटचाल केली आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना इयत्ता नववीनंतर शिक्षण घेता आले नाही. वयाच्या जेमतेम १८ व्या वर्षीच आई-वडिलांनी लग्न लावून दिले. लग्नानंतर त्या खालापूर तालुक्यातील मोहपाडा येथे आपल्या पतीसमवेत राहू लागल्या. शिक्षण पूर्ण झाले नसले तरी ताई सुशिक्षित मात्र नक्कीच होत्या. आपल्या आसपासच्या आदिवासी समाजाचे प्रश्न त्यांना जाणवत होते, अस्वस्थ करत होते. हा समाज आजही दुर्लक्षित आणि वंचित राहिल्याची जाणीव त्यांना सातत्याने होत होती. त्यामुळे सामाजिक कार्यात आणि राजकारणात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आणि थेट राजकारणात उतरून यावर उपाय शोधायचे ठरवले.

वयाच्या चोविसाव्या वर्षी ताई पवार मोहपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. शासकीय योजनांचा लाभ वाड्या-वस्त्यांवर पोहोचला पाहिजे यासाठी त्या कार्यरत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ग्रामपंचायतीचा कारभार त्या अत्यंत समर्थपणे सांभाळत आहेत. एकटी बाई काय करणार, या गृहितकाला छेद देत ताई पवार यांनी समर्थ राजकीय नेतृत्वाचा आदर्श घालून दिला आहे.

श्रीपाद जगताप (उद्योग) : उद्योजक  शेतकरी

ग्रामीण भागात शेतकऱ्यांशी नाते जोडून उद्योग-व्यवसायाचे स्वप्न पाहणारे तरुण होतकरू उद्योजक म्हणजे श्रीपाद चंद्रशेखर जगताप. अत्यंत अत्यल्प भांडवलातून सुरुवात केलेला त्यांचा ‘किसान अ‍ॅग्रो’ हा पशुखाद्य उत्पादन व्यवसाय आज कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. शेतीतील पारंपरिक ज्ञानाचा वारसा आणि त्याला अद्ययावत शिक्षणाची जोड देऊन ही किमया त्यांनी साधली आहे. एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरही गावी येऊन व्यवसाय करायचा, ही श्रीपाद यांची इच्छा होती. याच इच्छेपोटी श्रीपाद जगताप यांनी पशुखाद्य उत्पादन आणि विक्रीचा  व्यवसाय करायचे ठरवले. त्याआधी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. आपले उत्पादन अनेक कसोट्यांवर तपासून मगच शेतकरी मित्रांसमोर आणले. पण केवळ उत्पादन आणि विक्री एवढेच त्यांच्या व्यवसायाचे उद्दिष्ट नाही. त्यासोबतच शेतकऱ्यांना शिक्षित करणे हासुद्धा उद्देश आहे. त्यामुळेच शेतकरी प्रशिक्षण, जनावरांसाठी औषधेवाटप, पशुखाद्याच्या साठवणीसंदर्भात माहिती, दुग्धव्यवसायासाठीची यंत्रसामग्री वाजवी दरात उपलब्ध करून देणे, गोठा व्यवस्थापन यांसारख्या आधुनिक माहितीबरोबरच जनावरांचे आरोग्य, किरकोळ रोगांवर घरच्या घरी उपचार  अशा अनेक बाबतीत ‘किसान अ‍ॅग्रो’ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करते.  शेतकऱ्यांकडे केवळ ग्राहक म्हणून न पाहता सहकारी म्हणून पाहण्याची दृष्टी, शेतीविषयीचा जिव्हाळा हेच श्रीपाद जगताप यांच्या व्यवसायाचे वेगळेपण आहे. म्हणूनच आज अनेक शेतकऱ्यांच्या मनात आणि मळ्यांत ‘किसान अ‍ॅग्रो’ पशुखाद्य उत्पादनाची खास जागा आहे.

रसिका आगाशे (मनोरंजन) : निर्भीड नाट्यकर्मी

लेखिका, अभिनेत्री आणि दिग्दर्शिका या तिन्ही जबाबदाऱ्या लीलया पेलणारी कलाकार म्हणजे रसिका आगाशे. नाटकातून समाज बदलता येतो यावर विश्वास असणारी आणि तो बदलण्यासाठी फक्त रंगमंचावरच नव्हे, तर रंगमंचाबाहेरही आपले विचार ठामपणे मांडणारी रसिका म्हणूनच तिच्या समकालीन कलाकारांपेक्षा वेगळी ठरते. दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्यविद्यालयातून पदवी घेतलेल्या रसिकाचे पहिले व्यावसायिक मराठी नाटक ‘पोपटपंची’! त्यानंतर ‘चहेता’, ‘हारूस मारूस’, ‘वेडिंग अल्बम’, ‘हम पंछी लेहरों के’, ‘इस कम्बख्त साठें का क्या करे?’ अशा नाटकांमधून तिने काम केले. तर ‘कोलॅबोरेटर’, ‘हारूस मारूस’, ‘म्युझियम ऑफ स्पेसीज इन डेंजर’सारख्या वेगळ्या नाटकांचे दिग्दर्शन तिने केले आहे. संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा चारही भाषांमध्ये ती नाटक करते. शिवाय कलाक्षेत्रात येणाऱ्या नवख्या नाटककार, कलाकारांना मुक्त व्यासपीठ मिळावे यासाठी रसिकाने ‘बीइंग असोसिएशन’ नामक नाट्यसंस्थेची उभारणीही केली आहे. नाटकातून मनोरंजनासह प्रबोधनही व्हावे, या उद्देशाने धर्मांधता, भेदभाव, लैंगिक शोषण अशा विषयांवर ती निर्भीडपणे बोलते, नाटकांतून ते मांडते. उत्तम संहिता असणाऱ्या नव्या नाटकांना व्यासपीठ मिळवून देणे, जुन्या अभिजात नाटकांच्या संहिता जपणे व त्या ई-ग्रंथालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे अशा अनेक प्रकल्पांत तिचे वेगळेपण दिसते. प्रत्येक टप्प्यावर नाट्यकला आणि या कलेवर प्रेम करणाऱ्यांसह ठाम उभी असलेली, स्पष्ट विचारांची रंगकर्मी म्हणून रसिका आगाशे वेगळी ठरते.

 

पराग बोरसे (कला) : कल्पनेचा कुंचला

अमेरिकेतील पेस्टल जर्नलमार्फत दरवर्षी चित्रकारांची जागतिक स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत जगभरातील निवडक १०० चित्रकारांची चित्रे निवडली जातात आणि त्यातील १९ चित्रांना पुरस्कार दिला जातो. या स्पर्धेमध्ये पराग बोरसे या तरुण भारतीय चित्रकाराने रेखाटलेल्या व्यक्तिचित्राला २०२० सालचा द्वितीय पुरस्कार मिळाला. गेल्या २१ वर्षांत या पुरस्कारासाठी निवड होणारे पराग बोरसे हे पहिले भारतीय चित्रकार ठरले आहेत. जे. जे. कला महाविद्यालयात चित्रकलेचे प्रशिक्षण घेतल्यानंतर २००३ पासून ते कलाक्षेत्रात कार्यरत आहेत. २०१७ मध्ये कॅलिफोर्नियातील पेस्टल सोसायटी ऑफ वेस्ट कोस्ट या कलासंस्थेच्या आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनामध्येही पराग यांच्या ‘रिंकल्स अँड रुस्टर्स’ या चित्राला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला होता. पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका यांच्यामार्फत दरवर्षी न्यूयॉर्क येथे जगभरातील चित्रकारांचे चित्रप्रदर्शन भरविले जाते. त्यात २०१७,

२०१८ आणि २०१९ अशा तीन वेळा त्यांना ही संधी मिळाली. मुंबई, पुणे, दिल्ली, ओरिसा अशा विविध ठिकाणी पराग यांची चित्रप्रदर्शने भरली आहेत.

कलाभिव्यक्तीखेरीज सामाजिक जाणिवा

जपण्याचे भानही पराग यांना त्यांच्या कलेने दिले आहे. आदिवासी पाड्यांवरील मुलांना चित्रकलेचे मोफत प्रशिक्षण, कर्करोगग्रस्त व पूरग्रस्तांना चित्रांच्या माध्यमातून मदत, करोनादरम्यान माथेरानमधील शाळेला मदत अशा अनेक उपक्रमांत पराग बोरसे नेहमी अग्रेसर असताना दिसतात.

तेजस्विनी सावंत (क्रीडा) : सुवर्णवेधाचे  लक्ष्य

कोल्हापूरच्या वैभवशाली क्रीडा परंपरेतील एक उज्ज्वल तारा म्हणजे नेमबाज तेजस्विनी सावंत. प्रतिकूल परिस्थितीशी झुंजणाऱ्या तेजस्विनीने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न जोपासले आहे. तेजस्विनीची एनसीसीत असताना नेमबाजीशी पहिली ओळख झाली. महाविद्यालयात अनेक बक्षिसे मिळवल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे नेमबाज आणि प्रशिक्षक जयसिंह कुसळे यांच्याशी भेट झाल्यावर तेजस्विनीचे आयुष्य बदलले. कोल्हापुरात नेमबाजीच्या सरावासाठी फारशा सोयी उपलब्ध नव्हत्या. नेमबाजीसाठी आवश्यक साहित्य विकत घेण्यासाठी तिला पैसे उसने घ्यावे

लागले होते. पण न डगमगता जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचा मान तेजस्विनीने पटकावला. मेलबर्नच्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत (२००६) तेजस्विनीने १० मीटर एअर रायफल एकेरी आणि अवनीत कौर सिद्धूसोबत दुहेरीत अशा दोन सुवर्णपदकांची कमाई केली. म्युनिक येथे २००९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत

५० मीटर रायफलप्रोन इव्हेंटमध्ये तिने जागतिक विजेतेपद प्राप्त केले. ५० मीटर रायफल- प्रोन प्रकारात जागतिक विक्रमाची बरोबरी करत विजेतेपद मिळवणारी तेजस्विनी ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली.  तेजस्विनीच्या या कामगिरीसाठी तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्याप्रमाणेच देशातील मुलींनी या वेगळ्या वाटेवरील खेळाकडे पाहावे यासाठी ती प्रयत्नशील आहे.

रितू मल्होत्रा(उद्योग) : नवउद्यमाची नांदी

अभियांत्रिकी शिक्षणातील कौशल्याचा वापर करत यशस्वी नवउद्यमी म्हणून झेप घेणारी हुशार आणि होतकरू तरुणी आहे- रितू मल्होत्रा. डिजिटल अक्वेरिअम, इझी स्पिट, डिजिटल प्लँटर अशा नवनवीन शोधांसह रितूचा विज्ञानजगतातील प्रवास सुरू आहे. पुस्तकापलीकडल्या जगात आपल्या ज्ञानाचा वापर करून पाहण्याची जिज्ञासा रितूमध्ये अगदी लहानपणापासूनच होती. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या मनातल्या कल्पना स्मार्टपणे मांडण्याचे तिने ठरवले. सुरुवात झाली ‘डिजिटल अ‍ॅक्वेरिअम’ निर्मितीतून. त्याद्वारे मानवी हस्तक्षेपाशिवाय सुमारे ३० दिवसांपर्यंत माशांना अन्न देणे, पाणी शुद्ध करणे, स्वच्छता करणे ही कामे केली जातात. या शोधाचे पेटंटही रितूने घेतले आहे.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या पिंकबहाद्दरांसाठी रितूने ‘इझी स्पिट’ हे उपकरण तयार केले आहे. एक पाऊच किंवा कंटेनरमध्ये पावडर स्वरूपातील एक विशिष्ट केमिकल देण्यात येते. त्यात थुंकल्यानंतर द्रव स्वरूपातील थुंकी काही सेकंदांमध्ये अर्धघन स्वरूपात रूपांतरित होते. पावडर आणि द्रव यांच्या संयोगातून इकोफ्रेण्डली पॉलिमर तयार होते, जे झाडांच्या मातीत मिसळून टाकता येते. त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता झाडांसाठी लाभदायक ठरू शकते. कागदापासून बनवलेल्या पाऊचमध्ये १५ वेळा, तर कंटेनरमध्ये ३० वेळा थुंकता येते. या उत्पादनामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे कमी होऊ शकेल असा विश्वास रितूला वाटतो. त्याचबरोबर ‘डिजिटल प्लँटर’च्या मदतीने घरातील झाडाला वर्षभर पाणी, खत, प्रकाश उपलब्ध करून देऊ शकणारी प्रणाली तिने विकसित केली आहे. यात कुंडीला  बसविण्यात आलेल्या यंत्रामुळे झाडाला रोज पाणी किंवा खत देण्याचे काम हे यंत्र स्वत:च करणार आहे. यात अगदी ‘ब्लू टूथ’वरून गाणी ऐकण्याचीही सोय आहे. याविषयीची माहिती केंद्र शासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ या संकेतस्थळावरही झळकली आहे.

अनिल गावडे(समाजकारण) : लैंगिक अत्याचारांविरुद्ध सामाजिक लढा

स्ने  हालय या प्रथितयश सामाजिक संस्थेत एक साधा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतर अनिल गावडे आज ते संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्याचबरोबर संस्था राबवत असलेल्या २२ प्रकल्पांच्या समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. लहान मुले, स्त्रिया यांच्यावरील लैंगिक अत्याचारांना वाचा फोडण्याचे, त्याविरुद्ध लढा उभारण्याचे आणि शोषितांचे पुनर्वसन करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम अनिल गावडे करत आहेत. २००६ साली बाल-लैंगिक शोषणाची दोन प्रकरणे त्यांनी उजेडात आणली. या प्रकरणांत बड्या धेंडांची नावे गुंतलेली असूनही कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी पीडितांना न्याय मिळवून दिला. इतकेच नव्हे तर त्यांचे पुनर्वसनही केले. त्यामुळे अल्पवयीन मुलींना देहव्यापारात आणण्याच्या घटनांना चांगलाच आळा बसला. या कामामुळे अनिल गावडे आज अनेक मुलींसाठी भाऊ, मार्गदर्शक बनले आहेत.

मूळचे श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी गावात राहणारे अनिल नगर शहरात शिक्षणासाठी आले आणि गिरीश कुलकर्णी यांच्या ‘स्नेहालय’ या संस्थेशी जोडले गेले. चळवळीत काम करतानाच त्यांनी ‘एमएसडब्ल्यू’ पूर्ण केले. आपल्या संस्थेसाठी काम करतानाच भटक्या समाजातील मुलांचे पुनर्वसन, लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांचे पुनर्वसन यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक संस्थांच्या उभारणीत त्यांनी पाठबळ दिले. भटके-विमुक्त, आदिवासी, डोंबारी समाज, ऊसतोडणी कामगार अशा समाजातील वंचित घटकांच्या मुलांसाठी विविध उपक्रमांद्वारे ते मदत करतात. स्नेहालय परिवारातील दिव्यांगांच्या प्रशिक्षण व पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या ‘अनामप्रेम’ या स्वतंत्र संस्थेची पायाभरणीही त्यांनी केली.

लैंगिक अत्याचारग्रस्तांच्या पाठीशी तर ते उभे राहतातच, पण हे अत्याचार होऊ नयेत यासाठी चाइल्ड हेल्पलाइनसारख्या विविध कल्याणकारी संकल्पना राबवण्यातही त्यांचा पुढाकार आहे.

मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बॅँक लि., वल्र्ड वेब सोल्युशन्स, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सिडको

पॉवर्ड बाय : एम. के. घारे ज्वेलर्स

नॉलेज पार्टनर : प्राईसवॉटरहाऊसकुपर्स

टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा