News Flash

तत्त्वबोध : मनाचे पोषण

मन आहे तर शरीरास भोग व क्रिया साधतात. मन नाही तर शरीर मृतप्राय असते.

(संग्रहित छायाचित्र)

स्थूल शरीर हे फक्त एकाच जागृतावस्थेत आमच्या उपयोगी पडते, म्हणून आम्ही त्या शरीराचे पोषण, मुंडण आणि अलंकरण करण्याकरिता झटत असतो. पण मन हे स्थूल व सूक्ष्म शरीरामध्ये फिरत असून जागृति व स्वप्न या दोन्ही अवस्थांतही हजर असते. तर अशा रीतीने सर्व अवस्थांमध्ये आपल्याला कधी सोडून न राहणाऱ्या मनाचे पोषण, मुंडण व अलंकरण याकडे आमचे लक्ष जात नाही, हा केवढा अविचार! मनाची खरी योग्यता, कर्तबगारी, महत्त्वही आम्ही नीट पहात नाही म्हणून इहपर आमची दुर्दशा होत आहे. मन हे या जन्मीचा आपला सोबती व गडी आहे. इतकेच नव्हे तर ते जन्मोजन्मी आपल्या हिताकडे लागले तर आपला सांगाती, सेवक किंवा मित्र होते. परंतु तेच अहिताकडे लागले तर आपला शत्रु होत असते. म्हणून मनास शत्रु किंवा मित्र करून ठेवणे आपले काम आहे. शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे. कारण मनाला सोडून शरीर निरुपयोगी होते. मन आहे तर शरीरास भोग व क्रिया साधतात. मन नाही तर शरीर मृतप्राय असते. तर अशा उत्तम साधनभूत मनाकडे दुर्लक्ष करून फक्त शरीर तेवढे पोसून मिरविणे म्हणजे अपाय करून घेणे आहे. म्हणून मनाला रोज पुष्ट व निरोगी करणारे चांगले अन्न खायला द्यावे- म्हणजे संतबोध भरवावा. मन सुंदर सुशोभित होईल असे वरचेवर त्याचे मुंडण करावे म्हणजे बाधक भेद-कल्पनारूपी केश तोडून अगर उपटून टाकावेत आणि मनास दृढता व बल येईल अशी मनन व एकवाक्यताकरणरूपी तालीम करावी. मनाची भित्रेपणा जाऊन त्याचे ठिकाणी शूरपणा जडावा यासाठी नेहमी संकटे, दुख, ताप वगैरे सोसण्याची त्याला सवय लावून, काळाशी नेहमी कुस्ती घेण्यास शिकवून अंती काळास जिंकण्याची तयारी ठेवावी. मनरूपी घोडा नेहमीच बांधून घरी ठेवावा. मनरूपी घोडा जर निर्वाणी उपयोगी पडावा अशी इच्छा असेल तर त्याला सतत चांगला दाणा देऊन, चांगला खरारा करून, अंग रगडून, पुष्ट करून, मोकळ्या मैदानात, जंगलात, रणात, शर्यतीत वगैरे खेळवून त्याच्यातला भित्रेपणा काढून तयार व धीट करून ठेवावा.

मन माझे ताब्यात नाही, अशी अनेकांची तक्रार असते. मन माझे म्हणता तर ते स्वाधीन असलेच पाहिजे. मन हा माझा चाकर आहे. मी जे इच्छितो ते मन घेते. अशा या बापडय़ा दीन चाकराच्या भिकेच्या आड तरी आपण का यावे? मन पाहिजे तेथे भटकेना! ते कोठे आणि किती भटकेल? ते भिक्षावृत्ति करते, लालूच दाखवते तरी माझ्या सुखाकरिताच ना त्याची खटपट? जाईना का ते पाहिजे त्या मार्गाने! आपल्याला आपल्या मनाची गोष्ट आवडत नसेल तर आपण असंगसाक्षी बनून रहावे म्हणजे झाले. आपल्या आवडीची गोष्ट मनाने धरली तर बरेच झाले. तशी  न धरता जर ते आवडीविरुद्ध जात असेल तर जाईना का! आपण त्याची संगत सोडली म्हणजे आपोआप लत्ता खाऊन ते परत फिरते व सन्मार्गास वळते. आपल्याशिवाय मनाला गतिच नाही. आपल्या आधारावर, आपल्या जोरावर, आपल्या नावावर, आपल्या सान्निध्यावर मन हे उडय़ा मारते. पाळलेल्या कुत्र्यासारखे ते आहे. आपण उदार रहावे व मनास म्हणावे, जा तू भटकून दमून ये. मी तुझ्या संगतीत येत नाही. असे केले म्हणजे मनही पाठबळ नसल्याने लज्जित होऊन आपल्याजवळच येते. आपण उदार, गंभीर व प्रेमळ व्हावे म्हणजे मनही हळूहळू तसेच बनते.

– श्रीपंतमहाराज बाळेकुंद्रीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 12:52 am

Web Title: tattvabodha let the mind feed the healthy food
Next Stories
1 अनुदान नको, तंत्रज्ञान द्या!
2 लब्धप्रतिष्ठितांची लबाडी
3 स्वयंचलित वाहनांचा आराखडा
Just Now!
X