तळेगाव प्रकरणानंतर गेल्या आठ दिवसांत त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यासह नाशिक शहरात इतक्या घडामोडी घडल्या की, मूळ संवेदनशील विषयाचे गांभीर्यच जणू लोप पावले. स्थिती दिवसागणिक बदलली. प्रारंभी उसळलेला आगडोंब शमत असतानाच दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी पुन्हा वातावरण कलुषित झाले.. या आठ दिवसांत त्या परिसरात नेमके काय घडले?

०८ ऑक्टोबर २०१६

boy tied to tree, boy beaten Temghar Pada,
ठाणे : १० वर्षीय मुलाला पेरूच्या झाडाला बांधून मारहाण, आरोपींविरोधात गुन्हा दाखल
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!
mukhtar ansari death gangster turned politician buried near his parents graves in ghazipur
मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाचे दफन

तळेगाव. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरचे गाव. पाचवर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रयत्नांची घटना सायंकाळी उघडकीस आली आणि हे गाव अक्षरश: ढवळून निघाले. समाज माध्यमांमुळे ही बातमी पंचक्रोशीत पसरायला वेळ लागला नाही. आसपासच्या ग्रामस्थांचे जत्थे रात्रीच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात धडकू लागले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अल्पवयीन संशयिताला अटक केली. तोवर पोलीस ठाण्याबाहेर दोन-तीन हजारांचा जमाव जमला होता. कोणी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. वातावरणात धुसफूस होती. तशात संतप्त जमावाने संशयिताचे घर पेटविण्याचा प्रयत्न केला. शहर व ग्रामीण भागात ठीकठिकाणी रास्तारोको सुरू झाले. समाज माध्यमांवरून अफवांचे असे काही पेव फुटले की, हे संवेदनशील प्रकरण काही तासात वेगळ्याच वळणावर पोहोचले. पोलिसांनी रात्रीच वस्तुस्थिती, कारवाईचा तपशील मांडत अफवा रोखण्याचे आटोकाट प्रयत्न केले. पण तोपर्यंत हा विषय हाताबाहेर गेला होता.

 

०९ ऑक्टोबर २०१६

वातावरण रात्रीतून बदलले होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने नाशिकला धाव घेतली. सकाळी पीडित बालिका आणि तिच्या पालकांची भेट घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मग ते माध्यमांशी बोलले. अत्याचार झाला नाही, तसा प्रयत्न झालाय असे ते म्हणाले. तेच त्यांनी तळेगावच्या आंदोलकाना सांगितले. पण त्याचे वेगळेच अर्थ काढण्यात आले. संतप्त जमावाने पालकमंत्र्यांची वाट रोखली. निषेधाच्या घोषणा दिल्या. शेवटी त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. पोलिसांनी पालकमंत्र्यांना कसेबसे बाहेर काढत मार्गस्थ केले. काही वेळातच जमावाचा रोष पोलिसांच्या वाहनांवर निघाला. पालकमंत्र्यांच्या विधानाचा समाचार घेणारे संदेश एव्हाना समाजमाध्यमांवर फिरायला लागले. त्र्यंबकेश्वरलगत इगतपुरी तालुका आहे. दोन्ही तालुके आदिवासीबहुल. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाट चढून वर आल्यावर नाशिकच्या हद्दीत इगतपुरीच वाहनधारकांचे स्वागत करतो. संपूर्ण उत्तर भारताला देशाच्या आर्थिक राजधानीशी जोडणाऱ्या या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. याच तालुक्यात घोटीहून सिन्नरमार्गे थेट शिर्डीला जाणारा रस्ता आहे. बाहेरगावहून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना त्र्यंबकेश्वर येथे काय घडले, याची कल्पना असण्याचा प्रश्नच नव्हता. रात्री काही आंदोलने झाली असली तरी पुन्हा या परिसरात पडसाद उमटतील, याचा अंदाज यंत्रणेला बांधता आला नाही. अखेर व्हायचे तेच झाले. समाजकंटकांना निमित्त मिळाले.

रात्रीच्या आंदोलनाने रविवारी दुपारनंतर गंभीर वळण घेतले. या एकाच दिवशी एसटी बसेस, खासगी व पोलिसांची वाहने पेटविण्याचे अनेक प्रकार घडले. प्रवाशांना बाहेर काढून बसगाडय़ा पेटविल्या गेल्या. पाडळीफाटा येथे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. इगतपुरी तालुक्यातील काही गावांमध्ये पडसाद उमटले. काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत जाहीर झाली. गावातील राजकारण, हेवेदावे, जुने वाद याचे उट्टे काढण्यावर अनेकांनी या पाश्र्वभूमीवर भर दिल्याचे दिसून आले.

बाहेरील मंडळींनी गावात येऊन चिथावणी दिल्याचे, काही गावांत हल्ले केल्याचे ग्रामस्थ सांगतात. मागील काही महिन्यांत शहर पोलिसांनी शहरातील अनेक गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कातंर्गत कारवाई केली. या टोळ्यांशी संबंधित काही घटकांनी वातावरण पेटविण्यात हातभार लावला असल्याचे बोलले जात होते.

 

१० ऑक्टोबर २०१६

अफवांमुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती.  प्रशासनाने प्रथम त्यास प्रतिबंध घालण्यासाठी सकाळपासून जिल्ह्य़ातील मोबाइल इंटरनेट आणि व्हॉटस अ‍ॅप वगैरेंची सेवा बंद केली. पीडितेच्या गावात जाण्यास राजकीय पक्षांच्या नेत्यांना प्रतिबंध केला गेला. संवेदनशील भागात जादा कुमक नेण्यात आली. दरम्यान आता शांतता समितीच्या बैठकांचे सत्र सुरू झाले होते. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक संवेदनशील गावांमध्ये भेटी देऊन शांततेचे आवाहन करत होते. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया गतिमान झाली होती. किरकोळ घटनांचा अपवाद वगळता या दिवशी नाशिक शहरही तसे शांत होते. अफवांना प्रतिबंध बसल्याने तणाव निवळण्यास चांगलीच मदत झाली. पण ही वादळापूर्वीची शांतता ठरली.

 

११ ऑक्टोबर २०१६

विजयादशमी. लोकांची सणखरेदी जोरात सुरू होती. शहरातील बाजारपेठा झळाळल्या होत्या. पण संवेदनशील गावांत तणावाचे सावट होते. तेथे बंदोबस्त होताच. अन्यत्र जनजीवन पूर्वपदावर येत होते. एसटीसेवा सुरू करण्यात आली होती. पण.. या दिवशी विविध भागांत दुचाकीवर घोषणाबाजी करत फिरणाऱ्या टोळक्यांमुळे पुन्हा भीतीचे वातावरण पसरले. पोलिसांनी त्यांकडे दुर्लक्ष केले. सायंकाळी दुचाकीवरील काही टोळक्यांनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली. अनेक भागांत पुन्हा दगडफेक, वाहनांच्या जाळपोळीचे सत्र सुरू झाले. काही टोळकी दगडफेक करत त्र्यंबकेश्वरच्या दिशेने गेली. ती तिकडे का गेली, हे अनुत्तरितच राहिले. त्यांची वाटेतच दुसऱ्या गटाशी धुमश्चक्री उडाली. त्यावेळी जवळपास १५ हून अधिक दुचाकी जाळल्या गेल्या. परिस्थिती पुन्हा चिघळली. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वाहतूक पुन्हा बंद पडली.

 

१२ ऑक्टोबर २०१६

कालचे ‘बघे’ पोलीस या दिवशी सर्वशक्तीनिशी रस्त्यावर उतरले. ज्या भागात दगडफेक व तत्सम प्रकार घडत होते, तिथे संचलन करत दंगेखोरांना प्रसाद देण्यास सुरुवात केली. त्यात अनेक गुन्हे दाखल असलेला नाशिक रोडमधील भाजपचा नगरसेवक पवन पवारही सापडला. त्याने थेट यंत्रणेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्याचा भाऊ पोलीस उपायुक्तांच्या अंगावर धाऊन गेला. पोलिसांनी या सर्वाना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. काही विशिष्ट घटकांच्या चिथावणीमुळे वातावरण बिघडत असल्याचे यंत्रणेच्याही लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अशा घटकांविरुद्ध कारवाई करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यात माजी नगरसेवक व त्याच्या समर्थकांवरही कारवाई केली गेली. खरे तर ही कारवाई पहिल्या दिवशीपासून होणे अपेक्षित होते.

शेवगेडांग गावात दाखल झालेल्या गुन्ह्य़ात संशयितांना अटक करताना घरातील महिलांनी विरोध केला. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तीन महिलांना अटक करण्यात आली. यामुळे संतप्त ग्रामस्थ शिवसेनेचे खा. हेमंत गोडसे यांना घेऊन घोटी पोलीस ठाण्यावर धडकले. महिलांना अटक कशी केली यावरून खडाजंगी झाली. पोलिसांनी ग्रामस्थांना बेदम मारहाण केल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी केली गेली. पोलीस ठाण्यातून अटकेतील महिलांची सुटका करण्याचा प्रयत्न झाला. परंतु तसे केल्यास लोकप्रतिनिधींवर गुन्हा दाखल होईल, याची जाणीव वरिष्ठांनी करून दिल्यामुळे खासदारांनी एक पाऊल मागे घेतल्याचे सांगितले जाते.

दुसरीकडे पीडितेच्या भेटीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात राजकीय नेत्यांची रीघ लागली होती. त्यात सत्ताधारी जसे होते, तसेच विरोधी पक्षातील नेतेही होते. आपल्या कार्यकर्त्यांशी बंद दाराआड चर्चा करत प्रत्येकाने बाहेर शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्र्यंबक आणि इगतपुरी तालुक्यातील संवेदनशील गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. अफवा पसरू नये म्हणून भ्रमणध्वनीवरील इंटनेट बंदची मुदतही तीन दिवसांनी वाढवत यंत्रणेने स्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले.

 

१३ ऑक्टोबर २०१६

चांदवड येथील बंद आणि भगूरमधील दगडफेक वगळता चार दिवसांपासून धुमसत असलेले नाशिक बऱ्यापैकी शांत झाले. भावना भडकावणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे या कारणावरून गुन्हा दाखल झालेल्या भाजपवासी नगरसेवक पवन पवारच्या घर आणि कार्यालयाच्या झडतीत दोन पिस्तूल, जिवंत काडतुसे, तलवारी, जांभिया, मिरचीची पूड व दगडांनी भरलेली गोणी असा शस्त्रसाठा सापडला. दंगेखोरांच्या उच्छादात सार्वजनिक मालमत्तेसह एसटी बसेस व खासगी वाहनांचे कोटय़वधींचे नुकसान झाले. एसटी महामंडळाला दीड कोटीच्या नुकसानीसह सलग चार दिवस दैनंदिन ७५ लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. त्र्यंबक व इगतपुरीतील संवेदनशील गावे वगळता जनजीवन पूर्वपदावर आले होते..

 

१४ ऑक्टोबर २०१६

आजवर ४७ गुन्हे दाखल. दीडशेहून अधिक जणांना अटक. त्यात समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या सात आणि ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यान्वये दाखल झालेल्या सहा गुन्ह्य़ांचाही अंतर्भाव. कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी सहा पोलिसांची चौकशी.. कारवाई सुरू झाली होती..  दंगल स्थितीला राजकीय किनार आहे. निवडणुकीतील इच्छुक आणि काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी वातावरण दूषित करण्यात हातभार लावला, असे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगत होते. यामुळे पकडलेले दंगेखोर कोणत्या राजकीय पक्ष वा संघटनेशी संबंधित आहेत त्याची छाननी सुरू झाली.

 

१५ ऑक्टोबर २०१६

एका आठवडय़ाचा फेरा आज संपला. तणाव पूर्णपणे निवळला आहे. पण आतल्या धुसफुशीचे काय? अफवा रोखण्यासाठी सलग पाच दिवस बंद ठेवलेली मोबाइल इंटरनेट सेवा दुपारपासून सुरू करण्यात आली. ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत १२१ जणांना तर शहर पोलिसांनी ३५ जणांना अटक केली आहे. त्यात समाजमाध्यमांवर अफवा पसरविण्यास हातभार लावणाऱ्या काही ग्रुपचे अ‍ॅडमिन व सदस्यांचाही समावेश आहे.. व्हॉट्स अ‍ॅपने तेल ओतलेली ही दंगल. ती आता शमली आहे. राखेखालच्या निखाऱ्यांचे मात्र काही सांगता येत नाही..

संकलन : अनिकेत साठे