पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच पाकिस्तानला अकस्मात भेट देऊन सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याची चर्चा अजूनही सुरू असताना पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर काल अतिरेकी हल्ला झाला. सीमा सुरक्षा दलाची तटबंदी कुचकामी ठरली, तर पंजाब पोलीसही गाफील राहिले. बोटावर मोजता येतील, इतक्या दहशतवाद्यांनी संपूर्ण देशाला दिलेल्या आव्हानात नेमकी कोणाशी सरशी झाली?
नवीन वर्षांतील दुसरा दिवस पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरील अतिरेकी हल्ल्याने उजाडला. अर्थात, पाकपुरस्कृत गटांकडून भारतावर झालेला हा काही पहिलाच हल्ला नाही. आजवर असे अगणित हल्ले पाकिस्तानी अतिरेक्यांनी केले आणि लीलया ते पचविलेदेखील. पाकिस्तानी लष्कर व दहशतवाद्यांची ही नियोजनबद्ध रणनीती लक्षात घेऊन आवश्यक ती सावधगिरी बाळगली जात नाही, तोपर्यंत सीमेसह देशांतर्गत अशा छुप्या युद्धाला वारंवार तोंड देणे भाग पडणार आहे. हवाई तळावर हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले. त्यात तीन जवान शहीद झाले. मरणाच्या तयारीने आलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यामुळे देशवासीयांमध्ये विजयोत्सवाची लकेर उमटणे स्वाभाविकच. परंतु या छुप्या लढाईत कोण जिंकते आणि कोण पराभूत होते, हे सुज्ञांस सांगणे न लगे.
शेजाऱ्यांशी सौहार्दाचे संबंध राखण्याची भारताची मनीषा ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच पाकिस्तानला अकस्मात भेट देऊन सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला होता. भेटीचे निमित्त पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या जन्मदिनी अभीष्टचिंतनाचे होते. त्यातून उभय देशांत चर्चेचे दरवाजे किलकिले झाल्याचे आश्वासक वातावरण तयार झाले. अनेक महिन्यांपासून थांबलेला संवाद सुरू होण्यासाठी भारताने पाऊल उचलत हा मार्ग प्रशस्त केला. या चर्चामधून काय निष्पन्न होईल, यापेक्षा शेजाऱ्याशी संवादाचा धागा कायम ठेवणे कधीही आवश्यकच. सत्तेवर असताना काँग्रेसने राबविलेले धोरण भाजपलाही राबविणे क्रमप्राप्त ठरले. भारत आणि पाकिस्तानचे पंतप्रधान एकमेकांना भेटणे, द्विपक्षीय चर्चेची तयारी करणे म्हणजे संबंध सुधारले वा मैत्रीपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली, असे म्हणता येणार नाही. कारण फाळणीनंतर आजपर्यंत काही अपवादात्मक कालावधी वगळता उभयतांमध्ये प्रदीर्घ काळ चर्चा होऊनही तसे सुचिन्ह दृष्टिपथास आलेले नाही. तरीदेखील आपले म्हणणे मांडण्यासाठी या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होते.
भारत-पाक यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होऊ नये, असे पाकिस्तानातील दहशतवादी गटांना वाटते. त्यामुळे चर्चेच्या मार्गात खोडा घालण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून होणार, याचे आकलन करण्यात भारतीय गुप्तचर यंत्रणा कमी पडली. संवादाचा श्रीगणेशा होत असताना संवेदनशील ठिकाणांवर हल्ल्याद्वारे तो पूल उखडण्याचा प्रयत्न होईल, हे जोखून या काळात अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज होती. ती न बाळगल्याचा परिपाक पठाणकोटच्या हल्ल्यात झाल्याचे दिसून येते. या घटनेमुळे उभय देशात संबंध ताणले जाणार हे ओघाने आलेच. परंतु त्यामुळे चर्चेच्या मार्गात अवरोध आल्यास दहशतवादी गटांचे ईप्सित साध्य होणार आहे.
केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पंजाबमधील हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. पठाणकोट पाकिस्तानी सीमेपासून केवळ ४० किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण निवडण्यामागे जम्मू-काश्मीरमध्ये सध्या होणारी बर्फवृष्टी कारण असू शकते. या स्थितीत त्या भागातून शिरकाव करणे अवघड ठरते. हवाई तळावरील हल्ला करणारे हे दहशतवादी प्राथमिक अंदाजानुसार पाकिस्तानातून सीमा ओलांडून भारतीय हद्दीत शिरले. त्यांची संख्या पाच ते दहाच्या आसपास असल्याचा संशय आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरून दहशतवादी भारतीय भूमीत शिरकाव करत असताना लोखंडी तारांचे कुंपण आणि या क्षेत्राची जबाबदारी सांभाळणाऱ्या सीमा सुरक्षा दलाची तटबंदी कितपत उपयुक्त ठरली, हा प्रश्न राहतोच. त्या जोडीला गाफील राहिलेले पंजाब पोलीस. आपल्या अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याचे मोटारीसह अपहरण होऊनही या यंत्रणेने पुरेशी सतर्कता बाळगली नसल्याचे दिसते. ही दक्षता बाळगली असती तर दहशतवाद्यांना हवाई तळाच्या आसपासही फिरकता आले नसते. बाहेरच त्यांचा खात्मा करता आला असता. काही दिवसांपूर्वी हेरगिरीच्या संशयावरून हवाई दलातील काही माजी अधिकाऱ्यांना अटक झाली होती. संबंधितांनी हवाई दलाच्या संवेदनशील ठिकाणांची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरविल्याचा संशय आहे. त्या माहितीचा उपयोग दहशतवाद्यांनी या हल्ल्यावेळी केला काय, याची खातरजमा होण्याची गरज आहे. अनोळखी भूमीत शिरकाव करून इतक्या सहजपणे एखाद्या संवेदनशील ठिकाणापर्यंत पोहोचणे खचितच अवघड. संबंधितांना स्थानिक पातळीवर काही मदत मिळाली काय, याची छाननी करावी लागणार आहे. या घटनेआधीच दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आल्याचा दावा गुप्तचर यंत्रणा करत आहे. त्याआधारे हवाई तळाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली गेली होती. यामुळे दहशतवाद्यांना लढाऊ विमाने वा हेलिकॉप्टपर्यंत पोहोचता आले नाही, हेच काय ते सुदैव म्हणायचे.
पाकिस्तानातील अनेक दहशतवादी गटांना पाक लष्कर आणि आयएसआय गुप्तचर संस्थेचा पाठिंबा आहे. भारतातील काही गटांना खतपाणी घालण्याचे काम त्यांच्याकडून सुरू असते. पंजाबमध्ये जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि त्याच्या खलिस्तानवादी चळवळीचे पडसाद आजही अधूनमधून उमटत आहेत. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ मोहिमेचा संदर्भ देत तरुण पिढीची दिशाभूल करून भावना भडकविण्याचे पद्धतशीर प्रयत्न होत आहेत. या घडामोडींचा उपरोक्त घटनेशी काही संबंध आढळतो काय, याचा विचार तपास यंत्रणेला करावा लागणार आहे. पाकिस्तानची सूत्रे वरकरणी पंतप्रधानांकडे असली, तरी देशाचे धोरण व रणनीती प्रत्यक्षात लष्करच निश्चित करते. पाकिस्तानी लष्कराच्या इच्छेशिवाय त्यांचे पंतप्रधान काहीच करू शकत नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. आजवरचा इतिहास लक्षात घेतल्यास भारत-पाक चर्चेला पाकिस्तानने कधीच नकार दिलेला नाही. दोन्ही देशांच्या राज्यकर्त्यांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असो वा नसो, आपले कुटिल डावपेच पुढे रेटणे पाकिस्तानी लष्कराचा एककलमी कार्यक्रम आहे. त्यासाठी दहशतवादी गटांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पुरेपूर वापर करवून घेतला जातो.
प्रत्यक्ष रणभूमीवरील एकाही युद्धात पाकिस्तानी लष्करास आजवर यश मिळालेले नाही. समोरासमोरील लढाईत भारतीय सैन्याशी दोन हात करणे अवघड आणि आर्थिकदृष्टय़ा जिकिरीचे असल्याने त्याने छुप्या युद्धाचा सोपा आणि स्वस्त मार्ग अनुसरला आहे. गनिमी काव्याने लढल्या जाणाऱ्या या युद्धात पाकिस्तानी लष्कराचा थेट संबंध असूनही तो उघड होत नाही.
भारतातील अनेक हल्ल्यांत तो स्पष्ट होऊनही पाकिस्तान त्यास दाद देत नाही. अनेक वर्षांपासून चाललेल्या छुप्या पद्धतीच्या युद्धात भारतात शक्य तिथे हल्ले करत दहशतवादी अराजक माजविण्याचा प्रयत्न करत आहेत.

पठाणकोटमधील हल्ल्यानंतर देशाची अवघी सुरक्षा यंत्रणा कार्यप्रवण झाली. चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यावर भारतीय लष्कराने आणखी काही दहशतवादी लपून बसल्याच्या संशयावरून पठाणकोट परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली. दिवसभर चाललेल्या या मोहिमेत हवाई दलाचे हेलिकॉप्टर सहभागी झाले. वैमानिकरहित (ड्रोन्स) विमानांचाही शोधमोहिमेत वापर करण्यात आला. दिल्लीत लष्कराच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आपत्कालीन बैठक बोलावली गेली. देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला. बोटावर मोजता येतील, इतक्या दहशतवाद्यांनी संपूर्ण देशाला दिलेल्या आव्हानात नेमकी कोणाशी सरशी झाली?

aniket.sathe@expressindia.com