News Flash

तुरुंगातल्या २७ वर्षांनीच मला खऱ्या अर्थानं घडवलं..

मागे एकदा तुम्ही म्हणाला होतात की, जर तुम्ही तुरुंगात गेला नसतात तर आयुष्यातली एक मोठी गोष्ट तुम्ही साधली नसतीत, ती म्हणजे आत्मपरिवर्तन! तुरुंगातल्या २७ वर्षांनी

| December 7, 2013 03:16 am

ऑप्रा विन्फ्रे :मागे एकदा तुम्ही म्हणाला होतात की, जर तुम्ही तुरुंगात गेला नसतात तर आयुष्यातली एक मोठी गोष्ट तुम्ही साधली नसतीत, ती म्हणजे आत्मपरिवर्तन! तुरुंगातल्या २७ वर्षांनी तुमच्या व्यक्तिमत्त्वात नेमका काय बदल साधला?
मंडेला : तुरुंगात जाण्याआधी मी दक्षिण आफ्रिकेतल्या एका आघाडीच्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून राबत होतो. माझा दिवस सकाळी सात वाजता सुरू व्हायचा आणि मध्यरात्रीपर्यंत मी चळवळीतच गुंतून असायचो. आपण जे काही करीत आहोत त्याबद्दल विचार करायला मला उसंतच नव्हती. कामाच्या धबडग्यानं मला शारीरिक आणि मानसिक थकवाही खूप येऊ लागला होता आणि त्यापायी माझ्या बौद्धिक क्षमतेच्या तोडीचं कामदेखील मला साधेनासं झालं होतं. तुरुंगातल्या एकांतकोठडीनं मात्र मला विचार करायला वेळ दिला. माझ्या भूतकाळाचा आणि वर्तमानकाळाचा स्वच्छ विचार करायची संधी दिली. मग मला जाणवलं की माझा भूतकाळ हा बेपर्वाईनं भरलेला होता. मग ती बेपर्वाई नातेसंबंधातील असो की व्यक्तिगत प्रगतीपुरती असो.
ऑप्रा : म्हणजे नेमका कसा काळ होता तो?
मंडेला : मी घरातच थांबलो असतो तर मला घरच्यांनी ठरविलेल्या मुलीशी लग्न करावं लागलं असतं. म्हणून घरातून पळून मी १९४० च्या सुमारास जोहान्सबर्गला आलो. हा त्यांच्यासाठी मोठाच धक्का होता. त्यामुळे त्यांच्या वागण्यात परकेपणा आला. जोहान्सबर्गमध्ये मला काही प्रेमळ माणसंही भेटली, पण मी कायद्याचा अभ्यास पूर्ण करून वकील झाल्यावर राजकारणातही इतका गढलो की त्या माणसांची फिकीरही मी केली नाही. मी तुरुंगात गेलो तेव्हा मला सगळ्यांची आठवण येऊ लागली! यातल्या अनेकांनी माझ्यासाठी इतकं काही केलं होतं की मी त्यांना भेटून एका शब्दानंदेखील कृतज्ञता का व्यक्त केली नाही, याचंही आश्चर्य वाटून मी खंतावलो. दुसऱ्यानं केलेल्या पाठराखणीची कदरदेखील न बाळगण्याइतका मी क्षुद्र बनलो होतो, याची जाणीव मला झाली. तुमच्यासाठी कुणी काही चांगलं केलं तर त्याची जाण ठेवा आणि तो भाव त्यांच्यापर्यंत कृतीतून पोहोचू द्या, हे तुरुंगानंच शिकवलं.
ऑप्रा : हा भाव कायमचा आहे?
मंडेला : मग? आजही मी तेच तर करीत आहे. जे गरीब आहेत, निरक्षर आहेत, रोगग्रस्त आहेत अशा तळागाळातल्या माणसाच्या जीवनात थोडा का होईना, आनंद आणण्यासाठी काय करावं, या विचारातच मला जाग येते.
ऑप्रा : तुम्ही गजाआड गेलात तेव्हा तुमच्या मुली अवघ्या दोन-तीन वर्षांच्या होत्या, आणि त्या १६ वर्षांच्या होईपर्यंत तुम्ही त्यांना एकदाही पाहूदेखील शकला नाहीत! तुम्ही या वास्तवाला कसं पचवलंत?
मंडेला : तब्बल २७ वर्षे मी त्यांनाच काय, एकाही लहान मुलाला ओझरतंदेखील पाहू शकलो नाही. तुरुंगापायी भोगावी लागणारी ही खरं तर सर्वात मोठी सजा आहे. त्यामुळेच मुलांबद्दल माझं मन अत्यंत प्रेमानं उचंबळून येतं. मुलं ही घराची आणि पर्यायानं देशाची फार मोठी संपत्ती आहे. ही संपत्ती जोपासण्यासाठीच त्यांना पालकांकडून योग्य शिक्षण आणि प्रेम मिळालं पाहिजे. तुम्ही तुरुंगात असता तेव्हा तुमच्या मुलांना या गोष्टी तुम्ही देऊ शकत नाही.
ऑप्रा : तुरुंगामुळे आणखी काय गमावलंत?
मंडेला : माझ्या लोकांचा सहवास गमावला. अर्थात खरं सांगायचं तर जे तुरुंगाबाहेर होते, त्यांचीच परिस्थिती खडतर होती! तुरुंगात आम्हाला तीनदा खायला मिळे, कपडे मिळत, वैद्यकीय उपचार मोफत होते आणि आम्ही १२ तास झोपू शकत होतो. तुरुंगाबाहेर हे सुख नव्हतं.
ऑप्रा : तुरुंगात तुम्ही आणि तुमचे सहकारी शिकूही लागलात त्यामागे काय हेतू होता?
मंडेला : शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची प्रगती केवळ अशक्य आहे. जो देश प्रगतीपथावर आहे त्याचे नागरिकही शिक्षणात प्रगती साधत असलेच पाहिजेत. शिक्षण हे स्वातंत्र्यासाठीचं सर्वात मोठं हत्यार आहे आणि ते आम्ही ताब्यात घेतलंच पाहिजे, ही जाणीव आम्हाला झाली होती.
ऑप्रा : तुम्ही अधिक सुज्ञ बनून बाहेर आलात?
मंडेला : निदान मी कमी अडाणी तरी राहिलो होतो! उत्तमोत्तम साहित्यानं माझी वैचारिक जडणघडण केली होती. तुरुंगातून बाहेर पडताना माझ्यात कितीतरी समज आली होती. तुमची समज जितकी वाढते तितका तुमच्यातला उर्मटपणा आणि दुराग्रहीपणा कमी होत जातो.
ऑप्रा : तुम्ही उर्मट होतात?
मंडेला : तरुणपणी मी खूप उद्धट होतो. तुरुंगानं मला अहंकारातून मुक्त व्हायला शिकवलं. माझ्या उद्धटपणामुळं मी अनेक शत्रू निर्माण केले होते.
ऑप्रा : अजून कोणते दुर्गुण होते?
मंडेला : ज्या गोष्टी आपल्याला जोडतात त्या पाहता येण्याऐवजी ज्या तोडतात त्याच पाहता येण्याची क्षमता! नेत्यानं तर चर्चेकडे खुलेपणानं पाहिलं पाहिजे आणि त्याला ही खात्री पाहिजे की, कोणत्याही वादचर्चेच्या शेवटी दोन्ही बाजूंना अधिक जवळ आणणं आपल्याला साधेल! ज्या नेत्याला हे साधतं त्याचीच ताकद खऱ्या अर्थानं वाढते. खऱ्या नेत्यानं संकटात सर्वात पुढं असलं पाहिजे आणि जल्लोषाच्या प्रसंगी मागं राहून लोकांना पुढे केलं पाहिजे.
ऑप्रा : तुम्ही सात बाय नऊ फुटांच्या कोठडीत कित्येक र्वष जखडला होतात, हे काही केल्या मला स्वीकारता येत नाही.
मंडेला : मला त्या लहानशा जागेची सवयच झाली होती. त्यातच मी रोज सकाळी आणि संध्याकाळी व्यायाम करायचो. पण आज ती जागा पाहताना मलाही आश्चर्य वाटतं की या एवढय़ाशा जागेत कसे काय तगून राहिलो!
ऑप्रा : माणूस मुळात चांगला असतो का?
मंडेला : यात काहीच शंका नाही, फक्त दुसऱ्यातला चांगुलपणा प्रकटला पाहिजे. वर्णद्वेषविरोधी लढय़ात, जे आमचा द्वेष करीत होते अशाही कित्येकांचे मनपरिवर्तन आम्ही करू शकलो, कारण आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहेच, याची जाणीवही त्यांना झाली.
ऑप्रा : हिंसाचार सोडण्याची हमी दिल्यास तुम्हाला मुदतीआधी सुटकेची संधी मिळाली होती. ती तुम्ही नाकारली होती. तुमचा हिंसेवर विश्वास आहे?
मंडेला : नाही. पण हिंसा त्यांनी सुरू केली होती. आमची हिंसा ही आत्मरक्षणापुरती होती. मी कोणत्याही अटींवर तसेच माझ्या सहकाऱ्यांना सोडून एकटा मुक्त होऊ इच्छित नव्हतो. तुरुंगाबाहेरील लोकांनी जागतिक जनमत संघटित करण्यासाठी भले माझंच नाव मोठं केलं असेल, पण माझ्या काही सहकाऱ्यांनी माझ्यापेक्षादेखील अधिक तुरुंगवास भोगला होता. त्याची जाण मी बाळगली नाही तर मी कृतघ्न ठरेन.
ऑप्रा : ७१व्या वर्षी सुटका, हा पुनर्जन्मच होता नाही?
मंडेला : हो. तुरुंगाबाहेर प्रचंड जनसागर माझ्या स्वागतासाठी उसळला आहे, याची मला कल्पनाही नव्हती.
ऑप्रा : तुम्ही कमालीचे अत्याचार सहन करत असतानाही स्वत:ची प्रतिष्ठा जपलीत यामुळे मला तुमचा अभिमान वाटतो. तुम्हालाही स्वत:चा अभिमान वाटत असेलच ना?
मंडेला : तुझ्या आत्मीयतेबद्दल मी आभारी आहे ऑप्रा. पण तुझ्या मनात माझी जी प्रतिमा आहे, तसा मी नेहमीच नव्हतो, हेही मलाच प्रांजळपणे सांगितलं पाहिजे.
ऑप्रा : तुम्हाला मृत्यूची भीती वाटते का?
मंडेला : नाही. शेक्सपिअरच्याच शब्दांत सांगायचं तर, भेकड माणूस मृत्यूआधी अनेकदा मेलेलाच असतो, वीर पुरुष मात्र मृत्यूची चव एकदाच आणि अखेरचीच चाखतो. मृत्यू आजूबाजूला पाहात असूनही माणसाला मृत्यूची भीती वाटते, हे मला जगातलं सर्वात मोठं आश्चर्य वाटतं. मृत्यू म्हणजेच शेवट हा अटळच आहे. तो यायचा तेव्हा येईल.
(प्रख्यात मुलाखतकार ऑप्रा विन्फ्रे यांनी घेतलेली व ‘ओ’ मासिकामध्ये  प्रसिद्ध झालेली मुलाखत. )
    अनुवाद – उमेश करंदीकर

जगातील ज्या लाखो लोकांना मंडेलांनी प्रेरणा दिली त्यात  मीही एक आहे. मी जी पहिली राजकीय कृती केली होती ती वर्णविद्वेषविरोधी राजकारण व धोरणाशीच संबंधित होती. ते आमचेच आहेत असे नव्हेत तर अनेक युगांचे आहेत.
 – अमेरिकेचे अध्यक्ष , बराक ओबामा

दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला यांनी वर्णविरोधी लढा देताना व्यक्तिगत पातळीवर अनेक त्याग केले. न्यायासाठी ते झटले. अतिशय उच्च अशी कामगिरी, चांगला माणूस यामुळे ते नावाजले गेले. त्यांच्या लढय़ाने अनेकांना प्रेरणा दिली, जगाच्या पटलावरचे ते एक महान व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने आम्हाला वाईट वाटले.
-संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस,  बान की मून

महात्मा गांधी हे आपले प्रेरणास्थान होते असे मंडेला सांगत असत, ते खरे गांधीवादी होते. ते एक महान व्यक्तिीमत्त्व होते. अन्याय व दडपशाहीच्या विरोधात लढणाऱ्यांसाठी ते आशेचे स्थान होते. त्यांच्या निधनाने भारत व दक्षिण आफ्रिकेचे मोठे नुकसान झाले आहे.
-पंतप्रधान मनमोहन सिंग

नेल्सन मंडेला यांनी त्यांच्या देशाच्या भल्यासाठी खूप मोठे काम केले आहे. शांततामय दक्षिण आफ्रिका हा त्यांनी उभा केलेला वारसा आहे, त्यांच्या निधनाने मला तीव्र दुख झाले.
-ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ

आपल्या जगातील चमकदार असा प्रकाश विझला आहे. नेल्सन मंडेला हे केवळ आमच्या काळाचे नायक नाहीत तर ते सर्वकालीन नायक आहेत. ते स्ततंत्र दक्षिण आफ्रिकेचे पहिले अध्यक्ष होते. त्यांनी स्वातंत्र्य व न्यायासाठी खूप सोसले होते.
– ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून

नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी व जगासाठी ऐतिहासिक कामगिरी केली ती प्रशंसनीयच आहे.
– चीनचे पंतप्रधान झी जिनपिंग

आधुनिक काळातील महान राजकारणी हरपला. मंडेला खूप हालअपेष्टांना सामोरे गेले व जीवनाच्या अखेरीपर्यंत मानवता व न्यायाच्या आदर्शासाठी वचनबद्ध राहिले.
– रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर मेदवेदेव

नेल्सन मंडेला हे राजकीय नेत्यापेक्षा नैतिकतावादी नेते म्हणून लक्षात राहतील.
– ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॉट

नेल्सन मंडेला यांनी दक्षिण आफ्रिकेतच नव्हे तर जगात इतिहास घडवला. वर्णविद्वेषाविरोधात न थकता लढा देणारा नेता हरपला त्यांनी आपल्या धैर्याने, हट्टाने, पिच्छा पुरवून वर्णविद्वेषाविरोधातील लढाई जिंकली.
– फ्रान्सचे अध्यक्ष, फ्रँकॉइस ऑलाँद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 3:16 am

Web Title: that 27 years in prison teaches realty nelson mandela
टॅग : Nelson Mandela
Next Stories
1 वर्णभेदविरोधी लढय़ाचे प्रणेते नेल्सन मंडेला यांचे निधन
2 .. आणि ती बातमीही जनतेने शांतपणे पचविली !
3 नेतृत्वाचे अष्टपलू
Just Now!
X