इमारतीच्या ३० पायऱ्या, त्यावरले आठ डोरिक पद्धतीचे स्तंभ असा स्थापत्यशास्त्राचा डौल असलेली ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ ही भारदस्त संस्था आहे. मुंबई हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचंच असल्याचं ब्रिटिशांनी जाणलं होतं, याची १८१ वर्षांपूर्वीची एक खूण म्हणजे या संस्थेची इमारत. मुळात ही इमारत ‘टाउन हॉल’ म्हणून बांधली गेली. तिच्या उभारणीसाठी एशियाटिक सोसायटीनं १० हजार रुपये (२०० वर्षांपूर्वी) दिले. ग्रंथालयासोबत इथं शहरातील कर्तेधर्ते लोक एकमेकांना भेटत, अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुंबई इलाख्यासाठी पुढल्या योजना ठरवत. इथल्या ‘दरबार हॉल’मध्ये आज विद्वानांची भाषणं होतात, तिथंच कधीकाळी न्यायदानाचं कामही चाले. ‘सत्ता आणि ज्ञानाची मत्ता हे दोन्ही इथं नांदे’ असा टाउन हॉलबद्दलचा सार्थ उल्लेख ‘झीरो पॉइंट बॉम्बे’ या केवळ हॉर्निमन सर्कलच्या इतिहास आणि वर्तमानाबद्दल १७ तज्ज्ञांनी लिहिलेल्या १७६ पानी पुस्तकात आहे. ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’नंच हे पुस्तक २००८ मध्ये प्रकाशित केलं. संग्रहातून संशोधनाला प्रोत्साहन, त्यातून पुढे नवी ग्रंथनिर्मिती असं ज्ञानाचं वर्तुळ या संस्थेनं अनेकदा पूर्ण केलं आहे. या संस्थेनं प्रकाशित केलेल्या ग्रंथांपैकी अनेक मुंबईच्या अभ्यासासाठी जिज्ञासूंना मदत करणारे आहेत, हे विशेष.
ही संस्था स्थापन झाली परळला गव्हर्नरच्या बंगल्यात, म्हणजे आजच्या ‘हाफकिन इन्स्टिटय़ूट’च्या वास्तूत. या बंगल्यात एकटेच राहणारे तेव्हाचे गव्हर्नर जोनाथन डंकन यांच्या उदार आश्रयाखाली, सर जेम्स मॅकिन्टॉश यांनी २६ नोव्हेंबर १८०४ रोजी स्वतचा (लवाजम्यासोबत, विलायतेहून आणलेला) ग्रंथसंग्रह खुला करून स्थापलेल्या या
संस्थेनं १८४० सालापासून भारतीय विद्वान आणि कर्तृत्ववान माणसं जोडली. तोवर मात्र संस्थेचे सर्व सदस्य ब्रिटिश अथवा युरोपीय होते. सर माणेकजी करसेटजी हे या सोसायटीचे पहिले भारतीय सदस्य. जगन्नाथ शंकरशेट, जीजिभाई जमशेटजी हे नगरपितेही या संस्थेचे सदस्य होते (या दोघांचे मूळ पूर्णाकृती संगमरवरी पुतळेही संस्थेतच आहेत). विल्सन कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉ. जॉन विल्सन हे सोसायटीचे अध्यक्ष होते आणि डॉ. भाऊ दाजी लाड, न्यायमूर्ती के. टी. तेलंग, सर जीवनजी मोदी, प्राच्यविद्यापंडित रा. गो. भांडारकर, डॉ. शंकर पांडुरंग पंडित, हे विद्वज्जन संस्थेशी संबंधित होते. याच संस्थेत महामहोपाध्याय आणि भारतरत्न पां. वा. काणे यांनी ‘धर्मशास्त्राचा इतिहास’ हा ग्रंथ सिद्ध केला. दुर्गा भागवतांनीही अनेक ग्रंथ इथे अभ्यासले. आजही २५ ‘रिसर्च डेस्क’ आहेत, तिथे संशोधकांचे काम सुरू असतेच, यापैकी दोघा संशोधकांना सोसायटीतर्फे अल्प (२५ हजार रु.) शिष्यवृत्तीही प्रदान केली जाते. शिवाय अन्य सदस्यही आपापल्या हौसेसाठी, आवडीच्या विषयांचा सखोल अभ्यास करायला अगदी वयाच्या सत्तरीनंतरही येथे येतात. उदाहरणार्थ, चित्रपट-इतिहासाचे अभ्यासक धरमशी किंवा मराठीइतकाच बंगाली साहित्याचा अभ्यास असलेले अशोक शहाणे यांसारख्या अनेकांची ज्ञानतृष्णा ‘एशियाटिक’मधल्या ग्रंथांनी, जुन्या दैनिकांसारख्या अन्य संदर्भसाहित्याने भागते. ‘बॉम्बे’चे ‘मुंबई’ झाल्यानंतर आपले नावही बदलणाऱ्या पहिल्या काही संस्थांपैकी ‘एशियाटिक सोसायटी’ आहे!
संशोधनाची संस्कृती आणि शहराचीच सभ्यता जपणारी ही मोठय़ा नावारूपाची, खानदानी संस्था! आपल्या मदतीविना तिचं काय अडणार आहे किंवा सरकार तर तिला मदत करतंच आहे असं क्षणभर कुणाला वाटेलही.. पण प्रश्न केवळ संस्थेला गरज असण्याचा नाहीच. आपल्याच एका महान संस्थेशी असलेलं नातं सिद्ध करण्याची ही आपल्याला संधी आहे. नऊ कोटी ७३ लाख ३५ हजार रुपये हा केवळ ग्रंथ आणि पोथ्यांच्या ‘डिजिटायझेशन’चा खर्च; त्यामुळे केवळ राज्य सरकारने आश्वस्त केलेले पाच कोटी पुरणार नाहीतच, पण ‘लोकसत्ता’च्या वाचकांना त्याहीपेक्षा मोलाचं वाटेल ते हे की, ही या ऐतिहासिक संस्थेची आजवरची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना असून तिचा थेट फायदा पुढील पिढय़ांना होणार आहे.

मोठी संस्था, मोठा खर्च
याच ‘एशियाटिक सोसायटी’च्या तळघरात, १९८०च्या दशकात काही जुने ग्रंथ पावसाच्या पाण्याने भिजून, त्यांना वाळवीही लागली होती. ग्रंथसंहाराच्या त्या स्थितीपासून वेळीच धडे घेऊन या संस्थेच्या तत्कालीन धुरिणांनी दानशूर व्यक्ती आणि कंपन्यांना, संस्थेच्या संधारण-कामासाठी मदत करण्याचे आवाहन केले. ‘दरबार हॉल’मधील गळती रोखण्यापासून, पुस्तकांसाठी नवे लोखंडी रॅक बसवून प्रत्यक्ष पुस्तकांच्या संधारणापर्यंत अनेकपरींच्या खर्चासाठी मदत मिळाली.
संगणकीकरण- ‘डिजिटायझेशन’ हा त्यापुढला प्रकल्प आहे. त्याची प्राथमिक अवस्था सुमारे १५ वर्षांपूर्वीच सुरू झाली असली, तरी भरपूर काम अद्यापही बाकी आहे आणि मुख्य म्हणजे, पुस्तकांचे ‘वृद्ध’ वय, अनेक पुस्तकांत चित्रे, नकाशे आदी असल्याने करावी लागणारी विशेष योजना यासाठी सरधोपट डिजिटायझेशन उपयोगाचे नाही. तज्ज्ञांचे पथक याकामी लागले आहेच. ग्रंथाचे पान ‘स्कॅन’ झाल्यावर ते आणखी एका संगणकीय कार्यक्रमाद्वारे साफसूफ करून घेण्यात येते. असे स्वच्छ पान मग संगणकीय स्वरूपात साठवण्यासाठी त्याची फाइल-साइझ कमी करावी लागते.. कामाचे हे टप्पे आता ओलांडले जात आहेत. पुस्तकांपेक्षा नकाशांच्या संगणकीकरणाचे काम अधिक जिकिरीचे असून, ते अद्याप मार्गी लागलेले नाही.

course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Gokhale Institute Pune
मतदार जागृतीच्या फलकावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’; पुण्यातील गोखले संस्थेतील घटना
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती

ग्रंथ आणि वस्तूदेखील
‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ ही पुस्तकांसाठी ओळखली जात असली, तरी सोपारा येथील (शूर्पारक) उत्खननात मिळालेल्या वस्तूदेखील येथे आहेत. सोसायटीचा जुन्या नाण्यांचा संग्रह अव्वल म्हणावा असा आहे. पाचव्या शतकातील समुद्रगुप्तकालीन नाण्यापासून, १५२६ सालचे अकबरकालीन नाणे आणि छत्रपती शिवरायांच्या राजवटीत वापरली जाणारी नाणी येथे असून विविध नाण्यांची एकंदर संख्या १२००० आहे!

ज्ञान ‘दिल्याने’ वाढते..
सुमारे दहा कोटी रुपयांची गरज या संस्थेला फक्त ‘डिजिटायझेशन’च्या प्रकल्पासाठी आहे.
यासाठी संस्थेने ‘दत्तक ग्रंथ योजना’देखील १९९०च्या दशकातच सुरू केली आहे.
रु. १००० भरून, तुम्ही एक पुस्तक ‘दत्तक’ घेऊ शकता- म्हणजे, त्या पुस्तकाचे मायक्रोफिल्म (किंवा संगणकीकरण) होण्यासाठीचा तेवढा तरी खर्च उचलू शकता.

धनादेश या नावाने काढावेत
द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई
(The Asiatic Society of Mumbai)
(कलम ८०जी नुसार देणग्या
करसवलतीस पात्र आहेत) संस्थांकडे धनादेश नोव्हेंबर महिन्यात सुपूर्द केले जातील.

एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयातील पाचपैकी एका ग्रंथदालनाची ही एक भिंत! या दालनाला ‘जनरल रीडिंग रूम’ असे नाव असून ‘रीसर्च रूम’ निराळी आहे.
(छायाचित्र : वसंत प्रभू, ‘एक्स्प्रेस संग्रहा’तून)

‘डिजिटल इंडिया’च्या दृष्टीने हे आमचंही पाऊल, त्यामागे अर्थातच ग्रंथ टिकावेत आणि अभ्यासकांना उपयोगी पडावेत हा उद्देश आहे. हे ग्रंथ थेट माहिती-महाजालावर उपलब्ध करण्याची योजना सध्या नसली,
तरी पुढे तसा विचार करता येईल.
– शरद काळे (माजी सनदी अधिकारी), ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’चे अध्यक्ष

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.
धनादेश येथे पाठवा..
मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, (०२२-६७४४०५३६)
==========
महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट
नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, मआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. (०२२-२७६३९९००)

ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. (०२२-२५३९९६०७)

पुणे कार्यालय
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट
नं. १२०५/२/६, शिरोळे
रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४१०००

नाशिक कार्यालय
संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. (०२५३-२३१०४४४)

नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग,
प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, (०७१२ – २७०६९२३)

औरंगाबाद कार्यालय
संपादकीय विभाग,
१०३, गोमटेश मार्केट, औषधी भवन जवळ, नवा गुलमंडी रस्ता, औरंगाबाद. (०२४०-२३४८३०३)

नगर कार्यालय
संपादकीय विभाग,
१६६, अंबर प्लाझा, पहिला मजला, स्टेशन रोड, अहमदनगर. (०२४१-२४५१५४४/२४५१९०७)

दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१ / बी,
सेक्टर- १० नोएडा (गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश) – २०१३०१
(०१२०- ६६५१५००)