|| सिद्धार्थ खांडेकर

जगज्जेतेपद लढतीतले कार्लसन आणि करुआना हे दोघेही बुद्धिबळपटू ‘मिलेनियल्स’ पिढीतले. संगणकीय अभ्यास, तयारी आणि सरावावर पोसलेले. या पिढीने अतिशय सहजपणे गॅजेटाभिमुख जीवन आत्मसात केले. ऊर्जा आणि जिद्दीच्या जोरावर पन्नास वर्षांपूर्वी खडतर वाटणारी ओपनिंग्ज किंवा मिडलगेम किंवा एंडगेम या पिढीने सहज आत्मसात केली. प्रचंड माहितीसाठा किंवा डेटाबेसच्या जोरावर तयार झालेली ही पिढी, वर्षांनुवर्षे पुस्तकी अभ्यास केलेल्या आणि आजही तयारीपेक्षा स्वतच्या बुद्धीवर भरवसा ठेवणाऱ्या विश्वनाथन आनंदसारख्यांच्या पिढीला भारी पडू लागली.

बुद्धिबळ इतिहासातला सर्वात शक्तिशाली जगज्जेता आणि सर्वात शक्तिशाली आव्हानवीर यांच्यातील द्वंद्व सध्या लंडनमध्ये सुरू आहे. नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन हा जगज्जेता आणि अमेरिकेचा फॅबियानो करुआना हा आव्हानवीर. कार्लसन २७ वर्षांचा, तर करुआना २६. सलग दुसऱ्यांदा अशा प्रकारे जगज्जेतेपदासाठी विशीतल्या तरुणांमध्ये सामना होत आहे. मॅग्नस कार्लसनचं एलो रेटिंग (एखाद्या खेळाडूची क्षमता ठरवणारे बुद्धिबळातले परिमाण) आहे २८३५. करुआनाचं एलो रेटिंग आहे २८३२. जागतिक क्रमवारीतही हे दोघे अर्थातच पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यापूर्वी म्हणजे १९९०मध्ये जगज्जेता ठरवणारी लढत पहिल्या-दुसऱ्या क्रमांकांच्या बुद्धिबळपटूंमध्ये झाली होती. ते होते गॅरी कास्पारॉव आणि अनातोली कारपॉव. दोघेही रशियाचे. गेल्या शतकात जवळपास पाऊणशे वर्षे सोव्हिएत महासंघ आणि रशियाने बुद्धिबळ जगतावर निर्विवाद वर्चस्व गाजवले. ती परिस्थिती आता राहिलेली नाही. नवीन सहस्रकात तर ती सद्दी संपवण्यात महत्त्वाचा वाटा आपल्या विश्वनाथन आनंदने उचलला. २००८मध्ये त्याने जगज्जेतेपदाच्या लढतीत रशियाच्या व्लादिमीर क्रॅमनिकला धूळ चारली. त्याच्या जवळपास सहा वर्षे आधी रशियाने ऑलिम्पियाडमध्ये अजिंक्यपद मिळवले, ते शेवटचेच. त्यानंतर रशियाच्या पुरुष संघाला कधीही सांघिक विजेतेपद मिळू शकलेले नाही. अजूनही रशियात सर्वाधिक ग्रॅण्डमास्टर्स असले, तरी ते संख्याबळ आहे. गुणबळ नाही. थोडक्यात, रशियाची या खेळातली सद्दी जवळपास संपल्यात जमा आहे. त्यांची जागा अगदी अनपेक्षितरीत्या अमेरिकेने आणि चीनने घेतलेली आहे! या आलेखरेखेवर भारताची वाटचालही चढती आहे. याच दरम्यान ऑनलाइन बुद्धिबळाचे वेड जगभर फोफावू लागलेय हे समयोचित आहे.

कार्लसन-करुआना यांच्यातील १२ डावांच्या लढतीत सुरुवातीचे सहा डाव बरोबरीत सुटले आहेत. अफाट प्रज्ञेच्या कार्लसनला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. त्याचा बचाव भेदण्याचे करुआनाचे प्रयत्नही फारसे यशस्वी ठरू शकलेले नाहीत. दोघेही अतिशय निष्णात आहेत. शिवाय दोघांकडेही या लढतीच्या तयारीसाठी प्रभावी सॉफ्टवेअर आणि अनुभवी मदतनीस दिमतीला आहेत. त्यामुळे परस्परांना ‘बुद्धिचीत’ करणे अतिशय अवघड होऊन गेलेय. त्यामुळेच आतापर्यंतचे सहाही डाव काहीसे कंटाळवाणे झाले. या लढतीच्या दुसऱ्या टप्प्याला रविवारपासून सुरुवात होत आहे. त्या वेळी कदाचित यापेक्षा रंजक द्वंद्व पाहायला मिळावे अशी अपेक्षा आहे. या लढतीच्या निमित्ताने जवळपास शतकभरानंतर दोन्ही बुद्धिबळपटू पश्चिम गोलार्धातील असावेत हेही लक्षणीय आहे. हे दोघेही बुद्धिबळपटू ‘मिलेनियल्स’ पिढीतले. संगणकीय अभ्यास, तयारी आणि सरावावर पोसलेले. या पिढीने अतिशय सहजपणे गॅजेटाभिमुख जीवन आत्मसात केले. त्यांच्या आधीच्या पिढीनेही (आनंद, टोपालोव, क्रॅमनिक, इव्हानचुक) संगणकांना आत्मसात केलं. पण बुद्धिबळातला सर्वात रोमँटिक भाग म्हणजे अंतप्रेरणा (इंटिय़ुशन) त्यांच्यात शाबूत राहिली. त्यामुळे घडले असे, की प्रत्यक्ष पटावर ही पिढी नवीन पिढीसमोर अजूनही आत्मविश्वासाने वावरते आणि काही वेळा जिंकतेही. पण त्यात सातत्य राहिलेले नाही. याउलट, ऊर्जा आणि जिद्दीच्या जोरावर पन्नास वर्षांपूर्वी खडतर वाटणारी ओपनिंग्ज किंवा मिडलगेम किंवा एंडगेम नवीन पिढीने सहज आत्मसात केली. प्रचंड माहितीसाठा किंवा डेटाबेसच्या जोरावर तयार झालेली ही पिढी वर्षांनुवर्षे पुस्तकी अभ्यास केलेल्या आणि आजही तयारीपेक्षा स्वतच्या बुद्धीवर भरवसा ठेवणाऱ्या पिढीला भारी पडू लागली. आधीच्या पिढीतील बुद्धिबळपटूंचे आणखी एक ठळक वैशिष्टय़ म्हणजे, जवळपास प्रत्येकाला दोन-तीन ओपनिंग्जची आवड होती. त्यासाठीचा त्यांचा अभ्यास अतिशय सखोल असे. इतका, की हे खेळाडू जणू त्या व्यूहरचनेतले ज्ञानकोशच मानले जायचे. नवीन पिढीला अशा प्रकारे स्वतला काही विशिष्ट व्यूहरचनांपुरते मर्यादित ठेवण्यात अजिबात रस नाही. त्यांना जवळपास प्रत्येक ओपनिंगमध्ये नैपुण्य मिळवता येते. पुस्तकी बाडांवर नव्हे, तर सॉफ्टवेअरच्या आधारे अभ्यास केल्यामुळे त्यांच्या ज्ञानाची व्याप्ती अफाट असते. गेल्या वीस वर्षांमध्ये आनंदसारख्या बुद्धिबळपटूंनी या खेळाला प्रस्थापित चौकटी आणि पूर्वग्रहांच्या कुंपणाबाहेर नेले. त्यामुळे कुतूहल, स्वीकारार्हता, गुंतवणूक अशा सर्व आघाडय़ांवर चैतन्य निर्माण झाले. इंटरनेटमुळे ऑनलाइन बुद्धिबळपटूंचा सुळसुळाट झाला. ऑनलाइन अभ्याससाहित्य उपलब्ध झाल्यामुळे हा खेळ इतिहासात कधीही नव्हता इतका लोकाभिमुख झाला. विविध तंत्रज्ञान कंपन्यांना अव्वल बुद्धिबळपटूंमध्ये ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसॅडर दिसू लागले. अर्थात टेनिस, फुटबॉल, गोल्फ किंवा क्रिकेटसारखा गडगंज पैसा या खेळात अजूनही आलेला नाही. मात्र या खेळाची म्हणून अशी एक अर्थव्यवस्था नक्कीच उभी राहिली नि अव्वल खेळाडूंना बऱ्यापैकी पैसे मिळू लागले, हे वास्तव आहे. २०१३मध्ये कार्लसन पहिल्यांदा जगज्जेता बनला, त्या वेळी त्याने विश्वनाथन आनंदला पराभूत केले. ती लढत चेन्नईत झाली होती. पुढच्याच वर्षी रशियात सोची येथे याच दोघांमध्ये सामना जिंकला, तोही कार्लसनने जिंकला. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी कार्लसनसमोर जगज्जेता होता रशियाचा सर्गेई कार्याकिन. हादेखील कार्लसनप्रमाणेच मिलेनियल. बुद्धिबळ चाहत्यांना अजूनही आनंद, क्रॅमनिक, टोपालोव अशा खेळाडूंचे सहजप्रवृत्तीतून आलेले बुद्धिकौशल्य आवडते. मात्र, बुद्धिबळाच्या बाजारपेठेसाठी कार्लसन, करुआना, नाकामुरा, मामेद्यारॉव, अरोनियान यांसारख्या युवा बुद्धिबळपटूंना महत्त्वाच्या स्पर्धामध्ये अधिक प्राधान्याने निमंत्रित केले जाते हे वास्तव आहे.

भारताचा विश्वनाथन आनंद हा आजही पारंपरिक बुद्धिबळ क्रमवारीत पहिल्या दहात असला, तरी जलद (रॅपिड) आणि अतिजलद (ब्लिट्झ) त्याचा प्रभाव ओसरू लागलाय. तरीही गेल्या वर्षी त्याने रॅपिड जगज्जेतेपद पटकावून दाखवलेच. शिवाय परवाच कोलकात्यामध्ये झालेली टाटा स्टील ब्लिट्झ स्पर्धाही त्याने जिंकली. असे विजय अपवादात्मक असले, तरी सुखावणारे आहेत. पण मुद्दा आनंदच्या कामगिरीचा नाहीच. आनंदनंतर कोण अशी चिंता देशभरातील बुद्धिबळपटूंना अगदी अलीकडेपर्यंत वाटत होती. आता ती निराधार ठरेल याचे पुरावे या स्पर्धेतून मिळाले. वयाची १५ वर्षेही न पाहिलेली दोन मुले या स्पर्धेत आनंदच नव्हे, तर जगातील अनेक उत्तम बुद्धिबळपटूंसमोर आत्मविश्वासाने खेळली. आर. प्रज्ञानंद आणि विशाल सरीन अशी त्यांची नावे. भारतापेक्षाही कदाचित भारताबाहेरील बुद्धिबळविश्वात या दोघांविषयी प्रचंड कुतूहल आणि कौतुक आहे. प्रज्ञानंद हा तर ग्रॅण्डमास्टरही बनलाय आणि विशालही लवकरच हा किताब हस्तगत करेल. याच स्पर्धेत सहभागी झालेला विदिथ गुजराथी हा मराठी ग्रॅण्डमास्टर आज जगातल्या अव्वल ५० बुद्धिबळपटूंमध्ये गणला जातो. तोही नवीन पिढीतला. कार्लसन, करुआनासारख्यांसमोर आत्मविश्वासाने खेळतो. भारतात आनंदमुळे या खेळाविषयी आकर्षण निर्माण झाले आणि त्यातून जी लाट आली त्यामुळे आता भारतात पन्नासहून अधिक ग्रॅण्डमास्टर्स खेळताना दिसतात. आनंदला ग्रॅण्डमास्टर आणि नंतर जगज्जेता होण्यासाठी त्या प्रकारचे वातावरण देशात नव्हते. पण त्याच्या प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्दीमुळे प्रज्ञानंद, विदिथ, विशालसारख्यांसमोर देशांतर्गत प्रोत्साहन हे आव्हान राहिलेले नाही.

आता पुन्हा एकदा थोडे जगज्जेतेपदाच्या सध्याच्या लढतीकडे वळू. यातील अमेरिकन आव्हानवीर करुआनाची तुलना बॉबी फिशर या अत्यंत प्रतिभावान पण तितक्याच तऱ्हेवाईक आणि वादग्रस्त जगज्जेत्याशी होऊ लागली आहे. खरे तर ब्रुकलिनमधील वास्तव्याचा धागा सोडल्यास दोघांमध्ये फारसे साम्य नाही. पण अमेरिकनांना त्याचे रास्त कौतुक आहे. गेली काही वर्षे करुआना इटलीत राहायचा आणि इटालियन म्हणूनच खेळायचा. दोन वर्षांपूर्वी तो अमेरिकेत आला. अमेरिकेतले इतर दोन मातबर बुद्धिबळपटू मूळचे त्या देशातले नाहीतच. हिकारू नाकामुरा हा जपानी, तर वेस्ली सो हा फिलिपिनो. पण करुआना, सो, नाकामुरा या त्रिमूर्तीने दोन वर्षांपूर्वी अमेरिकेला ऑलिम्पियाड जिंकून दिले. सेंट लुइमध्ये गेली काही वर्षे अव्वल दर्जाची बुद्धिबळ स्पर्धा खेळवली जाते. याशिवाय आजवरचा सर्वात वलयांकित जगज्जेता गॅरी कास्पारॉवही अमेरिकेत सातत्याने वास्तव्याला असतो. या देशात गेली काही वर्षे बुद्धिबळाविषयीचे कुतूहल प्रचंड वाढले असून, अनेक शाळांमध्ये हा खेळ आवर्जून खेळवला जातो. न्यू यॉर्कसारख्या गल्ली-रस्त्यांवरही बुद्धिबळाचे पट मांडलेले आढळतात. या साऱ्या बुद्धिबळ समुदायाचे लक्ष करुआनाकडे आहे. सध्या सुरू असलेल्या लढतीच्या सहाव्या डावामध्ये करुआना विजयाच्या समीप होता, असे संगणकीय विश्लेषणातून दिसून आले. पण तितक्या गुंतागुंतीचे विश्लेषण मानवी मेंदूला झेपणारे नाही यावर कार्लसन, करुआना आणि इतर सगळ्यांचे एकमत झाले! बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या लढतीवर भारतातूनही असंख्य चाहते लक्ष ठेवून आहेत. अशा लढती आता ऑनलाइन आणि समालोचनासह उपलब्ध आहेत. या लढतींमध्ये आता आनंद किंवा त्याच्या पिढीतले कोणी दिसण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. भविष्यात प्रज्ञानंद किंवा विदिथ यांना ती संधी मिळू शकते. टाटा स्टील स्पर्धेत अमेरिकेच्याच नाकामुराने रॅपिड स्पर्धा जिंकली. पण ब्लिट्झ प्रकारात आनंद जिंकला. जगज्जेतेपदाची संधी जुन्या पिढीला नसली, तरी तिचे अस्तित्व अजून संपलेले नाही हे आनंदने दाखवून दिले.

siddharth.khandekar@expressindia.com