मानवी संस्कृतीतील खेळांचा गाढा अभ्यास असलेले योहान हौझिंगा आपल्या ‘होमो लुडन्स’ या पुस्तकात म्हणतात, ‘माणूस हा एक खेळकर प्राणी आहे’. आपण कायम खेळ बनवत आणि खेळत आलेलो आहोत. अगदी पूर्वीचे शिकारींवर आधारित खेळ असोत, जमिनीत खड्डे करून खेळले गेलेले ‘मंकला’सारखे खेळ असोत किंवा कापड- कागद बनवू लागल्यानंतर त्यावर आखलेले सापशिडी, ल्युडो आणि नंतरचे नानाविध ‘बोर्डखेळ’ असोत – उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर आपण आपल्याला उपलब्ध तंत्रज्ञानातून खेळ बनवत आलो आहोत. त्यातले ‘डिजिटल खेळ’ हे अगदीच अलीकडचे. १९७०-८० पासूनचे. सुरुवातीला अगदीच साधे असे पाँग, स्पेस अ‍ॅटॅक, पॅकमॅन यांसारखे खेळ बनवले गेले. मग डॉस प्रणालीवर आधारित टायपिंग करत खेळायचे काही खेळ (टेक्स्ट अ‍ॅडव्हेंचर) आले. सोबत चेस, पूल, स्नूकर असे खेळही त्यांच्या डिजिटल रूपात मांडण्यात आले. पुढे संगणकाच्या क्षमता वाढल्या तसे खेळही सुधारले. तेव्हाचे मारिओ, डेव्ह, मोर्टल कॉम्बॅट असे खेळ आपल्यातल्या काहींच्या नक्की लक्षात असतील. ९०च्या दशकात मोबाइल फोन आले. आणि त्यांच्यासोबत स्नेक, स्पेस इनव्हेंचर असे खेळ आपल्या भेटीला आले. स्मार्टफोन आल्यानंतर तर वेगवेगळ्या प्रकारे बोटांनी मोबाइलच्या पडद्याला स्पर्श करून खेळायच्या खेळांची लाटच आली. अँग्री बर्ड्स, कँडी क्रश, टेम्पल रन, सबवे सर्फर, क्लॅश ऑफ क्लॅन्स हे तेव्हा आलेले आणि आजही सर्वाधिक खेळले जाणारे काही खेळ. आता मोबाइल व्हीआर चष्म्यात टाकून खेळायचे ‘आभासी वास्तवा’चे खेळ येत आहेत. गेल्या वर्षी आलेला ‘पोकेमॉन गो’ हा त्यातलाच एक. तो खऱ्या जगात आभासी प्रतिमा उभ्या करता येणाऱ्या तंत्रज्ञानावर (अल्टर्नेट रिअ‍ॅलिटी – एआर) बनविण्यात आला आहे.

पण खेळ बनवताना तंत्रज्ञानासोबतच महत्त्वाचा असतो विषय. गेल्या काही दशकांत मोबाइल आणि पीसी खेळ बनविण्याला व्यावसायिक स्वरूप आलेले आहे. जगभरातील गेमिंग इंडस्ट्रीची आजघडीची उलाढाल सुमारे ९० बिलियन डॉलर इतकी प्रचंड आहे. यात अनेक मोठमोठे गेमिंग स्टुडिओज आणि बऱ्याच लहानमोठय़ा गेमिंग कंपन्यांचा समावेश होतो. अशा ठिकाणी बनणारे खेळ अर्थातच अत्यंत व्यावसायिक विचारातून बनवले जातात. या कंपन्या बहुतेकदा दुसऱ्या एखाद्या क्लायंट कंपनीसाठी खेळ बनवतात. गेम डिझायनरना ‘क्लायंट’कडून खेळाचा विषय मिळतो. आणि त्यासोबत ‘टार्गेट ग्रुप’ म्हणजे कोणत्या वयाच्या लोकांसाठी तो बनवायचा आहे ते सांगितले जाते. सध्या कशा प्रकारचे तंत्रज्ञान आणि खेळ जास्त खेळले जात आहेत याचा विचार होतो. मग विषय, वयोगट आणि तंत्रज्ञान यानुसार गेम डिझायनर वेगवेगळ्या संकल्पना सुचवतात.

अलीकडच्या काळात प्रमोशनल खेळाचे प्रस्थ वाढलेय. एखादी वस्तू वा सेवा, चित्रपट वा पुस्तक इत्यादींचा प्रचार करण्यासाठी त्यावर आधारित खेळ बनवले जातात. आपल्याकडे चेन्नई एक्स्प्रेस, ब्रदर्स, एम. एस. धोनी या चित्रपटांवर आधारलेले खेळ प्रसिद्ध आहेत. ‘पोकेमॉन गो’ हासुद्धा पोकेमॉन या कार्टून मालिकेवर बनवला गेला होता. काही मोठय़ा प्रस्थापित गेमिंग स्टुडिओजचे खेळसुद्धा प्रस्थापित झालेले आहेत. उदा. कँडी क्रश, सब वे सर्फर, फार्मविल. अशा ठिकाणी नवे खेळ बनविण्यापेक्षा हे आधीचेच खेळ पुढे चालू ठेवण्यासाठी गेम डिझायनर काम करतात. त्यात मग कोणता सण, मोसम येत आहे त्यानुसार खेळामध्ये बदल केले जातात. कोणते ‘प्लेअर्स’ कधी, किती आणि कसे खेळतात या माहितीचा वापर करून खेळ सुधारण्यात येतात.

एकंदर क्रिएटिव्ह – सर्जनशील – वाटणाऱ्या गेम डिझाइन क्षेत्राचं अगदीच व्यावसायिकीकरण झालेले दिसते. पण तरीही या क्षेत्रात व्यावसायिक खेळ उद्योगाच्या विरुद्ध टोकाला ‘इंडी गेम’ ही चळवळ उभी आहे. इंडी म्हणजे इण्डिपेण्डण्ट खेळ. या चळवळीचा भाग असलेले गेम डिझायनर आणि डेव्हलपर स्वत: स्वत:चे खेळ बनवतात. व्यावसायिक आणि इंडी गेम डिझायनर्ससोबत आज काही संशोधक आणि समाजशास्त्रज्ञसुद्धा खेळ बनवीत आहेत. त्या खेळांचे विषय आणि ते बनविण्यामागची मानसिकता अगदीच वेगळी आहे. ‘फोल्डइट’ नावाचा खेळ खेळतानाच आपण त्यामागे चालणाऱ्या प्रणालीतून शास्त्रज्ञांना नवनवी प्रथिन-रूपे शोधून देत असतो. ‘सुपर प्लॅनेट क्रॅश’ नावाच्या खेळातून अंतराळात अजून पृथ्वीसारखे ग्रह कुठे असू शकतील याचा शोध लावला जातो. अशिक्षित बाळंत स्त्रियांना आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे कोणत्याही भाषेशिवाय समजावणारे खेळ आहेत. नेत्रहीन, मूकबधिर आणि उर्वरित समाज यांदरम्यान काही खेळांच्या माध्यमातून संवादाचे पूल बांधण्याचे प्रयत्नही होत आहेत. असे प्रयत्न अगदी थोडके असले, तरी त्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.  गेम व्यावसायिक कारणाने बनलेला असो, वैयक्तिक कल्पनेतून आलेला असो वा एखाद्या प्रयोगाचा भाग असो, तो लोकांपर्यंत पोहोचणार की नाही हे विविध ‘गेम होस्टिंग साइट’ आणि ‘स्टोअर्स’ ठरवतात. कोणते खेळ ठेवायचे याबद्दल त्यांची तत्त्वे आणि नियम आहेत. त्यानुसार प्रत्येक खेळाची, त्यातल्या गोष्टीची, चित्रांची, शब्दांची पडताळणी केली जाते. ही परीक्षा पार करणारे खेळच पुढे उपलब्ध होतात. परंतु गेमिंगच्या जगालासुद्धा ‘पायरसी’ने वेढले असल्यामुळे बरेच खेळ हे अशा चाळणीतून न जाता अगदीच सहजपणे इंटरनेटवर खेळायला उपलब्ध आहेत. एक खरे, की चित्रपट, नाटके किंवा पुस्तकांप्रमाणेच काही खेळ चांगले असणार, काही वाईट. निवड मात्र कायम आपलीच आहे.

प्रसाद सांडभोर

sandbhorprasad@gmail.com

(लेखक ‘टॉय आणि गेम डिझायनर’ असून, सध्या ‘युझर एक्स्पिरिअन्स डिझायनर’ म्हणून कार्यरत आहेत.)