सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात मुख्य इमारतीच्या समोर एक भले मोठे वडाचे झाड आहे. हे झाड एवढे जुने आहे की, त्याच्या पारंब्या जमिनीत शिरून त्यांची खोडे झालेली आहेत. प्रचंड विस्तार असलेल्या या झाडाचे मूळ खोड कोणते असेल ते सांगता येणे अवघड होते. हल्लीच्या काळात जाणारे-येणारे या झाडाजवळ आवर्जून थांबून सेल्फी काढून घेत असतात. या वडाशेजारी ‘ललित कला केंद्रा’ची जुनी, टुमदार, ब्रिटिशकालीन इमारत आहे. ही इमारत आणि तिच्या शेजारचा वड या दोन्ही गोष्टी ललित कला केंद्राची ओळख दाखविणाऱ्या; पण या विभागाची खरी ओळख निर्माण केली ती या विभागाच्या माजी विभागप्रमुखांनी- प्रा. सतीश आळेकरांनी!

संपूर्ण महाराष्ट्राला नाटककार म्हणून माहीत असलेल्या सतीश आळेकरांनी आपले पहिले नाटय़लेखन केले ते पुरुषोत्तम करंडकासाठी लिहिलेल्या ‘झुलता पूल’ या एकांकिकेपासून (त्याआधी त्यांनी ‘जज्ज’ नावाची एक एकांकिका रूपांतरित केली होती). तरुण वयातील अस्वस्थता, एकटेपणा, पिढय़ांमधील दुरावा, जुने आणि नवे पुणे यांच्यातील दिसणारे आणि अदृश्य फरक अशी अनेक आशयसूत्रे या एकांकिकेतून गोचर झाली होती. त्यानंतर त्यांनी ‘मेमरी’, ‘बसस्टॉप’, ‘दार कुणी उघडत नाही’, ‘भजन’, ‘सामना’ अशा अनेक एकांकिका लिहिल्या.  तरुण वयातल्या संवेदना आणि मध्यमवर्गीय जाणिवा मांडणाऱ्या या एकांकिका अजूनही महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धामधून सादर होताना दिसतात. ‘महानिर्वाण’ आणि ‘बेगम बर्वे’ ही मराठी रंगभूमीच्या इतिहासातील दोन महत्त्वाची नाटके, त्यांच्या आशयवैशिष्टय़ांसाठी जेवढी महत्त्वाची आहेत तेवढीच त्यांच्या सादरीकरणासाठीही! ‘महानिर्वाण’ हे नाटक शनिवार पेठेतल्या लहान-मोठय़ा मंदिरांमध्ये सादर होणाऱ्या कीर्तनाचे रूप घेऊन येते, तर जुन्या संगीत नाटकांमधील गाजलेली नाटय़पदांनी ‘बेगम बर्वे’ सजते. आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही बाबी एकमेकांना एवढय़ा पूरक की, ‘अमुक नाटकासाठी आळेकरांनी तमुक फॉर्म वापरून घेतला आहे’, असे आपण म्हणूच शकत नाही. एकमेकांची स्वप्ने एकमेकांमध्ये मिसळून जाताना जगण्यातली विसंगती, नात्यांमधील तुटकपणा अधोरेखित करणारे ‘बेगम बर्वे’ हे नाटक केवळ मराठीच नाही तर जागतिक रंगभूमीवरील एक महत्त्वाची शोक-सुखात्मिका- ट्रॅजी-कॉमेडी ठरते. चाळीस वर्षांपूर्वी लिहिलेले ‘महापूर’ त्यानंतरच्या प्रत्येक तरुण पिढीला आपले नाटक वाटत आले आहे.

दीडशे-पावणेदोनशे वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या आपल्या मराठी रंगभूमीवर अनेक समर्थ नाटककार होऊन गेले, परंतु आळेकरांएवढी नाटक आणि रंगभूमी या माध्यमाची सूक्ष्म आणि सखोल जाणीव असलेला नाटककार विरळाच. रंगभूमी ही कला ज्या मूलद्रव्यांनी बनलेली आहे, त्या मूलद्रव्यांशी सतत खेळत, आपल्या जगण्याबद्दलच्या तत्त्वज्ञानाचा-जाणिवांचा उभा छेद घेत आळेकर आपले नाटक सादर करत आलेले आहेत. खरे तर ते नाटककार म्हणून किंवा हल्ली चित्रपटांमधील अभिनेते म्हणून गाजलेले असले, तरी ते रंगमंचावरचे अस्सल परफॉर्मर आहेत. संवाद उच्चारण्याची विशिष्ट ढब आणि भाव निर्माण करण्याची त्यांची हातोटी या गुणवैशिष्टय़ांमुळे त्यांना रंगमंचावर एखादी भूमिका सादर करताना बघणे हा अद्वितीय अनुभव ठरतो.

नाटककार, दिग्दर्शक, नट शिवाय थिएटर अ‍ॅकॅडमीचे संस्थापक सदस्य, फोर्ड फाउंडेशनच्या ग्रँडमार्फत संपूर्ण महाराष्ट्राची प्रायोगिक रंगभूमी ढवळून काढणारे.. अशी अनेक विशेषणे त्यांना देता योतील, पण महाराष्ट्राच्या सध्याच्या मनोरंजन क्षेत्रासाठी त्यांची सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे ‘ललित कला केंद्रा’चे आळेकर!

१९९६मध्ये सतीश आळेकर ललित कला केंद्रात प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून रुजू झाले. तेव्हा विभाग सुरू होऊन आठ-नऊ  वर्षे झाली होती. पण आळेकर आल्यानंतर सर्वात आधी त्यांनी विभागाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. संगीत, नृत्य आणि नाटक क्षेत्रासाठी व्यावसायिक कलावंत निर्माण करणे हा हेतू निश्चित केला आणि त्यानुसार तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली. भारतीय परंपरेतील गुरू-शिष्यांचे नाते आणि आधुनिक विद्यापीठीय प्रशिक्षण पद्धती या दोहोंचा समन्वय साधणारा अभ्यासक्रम तयार झाला, राबवला जाऊ  लागला. कोणतीही प्रयोगकला प्रेक्षकांशिवाय पूर्णत्वास जात नाही, आणि प्रयोगकलेच्याच क्षेत्रात एखाद्याला आपली कारकीर्द घडवायची असेल तर प्रेक्षकांना गृहीत न धरता त्या कलेची साधना करता येत नेही, हे जाणून आळेकरांनी आपले विद्यार्थी जास्तीतजास्त वेळा प्रेक्षकांच्या समोर यावेत यासाठी प्रयत्न केले. केवळ परीक्षकांसमोर सादर होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षा सर्व प्रेक्षकांसाठी खुल्या केल्या. या परीक्षांची वर्तमानपत्रांधून जाहिरात येऊ  लागली, प्रेक्षकांकडून परीक्षा पाहण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जाऊ  लागले. यातून आळेकरांच्या शैक्षणिक धोरणांसोबत त्यांची व्यावसायिक नीतीदेखील अधोरेखित होते. संपूर्ण कलाव्यवहारात त्यांनी प्रेक्षकांना महत्त्व दिले, पण आपली कला केवळ प्रेक्षककेंद्री होऊ  नये, असा सल्ला ते सततच विद्यार्थ्यांना देत असतात. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर, ‘आपली कला प्रेक्षकांना आवडावी अशी आपली सदिच्छा असावी, असा अट्टहास नसावा.’

आपल्या बारा-तेरा वर्षांच्या कारकीर्दीत आळेकरांनी अनेक नवनवे उपक्रम केले, नव्या गोष्टी केल्या हे जेवढे महत्त्वाचे आहे; तेवढेच काही गोष्टींना ठाम नकार दिला हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. केवळ लोकप्रिय आहे, पण दर्जेदार नाही अशा कोणत्याही बाबी त्यांनी विभागाच्या परिघात येऊ  दिल्या नाहीत. विद्यार्थी अवस्थेत असताना उत्कृष्टतेचाच ध्यास सर्वानी धरावा याकडे त्यांचा कटाक्ष असे. ‘खाली उतरणे केव्हाही शक्य असते’, हे वाक्य एखाद्या पालुपदासारखे ते सतत विद्यार्थ्यांना ऐकवतात.

नामदेव सभागृहाचे नाटकघरात रूपांतर, ललित कला केंद्राशेजारी अतिशय देखण्या अशा अंगण-मंचाची निर्मिती, प्रयोगकलांच्या अभ्यासासाठी पाठय़पुस्तकांची निर्मिती, ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांची केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशभर दौरे काढून सादरीकरणे, कलेच्या ऐवजासोबतच तिच्या अर्थकारणाची विद्यार्थ्यांना सतत करून दिली जाणारी जाणीव अशा अनेक बाबी सतीश आळेकरांचे विद्यापीठातील कर्तृत्व सिद्ध करतात. ‘संहिता ते प्रयोग’ या नाटक शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सुरू केलेल्या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना नाटककलेच्या घटक आणि तत्त्वांची थेट जाणीव होते. या उपक्रमात प्रत्येक विद्यार्थी आळेकरांच्या मार्गदर्शनाखाली आपली स्वत:ची छोटी नाटय़संहिता तयार करतो. स्वत: समर्थ नाटककार असूनही ते कधीही विद्यार्थ्यांना ‘असे लिही’ किंवा ‘तसे लिही’ असे सांगत नाहीत, तर विद्यार्थ्यांनेच लिहिलेल्या पाठय़ाच्या अनंत शक्यता त्याला सुचवत राहतात. या प्रक्रियेतली त्यांची दोन प्रसिद्ध वाक्ये म्हणजे- ‘माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ  नकोस, विचार कर’ आणि ‘मी सांगतोय म्हणून बदल करू नकोस, तुला जे पटेल तेच कर.’ विद्यार्थ्यांला स्वत:ला विचारप्रवृत्त करून त्याच्या स्वत्त्वाला जपणारी, नाटय़कलेच्या अध्यापनपद्धतीला आळेकरांनी दिलेली ही फार मोठी देणगी आहे.

अध्यापन करायच्या कोणत्याही गोष्टीचे प्रमाणीकरण न करता, विद्यार्थ्यांवर बाहेरच्या कोणत्याही गोष्टी न लादता- विद्यार्थ्यांमधील मूलभूत, एतद्देशीय कलेचा ऐवज जपत त्या ऐवजाला कोंदण देण्याचे धोरण त्यांनी ललित कला केंद्रात जपले. आणि म्हणूनच ललित कला केंद्रातून केवळ कसबी कलावंत न तयार होता- विचार करणारे, आपल्या आजूबाजूच्या समाजाचे भान असलेले, स्वयंप्रकाशित असे कलावंत तयार झाले. ते आज आपल्या कलाप्रतिभेने संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकत आहेत. ललित कला केंद्र परिसरातील हा वटवृक्ष गेली अनेक वर्षे नित्यनेमाने बहरतो आहे, नव्या अंकुरांना जन्म देतोय. अत्यंत प्राचीन त्याच वेळी नित्यनूतन अशा या वडाशेजारी गेली अनेक वर्षे आम्ही वावरतोय, याचाच सार्थ अभिमान.

प्रवीण भोळे

(लेखक ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे प्राध्यापक आणि विभागप्रमुख आहेत.)