|| नंदा खरे

न्याय होत नाहीये हे लोकांना कळू लागतं. मग लोक एकत्र येऊन, न्याय मागण्यासाठी निदर्शनं वगैरे करू लागतात. या लोकांमध्ये कवी वगैरे अभिव्यक्तिस्वातंत्र्यवालेही असतातच.. या सर्वाना दंगलखोर समजणं, त्यांच्यावर गंभीर गुन्हेगारी आणि राजद्रोही आरोपांची कलमं लावणं हे जणू पोलिसांचं कामच; पोलीस ते करतात.. हेच सारं अमेरिकेत घडत होतं, १९६८ सालात. पण इथवरची कहाणी जरी परिचित वाटत असली तरी तिचा शेवट वेगळा होता. त्याला कारण होते तिथले सजग वकील.. ते कसे?

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Pawar family
पवार कुटुंबीयही कौटुंबिक जिव्हाळ्याचं राजकारण करू शकतात…
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेची (यूएसए) अशी समजूत झाली की, जगभरात कुठेही डावे विचार रुजायला लागले की त्यांची पाळेमुळे उखडून टाकण्याची जबाबदारी अमेरिकेची आहे. आधी कोरियाच्या यादवी युद्धात उतरून, दक्षिण भागाची पाठराखण करून अमेरिकेने त्या देशाची दोन शकले केली. मग व्हिएतनाममध्ये तशीच स्थिती घडू लागली. उत्तरेचे क्षेत्र साम्यवादी होते व त्याला चीन आणि रशियाची मदत होती. दक्षिणेचे क्षेत्र तत्त्वत: लोकशाहीवादी आणि प्रत्यक्षात भ्रष्टाचारी होते. यामुळे १९५५ पासून अमेरिका दक्षिण व्हिएतनामला ‘सल्लागार’ पुरवू लागली. तेव्हा आइक आयसेनहॉवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. १९६१ पासून जॉन एफ. केनेडी राष्ट्राध्यक्ष झाले. असे समजले जाते की, केनेडींना या लढाईत गुंतायचे नव्हते, पण ठोस काही कृती होण्याआधीच केनेडी यांची हत्या झाली (नोव्हेंबर १९६३). काही ‘कारस्थान-भक्त’ (कॉन्स्पिरसी थिअरिस्ट) असे मानतात की, युद्ध नको असल्याने केनेडी यांची हत्या झाली. तसेही आयसेनहॉवर सामरिक-उद्योजक गटबंधनाबद्दल (मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स) बोलत असतच. केनेडी यांच्या काळातही सैनिक (ज्यांना ‘सल्लागार’ म्हटले जाई!) जेमतेम १६ हजारच होते.

केनेडींच्या हत्येनंतर लिंडन जॉन्सन व पुढे रिचर्ड निक्सन यांच्या काळात मात्र व्हिएतनाममधले अमेरिकी सैन्य वाढत गेले. एकदा तर ते साडेपाच लाखांवर पोहोचले! एकुणात सुमारे २७ लाख अमेरिकी वेळोवेळी त्या युद्धात हजर राहून आले. १९७५ साली निक्सन अमेरिकेला युद्धातून बाहेर काढू शकले, पण तोपर्यंत युद्ध व्हिएतनामपासून लाओस, कंबोडिया वगैरे देशांतही पसरले होते. नोम चोम्स्की यांनी तर ‘अ‍ॅट वॉर विथ एशिया’ नावाच्या पुस्तकातून अमेरिका युद्धाच्या दलदलीत कशी अडकत गेली याचा पंचनामाच केला.

युद्ध महाग असते- डॉलर्समध्येही आणि सैनिकांच्या प्राणाच्या रूपातही. शेवटी ५८ हजारांवर अमेरिकी सैनिक आशियात मेले आणि तीन लाखांवर जखमी झाले. युद्धामुळे जडलेले मनोविकार, व्यसने वगैरेंचा धड हिशोबही नाही. व्हिएतनामी प्रजेतले हताहतही उपेक्षितच आहेत. नापाम (ज्याने लागलेल्या आगी विझतच नाहीत) शेते व झाडे निष्पर्ण करणारी रसायने वगैरे अमानुष शस्त्रांचे परिणामही नीटसे नोंदलेले नाहीत.

आणि ही परदेशातली हिंसा अमेरिकी जीवनातही उतरत होतीच. एप्रिल १९६८ मध्ये ‘काळा गांधी’ अशी ओळख स्थापित झालेले मार्टिन ल्यूथर किंग यांची हत्या झाली. लिंडन जॉन्सन पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ इच्छित नाहीत हेही स्पष्ट झाले. त्यांच्याऐवजी रॉबर्ट ‘बॉबी’ केनेडी यांनी निवडणूक लढवण्याच्या शक्यता चर्चेत असतानाच बॉबी केनेडींचीही हत्या झाली (जून १९६८). अखेर डेमोकॅट्रिक पक्षातर्फे ह्य़ूबर्ट हम्फ्री आणि रिपब्लिकन पक्षातर्फे आयसेनहॉवर यांचे उपाध्यक्ष राहिलेले रिचर्ड निक्सन यांच्यात निवड करावी लागेल असे दिसू लागले. सप्टेंबर १९६८ मध्ये हम्फ्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी डेमोकॅट्रिक पक्षाची सभा (कन्व्हेन्शन) शिकागो येथे भरणार होते. शिकागोचा नगराध्यक्ष रिचर्ड डेलीही डेमोकॅट्रच होता. पण..!!!

अनेक युद्धविरोधी, वंशवादविरोधी, भांडवलवादविरोधी गट एकत्र येऊन शिकागो कन्व्हेन्शनमध्ये निदर्शने करण्याचे घाटत होते. या सर्व गटांना एकत्रितपणे ‘न्यू लेफ्ट’ (नव-डावे) म्हटले जाई. त्यांची प्रस्थापितविरोधी मते ‘काऊंटर कल्चर’ (प्रति-संस्कृती) या नावाने ओळखली जात. प्रस्थापितांना जरी हे सगळे गट एकसारखे वाटत असले तरी त्यांच्यात अनेक छटा होत्या. यांपैकी तीन गटांनी शिकागो नगरपालिकेला लिंकन पार्क व ग्रँट पार्क या जागांवर निदर्शने करण्यासाठीची परवानगी मागितली होती; जी अर्थातच नाकारली गेली. एक गट ‘मोब’ (मोबिलायझेशन) या नावाने ओळखला जाई. त्याचा नेता होता डेव्हिड डेलिन्जर आणि गटाचा हेतू व्हिएतनाममधून अमेरिकी सैन्य परत आणणे एवढाच होता. दुसरा एक गट ‘स्टुडंट्स फॉर अ डेमोकॅट्रिक सोसायटी’ ऊर्फ ‘एसडीएस) म्हणून ओळखला जाई आणि त्याचे नेते होते रेनी डेव्हिस आणि टॉम हेडन. तिसरा गट ‘यूथ इंटरनॅशनल पार्टी (यपी)’ म्हणून ओळखला जाई. त्याचे नेते अ‍ॅबी हॉफमन आणि जेरी रुबिन हे अत्यंत शिवराळ, बोलायला हुशार, कल्पक आणि स्पष्टवक्ते होते. तिन्ही गट आपल्याबरोबर दहा हजार माणसे येतील असे सांगत होते. हॉफमनला जेव्हा विचारले की, ही माणसे काय करतील; तेव्हा तो
म्हणाला : ‘‘रॉक संगीत आणि जाहीर संभोग’’!

इतर तीन माणसांनाही पुढे महत्त्व आले. जॉन फ्रॉइन्स आणि ली वायनर हे मोलोटोव्ह कॉकटेल नावाचे गावठी हातबॉम्ब करण्यावर भाषणे देत. बॉबी सील हा ‘ब्लॅक पँथर’ या काळ्या अमेरिकी पक्षाचा अध्यक्ष होता. तर.. डेलिन्जर, डेव्हिस, हेडन, हॉफमन, रुबिन, फ्रॉइन्स, वायनर आणि सील या आठ जणांचा डेमोकॅट्रिक कन्व्हेन्शनच्या वेळी निदर्शने करण्याशी संबंध होता असे मानून या गटाला ‘शिकागो एट’ म्हटले जाऊ लागले. प्रत्यक्षात मात्र पहिले पाच जणच निदर्शनांमध्ये भाग घेत होते. इतर तिघांचा काही संबंधच नव्हता.

पोलिसांनी निदर्शने करू द्यायला परवानगी नाकारली होती, पण बागेत जायला बंदी नव्हती! तर मोब, एसडीएस आणि यपी यांचे कार्यकर्ते बागांमध्ये जमा झाले. सोबत आर्लो गथ्री, अ‍ॅलन गिन्सबर्ग वगैरे बंडखोर कवीही होते. गिन्सबर्ग मोठय़ाने ‘ओम’ असे म्हणत होता. जमाव कन्व्हेन्शनच्या जागेकडे जाऊ लागला तसे पोलीस आडवे आले. लोक मागे वळले, पण पोलीस एका बारक्या टेकाडावर जमा झाले. लोक त्या टेकाडाकडे जाऊ लागले आणि पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडून लाठीमार सुरू केला. लवकरच परिस्थिती हाताबाहेर गेली. हॉफमन, रुबिन वगैरेंचा एक गट कन्व्हेन्शनशी संबंधित एका हॉटेलजवळ उभा असताना पोलिसांनी त्यांना एका मोठय़ा काचेवर ढकलले आणि काच फुटून निदर्शनकारी हॉटेलात ढकलले गेले. टेकाडावरची दंगल आणि काच फुटण्याची घटना यांवरून ‘शिकागो एट’वर दंगल माजविण्याचा गुन्हा दाखल केला गेला.

दंगल घडली होती सप्टेंबर १९६८ मध्ये, पण खटला सुरू व्हायला सप्टेंबर १९६९ उजाडला.

सुरुवातीपासूनच बॉबी सील आपला या साऱ्याशी संबंध नसल्याचे सांगत होता. न्यायाधीश जुलिअस हॉफमन मात्र ऐकून घेत नव्हता. सील वारंवार सांगत होता की, त्याचा वकील रुग्णालयात आहे, पण न्यायालय हेही ऐकून घेत नव्हते. न्यायाधीशाने सीलला म्हटले, ‘‘तुझे वागणे न्यायालयाचा अवमान करणारे आहे.’’ सील म्हणाला, ‘‘तो तर माझा धर्मच आहे.’’ एका टप्प्यावर सीलला मुसक्या बांधून व दंडाबेडी घालून दोन दिवस न्यायालयात हजर केले गेले. आरोपीचा बोलण्याचा हक्क आपण नाकारतो आहोत, हेही न्यायालय मान्य करेना!

न्यायालय आरोपींच्या नावांमध्ये चुका करत असे. डेलिन्जरला ते कधी डिलिंजर म्हणे, तर कधी. एका आरोपीचे आडनाव आपल्यासारखेच आहे, हे पाहून न्यायाधीशाने आज्ञा दिली की दोघांत नाते नाही हे स्पष्टपणे नोंदावे. यावर आरोपी हॉफमन मोठय़ाने ‘‘ओऽ! बाबा!’’ असे म्हणाला. एकूण २४ सप्टेंबर १९६९ ते १८ फेब्रुवारी १९७० या काळात चाललेला हा खटला अत्यंत नाटय़पूर्ण होता. महत्त्वाची एक घटना म्हणजे, सीलला इतरांपासून वेगळे काढले गेले, कारण सरकारी वकील शुल्झ यालाही सीलचा संबंध नाही हे पटले. याआधी इतर सात आरोपींचा वकील न्यायालयाला खडसावून म्हणाला की, ‘‘न्यायालय काळ्या अमेरिकींना न्याय देत नाही!’’ न्यायालय म्हणाले, ‘‘तू पहिलाच माणूस आहेस, माझ्यावर असा आरोप करणारा!’’ यावर आरोपींचा दुसरा वकील म्हणाला, ‘‘आणि मी दुसरा!’’ अर्थातच, सर्व आरोपी व त्यांचे वकील यांच्यावर ‘न्यायालयाचा अवमान’ असे अनेकानेक गुन्हे नोंदले गेले! पण वर्षभराने वकिलांच्या एका सर्वेक्षणात ७८ टक्के वकिलांनी जुलियस हॉफमन हा न्यायाधीश म्हणून ‘नालायक’ (अनक्वालिफाइड) आहे असे मत दिले!

अखेर आरोपीच्या वकिलाने दंगलीच्या काळी महाअधिवक्ता (अ‍ॅटर्नी जनरल) असलेल्या रॅमसे क्लार्क या ज्येष्ठ वकिलाची साक्ष काढली. त्याने साक्षीत म्हटले, ‘‘घटना घडली तेव्हाच्या चौकशीत असे निष्पन्न झाले होते की पोलीसच दंगलीकरता जबाबदार आहेत. नंतर मात्र डेमोकॅट्रिक राष्ट्राध्यक्षाऐवजी रिपब्लिकन निक्सन आला आणि दंगलीचा दोष आरोपींवर ठेवला गेला!’’ पण याचा ज्युरीवर परिणाम झाला नाही. सीलप्रमाणेच फ्रॉइन्स आणि वायनर यांनाही सोडून दिले गेले; इतर पाच जणांना मात्र शिक्षा करण्याचे ठरले. अपीलमध्ये मात्र पाचही जण निर्दोष ठरले.

अ‍ॅरॉन सॉर्किन या प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शकाने ‘द ट्रायल ऑफ द शिकागो सेव्हन’ या नावाने नुकताच या खटल्यामागील घटनांवर व खटल्यावर चित्रपट काढला. सॉर्किनने सिनेमाची कथा स्टीव्हन स्पीलबर्ग या प्रसिद्ध निर्मात्यासाठी लिहायला घेतली होती, पण ती योजना बारगळली. अखेर सॉर्किनला स्वत:च चित्रपट करावा लागला. तसाही सॉर्किन ‘वेस्ट विंग’, ‘न्यूजरूम’, ‘अ फ्यू गुड मेन’ वगैरे उदारमतवादी राजकीय चित्रपट व टीव्ही मालिकांसाठी प्रसिद्ध आहे. या नव्या चित्रपटाने त्याच्या कीर्तीत भरच पडेल.

एक न घडलेली घटना मात्र चित्रपटात घेतली गेली आहे. शेवटी शिक्षेआधी एका आरोपीला कैफियत मांडायची संधी दिली जाते. हेडन हा आरोपी खटल्याच्या काळात व्हिएतनाममध्ये मरण पावलेल्या साडेचार हजार अमेरिकनांची नावे व पदे वाचून दाखवू लागतो. न्यायालय थाडथाड न्याय-हातोडा (गॅव्हल) आपटत असूनही हेडन थांबत नाही. न्यायालयातील सर्व लोक मात्र उभे राहून हुतात्म्यांना मानवंदना देतात, अगदी सरकारी वकीलही! माझ्या मते याने चित्रपट सुधारलाच आहे.
साध्या शांततामय निदर्शनांची राज्यकर्त्यांनी दखल न घेण्याने काटय़ाचा नायटा कसा होतो, त्यावरची न्याय-प्रक्रिया अपार दिरंगाईने कशी विकृत होते वगैरे बाबींबरोबरच न्यायालय कधीच ‘बिनचूक’ नसते, हेही ठसवण्याने चित्रपट वार्तापटाऐवजी राजकीय टीकाटिप्पणीच्या पातळीला कसा नेता येतो, याचा हा वस्तुपाठच समजावा!

(लेखक मराठीतील ज्येष्ठ कादंबरीकार, विचक्षण अभ्यासक असून, प्रणय लाल लिखित भारतीय उपखंडाचा सखोल नैसर्गिक इतिहास मांडणाऱ्या ‘इंडिका’ या पुस्तकाचा त्यांनी केलेला अनुवाद अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे.)

nandakhare46@gmail.com