|| उज्ज्वला बर्वे

‘एनपीआर’ अर्थात ‘नॅशनल पब्लिक रेडिओ’ ही बिगरखासगी, बिगरसरकारी, नफाउद्देशी नसलेली, सार्वजनिक म्हणता येईल अशी अमेरिकेतील रेडिओ वाहिनी. प्रामुख्याने बातम्या आणि चालू घडामोडींवर आधारित कार्यक्रम प्रसारित करणारी. अमेरिकाभर पसरलेल्या छोट्यामोठ्या हजारेक रेडिओ केंद्रांनी मिळून चालवलेल्या या वाहिनीस अलीकडेच ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने हा विशेष लेख- माध्यमांच्या स्वायत्ततेची निकड व्यक्त करणारा…

 

साधारण २०११ च्या सुमाराची ही गोष्ट. पत्रकारितेचा माझा एक माजी विद्यार्थी अमेरिकेत शिकून, आठ-दहा वर्षे तिथे नोकरी करून भारतात कायमचा परत आला. आता तो पत्रकार राहिला नव्हता, तर मोठ्या माहिती-तंत्रज्ञान कंपनीत विश्लेषक म्हणून काम करत होता. त्याची भेट झाली तेव्हा मी सहज विचारले, ‘‘भारतात आल्यावर अमेरिकेतील कोणत्या गोष्टीची सगळ्यात जास्त उणीव जाणवते आहे, कशाची जास्त आठवण येते आहे?’’ त्यावर क्षणाचाही विचार न करता त्याचे उत्तर आले, ‘‘एनपीआरची!’’

आमच्याबरोबर जे आणखी दोघेतिघे होते, त्यांना ‘एनपीआर’ म्हणजे काय याची सुतराम कल्पना नव्हती. त्यांना कदाचित ते ‘एनबीए’, ‘एनएफएल’ अशा बास्केटबॉल, फुटबॉलच्या संघटनांपैकी काही तरी वाटले. मी रेडिओप्रेमी आहे हे माहीत असल्याने तर त्याने असे उत्तर दिले नाही ना, असे क्षणभर मला वाटून गेले. पण ते तसे नाही हे त्यानंतरच्या गप्पांमधून लक्षात आले. माझ्या आणि त्याच्या सुदैवाने आदल्याच वर्षी मी काही महिने अमेरिकेत राहून आले होते. त्या काळात गाडीतून प्रचंड प्रवास केला होता, आणि गाडीत अखंड एनपीआरचे कार्यक्रम ऐकले होते. त्यामुळे त्याला काय म्हणायचे आहे ते मला समजू शकले, आणि एनपीआरविषयी बोलायला मिळाले याचा आनंद त्याला मिळू शकला.

आत्ता एनपीआरची आठवण व्हायचे कारण म्हणजे त्याला या वर्षी ५० वर्षे पूर्ण झाली. ‘एनपीआर’ हे ‘नॅशनल पब्लिक रेडिओ’ या नावाचे लघुरूप. पण ‘सीएनएन’चे पूर्ण नाव जसे कुणाला माहीत नसते, तसे हे नावही माहीत असण्याची गरज नाही. बिगरखासगी, बिगरसरकारी, नफाउद्देशी नसलेली, खऱ्या अर्थाने सार्वजनिक म्हणता येईल अशी ही अमेरिकेतील रेडिओ वाहिनी. तिच्यावर प्रामुख्याने बातम्या आणि चालू घडामोडींवर आधारित कार्यक्रम असतात. ती पूर्णपणे स्वायत्त आहे. तिची स्थापना  १९६७  साली करण्यात आलेल्या एका सार्वजनिक प्रसारण (पब्लिक ब्रॉडकास्टिंग) कायद्यान्वये झाली. अमेरिकाभर पसरलेल्या छोट्यामोठ्या हजारेक रेडिओ केंद्रांनी मिळून चालवलेली ही वाहिनी आहे.

भारतात रेडिओवरून आपल्याला ती ऐकता येत नसे, त्यामुळे आपल्याला ती वाहिनी माहीत असण्याचे फारसे कारण नाही. शिवाय तिचे कार्यक्रम पूर्णत: अमेरिकाकेंद्री असतात. आपल्याला ‘बीबीसी’ अधिक माहीत आहे; कारण ‘बीबीसी वर्ल्ड ’ या नावाने आंतरराष्ट्रीय वाहिनी म्हणून आपल्याला ती रेडिओवर लघुलहरींवर ऐकायला मिळत असे. शिवाय इंग्रजांची ‘बीबीसी’ आपल्याला भावनिकदृष्ट्याही अधिक जवळची वाटायची. अमेरिकेचीसुद्धा ‘व्हॉइस ऑफ अमेरिका’ ही आंतरराष्ट्रीय रेडिओ वाहिनी आहे. पण ती फार थोड्या लोकांना माहीत होती. अर्थात, आता इंटरनेटवरून सगळ्या रेडिओ वाहिन्या आणि ‘पॉडकास्ट’च्या माध्यमातून चांगले चांगले कार्यक्रम उपलब्ध आहेत. त्यामुळे कुठूनही एनपीआरच्या चाहत्यांना त्यांचे आवडते कार्यक्रम ऐकता येतात.

भारतात जी फारशी माहीत नाही, त्या एनपीआरची दखल कशासाठी घ्यायची? अनेक कारणे आहेत.

अतिशय दर्जेदार कार्यक्रमांसाठी ही वाहिनी प्रसिद्ध आहे. ३ मे १९७१ रोजी सुरू झालेला ‘ऑल थिंग्ज कन्सिडर्ड’ हा कार्यक्रम आजही तेवढाच लोकप्रिय आहे. तोवर वृत्तविषयक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फक्त पुरुष करत. बायकांना ते जमणार नाही, त्यांचा आवाजही तेवढा दमदार वाटणार नाही, अशी सार्वत्रिक समजूत होती. पण या कार्यक्रमाने १९७२ मध्ये पहिल्यांदा एका महिलेकडे ती जबाबदारी दिली आणि सर्व (गैर)समज खोटे ठरवले. सखोल वार्तांकन, चालू घडामोडींची सर्वांगीण चर्चा यामुळे हा कार्यक्रम अमेरिकेत अतिशय लोकप्रिय आहे.

विविध कला प्रकारांना, विविध विषयांना कार्यक्रमांत महत्त्वाचे स्थान देण्याची पद्धतही एनपीआरने सुरू केली. चारचाकी गाड्या ही अमेरिकेची जीवनरेखा आहे. गाड्यांविषयीचा ‘कार टॉक’ नावाचा अतिशय रंजक फोन-इन कार्यक्रम अनेक वर्षे या वाहिनीवर चालू होता. त्याखेरीज जगातील महत्त्वाच्या घडामोडींचे प्रत्यक्ष घटनास्थळावरून केलेले वार्तांकनही लक्षवेधी ठरले होते. श्राव्य माध्यमाच्या सर्व क्षमता आणि शक्यता वापरून केलेले कार्यक्रम हे या वाहिनीचे खरे वैशिष्ट्य आहे.

अधिकाधिक श्रोते आणि पर्यायाने अधिक जाहिराती मिळवण्यासाठी एनपीआरला कोणत्याही तडजोडी कराव्या लागत नाहीत, की टिकून राहण्यासाठी एका पक्षाची बाजू घ्यावी लागत नाही. त्यामुळे संतुलित, नि:पक्षपाती आशय हे एनपीआरचे वैशिष्ट्य आहे. भिन्न पक्ष, विचारप्रणाली यांना जर वाटत असेल की, ही वाहिनी त्यांच्या विरोधकांच्या बाजूची आहे, तर तेसुद्धा तिच्या तटस्थ भूमिकेचे द्योतक मानावे लागेल!

स्वायत्तता टिकवून ठेवणे कसे जमते? सदस्य रेडिओ केंद्रांच्या वर्गणीतून आणि इतर देणग्यांमुळे. सदस्य केंद्रेदेखील व्यापारी स्वरूपाची नाहीत. त्यांना त्यांचे विद्यापीठ किंवा स्वयंसेवी संस्था यांच्याकडून थोडी मदत मिळते. त्यामुळे त्यांच्यावरही राजकीय दडपण नाही. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे, बरीचशी आर्थिक मदत श्रोते करतात. मी अमेरिकेत असताना अशा एका रेडिओ केंद्राला भेट दिली. त्या वेळी त्यांचा ‘प्लेज वीक’ म्हणजे ‘वचन सप्ताह’ चालला होता. वचन कसले? तर… त्यांच्या आवडत्या रेडिओ केंद्राला यथाशक्ती २५, ५० डॉलर्सची मदत करून कोणत्याही व्यापारी आणि राजकीय दबावापासून दूर राहण्याचे बळ देण्याचे!

त्याखेरीज एनपीआरला वेगवेगळ्या कंपन्यांचे न्यास आर्थिक मदत करतात. परंतु त्या मदतीच्या बदल्यात कंपन्या कोणत्याही संपादकीय हस्तक्षेपाची अपेक्षा करू शकत नाहीत. एनपीआरवर नेहमीसारख्या जाहिरातीही असत नाहीत. फार तर कार्यक्रमाच्या वेळी निवेदक प्रायोजक कंपनीची तटस्थपणे थोडी माहिती देतात. माध्यम स्वायत्ततेचे महत्त्व जाणणाऱ्या अनेक श्रीमंतांनी व्यक्तिगत स्तरावरही एनपीआरला वेळोवेळी भरघोस मदत केली आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे, मॅक्डोनल्ड फाऊंडेशनचे संस्थापक रे क्रोक यांच्या पत्नी जोन क्रोक यांनी त्यांच्या मृत्यूपश्चात तब्बल २०० दशलक्ष डॉलर्सची देणगी एनपीआरला मिळेल अशी व्यवस्था केली होती. त्याखेरीज जोन क्रोक जिथे राहात तिथल्या रेडिओ केंद्राला ५० लाख डॉलर्स त्यांनी ठेवले होते. अमेरिकी जनतेला योग्य आणि वस्तुनिष्ठ माहिती मिळायची असेल तर सार्वजनिक प्रसारणाला पर्याय नाही, असे जोन क्रोक यांचे ठाम मत होते.

कोविड साथीचा परिणाम सगळ्या माध्यमांवर झाला. एनपीआरवरही झाला, पण चांगला. कारण घरून काम करण्याची पद्धत सुरू झाल्यामुळे गाडीतून कामाला जाताना रेडिओ ऐकण्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी संकेतस्थळ, पॉडकास्ट, अ‍ॅप यांच्या माध्यमांतून एनपीआरच्या श्रोत्यांमध्ये एका वर्षात १०-१५ टक्क्यांची वाढ झाली. सध्या एका आठवड्यात जवळपास सहा कोटी श्रोते एनपीआरचे कार्यक्रम अशा विविध साधनांद्वारे ऐकतात. श्राव्य कार्यक्रम ऐकणाऱ्या तरुण श्रोत्यांची संख्या फार झपाट्याने वाढत आहे, आणि एनपीआरला त्याचा मोठा फायदा होत आहे. अमेरिकेतील सर्वात जास्त लोकप्रिय २० पॉडकास्टमध्ये सात पॉडकास्ट एनपीआरचे आहेत.

भारतातही रेडिओप्रेमी श्रोत्यांची संख्या कमी नाही. परंतु खऱ्या अर्थाने स्वायत्त आणि नि:पक्षपाती अशा वृत्तप्रधान, माहितीप्रधान रेडिओ वाहिनीचा पर्याय आपल्याला कधी उपलब्धच झाला नाही. आपले रेडिओप्रेम मुख्यत: संगीत ऐकण्यापुरतेच राहिले. आणीबाणीनंतर ‘आकाशवाणी’ आणि ‘दूरदर्शन’ला स्वायत्तता देण्याचा प्रयत्न सुरू करणाऱ्या तेव्हाच्या जनता पक्षात आत्ताच्या भाजपच्या नेत्यांचाही समावेश होता. पण प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर त्या तत्त्वांचा सोयीस्कर विसर पडल्यामुळे केवळ मनातले सांगण्यासाठीच रेडिओचा उपयोग होत आहे. आकाशवाणीच्या प्रत्येक बातमीपत्राच्या पाच ठळक बातम्यांपैकी पहिल्या चार ‘पंतप्रधान’ या शब्दापासून सुरू होत असतील, तर श्रोत्यांनी आवर्जून त्या बातम्या का ऐकाव्यात? बातम्यांच्या निवडीतच जर इतका पक्षपात, तर चर्चात्मक कार्यक्रमांत किती असेल, हे गणित मांडणे फारसे अवघड नाही.

खासगी रेडिओ वाहिन्यांना बातम्या प्रसारित करू द्यायच्या नाहीत, आकाशवाणीला बातम्यांच्या स्वरूपात आणि सादरीकरणात बदल करू द्यायचे नाहीत. श्रोते कमी होणार, जाहिराती मिळणार नाहीत, खर्च परवडणार नाही. मग आकाशवाणी केंद्रांना खर्च कमी करायला सांगायचे किंवा उत्पन्न वाढवायला सांगायचे. दोन्ही उपायांमध्ये नुकसान जनतेचेच.

निर्मिती आणि प्रसारणासाठी, तसेच श्रोत्यांना वापरायलाही सोप्या असलेल्या, जवळच्या वाटणाऱ्या रेडिओ या सशक्त माध्यमाकडे आपले किती अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, हे सध्याच्या खासगी मालकीच्या तावडीत सापडलेल्या माध्यमांच्या एकांगी, प्रचारकी, अनेकदा अर्धसत्य, असत्य बातम्यांच्या काळात प्रकर्षाने जाणवत राहते.

एनपीआर हे केवळ एक उदाहरण आहे. त्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले. सर्व प्रगत लोकशाही देशांमध्ये अशा प्रकारे खऱ्या अर्थाने सार्वजनिक हितासाठी असलेल्या रेडिओ वाहिन्या आहेत. त्यांना उद्योगांची, दानशूर व्यक्तींची कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता मदत मिळते. सरकारही त्यांना मदत देते, पण अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करू शकत नाही. आपले सरकार, उद्योग, धनदांडगे तर तसे करताना दिसत नाहीत. त्यामुळे शेवटी प्रश्न एवढाच उरतो की, नि:पक्षपाती बातम्या हा आपला हक्क आहे हे कळणारा आपला समाज आहे का, आणि कळले तरी स्वायत्त, जनहितार्थ काम करणाऱ्या माध्यमांना सक्रिय मदत करायला हा समाज तयार आहे का? तुम्ही-आम्ही त्यासाठी काही करणार आहोत का?

(लेखिका माध्यम अभ्यासक व अध्यापक आहेत.)

ujjwalabarve@gmail.com