11 July 2020

News Flash

मंदिर चळवळीतील त्रिमूर्ती

भाजपने हा राजकीय मुद्दा केल्यामुळे नंतर संसदेत त्यांच्या जागा वाढल्या होत्या.

(संग्रहित छायाचित्र)

राम मंदिर चळवळीला आकार देणाऱ्यांमध्ये परमहंस रामचंद्र दास, अशोक सिंघल व लालकृष्ण अडवाणी ही त्रिमूर्ती आघाडीवर होती. अडवाणी यांनी मंदिरासाठी रथयात्राही काढली होती. भाजपने हा राजकीय मुद्दा केल्यामुळे नंतर संसदेत त्यांच्या जागा वाढल्या होत्या.

परमहंस रामचंद्र दास- दास यांचा जन्म १९१४ मध्ये बिहारमधील खेडय़ात झाला, त्यांचे मूळ नाव चंद्रेश्वर तिवारी. त्यांनी अयोध्येत जाऊन रामजन्मभूमीचा अभ्यास केला. दास हे फैजाबाद येथील हिंदू महासभेचे शहर अध्यक्ष होते. त्यांच्याच काळात  रामलल्लाची मूर्ती अयोध्येत १९४९ मध्ये बाबरी मशिदीच्या घुमटाखाली ठेवण्यात आली होती. त्यावेळी जो प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला त्यात परमहंस रामचंद्र दास यांचे नाव नव्हते. अभिराम दास, रामसकल दास, सुदर्शन दास व इतर ५०जणांची नावे त्यात होती अभिरामदास हे हिंदू महासभेशी संबंधित होते. परमहंस रामचंद्र दास हे या प्रकरणात कधीही आरोपी नव्हते पण नंतर त्यांनी असा गौप्यस्फोट केला की, डिसेंबर १९४९ मध्ये आपणच बाबरी मशिदीत मूर्ती ठेवल्या होत्या. त्यानंतरच ती जागा वादग्रस्त ठरली. त्यानंतर मुस्लिमांना मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यांना नमाजास बंदी करण्यात आली. हिंदूंना दर्शनाचा हक्क मिळाला. १९९१ मध्ये रामचंद्र दास यांनी दी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितले होते की, आपणच मशिदीत मूर्ती ठेवल्या होत्या. नंतर काही काळ त्यांनी कुठले भाष्य केले नाही. विहिंपच्या धर्मसंसदेत त्यांची नेहमी उपस्थिती असे. त्यांच्या नेतृत्वाखाली रामजन्मभूमी न्यासाची स्थापना करण्यात आली, ते त्याचे अध्यक्ष बनले. मृत्यूपर्यंत ते पदावर होते. १९८६ नंतर दास यांनी उच्च न्यायालयात याबाबत दावा दाखल केला होता. रामलल्ला विराजमानच्या वतीने देवकी नंदन अग्रवाल यांनी दावा दाखल केला. ते उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व विहिंपचे उपाध्यक्ष होते.

अशोक सिंघल- सिंघल यांचा जन्म उत्तर प्रदेशात आग्रा येथे १९२६ मध्ये झाला. त्यांचे वडील सरकारी अधिकारी होते. त्यांचे बंधू बी.पी सिंघल हे उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक होते. अशोक सिंघल यांनी बनारस विद्यापीठातून धातू अभियांत्रिकीत पदवी घेतली होती. तेथे उजव्या विचारसरणीशी त्यांची ओळख झाली. नंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी प्रांत प्रचारक म्हणून काम केले.  १९८१ मध्ये विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस बनले. त्यांच्याच काळात मंदिर प्रश्नावर पहिली धर्मसंसद झाली, त्यांनी मंदिर चळवळ लोकांपर्यंत नेली. शिलान्यासानंतरचे दिवस वादळी होते. ६ डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यावेळी आरोपपत्रात त्यांचे नाव होते. क्राइम नं १९८ या प्राथमिक माहिती अहवालात म्हटले होते  की,  लालकृ ष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी. विष्णू हरी दालमिया, उमा भारती, गिरिराज किशोर, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा यांनी त्यावेळी चिथावणी देऊन कारसेवकांना बाबरी मशीद पाडण्यास फूस दिली. बाबरी मशीद पाडल्याचा राजकीय फायदा हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भाजपला झाला व त्यानंतर त्यांना केंद्रात सत्तेचे फळ मिळाले.  सिंघल यांचे २०१५ मध्ये निधन झाले पण तोपर्यंत तरी राममंदिराच्या मुद्दय़ावर तोडगा निघाला नव्हता.

लालकृष्ण अडवाणी- रामजन्मभूमी आंदोलनातील प्रभावशाली राजकारणी असलेले अडवाणी आता अडगळीत टाकले गेले असले तरी भाजपची सत्तेची पायवाट त्यांच्या रथयात्रेने करून दिली होती. माजी पंतप्रधान वाजपेयी मवाळ होते पण अडवाणी हे जहाल नेते म्हणून राममंदिर चळवळ चालवत होते. सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतात त्यांचा १९२७ मध्ये जन्म झाला. १९४१ मध्ये ते संघाचे प्रचारक बनले. फाळणीनंतर त्यांना संघाने राजस्थानात पाठवले होते. भारतीय जनसंघ स्थापन झाल्यानंतर ते राजकारणात आले. १९५७ मध्ये राजकीय काम करू लागले. १९७० मध्ये राज्यसभा सदस्य झाले. १९७७ मध्ये ते पहिल्या काँग्रेसेतर मंत्रिमंडळात माहिती व प्रसारण मंत्री होते. १९८० मध्ये भाजपची स्थापना  झाली त्यावेळी वाजपेयी पहिले अध्यक्ष बनले. १९८४ च्या निवडणुकीत मंदिर मुद्दय़ांचा प्रभाव पडला नाही. त्यानंतर अडवाणी पक्षाध्यक्ष झाले. त्यांनी आक्रमक भूमिका घेत  आंदोलने केली. १९८९ मध्ये भाजपचे २ वरून एकदम ८९ खासदार निवडून आले. १९९० मध्ये मंदिर चळवळ जोरात होती. अडवाणी यांनी रामरथ यात्रा काढली ती सोमनाथ (गुजरात) ते अयोध्यादरम्यान होती. यात्रेच्या नियोजनात नरेंद्र मोदी सहभागी होते. लालूप्रसाद यादव यांनी अडवाणी यांची यात्रा रोखून त्यांना अटक केली.  नंतर दोन वर्षांनी बाबरी मशीद पाडली गेली. अडवाणी यात प्रमुख आरोपी ठरवले गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2019 12:54 am

Web Title: three peroson in the ram temple movement abn 97
Next Stories
1 धर्म आणि राजकारणाची फारकत करणार की नाही?
2 ‘एकसांस्कृतिक’ राष्ट्रवादाचा खटाटोप? 
3 ‘आरसेप’ टाळणे, हा उपाय नव्हे!
Just Now!
X