News Flash

बारा तासांची शाळा

दरवर्षी एखाददुसरा उपक्रम घेऊन शाळेच्या ॠणांमधून उतराई होण्याऐवजी एखादा कृतिशील शैक्षणिक उपक्रम सुरू करावा

दरवर्षी एखाददुसरा उपक्रम घेऊन शाळेच्या ॠणांमधून उतराई होण्याऐवजी एखादा कृतिशील शैक्षणिक उपक्रम सुरू करावा, या उद्देशाने डोंबिवलीतील टिळकनगर विद्या मंदिरातील माजी विद्यार्थी मैत्र जीवांचेजोडत एकत्र आले. कृतिशील अभ्यासक्रम आणि त्यातून उपक्रमशील विद्यार्थी तयार व्हावे यासाठी या विद्यार्थ्यांनी मग डोंबिवलीतील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून लोकमान्य गुरुकुलहा शैक्षणिक उपक्रम हाती घेतला. त्यातून उभी राहिली ही एक बारा तासांची शाळा.

दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील आदर्शवत, सुदृढ तरुण आपल्या शाळेतून घडावा, हे ‘लोकमान्य गुरुकुल’चे प्रमुख उद्दिष्ट. उद्योग, नोकरी, व्यवसाय, सनदी लेखापाल, डॉक्टर, वकील अशा वेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेली ही शाळा ‘एमआयडीसी’तील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेच्या जागेत चालते. गुरुकुलात सध्या इयत्ता पहिली, पाचवी ते सातवी असे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थी उत्तीर्ण होऊन वरच्या वर्गात जातील, त्याप्रमाणे वर्ग वाढतील. प्रत्येक वर्गात तीस ते पस्तीस विद्यार्थी आहेत. हे विद्यार्थी डोंबिवलीसह कल्याण, कळवा, बदलापूर परिसरांतून नियमित शाळेला येतात. सकाळी सात ते संध्याकाळी साडेसहा अशी शाळेची वेळ आहे. शहर परिसरातील विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी ना नफा ना तोटा तत्त्वावर बसची सुविधा संस्थेला उपलब्ध करून दिली आहे. शाळेत येताना विद्यार्थी फक्त पिण्याच्या पाण्याची बाटली आणतात. दप्तर शाळेतच असल्याने त्याचे ओझे नाही. बौद्धिक प्रगतीबरोबर विद्यार्थ्यांची शरीरयष्टी उत्तम व्हावी, यासाठी आरोग्यपूर्ण न्याहरी, भोजनाची सोय शाळेतच करण्यात आली आहे.

बी. एड. महाविद्यालयात प्राचार्य असलेल्या, पण उमलत्या तरुण पिढीसाठी काहीतरी नवीन, आव्हानात्मक करावे या उद्देशातून दामदुप्पट पगारावर पाणी सोडून गुरुकुल शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत झालेल्या एस. कोऱ्हाळकर या गुरुकुलमधील विद्यार्थ्यांसाठी नवनवीन विषय उपक्रमांची आखणी करीत असतात. ‘मैत्र जीवां’चे ग्रुपमधील डॉ. महेश ठाकूर, माधव चिकोडी, राजन मराठे, महेश देशपांडे, मिलिंद फाटक, कानिटकर बंधू, परुळेकर बंधू, संदीप वैद्य, आशीर्वाद बोंद्रे, अमोद गोखले, शाळा व्यवस्थापन समितीसह, शिक्षक, अनेक माजी विद्यार्थी या उपक्रमात हिरिरीने सहभागी होऊन गुरुकुलचा शैक्षणिक वटवृक्ष फुलविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

परिपाठ आणि न्याहरी

सकाळी सात वाजता सरस्वतीची प्रार्थना झाल्यानंतर विद्यार्थी योगासने, मौनसंवाद, सूर्यनमस्कार, कवायत हा शारीरिक व्यायाम एक तास करतात. खंबीर सृजनशील मन फुलविणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. संवाद कला, मूल्यशिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. त्यानंतर शेंगदाणा, राजगिरा, सातू अशा पंधरा प्रकारचे लाडू विविध दिवशी विद्यार्थ्यांना सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत पौष्टिक आहार म्हणून दिले जातात.

विषयांचे वर्ग

सर्व शाळेत शिक्षक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवितात. लोकमान्य गुरुकुलमध्ये मराठी, इतिहास, भूगोल, इंग्रजी, गणित अशी प्रत्येक विषयाची वर्ग खोली आहे. ज्या विषयाचा तास असेल त्या विषयाप्रमाणे विद्यार्थी त्या वर्गात जाऊन बसतात. ई लर्निंग, स्वतंत्र संगणक कक्ष व अभ्यासाची सोय येथे आहे.

स्वयंशिस्तीचे धडे

दुपारच्या वेळेत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जाते. विद्यार्थीच विद्यार्थ्यांना वाढतात. विद्यार्थ्यांच्या दोन तुकडय़ा करण्यात आल्या आहेत. इयत्ता पहिले ते सातवीचे विद्यार्थी सभागृहात पंगत पद्धतीने बसून एकत्र भोजन घेतात. लहान, मोठे विद्यार्थी एकत्र बसविल्याने लहान मुलांना मोठय़ांचा विचार, आचार कळावा, हा यामागील उद्देश. भोजन झाल्यानंतर विद्यार्थी स्वत: आपली भांडी धुवून जागेवर ठेवतात. स्वयंशिस्तीचे धडे विद्यार्थ्यांना मिळावेत यामागील उद्देश.

स्वयंअध्ययन

भोजनानंतर विद्यार्थी एक तास स्वयंअध्ययन, गृहपाठ, पाढे, घनपाठ, पाठांतराला बसतात. काही विद्यार्थी शाळेच्या ग्रंथालयात बसून स्पर्धा परीक्षा व अवांतर वाचन करतात. देश, जगातील दैनंदिन घडामोडी विद्यार्थ्यांना कळाव्यात म्हणून वर्तमानपत्र वाचन विद्यार्थ्यांना सक्तीचे आहे. महत्त्वाच्या बातम्यांचे वाचन शाळेत केले जाते. काही बातम्या फलकावर लावण्यात येतात. दर महिन्याला विद्यार्थ्यांनी किमान कोणत्याही प्रकारची तीन पुस्तके वाचून पूर्ण करायची असतात. त्यामुळे वर्षांला एक विद्यार्थी किमान तीस ते पस्तीस पुस्तके वाचेल, ही अपेक्षा. विद्यार्थ्यांची ग्रहण शक्ती, त्यांच्या आकलन शक्तीचा अंदाज घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एखादा विषय देऊन गटचर्चा घडून आणल्या जातात. प्रत्येक विद्यार्थ्यांने कोणताही विषय निवडून त्यावर कीर्तन, प्रवचनाप्रमाणे आपले भाष्य करावे, असा एक परिपाठ आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा आपोआप येतो.

कौशल्य विकास

कौशल्य विकासासाठी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, रद्दी पेपरपासून अधिकाधिक चांगले टिकाऊ काय करता येईल, ते विद्यार्थ्यांकडून कार्यानुभवाच्या तासात करून घेतले जाते. कौशल्य अभ्यासात पारंगत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच रोजगाराभिमुख कलेचे मार्गदर्शन केले जाते.

मैदानी व्यायाम

संध्याकाळच्या वेळेत एक तास विद्यार्थ्यांना मैदानी खेळ शिकवले जातात. यामध्ये मल्लखांब, बास्केटबॉल, अ‍ॅथलेटिक्स अशा खेळांचा समावेश आहे. हा तास सक्तीचा आहे. विद्यार्थ्यांमधील गायन, वादनविषयक कलागुण विकसित व्हावेत म्हणून दर दिवसाआड एक तास गायन सभागृहात हार्मोनिअम, तबला, नृत्य, सिंथेसायझर, गायनाचे धडे दिले जातात. यासाठी स्वतंत्र शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

व्यवसाय मार्गदर्शन

लहानमोठे व्यवसाय, त्यांचे व्यवहार यांच्या माहितीसाठी महिन्यातून एकदा क्षेत्रभेट कार्यक्रम निश्चित केला जातो. उदा. गजरा विक्री करणारी स्त्री, तिचा दैनंदिन जीवनक्रम, फुले कोठून आणते, गजरा कशी बांधते, वेणी कशी तयार करतात अशी माहिती विद्यार्थी घेतात. गावपाडय़ावर निवासी शिबीर घेऊन त्या गावातील जीवनमान कसे आहे, याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला आहे. या पद्धतीने बँका, कारखाने, पोलीस ठाणी, व्यवस्थापनांना भेटी देण्याचा कार्यक्रम आखण्यात येतो. स्वत:मधील व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकतेचे गुण तपासण्यासाठी हे उपक्रम आखले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी गणेश पूजनाचे साहित्य विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश पूजेसाठी लागणारे सुट्टे साहित्य दादरला जाऊन, खरेदी करून त्यांची विक्री रेल्वे स्थानक परिसर, गर्दीच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. अशा वेगवेगळ्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमधील अंतर्मनातील प्रेरणांना, कृतिशीलतेला वाव देण्याबरोबरच त्यांच्यात स्वयंशिस्त रुजविण्याचे काम ही बारा तासांची शाळा करते आहे.

 

भगवान मंडलिक

संकलन – रेश्मा शिवडेकर

reshma.murkar@expressindia.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 3:06 am

Web Title: tilaknagar vidya mandir dombivli
Next Stories
1 ‘बांगलादेशात केले तेच बलुचिस्तानमध्ये करा!’
2  ‘त्यांचे’ ते पाप, अन्..
3 कायदा.. आजारी मानसिकता बदलण्यासाठी
Just Now!
X