|| मुकुंद संगोराम

भारतीय संगीताच्या रीतसर मैफली परदेशांत तशा उशिराच सुरू झाल्या. त्याआधीच भारतात पाश्चात्त्य संगीत आकळून घेण्याचे प्रयत्न फळास येत होते, त्यातून चित्रपट-संगीत बहरत होते, मैफिलीही होत होत्या… पैसा तसा कमीच; पण त्या हलाखीची तमा न बाळगता संगीतात सर्वसंचार करणारे कलावंत होते… 

पारतंत्र्यात असलेल्या भारताचे संगीत जगापर्यंत पोहोचण्याची कोणतीच संधी उपलब्ध नव्हती. स्वातंत्र्यानंतर अशी संधी मिळणाऱ्या थोड्या कलावंतांपैकी एक म्हणजे सतारवादक पंडित रविशंकर (७ एप्रिल १९२०- ११ डिसेंबर २०१२). बंगालमध्ये जन्मलेल्या रविशंकर यांचे बंधू उदयशंकर यांच्या नृत्याच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने रविशंकर जगभर प्रवास करत होते. ते दहा वर्षांचे असतानाच पॅरिसमध्ये चौदा वर्षांच्या यहुदी मेन्युहीन यांच्याशी त्यांची गाठ पडली. ही केवळ दोन व्यक्तींमधील मैत्री नव्हती. त्या दोघांमध्ये स्वरांचे बंध होते. नंतरच्या काळात या शतकातील एक अतिशय नामांकित व्हायोलिनवादक म्हणून विख्यात  झालेले मेन्युहीन भारतीय स्वातंत्र्यानंतर लगेचच म्हणजे १९५२ मध्ये भारताच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा रविशंकर यांनी केवळ त्यांच्यासाठी सतारवादनाची मैफील आयोजित केली. याबद्दल खुद्द रविशंकर लिहितात, ‘‘यहुदी भारतीय संगीताला पहिल्यांदाच सामोरा जात होता. त्या क्षणी तो या संगीताच्या प्रचंड प्रेमात पडला. हे प्रेम त्याच्या मृत्यूपर्यंत टिकून होते. लगेचच म्हणजे १९५५ मध्ये त्याने मला न्यूयॉर्कला येऊन कार्यक्रम सादर करण्याचे निमंत्रण पाठवले. काही कौटुंबिक कारणांमुळे मला जाता आले नाही, म्हणून मी, माझा मेहुणा अली अकबर याला पाठवले. (उस्ताद अली अकबर खाँ हे रविशंकर यांचे गुरू मैहर घराण्याचे उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांचे चिरंजीव आणि नंतरच्या काळात आपल्या सरोदवादनाने साऱ्या जगाला भुरळ पाडणारे एक असामान्य कोटीतील कलावंत. त्यांची बहीण… म्हणजे रविशंकर यांची प्रथम पत्नी अन्नपूर्णादेवी) याच काळात मी परदेशात छोट्या छोट्या मैफिली करू लागलो होतो. तेव्हा मी वाजवायचो, शिकवायचो आणि समजावूनही सांगायचो.’’

पाश्चात्त्य संगीत आणि भारतीय उपखंडातील संगीत यामध्ये मूलभूत संकल्पनांचाच फरक होता. त्यांचे संगीत ‘हार्मनी’चे तर आपले ‘मेलडी’चे. हार्मनी आणि मेलडी असा संगीताच्या बांधणीशी मूलभूत असलेला प्रश्न ब्रिटिशांच्या राजवटीदरम्यान निर्माण झाला. पाश्चात्त्य संगीताचा पाया हार्मनी तर भारतीय संगीताचा पाया मेलडी. एकाच वेळी एकाहून अधिक स्वरांच्या समूहातून स्वरनाद निर्माण करून संगीत व्यक्त करण्याची ही पाश्चात्त्य संगीताची पद्धत भारतीय संगीतासाठी अगदीच नवी. भारतीय संगीत परंपरेत प्रत्येक स्वर सुटा आणि स्वयंभूही. मात्र केवळ एकाच स्वराच्या आधारे संगीत निर्माण करता येत नाही, तर त्यासाठी किमान तीन स्वर तरी विशिष्ट क्रमाने जोडले जाणे आवश्यक. हे भान यायला लागल्यानंतर स्वरांच्या लडीमधून संगीत निर्माण करण्याची एक अखंड परंपरा भारतीय उपखंडात निर्माण झाली. या दोन्ही संगीत परंपरा समांतर होत्या आणि त्यांच्या मूलभूत वैचारिक बैठकीतच वेगळेपणा होता. तो पचवायला भारतीय संगीतकारांना फारसा वेळ लागला नाही. जेवढा वेळ पाश्चात्त्य संगीतकारांना भारतीय संगीताची परंपरा समजून घेण्यास लागला, त्याहून कमी वेळात आपण त्यांच्या संगीतातील जे आपल्या संगीत संस्कृतीत चपखल बसू शकेल, असे सगळे स्वीकारले.

पण तरीही आपण आपले संगीत नेहमीच आपल्या शैलीने वृद्धिंगत केले. पाश्चात्त्य संगीताचा प्रभाव आपल्या अभिजात संगीतावर झाला नाही, याचे कारण या दोन्ही संगीत प्रकारांचा पाया वेगळा होता. तरीही काळाच्या ओघात तो परिणाम होणे अगदीच स्वाभाविक होते. मात्र भारतीय चित्रपट संगीताने अतिशय कलात्मकतेने तो प्रभाव स्वीकारला. साठच्या दशकांत चित्रपट संगीतात या दोन संगीतशैलींचा अप्रतिम मेळ ऐकायला मिळू लागला. बव्हंशी चित्रपट संगीतावरही अभिजात संगीताचाच प्रभाव अधिक होता. त्या काळात भारतातील अनेक शहरांमध्ये अभिजात संगीताच्या कार्यक्रमांना रसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहू लागले. ‘घराणे’ या संकल्पनेतून निर्माण झालेल्या विविध शैलींचे म्हणून रसिकवर्ग तयार झाले. तरीही ते सगळ्याच घराण्यांच्या संगीताला मोकळ्या मनाने सामोरे जात होते. या सगळ्याच घराण्यांमधील कलावंत आपले वेगळेपण कलात्मकतेच्या आणि अभिजाततेच्या कसोटीवर जपण्याचा प्रयत्न करत होते. कलाजीवन हेच जगण्याचे मुख्य ध्येय असणाऱ्या सगळ्यांना किती पैसे मिळतात, किती प्रसिद्धी मिळते, यापेक्षा ‘किती जणांना आपले संगीत आवडते’, यात अधिक रस होता.

परदेशात जाऊन तेथील जाणकारांना आपले संगीत ऐकवणाऱ्यांमध्ये रविशंकर आणि अली अकबर खाँ हे बिनीचे कलाकार. त्यांनी तेथील संगीताबरोबर भारतीय संगीताची सांगड घालण्याचा प्रयोग केला. तोही तेथील रसिकांना भावला. बीटल्स या जगविख्यात वाद्यवृंदाबरोबर रविशंकर यांना वादन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे परदेशांत भारतीय संगीताची एक नवी बाजारपेठही निर्माण होऊ लागली. तोपर्यंत तेथे जाऊन स्थायिक झालेल्या भारतीयांबरोबरच तेथील स्थानिकांनाही या संगीताबद्दल आपुलकी निर्माण होणे, हे या संगीताचे यश.

संगीताची ही अशीच बाजारपेठ भारतातही, भारतीय संगीतासाठी निर्माण होऊ लागली होती. त्यासाठी संगीताचे मोठे कार्यक्रम आयोजित होऊ लागले होते. एखाद्याच्या घरात किंवा छोट्याशा सभागृहात मोजक्या रसिकांसमोर सादर होणारे संगीत आता मोठ्या परिषदांमधून आणि महोत्सवांमधून सादर होऊ लागले होते. त्यासाठी प्रवेशमूल्य आकारण्याची पद्धत सुरू झाली होती. एकाच कलावंताची स्वतंत्र मैफील आयोजित करणाऱ्या आयोजकांना त्यांची स्वत:ची कलेची भूक भागवण्याची हौस अधिक होती. तरीही प्रत्येक कलावंताचा स्वत:चा रसिकवर्गही तयार होऊ लागला होता. तिकिटांमधून येणाऱ्या उत्पन्नातच कार्यक्रमाचा खर्च आणि कलावंताची बिदागी भागवण्याशिवाय पर्याय नव्हता. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकात चित्रपटसृष्टीही बहरू लागली होती आणि त्याकडे वळणाऱ्या प्रेक्षकांची संख्याही वाढत होती.

या काळात एकीकडे पं. रविशंकर जगभरात भारतीय संगीत सतारीच्या माध्यमातून ऐकवत होते तर इथे भारतात, विष्णु दिगंबर पलुसकरांचे चिरंजीव द. वि. पलुसकर (२८ मे १९२१- २६ ऑक्टोबर १९५५) आपल्या नवोन्मेषी गायनामुळे देशभर लोकप्रियतेच्या शिखरावर होते. भारतात संगीत शिक्षणाचा पाया घालणाऱ्या विष्णु दिगंबर यांचे ‘गुरु’त्व त्यांच्या या पुत्राला लाभले नाही. वयाच्या दहाव्या वर्षीच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यानंतर स्वकर्तृत्वाने स्वत:ची शैली विकसित करणारे द. वि. पलुसकर हे स्वातंत्र्याच्या पहिल्या दशकातील बिनीचे कलाकार ठरले. एका महावृक्षाच्या सावलीत आणखी एका महावृक्षाची पेरणी होत नाही, हे सत्य खोटे ठरवण्यासाठी दत्तात्रय विष्णु ऊर्फ डी. व्ही. ऊर्फ बापुराव पलुसकरांनी आपल्या अल्पायुष्यात जे काही साध्य केले, ते त्यांच्या असामान्यत्वाची साक्ष देणारे आहे. वयाच्या चौतिसाव्या वर्षी इहलोकीची स्वरयात्रा थांबवणाऱ्या या कलावंताला आणखी काही काळ आयुष्य लाभले असते, तर कदाचित भारतीय अभिजात संगीताचा चेहरा अधिक ललितसुंदर झाला असता.

गवयाचे पोर सुरातच रडणार, ही म्हण म्हणूनच ठीक. प्रत्यक्षात सुरात रडण्यासाठीही काही तालीम लागणारच. तेव्हा प्रत्येकच गवयाला आपल्याही पुत्राने गवईच व्हावे, असे वाटणे, ही सहजसुलभ भावना झाली. परंतु सुरवंटाचे फुलपाखरू होण्याच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष फुलपाखराला काहीच करावे लागत नाही. संगीतात मात्र तालीम आणि रियाजाशिवाय फुलपाखरू होण्याची शक्यता कमीच. बापुराव हे घराणेदार संगीतातले क्रांतिकारकच. केवळ ग्वाल्हेर घराण्याच्या कक्षेत न राहता इतर घराण्यांमधील काही सुंदर आणि अभिजात गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या आणि आपले संगीत अधिक तेज:पुंज केले. त्यांच्या ज्या थोड्या ध्वनिमुद्रिका उपलब्ध आहेत, त्यावरून त्यांच्या गोड आणि भरदार गायनाची कल्पना येऊ शकते. (‘बैजू बावरा’ या चित्रपटातील उस्ताद अमीर खाँ यांच्याबरोबरची त्यांची ‘आज गावत मन मेरो झूमके’ ही जुगलबंदी तर तेव्हा लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडणारी होती.) १९५० ते त्यांच्या निधनापर्यंतच्या पाच वर्षांत, ते देशभर दौरे करत होते. आकाशवाणी, संगीत महोत्सव, खासगी मैफिली अशा सगळ्या पातळ्यांवर ते हुकमी कलावंत म्हणून नावाजले होते. तरीही त्यांच्या आयुष्यात पुरेसे पैसे नाही, संसाराचा गाडा चालवणे कठीण होत चालले आहे, अचानक उद्भवलेल्या व्याधीने स्वरांचा महाल कोसळून पडण्याची अनावर भीती दाटून येते आहे… अशा भावनांचा कल्लोळ उभा राहिलाच. ‘प्रेम के कारण प्रेमी गावें, तानों से बादल पिघलावें, जगत में रहे मान रे’ या (‘आज गावत…’ मधल्या) ओळींसारखीच एकंदर अवस्था. ते त्यातूनही बाहेर आले खरे, परंतु त्या काळातील भारतीय संगीतातील कलावंतांची जी घालमेल होत होती, त्याचे वर्णन त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या दैनंदिनीतून लक्षात येते. जन्मशताब्दी साजरी होत असलेल्या बापुरावांचे स्मरण म्हणूनच अत्यंत आवश्यक.

mukund.sangoram@expressindia.com