31 May 2020

News Flash

मिठीची कथा व्यथा..

मंगळवार, २६ जुलै २००५.. सकाळपासूनच मुंबईत पावसाने ताल धरला होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास पावसाने रौद्ररुप धारण केले आणि काही क्षणातच मुंबईत हाहाकार उडाला

| July 26, 2015 04:35 am

मंगळवार, २६ जुलै २००५.. सकाळपासूनच मुंबईत पावसाने ताल धरला होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास पावसाने रौद्ररुप धारण केले आणि काही क्षणातच मुंबईत हाहाकार उडाला. रस्ते, रेल्वे मर्ग पाण्याखाली लुप्त झाले आणि इमारतींचे तळमजले पाण्याखाली बुडाले. जलप्रलयामुळे मुंबईकरांचे धाबेच दणाणले. पूर ओसरल्यानंतर अतिक्रमणाने गुदमरलेल्या मिठी नदीचे सरकार आणि मुंबईकरांना स्मरण झाले. कोटय़वधी रुपये खर्च करुन मिठी रुंद आणि खोल झाली, पण प्रदूषणाच्या फासातून मुक्त होऊ शकलेली नाही.

विहार तलावातून उगम पावून वळणे घेत माहीममध्ये समुद्रात विलीन होणारी, कुण्या एकेकाळी निर्मळ पाण्याने झुळूझुळू वाहणारी मिठी नदी दळणवळणासाठीचा मार्ग म्हणून ओळखली जात होती, असे कुणी आज सांगितले तर ते खरे वाटणार नाही. विहार तलावाजवळून उगम पावून माहीम कॉजवे येथे समुद्राला मिळणाऱ्या मिठी नदी किनाऱ्यालगतच्या भागात शेतीही केली जायची. मिठी नदीवर धारावी परिसरात एक धक्का होता. तर पुढे चुनाभट्टी छेटेखानी बंदर होते. समुद्रमार्गे चुना घेऊन येणाऱ्या छोटय़ा बोटी माहीम येथून मिठी नदीमध्ये प्रवेश करायच्या आणि धारावी धक्क्यावरून पुढे चुनाभट्टीच्या दिशेने मार्गक्रमण करायच्या. मासेमारीचा छंद असलेल्या मंडळींसाठी या नदीमध्ये फिशींग क्लबही चालविण्यात येत होता.
कालौघात मुंबईत झपाटय़ाने औद्योगिकरण झाले. रोजगाराच्या निमित्ताने मुंबापुरीवर बेरोजगारांचे लोंढे थडकू लागले. त्यापैकी अनेकांनी मिठीकाठीच आपले बस्तान बसविले. झोपडपट्टय़ांच्या मगरमिठीत मिठी अडकली. नदीपात्र अरुंद झाले. कचऱ्यामुळे प्रवाहात अडथळे निर्माण झाले. अतिक्रमणांचा विळखा मिठीला पडला आणि हळूहळू ती विस्मृतीत गेली.
मंगळवार, २६ जुलै २००५ रोजी मुंबईत आलेल्या प्रलयानंतर खडबडून जाग्या झालेल्या सरकार आणि पालिकेला विस्मृतीत गेलेल्या नद्यांचे स्मरण झाले. प्रलयंकारी पावसात रौद्ररुप धारण करून धावणाऱ्या मिठीचाही त्यात समावेश होता. झोपडपट्टय़ा, कारखान्यांमुळे आक्रसलेली रासायनिक द्रव्ये, सांडपाणी, मलयुक्त पाण्याने मिठी मलीन झाली. मिठी नदीच्या संवर्धनाची जबाबदारी मुंबई महापालिकेवर आली. गेल्या दहा वर्षांमध्ये मिठीचे रुंदीकरण, खोलीकरण, किनाऱ्यालगत संरक्षक भिंत उभारण्याचे काम पालिकेने चोख बजावले. काही न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे काम रखडले आहे. पण मिठीमधील प्रदूषण दूर करण्यात पालिका आजही अपयशी ठरली आहे. आजही सांडपाणी, मलयुक्त पाणी, कारखान्यांतील रसायनयुक्त पाणी मिठीमध्येच सोडले जात आहे. आरे कॉलनीतील फिल्टर पाडय़ापासूनच मिठीच्या प्रदूषणाला सुरुवात होते. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, मरोळ, साकी नाका, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुलातून पुढे माहीमजवळ समुद्राला मिळते. मिठीची मनुष्यवस्तीत खळखळ कानी पडते ती फिल्टरपाडय़ात. या वस्तीमध्ये केवळ झोपडय़ाच नव्हे, तर कारखान्यांची खडखडही सुरू असते. त्यातून सोडले जाणारे पाणी सामावून घेत मिठी पुढे सरकते. कुल्र्याच्या सीएसटी रोडवरील किस्मत नगर आणि कलिना रोडवरुन वळसा घालणाऱ्या मिठीत आजही कचरा फेकला जातो.
अतिक्रमण हटवून मिठी काठ मोकळे करण्याचा धडाका पालिकेने लावला होता. मिठीचे पात्र आज बऱ्याच ठिकाणी दुपटीने रुंदावले आहे. खोलीही वाढविण्यात आली. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत पात्र विस्तृत झाले आहे. नदीकाठी सेवा रस्ता उभारण्याचा प्रशासनाचा मानस होता. परंतु रस्त्यासाठी सोडलेल्या जागेवर आता पुन्हा अतिक्रमणाला सुरुवात झाली आहे. मोठा प्रश्न आहे तो नदीतील दुषित पाण्याचा. जेमतेम फिल्टरपाडय़ापर्यंतच मिठीचे पाणी निर्मळ दिसते. या पाडय़ातील लहान मुले आणि तरुण आजही तेथे मासेमारी करताना दृष्टीस पडतात. मात्र फिल्टरपाडय़ातून पुढे थेट माहीमपर्यंत मिठीमधील प्रदुषण टप्प्याटप्प्यावर वाढतच आहे. समुद्रात विलीन होणारे नदीचे काळे ठिक्कर पाणी समुद्रातील प्रदूषण वाढीस कारणीभूत ठरत आहे. मिठी पूर्वीसारखी निर्मळ कधी होणार, असा प्रश्न अनेकांना सतावत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2015 4:35 am

Web Title: tragedy of mithi river
टॅग Mithi River
Next Stories
1 बदलापूर – यंत्रणा अपयशी
2 ठाण्याची स्थिती हाताबाहेर
3 कृष्णाकाठचा थरकाप कायम
Just Now!
X