वर्षांनुवर्षे गरिबीत, अज्ञानाच्या गर्तेत राहून रूढी-परंपरांना घट्ट पकडून राहणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याचे कार्य जव्हार येथील ‘प्रगती प्रतिष्ठान’ने हाती घेतले आहे. साडेतीन दशकांच्या वाटचालीत संस्थेने आदिवासींसाठी मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या या वाटचालीला लोकसहभाग आणि लोकवर्गणीची जोड असणेही महत्त्वाचे आहे..
स्वा तंत्र्य मिळाल्यापासून आर्थिक आणि सामाजिक विषमता हे आपल्या देशापुढील फार मोठे आव्हान असून आता २१व्या शतकात आपण महासत्ता होण्याचे स्वप्न पाहात असतानाही हे वास्तव काही बदलू शकलेले नाही. देशाची आर्थिक राजधानी अशी ख्याती असलेल्या मुंबईपासून अवघ्या शंभर-सव्वाशे किलोमीटर अंतरावरील प्रदेशात वीज, पाणी, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार या प्राथमिक सुविधाही अद्याप पोहोचू शकलेल्या नाहीत. येथील आदिवासीबहुल समाजातील फार मोठा घटक दारिद्रय़ आणि अंधश्रद्धांच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. आरोग्य सुविधांचा अभाव आहे. दुर्गमतेबरोबरच ‘सदैव सर्वसामान्यांसाठी’ असा दावा करणाऱ्या शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष हे या परिस्थितीचे प्रमुख कारण आहे. असे असले तरी काही अशासकीय संस्था मात्र या भागात सातत्याने विविध कल्याणकारी योजना राबवून येथील समाजाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘प्रगती प्रतिष्ठान’ ही त्यापैकीच एक प्रमुख संस्था असून गेली ३५ वर्षे सातत्याने कार्यरत असणारे या भागातील हे जणू काही स्वयं सरकारच आहे.
सध्या पालघर जिल्ह्य़ातील जव्हार आणि मोखाडा या दोन तालुक्यांत प्रामुख्याने काम करणाऱ्या या संस्थेची स्थापना मात्र ठाणे शहरात शैक्षणिक स्वरूपाचे काम करण्याच्या उद्देशाने झाली होती. १९७२ मध्ये ठाण्यात या संस्थेने काम करण्यास सुरुवात केली. झोपडपट्टी पुनर्विकास हा शब्दही जेव्हा अस्तित्वात नव्हता, त्या काळात या संस्थेने पुढाकार घेऊन मो. ह. विद्यालयामागच्या झोपडपट्टीचे प्रभातनगर या सुनियोजित वसाहतीत रूपांतर केले. त्याचप्रमाणे ठाणे शहरातील वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी काही ठोस प्रयत्न करण्याचा संस्थेचा मनोदय होता. संस्थापक वसंतराव पटवर्धन त्यासाठी प्रयत्न करीत होते. कोरस कंपनीच्या जागेत संस्थेला एक शाळाही बांधून दिली जाणार होती. मात्र या दरम्यान शहरी भागापेक्षा तत्कालीन ठाणे जिल्ह्य़ाचा भाग असणाऱ्या दुर्गम तालुक्यांमध्ये अशा प्रकारचे काम करण्याची अधिक गरज असल्याचे संस्थाचालकांच्या लक्षात आले. त्यामुळे प्रगती प्रतिष्ठानने जव्हार आणि मोखाडा या दोन तालुक्यांकडे लक्ष केंद्रित केले.
फिरते दवाखाने
आरोग्य सुविधांचा अभाव ही या भागातील एक प्रमुख समस्या आहे. त्यामुळेच कुपोषण, गरोदरमाता मृत्यू आदी प्रश्न अद्याप कायम आहेत. ‘प्रगती प्रतिष्ठान’ने तीन दशकांपूर्वी जेव्हा या भागात काम सुरू केले, तेव्हा त्यांच्या ही गोष्ट प्रकर्षांने लक्षात आली. कारण अगदी दूरदूपर्यंत अगदी औषधापुरतीही आरोग्य सुविधा उपलब्ध नव्हती. त्यात अंधश्रद्धेचा पगडा असल्याने भोंदू भगतांचा सुळसुळाट होता. संस्थेने १९८० मध्ये वैद्यकीय पथकाद्वारे या भागात फिरता दवाखाना सुरू केला. एक पूर्णवेळ डॉक्टर या सेवेसाठी नेमण्यात आला. जव्हार आणि मोखाडा या दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी तीन आरोग्य केंद्रे थाटण्यात आली. गावातील एका झोपडीतच आठवडय़ातून एकदा रुग्ण तपासणी आणि औषध उपचार केले जात. सोमवार ते शनिवार प्रत्येक आरोग्य केंद्राला डॉक्टर भेट देई. या पथकासोबत जुजबी औषधेही असत. रुग्णाची व्याधी पाहून तीन-चार दिवसांचे औषधे दिली जात. कारण पुढील आठवडय़ाशिवाय मध्ये कोणतेही उपचार त्यांच्यापर्यंत पोहोचविणे शक्य नव्हते. तब्बल १७ वर्षे प्रगती प्रतिष्ठानचे हे फिरते दवाखाने सुरू होते. पुढे शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित झाल्यावर ही सुविधा बंद करण्यात आली.
नळपाणी योजना
या भागातील अनेक गावांना अजूनही पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी गावातील महिलांना, मुलींना वणवण भटकावे लागते. पुन्हा एवढे कष्ट उपसूनही शुद्ध पाणी मिळेलच, याची खात्री नसते. परिणामी अशुद्ध पाण्यामुळे भेडसावणाऱ्या आजारांचा त्यांना सामना करावा लागतो. गावांमधील महिलांची पाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टातून सुटका व्हावी, या हेतूने प्रगती प्रतिष्ठानने गावोगावी पाणी योजना राबविण्यास सुरुवात केली. दहा गावांमध्ये दूरवरील विहिरींवर वीजपंप बसवून पाणी आणले. विजेची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी सौरपंपांचा वापर करण्यात आला. आतापर्यंत सौरपंपाद्वारे संस्थेने ३२ ठिकाणी पाणी योजना राबविल्या आहेत. या योजनांमुळे ४२ ते ७२ मीटर उंचीवरील वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचविण्यात संस्थेला यश आले आहे. या पाणी योजनांचा या भागातील १५ हजार रहिवाशांना लाभ झाला आहे. ‘ग्राऊंड फोर्स’ ही डेन्मार्कस्थित कंपनी या भागात शंभर सौरपंप देणार आहे.
जलसंधारणासाठी ३६ बंधारे
ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्य़ांत मुबलक पाऊस पडतो. मात्र जलसंधारण योजना नसल्याने हा प्रदेश अद्याप कोरडा आहे. नव्याने मोठी धरणे बांधणे आता अनेक कारणांनी अशक्य असल्याने नैसर्गिक नाले, ओहोळांवर बंधारे बांधून स्थानिकांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे हाच एक उपाय आहे. ‘प्रगती प्रतिष्ठान’ने हे वास्तव ओळखून जव्हार तालुक्यात आतापर्यंत तब्बल ३६ बंधारे बांधले आहेत. त्यामुळे स्थानिकांना शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले आहे.
सौर ऊर्जेचा प्रभावी वापर
दुर्गमतेमुळे या भागातील अनेक गाव-पाडय़ांपर्यंत अद्याप वीज पोहोचू शकलेली नाही. त्यामुळे येथील वस्त्यांवरील अंधार दूर करण्यासाठी सौर ऊर्जा हा एकच पर्याय आहे. प्रगती प्रतिष्ठानने गेली अनेक वर्षे रोटरी तसेच इतर संस्थांच्या मदतीने या भागातील अनेक वाडय़ा-वस्त्यांवर सौरदिवे दिले. गेल्या एप्रिल महिन्यात जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पाथर्डी, ऐना आणि झाप या तीन ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या हेदोली, दखनेपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी, वडपाडा, भाटीपाडा आणि नवापाडा या सात पाडय़ांमध्ये स्वतंत्र सौर ऊर्जा केंद्रांद्वारे अखंड वीजपुरवठा सुरू करण्यात आला. पुण्यातील ग्रामऊर्जा प्रतिष्ठान आणि आयसीआयसीआय बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रगती प्रतिष्ठान’ने साकारलेल्या या उपक्रमामुळे या भागातील दोनशे घरे जणू काही युगानुयुगाच्या अंधारातून बाहेर पडली आहेत.
शेती सुधार उपक्रम
प्रगती प्रतिष्ठान गेली काही वर्षे सातत्याने या परिसरात विविध शेती सुधार उपक्रम राबवीत आहे. त्यासाठी सिजेंटा फाऊंडेशनसोबत प्रतिष्ठानने सहकार्य करार केला आहे. त्याद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाचा ग्रामीण भागाच्या विकासासाठी उपयोग केला जात आहे. संस्थेने प्रत्येकी १५ पाडय़ांमागे एक कृषीतज्ज्ञ नेमला आहे. तो सोमवार ते शुक्रवार त्याला नेमून दिलेल्या भागामध्ये फिरून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करतो. शनिवारी हे शेतीतज्ज्ञ आपापला अहवाल संस्थेला सादर करतात. वेळप्रसंगी मोबाइलवरूनही शेतकऱ्यांना सल्ले दिले जातात. त्यामुळे या भागातील शेती व्यवसाय आता पूर्वीच्या तुलनेत किती तरी अधिक शाश्वत झाला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत, कीटकनाशके दिली जातात. त्यामुळे त्यांना यासाठी पूर्वीसारखे कर्ज काढावे लागत नाही. या भागातील तब्बल अडीच हजार शेतकऱ्यांची संस्थेने किसान क्रेडिट कार्ड काढली आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता कोणत्याही बँकेतून पाच हजार रुपयांचे कर्ज विना हमी मिळण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या भागातील दोन शेतकरी गटांची फार्मर्स प्रोडय़ूस ऑर्गनायझेशनमध्ये नोंदणी झाली आहे. त्यामुळे त्यांना आता थेट ग्राहकांना त्यांचा शेतमाल विकता येतो. साधारणपणे एका गावातील सर्व शेतकरी शक्यतो एक किंवा दोन प्रकारच्या भाज्यांचीच लागवड करतात. तंत्रज्ञानाबरोबरच सिजेंटा फाऊंडेशनने येथील शेतमालाला बाजारपेठही मिळवून दिली आहे. त्यामुळे आता किमान दहा गुंठा जागेत भाजीपाला लागवड करणाऱ्या येथील शेतकऱ्याला २० हजार रुपये उत्पन्न मिळते.

 

संस्थेपर्यंत कसे जाल?

ठाणे येथून बसने भिवंडी- वाडा-विक्रमगड मार्गे जव्हारला जाता येते. अंतर ११० किलोमीटर आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गाने मनोरहून विक्रमगड मार्गाने जव्हारला पोहोचता येते. हे अंतर १७० किमी आहे.

प्रगती प्रतिष्ठान, जव्हार
जि. पालघर
मोखाडा येथे संस्थेने प्रगती विद्यार्थी वसतिगृह स्थापन केले. त्यामुळे दूरवरच्या गावपाडय़ांवरून मोखाडय़ाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्या-जेवण्याची सुविधा उपलब्ध झाली. तिथे आता ३० विद्यार्थी राहतात. पुढे जिल्हा परिषदेने या वसतिगृहास मान्यता देऊन २५ विद्यार्थ्यांचे अनुदान मंजूर केले.
कर्णबधिरांसाठी निवासी शाळा

संस्थेने १९८५ मध्ये जव्हारमध्ये नीलेश लक्ष्मण मुर्डेश्वर कर्णबधिर विद्यालय आणि वसतिगृह सुरू केले. येथे कर्णबधिर मुलांसाठी प्राथमिक शाळा आहे. त्यानंतर पाचवीपासून ही मुले इतर शाळांमधून सर्वसाधारण विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेतात आणि संस्थेच्या वसतिगृहात राहतात. संस्थेतर्फे या विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी विविध उपक्रमही राबविले जातात.

धनादेश या नावाने काढावेत

प्रगती प्रतिष्ठान
(Pragati Pratishthan)
(कलम ८०जी (५) नुसार देणग्या
करसवलतीस पात्र आहेत) संस्थांकडे धनादेश नोव्हेंबर महिन्यात सुपूर्द केले जातील.

पालघर जिल्ह्य़ात आताही दळणवळणाची फारशी साधने नाहीत. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी स्थानिकांना सातत्याने आपुलकीचा, मायेचा हात पुढे करणारी संस्था म्हणजे प्रगती प्रतिष्ठान. शिक्षण, आरोग्य आणि जलसंधारण, पिण्याचे पाणी आदी विविध क्षेत्रात संस्था करीत असलेले कार्य उल्लेखनीय असून या ग्रामोद्धाराच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे मला वाटते. – गायिका देवकी पंडित

धनादेश येथे पाठवा..
एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय
लोकसत्ता, संपादकीय विभाग, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२१४

महापे कार्यालय
संपादकीय विभाग, प्लॉट
नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, मआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय
संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय
संपादकीय विभाग,
एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट
नं. १२०५/२/६, शिरोळे
रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४१०००

नाशिक कार्यालय
संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय
संपादकीय विभाग,
प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ झ्र् २७०६९२३

औरंगाबाद कार्यालय
संपादकीय विभाग, मालपाणी, ओबेरॉय टॉवर्स, जालना रोड, शासकीय दूध डेअरीसमोर, औरंगाबाद. ०२४०-२३४६३०३

नगर कार्यालय
संपादकीय विभाग, आशीष, सथ्थ्या कॉलनी, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७

दिल्ली कार्यालय
संपादकीय विभाग, एक्स्प्रेस बिल्डिंग, ९/१०, बहादूरशाह जफर मार्ग, नवी दिल्ली-११०००२. ०११- २३७०२१००