17 January 2021

News Flash

नेता जिद्दीचा, दूरदृष्टीचा..

पद्मभूषण बाळासाहेब विखे-पाटील राजकारणात येण्यापूर्वी शेतात काम करत असत.

राज्यातील सहकार क्षेत्रातच नव्हे, तर शिक्षण क्षेत्रातही आपल्या कार्यकर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखेपाटील यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्याशी राजकीय संघर्ष करतानाच, त्यांच्यातील माणुसकीचा, चांगुलपणाचा हृद्य अनुभव घेतलेल्या ज्येष्ठ नेत्याने त्यांना वाहिलेली ही आदरांजली..

यशवंतराव गडाख-पाटील

पद्मभूषण बाळासाहेब विखे-पाटील राजकारणात येण्यापूर्वी शेतात काम करत असत. शेतातील डिझेल इंजिन ते चालवायचे; पण त्यांना राजकारणात ओढले गेले. जिल्हा परिषदेला उभे करण्यात आले. ते उपाध्यक्ष झाले तेव्हा मी नेवासे पंचायत समितीचा सभापती होतो. तेव्हापासून माझा त्यांच्याशी राजकीय संबंध आला. त्यांचा राजकीय जीवनप्रवास हा संघर्षांचा होता. त्या वेळी आबासाहेब िनबाळकर, शंकरराव काळे हे जिल्ह्य़ात नेते होते. काँग्रेसमध्ये राज्यात यशवंतराव चव्हाण व शंकरराव चव्हाण असे दोन प्रवाह होते. विखे यांनी वेगळी वाट धरली. ते शंकरराव चव्हाण यांच्याबरोबर गेले. चव्हाणांबरोबर जिल्ह्य़ातून ते एकटेच होते. विरोधी वाट त्यांनी जरूर चोखाळली, पण राजकारणाच्या एका पठडीत ते गुंतून पडले नाहीत. दोन चव्हाणांच्या राजकारणामुळे त्यांना जिल्ह्य़ात संघर्ष करावा लागला. माजी मंत्री बी. जे. खताळ पाटलांचा एक गट होता. जिल्ह्य़ात त्यांनी स्वत:चा एक गट उभा केला. गावोगावी कार्यकत्रे जोडले. आमच्या सर्वाच्या विरोधात ते लढले. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ संघर्ष करताना त्यांनी कार्यकत्रे तयार केले, ते सांभाळले. ते काही काळ शिवसेनेतही गेले. पुन्हा काँग्रेसमध्ये आले. ते शंभर टक्के राजकारणी व्यक्ती होते. राजकारणात व्यावहारिकता जपावी, भावनेला थारा नको, अशी त्यांची धारणा होती. त्यांनी तसेच राजकारण केले. मात्र राजकारण करताना त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे काम उभे केले. लोणीसारख्या गावात शैक्षणिक संकुल उभे करून ते राज्यातच नव्हे तर देशात नावलौकिकाला आणले. सातवी शिकलेला एक शेतकरी हे काम उभे करू शकतो हे कौतुकास्पद आहे. ते पहिल्यांदा संसदेत गेले, तेव्हा त्यांच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला गेला. विरोधी पक्षाचे लोक विखेंना इंग्रजी बोलता येत नाही म्हणून टीका करीत. पुढे ते इंग्रजी शिकले. तेव्हा आम्ही दोघेही खासदार होतो. संसदेत राजकीय तसेच विविध प्रश्नांवर िहदी आणि इंग्रजीत ते पोटतिडकीने बोलत असल्याचे मी पाहिले.

संघर्ष हा त्यांच्या राजकारणाचा गुण व स्वभाव होता. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विखे-गडाख ही लढाई देशात गाजली. ती निवडणूक आम्ही दोघांनी एकमेकांविरुद्ध लढविली. देशात त्या वेळी गाजलेल्या पाच निवडणुकांत तिचा समावेश होतो. मी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा खासदार असताना ते कोपरगाव लोकसभा मतदारसंघातील खासदार होते. त्या वेळी काँग्रेस पक्षात फूट पडली. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्याशी त्यांची जवळीक असल्याने त्यांना कोपरगावमधून पक्षाच्या संसदीय समितीने उमेदवारी नाकारली. कोपरगावऐवजी ते नगर दक्षिणेतून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या विचारात असल्याचे मला कळाले. मला दिल्लीऐवजी राज्याच्या राजकारणात यायचे होते. त्यामुळे मीदेखील लोकसभेची निवडणूक लढवायला उत्सुक नव्हतो. मी विखेंना ‘तुम्ही अपक्ष उभे राहू नका. काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहा, मी माघार घेतो,’ असे म्हणालो. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्याशीही चर्चा केली. पवारांनी तेव्हा रामराव आदिकांना दिल्लीला राजीव गांधी यांच्याशी बोलण्यासाठी पाठविले. गडाखांची तयारी नाही, विखेंना तिकीट दिले तर संघर्ष मिटेल, असे आदिकांनी सांगितले; पण राजीव गांधींनी त्याला नकार दिला. गडाखांनाच उभे राहावे लागेल, मी तिकीट बदलणार नाही, असे त्यांनी आदिकांना सांगितले. त्यामुळे मला उभे राहावे लागले. दोघांमध्ये लढाई झाली. जिल्हा परिषदेत मी २० वर्षे काम केले. दक्षिणेत माझा संपर्क होता. खासदारकीमुळे कार्यकर्त्यांचे जाळे होते. अटीतटीच्या लढाईत मी जिंकलो. निवडणूक काळात मी भाषणात जे बोललो त्याविरुद्ध त्यांनी खटला भरला. न्यायालयात मी हरलो. आम्ही दोघेही एक लढाई हरलो, एक लढाई जिंकलो; पण व्यक्तिगत कटुता, द्वेष, मत्सर ठेवला नाही. सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू असताना एकदा आम्ही एकाच विमानातून जात होतो. विखेंकडे सामानाच्या चार-पाच पिशव्या होत्या. त्यांना ओझे झाले म्हणून मी त्या माझ्याकडे घेतल्या. ते नको नको म्हणत होते. नंतर त्यांची माणसे आली. हा खटला सुरू असतानाच दिल्लीत मी आजारी पडलो. रुग्णालयात दाखल झालो. विखेंना ते कळले. न्यायालयीन लढाई सुरू असतानाही ते मला भेटायला आले. ही घटना मी कधी विसरू शकत नाही. पुढे राजकारणात काही वर्षे अडचणीची गेली. विधान परिषदेला मी उभा राहिलो, तेव्हा डॉ. राजेंद्र पिपाडा माझ्याविरुद्ध उभे होते. त्या वेळी विखे स्वत: माझ्याकडे आले. मला निवडणुकीत मदत केली. सल्ला दिला. निवडणुकीला उभे राहा, राजकारणाबाहेर राहू नका, अशा गोष्टी घरी येऊन सांगितल्या. झाले गेले विसरून पुन्हा मदतीची भूमिका घेतली. मोठय़ा संघर्षांनंतरची ही घटना होती. नगरचे राजकारणी एकमेकांविरुद्ध लढतात, एकमेकांना भिडतात, पराकोटीचा संघर्ष करतात; पण मने तुटू देत नाही. नगरच्या राजकारणाचे हे एक आगळे वैशिष्टय़ आहे.

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, तुळशीदास जाधव, रत्नाप्पा कुंभार, वसंतदादा पाटील, तात्यासाहेब कोरे, भाऊसाहेब थोरात, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, मारुतराव घुले यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ धुरीणांनी सहकारी साखर कारखानदारी उभी केली. सहकारी साखर कारखानदारीतील ते पहिले वारसदार होते. त्यांना मोठा वारसा मिळाला. त्याचा त्यांना फायदाही झाला. त्या वेळी लोकांचा सहकारावर दृढ विश्वास होता. त्यांच्यानंतर सहकारात दुसरी पिढी यायला २५-३० वष्रे लागली. पद्मश्री विठ्ठलराव विखे हे साखर कारखान्याची एक निवडणूक हरले होते. त्यामुळे बाळासाहेब विखे यांनी कारखाना चालवताना चाणाक्षपणा ठेवला. हातून सूत्रे जाऊ दिली नाहीत. सहकार एके सहकार व सहकार एके कारखाना असे चालणार नाही हेच त्यांनी ४०-५० वर्षांपूर्वी ओळखले. अनेक संस्था कारखान्याच्या माध्यमातून उभ्या केल्या. ते वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायला निघाले तेव्हा काही पुढारी त्यांना हसत, त्यांची चेष्टा करत. लोणी हे लहान गाव असल्याने तसे वाटणेही स्वाभाविक होते; पण त्यांनी सहकाराचा ‘ट्रेन्ड’ बदलला, मार्ग बदलला. हे करताना थोडाफार खडखडाट झाला. त्या वेळी एकाही पुढाऱ्याला वैद्यकीय महाविद्यालय काढता आले नाही. डी. वाय. पाटील, पतंगराव कदम तसेच अन्य मंडळींची वैद्यकीय महाविद्यालये नंतर आली. पुढे अभियांत्रिकी व अन्य संस्था इतरांनीही उभारल्या, पण त्याला खूप उशीर झाला. बाळासाहेब थोरात यांनी नंतर वैद्यकीय महाविद्यालय काढले. आम्हीही शिक्षणसंस्थांत आलो, पण त्यापूर्वी विखे यांनी मार्ग बदलला. त्यासाठी मोठे परिश्रम घेतले. जे वाटय़ाला येईल ते सोसलेदेखील. शैक्षणिक क्षेत्रात १०० टक्के यश त्यांनी मिळविले. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागांत शाळा, महाविद्यालये सुरू केली. विखे यांनी स्वत:चे शिक्षण कमी असूनही परिपूर्ण शैक्षणिक संकुल उभारले. बहुजन समाज व शेतकरी कुटुंबातील सातवीपर्यंत शिक्षण झालेला माणूस हे काम उभे करतो, हे राज्याला दुर्लक्षित करता येणार नाही. सकारात्मक दृष्टीने त्याकडे पाहावे लागेल.

नगर जिल्ह्य़ात कर्तृत्ववान पुढारी निर्माण झाले. राजकीय समज असलेला हा जिल्हा आहे. बाळासाहेब विखे, गोिवदराव आदिक, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे अशी एकापेक्षा एक मोठय़ा उंचीची माणसे जिल्ह्य़ाने दिली. अन्यत्र ते पाहायला मिळत नाही. मुख्यमंत्रिपदाला पात्र होतील असे अनेक नेते जिल्ह्य़ाच्या राजकारणात तयार झाले. विखे यांच्यामध्येदेखील मुख्यमंत्रिपदाची क्षमता होती. त्यांचे व्यक्तिमत्त्व वादळी व लढाऊ होते. मोठी सत्ता क्षमता असूनही त्यांच्या वाटय़ाला दुर्दैवाने आली नाही. ते नेहमी समाजाचे प्रश्न मांडत राहिले. ४० वर्षांहून अधिक काळ ते खासदार होते, पण सत्ता हाती असती तर प्रश्नाची सोडवणूक करण्याचे काम त्यांना करता आले असते. सत्ता पूर्ण हातात असल्याखेरीज ते करता येत नाही. ज्येष्ठ विचारवंत बाळासाहेब भारदे यांना मी एकदा हा प्रश्न केला होता. नगर जिल्ह्य़ात भांडणे तीव्र का? नेते एकत्र का येत नाहीत? त्याने नुकसान होते, असे मी म्हणालो. तेव्हा भारदे म्हणाले, ही तत्त्वाची आणि स्वभावाची भांडणे आहेत. स्वभाव कोणी बदलू शकत नाही. भांडणे चालूच राहणार. नुकसान होत राहणार. हे खरे ठरले. कोणी कोणाचे ऐकत नाही, हे मी मोठय़ा लोकांत राहून अनुभवले. तसे झाले नसते तर जिल्ह्य़ात नेतृत्व उभे राहिले असते. पूर्वी यशवंतराव चव्हाण आदेश देत, तो कार्यकत्रे पाळत, शब्द प्रमाण मानत. बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे शिवसेना चालते; पण आता असा आदेश तरी कुठे चालतो? विखे मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश देत असत. राजकारण हे त्यांच्या जीवनाचे अंग होते. संस्थांची उभारणी हे त्यांचे कर्तृत्व होते. समाजउभारणीत त्यांनी योगदान दिले. त्यांच्यात जिद्द होती, दूरदृष्टी होती. त्यातून त्यांनी एक विधायक साम्राज्य उभे केले. समाजापुढे एक आदर्श घालून दिला.

लेखक माजी खासदार आहेत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2017 4:26 am

Web Title: tribute to balasaheb vikhe patil
Next Stories
1 राज्यकारण उत्तर प्रदेश : ते ३५ टक्के!
2 आव्हान कलंकमुक्तीचे
3 पैसा रिता तो रिताच..
Just Now!
X