अतुल भातखळकर

‘दिल्लीतील बांगलादेश सत्याग्रहात नरेंद्र मोदी यांचा सहभाग होता’ या स्पष्टीकरणासह, ‘बांगलादेशाच्या स्वातंत्र्याकरिता जनसंघाने प्रयत्न केले व बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या ५० व्या वाढदिवशी या देशातील हिंदुत्ववादी व्यक्ती असलेले पंतप्रधान तिथे खास अतिथी म्हणून गेले, हा सुंदर योगायोग’ अशी बाजू मांडणारा प्रतिलेख…

‘बांगला-मुक्तिसंग्रामाचे सत्य…’ हा मिलिंद मुरुगकर यांचा लेख (लोकसत्ता, १ एप्रिल)  वाचला. नरेंद्र मोदींना देशाचे प्रधानमंत्री म्हणून बांगलादेश सरकारने देशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले होते आणि त्यावेळी बोलताना बांगलादेश आणि भारताचे संबंध किती जुने आणि त्यांच्या जन्मापासूनचे आहेत हे सांगत असताना- ‘‘मीही बांगलादेशाकरिता केलेल्या सत्याग्रहात सहभागी झालो होतो…’’ हे सत्य- जे यापूर्वीही समोर आलेले आहे- मोदी यांनी पुन्हा एकदा सांगितले. नरेंद्र मोदी यांनी सत्याग्रहात कोणत्या सत्याचा आग्रह केला, असा प्रश्न मुरुगकर यांनी उपस्थित केला आहे.

मुळात काँग्रेस व इंदिरा गांधींची या विषयात कुठल्या प्रकारची भूमिका होती, असा प्रश्न पडावा अशी स्थिती इतिहास चाळला तर लक्षात येईल. काँग्रेसने हिंदी राष्ट्रवादाचा आग्रह धरला; पण देशाची फाळणी धार्मिक आधारावर केली, ही वस्तुस्थिती आहे. ज्या काँग्रेसने फाळणीला शेवटपर्यंत ‘विरोध’ केला, पं. नेहरूंनी १९४६ साली ‘पाकिस्तान इज अ फॅण्टॅस्टिक नॉन्सेन्स’ अशा प्रकारची वाक्ये उच्चारली, त्यांनीच अवघ्या काही महिन्यांत फाळणीला पाठिंबा दिला आणि तीन महिन्यांमध्ये या महाकाय देशाची एक रेघ मारून धर्माच्या आधारावर फाळणी केली.

रा. स्व. संघ सांस्कृतिक राष्ट्रावादामध्ये धर्माच्या पलीकडे जाऊच शकत नाही, अशा प्रकारचे आरोप वर्षानुवर्षे होत आहेत. पण असा आरोप करणारे कदाचित हा इतिहास सोयीस्कररीत्या विसरले असतील की, बांगलादेशला अधिकृत राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी या देशात सर्वप्रथम भारतीय जनसंघाने केली होती.

लोहिया, उपाध्याय यांचा राष्ट्रवाद

भारतीय जनसंघाने यासाठी केवळ सत्याग्रह केले नाहीत, तर लोकसभा व राज्यसभेत याबद्दल आवाज उठवला आणि या गोष्टींचा आग्रह धरला. बांगलादेशला राष्ट्र म्हणून मान्यता देत असताना तिथल्या मुसलमानांना बाहेर काढून अल्पसंख्य हिंदूंना तिथेच ठेवावे अशी भूमिका जनसंघाने घेतली नव्हती. मुळातच रा. स्व. संघाची सांस्कृतिक राष्ट्रवादाची कल्पना ही रूढार्थाने ‘धर्म’ या मुद्द्यावर आधारित नाहीच. राममनोहर लोहिया, पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी १९६७ ला संयुक्त पत्रक काढून ‘अखंड सांस्कृतिक भारता’ची कल्पना मांडली होती. त्यात या देशातले किंवा त्या देशातले सर्व मुसलमान रूढार्थाने हिंदू करावेत अशा प्रकारची कल्पना कधीच नव्हती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक स्व. बाळासाहेब देवरस यांनी १९७८ झाली ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अखंड भारताच्या संकल्पनेविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले होते की, ‘‘अखंड भारत म्हणजे ‘वन नेशन- वन स्टेट’ ही आमच्या संस्कृतीची कल्पना नसून, ‘वन नेशन- डिफरन्ट स्टेट्स’ अशी आहे. ज्या प्रकारे कॉमन युरोपियन मार्केट आहे (त्यावेळी होते!) तशा पद्धतीने कॉमन एशियन मार्केट असावे, सर्व आशियाई वंशांच्या लोकांनी एकत्र आले पाहिजे, ही आमची अखंड भारताची कल्पना आहे.’’

त्यामुळे रा. स्व. संघाची सांस्कृतिक राष्ट्रवादाची परिभाषा जाणीवपूर्वक समजून घ्यायची नाही आणि आम्ही मुस्लीमविरोधी आहोत असे म्हणत आमच्यावर सातत्याने टीका करायची, हे केवळ निराशेतून आलेले वक्तव्य होय. जर भाजप ‘धर्म’ या संकल्पनेच्या पलीकडे जाऊ शकली नसती, किंवा संघपरिवार जाऊ शकला नसता तर भारतीय जनता पार्टीमध्ये मुसलमान उच्च पदावर जाऊ शकले नसते. रा. स्व. संघातसुद्धा अनेक मुसलमान प्रचारक म्हणून काम करत आहेत. ‘मुस्लीम राष्ट्रीय मंच’सारखी संघटना आज संघपरिवारात काम करते. आमच्या सांस्कृतिक राष्ट्रवादामध्ये उपासना पद्धतीला महत्त्व नाही, तर संस्कृतीला महत्त्व आहे.

५१४ पेक्षा जास्त…

बांगलादेशमधून स्वातंत्र्यानंतर हिंदूंचा जो महापूर या देशामध्ये येत होता, त्याबाबतीत काँग्रेसने मिठाची गुळणी धरली. हिंदूंच्या बाजूने बोलणे म्हणजे जातीयवाद आहे, ही कल्पना आम्ही वास्तवतेचे भान ठेवून कधीच स्वीकारली नाही. भारतातील अल्पसंख्याकांच्या अधिकारांविषयी गळे काढणारे लोक पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान या देशांतल्या अल्पसंख्याकांविषयी आवाज का उठवीत नाहीत? महात्मा गांधींनी ‘फाळणीनंतर पाकिस्तानमधले जे अल्पसंख्य आहेत (म्हणजे हिंदू!), त्या हिंदूंची काळजी आम्ही घेऊ आणि त्यांच्याकरता भारताचे दरवाजे कायम उघडे आहेत,’ ही भूमिका घेतली होती. ‘सीएए’सारखा कायदा असला पाहिजे, ही भूमिका मनमोहन सिंग यांनी ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते असताना घेतली होती.

पाकिस्तान किंवा आत्ताच्या बांगलादेशमध्ये हिंदू सुरक्षित राहू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे व ती स्वीकारणे तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना सहन होऊ शकत नाही. त्यामुळे असा चुकीचा आणि विषारी युक्तिवाद करण्याचे काम ते सातत्याने करत आहेत. पश्चिम बंगालमधल्या साम्यवादी राजवटीच्या काळात बांगलादेशमधून आलेल्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले. त्यामुळेच ‘सीएए’सारखा कायदा करून त्या अत्याचारित लोकांना भारताचे नागरिकत्व देऊन सन्मानाने जगण्याचा अधिकार भारतीय जनता पार्टीने दिला. भारतीय जनता पार्टीने यासंदर्भात धर्माच्या आधारे विचार केला असता तर नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान म्हणून २०१४ ते २०१९ या पहिल्या कार्यकाळात ५१४ पेक्षा जास्त मुसलमानांना या देशाचे नागरिकत्व देण्यात आलेच नसते. या देशातल्या हिंदुत्ववाद्यांनी – मग ती हिंदु महासभा असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा भारतीय जनसंघ असेल-  यांनी कधीही घटनेत, कायद्यामध्ये अल्पसंख्याकांना वेगळ्या प्रकारची वागणूक द्यावी अशी भूमिका घेतली नाही. घटना समितीतील श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या नेत्यांनीसुद्धा कधीच मुस्लीमविरोधी भूमिका घेतली नव्हती.

मोदी सहभागी होतेच…

मुळात हा विषय सुरू झाला नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सत्याग्रहाच्या वक्तव्यावरून! १ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट १९७१ या कालावधीत जनसंघाने देशभर सत्याग्रह आयोजित केला होता व १२ ऑगस्ट १९७१ ला संसदेसमोर झालेल्या जाहीर सभेत स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी देशासह जगाला उद्देशून बांगलादेशाच्या स्वातंत्र्याविषयी आवाहन केले होते. त्यांच्या या योगदानाबद्दल २०१५ साली बांगलादेश सरकारने देशाचे माजी पंतप्रधान वाजपेयी यांना ‘लिबरेशन वॉर ऑनर’  हा सन्मान देऊन गौरव केला. तसेच नरेंद्र मोदी हे त्या सत्याग्रहात सहभागी झाले होते याचे अनेक दाखलेसुद्धा उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर १८५७ च्या उठावाला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २००७ साली साजरा करण्यात येणारा १५० वा उत्सव भारत, पाकिस्तान व बांगलादेश या तिन्ही देशांनी संयुक्तपणे साजरा करावा असे आवाहन स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते. खरे तर मोदीद्वेषातून कोणताही इतिहास न जाणता वाटेल ती टीका करण्याचे सत्रच अनेकांनी चालवले आहे. नरेंद्र मोदी बांगलादेशात जाऊन हिंदू मंदिरात दर्शनासाठी गेले, हे त्यांचे खरे दु:ख!

मुळात देशाची धर्माच्या आधारे फाळणी स्वीकारून द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतासमोर ज्यांनी मान तुकवली त्यांचे हे ढळढळीत अपयश बांगलादेश युद्धानंतर आणि बांगलादेशनिर्मितीनंतर वारंवार अधोरेखित होत होते, ते ठसठशीतपणे पुढे आले. त्याचवेळी बांगलादेशाच्या स्वातंत्र्याकरिता जनसंघाने प्रयत्न केले आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या ५० व्या वाढदिवसाला या देशातील हिंदुत्ववादी व्यक्ती असलेले प्रधानमंत्री तिथे खास अतिथी म्हणून गेले, यामुळे भारतातील तथाकथित धर्मनिरपेक्ष उदारमतवाद्यांना त्रास होत आहे. ज्यांनी पहिल्यापासून सकारात्मक धर्मनिरपेक्षता आणि खऱ्या राष्ट्रवादाची भूमिका घेतली, त्या विचारधारेच्या नेत्याच्या हस्ते बांगलादेशात ५० वा स्वातंत्र्यदिन उत्सव साजरा केला गेला, हा नियतीने साधलेला सुंदर योगायोग आहे.

लेखक भारतीय जनता पक्षाचे विधानसभा सदस्य आहेत.

ईमेल : officeofmlaatul@gmail.com