News Flash

सत्याची जात..

‘कलबुर्गी सरांना कुणी तरी घरात येऊन गोळय़ा घातल्या.’

३० ऑगस्टचा रविवार. सकाळी दहाच्या सुमाराला गुलबग्र्यावरून विजया तेलंगांचा फोन आला. ‘कलबुर्गी सरांना कुणी तरी घरात येऊन गोळय़ा घातल्या.’ त्या म्हणत होत्या. त्या काय म्हणताहेत ते आधी नीट कळलंही नाही. महाराष्ट्रातल्या कन्नड कोरीव लेखांविषयी कलबुर्गीनी जे पुस्तक लिहिलं होतं, त्या लहानशा पुस्तकाचा अनुवाद विजयाताईंनी केला होता. धारवाडला विद्यापीठात असताना कन्नड आणि मराठी विभाग एक ठिकाणी होते, म्हणून डॉ. पंडित आवळीकर आणि डॉ. विजया तेलंग या दोघांचाही कलबुर्गी सरांशी चांगला स्नेहसंबंध होता. विजयाताईंनी अनुवादित केलेलं ते पुस्तक माझ्या वडिलांच्या- अण्णांच्या आणि डॉ. द. दि. पुंडे यांच्या सूचनेनं पद्मगंधा प्रकाशनानं प्रसिद्ध केलं होतं आणि अण्णांनीच त्या पुस्तकाला प्रस्तावनाही लिहिली होती.

जवळजवळ एक तपाचा कलबुर्गीचा आणि माझ्या वडिलांचा स्नेह होता. धारवाड-बेळगावच्या पुष्कळ लेखक-कलावंतांशी आणि रसिक-वाचकांशी जसे आपले स्नेहाचे संबंध, तसे तिथल्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतल्या अनेकांशीही स्नेहाचे संबंध. कलबुर्गीच्या मोठय़ा विद्यार्थी परिवारामधले आणि सहकाऱ्यांमधलेही काही सहजच संपर्कात आलेले होते. कलबुर्गी मराठी लिहीत, बोलत नव्हते, पण त्यांना मराठी थोडंफार समजत मात्र होतं. धारवाडच्या कर्नाटक कॉलेजमध्ये ते काही काळ प्राध्यापक होते. पुढे ते तिथेच कर्नाटक विश्वविद्यालयाच्या कन्नड अध्यापन केंद्रात प्राध्यापक, रीडर आणि नंतर केंद्रप्रमुख झाले. त्यानंतर निवृत्तीपर्यंत हम्पी विश्वविद्यालयात कुलगुरू म्हणून त्यांनी काम केलं. अध्यापन, लेखन आणि संशोधन हा त्यांचा आयुष्यभराचा व्यवसाय होता आणि त्यांचा निदिध्यासही होता.
कलबुर्गी अण्णांच्या लेखनाविषयी आस्था बाळगणारे होते, ते त्यांच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास पद्धतीमुळे, संशोधनातल्या प्रखर सत्यनिष्ठेमुळे आणि प्रदेश आणि भाषा यांच्या सीमा निर्थक ठरवणाऱ्या सांस्कृतिक देवघेवीच्या लख्ख भानामुळे. कर्नाटकाच्या सांस्कृतिक इतिहासातले अनेक अज्ञात-अल्पज्ञात कोपरे अण्णांच्या संशोधनातून उजळले गेले आहेत आणि दक्षिण भारताच्या सांस्कृतिक अभ्यासाला अण्णांच्या संशोधनाची फार मोठी मदत झाली आहे, होते आहे- या जाणिवेने कलबुर्गीनी अण्णांच्या दहा महत्त्वाच्या पुस्तकांचे कन्नड अनुवाद करवले.
प्राध्यापक म्हणून आणि अनुवादक म्हणून उत्तम अनुभव असणारे त्यांचे विद्यार्थी या अनुवादांसाठी पुढे आले. काही सहकारी अभ्यासक आणि संशोधक पुढे आले. कर्नाटक शासन, हम्पी विश्वविद्यालय आणि इतर काही पारंपरिक अध्ययन संस्थांनी हे अनुवादित ग्रंथ प्रकाशित केले. यानिमित्तानं कन्नड अभ्यासकांचा एक परिवारच अण्णांच्या स्नेहक्षेत्रात आला आणि सामाजिक, राजकीय, प्रादेशिक, भाषिक अंतराला ओलांडून ज्ञानाच्या अखंडत्वाचा आणि संशोधकीय सत्याच्या प्रकाशात चालण्याचा आनंद उभयपक्षी घेता आला.
त्यानिमित्तानं जाणवलं ते कलबुर्गीचं कन्नड संस्कृतीच्या अभ्यासाविषयीचं प्रेम, त्यांची ज्ञाननिष्ठा आणि त्याचबरोबर कर्नाटकातल्या संस्कृती संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेली कृतिशील चेतना. किती तरी होतकरू संशोधकांना त्यांनी योग्य दिशेनं अभ्यासाकडे वळवलं, किती तरी संशोधकांना अभ्यासाच्या नव्या वाटा, नवी क्षेत्रं खुली करून दिली. अध्ययनासाठी आणि संशोधनासाठी वेगवेगळे विषय सुचवले. संशोधनात्मक कामं केली आणि करवून घेतली. त्या कामांच्या उत्तम दर्जाचा आग्रह धरला आणि त्या कामांचा उपयोग कन्नड संस्कृती आणि इतिहास यांच्या विविधांगी शोधाकडे करून घेतला.
ते अतिशय स्वच्छ, बुद्धिवादी विचारांचा निर्भय पाठपुरावा करणारे, परखड आणि सत्यान्वेषी होते; किंबहुना त्यामुळेच अनेकदा वादग्रस्तही ठरले होते.
पण त्यांच्या कामाचा आवाका आणि पैस मोठा होता. संशोधन आणि संपादन या दोन्ही प्रकारांमधली सत्तरपेक्षा अधिक पुस्तकं आज त्यांच्या नावावर आहेत. तीनशेपेक्षा अधिक संशोधनात्मक लेख त्यांनी प्रसिद्ध केले आहेत. कर्नाटक शासनानं राज्योत्सव प्रशस्ती पुरस्कार तर त्यांना दिलाच, पण महाकवी पंप यांच्या नावे असलेला राज्य सरकारचा सर्वोच्च पुरस्कारही त्यांना वीस वर्षांपूर्वीच प्रदान केला. कर्नाटक साहित्य अकादमी आणि कर्नाटक जानपद अकादमीचे पुरस्कार त्यांना मिळाले. ‘मार्ग’ या नावानं त्यांनी जी चार ग्रंथांची मालिका लिहिली, त्यातल्या चौथ्या ग्रंथाला केंद्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
‘मार्ग’इतकंच महत्त्वाचं त्यांचं आणखी एक कार्य म्हणजे वीरशैव संप्रदायाच्या वचन साहित्याचे त्यांच्या प्रमुखत्वाखाली संपादित झालेले तब्बल पंधरा खंड. शिवाय वचन साहित्य इतर भारतीय भाषांमध्ये अनुवादित व्हावं म्हणूनही त्यांनी विशेष प्रयत्न केले.
कलबुर्गीनी मराठी आणि तेलुगूमधलं सांस्कृतिक इतिहासाचं महत्त्वपूर्ण संशोधन कन्नडमध्ये आणलं; पण त्यांचं संशोधनात्मक लेखन मात्र अनुवादित स्वरूपात दक्षिणी भाषांमध्ये प्रसृत झालं नाही. मराठीतही कन्नडमधून अनुवादित झालं ते मुख्यत: कन्नड लेखकांचं ललित साहित्य. या पाश्र्वभूमीवर अपवाद ठरलेलं कलबुर्गीचं पुस्तक म्हणजे ‘महाराष्ट्रातील कन्नड कोरीव लेख’. महाराष्ट्रात आजवर उपलब्ध झालेले कन्नड कोरीव लेख दोनशे सत्तर आहेत. अजूनही तेवढे किंवा त्याहून जास्त उपलब्ध होऊ शकतील असा कलबुर्गीसह अनेक अभ्यासकांचा अंदाज आहे. या लेखांचा कलबुर्गीनी केलेला अभ्यास म्हणजे प्रमाणशुद्ध मांडणीचा एक उत्तम वस्तुपाठ आहे आणि माझ्या वडिलांनी त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे ‘लेखकाशी कमी-अधिक मतभेद असणाऱ्यांनीही अनुसरावा असा त्याचा दर्जा आहे’. कर्नाटक संस्कृतीचं चित्र स्पष्ट करण्यासाठी महाराष्ट्रातील कोरीव लेखांचा अभ्यास करण्याची गरज त्यांनी या पुस्तकाने साधार स्पष्ट केली आहे आणि त्यानिमित्ताने या दोन्ही प्रदेशांचे ऐतिहासिक-सांस्कृतिक अनुबंध उलगडले आहेत. त्यातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अभ्यासालाही एक वास्तव अधिष्ठान प्राप्त झालं आहे.
कलबुर्गीची सगळी हयात या प्रकारच्या गंभीर, वैचारिक विषयांच्या अध्ययन-अध्यापनात गेली. तरुण संशोधकांविषयी त्यांनी कायम आस्था बाळगली. त्यांनी लक्षात आणून दिलेल्या लहानशा दुरुस्त्याही योग्य ठरल्या तेव्हा सहज औदार्यानं स्वीकारल्या. त्या तरुण मुलांच्या संशोधनातल्या प्रश्नांकडे लक्ष पुरवलं, अडचणी दूर करण्याचे प्रयत्न केले आणि समकालीन ज्येष्ठांच्या मौलिक कामाविषयी नितांत आदर बाळगला.
असं पूर्ण ज्ञानसाधकाचं नि:स्पृह जगणं असलेल्या माणसाला कुणी तरी येऊन गोळय़ा झाडून, कोणत्याही वैयक्तिक शत्रुत्वाविनाच संपवून टाकावं या अमानुषतेला काय म्हणावं? मतभेद आणि संघर्ष कलबुर्गीच्या आसपास फिरकले नाहीत असं नाही; किंबहुना संशोधनाच्या क्षेत्रात मूलभूत काम करताना आणि अवघड ताणेबाणे उलगडताना मतभेद अनेकदा अटळच ठरतात. शिवाय कलबुर्गी फार स्पष्टवक्तेही होते.
स्पष्टवक्ते आणि सत्यप्रिय. सार्वजनिक क्षेत्रात अर्धवट ज्ञानी, अहंकारी, मत्सरी आणि पढतमूर्ख यांचा सामना त्यांना करावा लागलाच. जात, धर्म, प्रादेशिकता यांचा आग्रह अनेकदा माणसांना अविवेकी आणि अंध बनवतो; पण याचा अर्थ विचार पटला नाही तर तसा विचार करणारा माणूस संपवणं हा नव्हे. अशा आंधळय़ा हिंसेचा बळी ठरले कलबुर्गी. मल्लप्पा मडिवाळप्पा कलबुर्गी! सत्याचा शोध हेच संशोधकाचं ध्येय असलं पाहिजे, असं मानत होते ते. त्या सत्यशोधाचं फळ अविवेकी प्रतिगामी माणसांकडून काय मिळतं हे त्यांना ठाऊक नव्हतं.
शरश्चंद्र मुक्तिबोधांसारख्या द्रष्टय़ा कवीनं मात्र फार आधीच ते जाणलं आणि लिहून ठेवलं-
सत्याच्या जातीला दु:ख असे मिळणारच
दु:खातून करुणेचे मर्म सहज कळणारच
सत्याचे अपराधी : मृत्युदंड त्यांस अटळ
भाकर अन् मृत्यूची भक्षुनि ते जगणारच
जमलेल्या अश्रूंना माघारे परतावि तू
सत्याचे भव्य भाल रक्ताने भिजणारच

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 12:58 am

Web Title: truth telling kulbargee
Next Stories
1 सांगाडय़ांचा समाज
2 राज्यघटना आणि ‘सेक्युलॅरिझम’ हाच प्रबोधनाचा पाया व्हावा!
3 सीरियातील आग आणि युरोपातील फुफाटा
Just Now!
X