27 February 2021

News Flash

विवेकानंदांना समजावून घेऊ या…

तुम्हाला जर धर्म खऱ्या अर्थाने कळला असेल, तर कोणताही धर्म न मानणारी, पण खऱ्या अर्थाने धार्मिक असलेली माणसे तुमच्या भोवती असतात, हे तुमच्या लक्षात येईल.

|| दत्तप्रसाद दाभोळकर

‘विवेकानंदांचा ‘धर्म’!’ (‘रविवार विशेष’, १० जानेवारी) या माझ्या लेखाच्या संदर्भात १७ जानेवारीच्या ‘रविवार विशेष’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वाचकपत्रांचे मी स्वागत करतो. त्यांनी पत्रांत मांडलेले विचार व उपस्थित केलेले प्रश्न यांबाबतची माझी मते मांडण्याची संधी मला त्यामुळे मिळाली आहे. विवेकानंदांना समजावून घेण्यासाठी अशा प्रश्नोत्तरांची गरज आहे.

त्यातील एका पत्राचे शीर्षक आहे : ‘स्वामी विवेकानंदांचा हिंदूंनी स्वीकारच केला आहे!’ हे असे सांगणे म्हणजे ‘आंबेडकरांचा हिंदू धर्माने स्वीकारच केला आहे’ असे म्हणण्यासारखे आहे! विवेकानंदांचे अभिनंदन राहू देत, त्यांच्या कौतुकाचा एक शब्दही एकाही शंकराचार्यांनी वा इतर कोणी मठाधिपतींनी काढलेला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर बेलूर मठाने जी शोकसभा आयोजित केली, त्यात सामील होण्यासाठी कोलकता उच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींना आमंत्रण पाठविले होते, त्यांनी त्यास नकार दिला. हिंदू धर्माने विवेकानंदांचा स्वीकार हा असा केला होता!

ते असो; याच पत्रातील पहिला मुद्दा- विवेकानंदांचे अमेरिकेतील धर्म परिषदेतील अभूतपूर्व स्वागत व त्यांनी तेथे केलेला हिंदू धर्माचा प्रचार याबाबत आहे. परिषदेच्या उद्घाटनाच्या दिवशी सुमारे ३० वक्ते बोलणार होते. म्हणजे प्रत्येकाला सुमारे पाच मिनिटे मिळणार होती. प्रत्येकजण त्या वेळेत आपण कोणत्या धर्माचे प्रतिनिधित्व करतो व तो धर्म मोठा कसा आहे, हे सांगत होता. विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची भाषेवरची पकड व शब्दांची फेक यांमुळे सभागृह संमोहित झाले, हे अगदी खरे आहे. मात्र विवेकानंद हिंदू धर्म सांगावयास आले होते व त्यांनी तेथे त्याचा प्रचार केला, हे सांगणे शतप्रतिशत खोटे आहे. आपण अमेरिकेला का आलो आहोत, हे सर्वधर्म परिषदेनंतर केवळ तीन महिन्यांनी, २८ डिसेंबर १८९३ रोजी हरीपद मित्रा यांना पत्र पाठवून विवेकानंदांनी सांगितले आहे. पत्रात ते सांगतात, ‘मी येथे नाव मिळवायला किंवा कुतूहल म्हणून किंवा जग पाहावयास आलेलो नाही, तर माझ्या मनात माझ्या देशाचे नवनिर्माण करण्यासाठी ज्या कल्पना आहेत त्यांना मदत करणारी माणसे वा रचना येथे दिसताहेत का हे मला पाहावयाचे आहे.’ ही रचना कोणती हे त्यांनी चार विस्तृत पत्रांमधून रामकृष्णानंद, अळसिंगा पेरुमल, जुनागडचे दिवाण आणि म्हैसूरचे महाराज यांना कळविले आहे. पत्राच्या तारखा अनुक्रमे १९ मार्च, २८ मे, २० जून व २४ जून, १८९४. या पत्रांत त्यांनी केलेली मांडणी संक्षिप्त स्वरूपात अशी आहे : ‘आपली सगळी खेडी अर्धपोटी व अर्धनग्न आहेत. आपण साऱ्या जगातील संपत्ती लुटून आणून एका खेड्यात ओतली, तरी एका वर्षात ते खेडे पुन्हा तसेच बनेल. कारण पुरोहितांनी त्यांना हजारो वर्षे ज्ञानापासून वंचित ठेवलंय. त्यांची एवढी हेटाळणी केली आहे, की आपण माणूस आहोत हेच ते विसरून गेलेत. त्यांना सर्वप्रथम शिक्षण द्यावयास हवे. पण खेड्यात शाळा काढून काहीही उपयोग नाही. शेतकरी दिवसभर शेतात राबणार. मुले गुरे राखायला जाणार. स्त्रिया पाणी आणणे आणि घरकाम करणार. हे लोक शाळेत कसे येणार? मला प्रत्येक खेड्यात दोन संन्यासी ठेवावयाचे आहेत. संध्याकाळी गावातील लोक जिथे बसतात त्या पारावर ते बसतील. ते त्यांना धर्म समजावून देतीलच; पण त्याच वेळी त्यांच्याकडे पृथ्वीचा गोल असेल. भूगोलाच्या मदतीने ते इतिहास शिकवतील. त्यांच्याकडे लोहचुंबक असेल, ते त्यांना विज्ञान शिकवतील. त्यांच्याकडे काही रासायनिक पदार्थ असतील, त्यांच्याकडे प्रकाशचित्रे (मॅजिक लँटर्स) असतील, त्यांच्या मदतीने ते त्यांना रसायन शिकवतील. हा आपला देश प्रत्येक खेड्याला विज्ञान आणि पर्यावरण शिकवत असा उभा करावा लागेल. यासाठी मला भारतात आज दहा हजार तरुण मिळतील. पण भारतातील कोणताही श्रीमंत माणूस अशा कामासाठी फुटकी कवडीही देणार नाही. मी अमेरिकेत भाषणे देईन आणि पैसे मिळवीन. अमेरिकेतल्या लोकांना मी ‘धर्म’ समजावून देईन, ते मला पैसे देतील. त्यातून माझे काम उभे करीन.’

विवेकानंद येथे ‘धर्म’ म्हणतात ‘हिंदू धर्म’ नव्हे! प्रा. राइट यांच्या पत्रामुळेच विवेकानंद सर्वधर्म परिषदेत उभे राहिले आणि सर्वधर्म परिषदेच्या फक्त एक आठवडा आधी, म्हणजे ४ सप्टेंबर १८९३ रोजी धर्म आणि देव म्हणजे काय हे सांगणारी एक सुंदर कविता त्यांनी राइटना लिहिली आहे. त्या कवितेचा सारांश असा : ‘दोन माणसांतील निरपेक्ष प्रेम आणि निरपेक्ष सहकार्य म्हणजे ईश्वर. म्हणजे धर्म’ …आणि कवितेच्या शेवटी विवेकानंद लिहितात : ‘हे माझ्या ईश्वरा, सर्व प्राचीन प्रेषितांनी तुलाच पाहिले. सर्व धर्मांचा आणि पंथांचा उगम तेथेच झाला. ते वेद, ते बायबल, ते धीट कुराण तू आहेस. फक्त तूच आहेस.’

विवेकानंद हा धर्म सांगत इंग्लंड-अमेरिकेत हिंडलेत. लंडन येथे ‘धर्माची आवश्यकता’ या विषयावर भाषण देताना त्यांनी सांगितले : ‘एक धर्म खरा ठरला, तर इतर सर्व धर्म खरे ठरतात आणि एक धर्म खोटा ठरला तर इतर सर्व धर्मही खोटे ठरतात. तुम्हाला जर धर्म खऱ्या अर्थाने कळला असेल, तर कोणताही धर्म न मानणारी, पण खऱ्या अर्थाने धार्मिक असलेली माणसे तुमच्या भोवती असतात, हे तुमच्या लक्षात येईल.’ हे सर्व समजावून देणे कठीण आहे याची त्यांना कल्पना आहे. ७ जून १८९६ रोजी मार्गारेट नोबल- म्हणजे नंतरच्या भगिनी निवेदिता- यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितलेय, ‘आज जगातील सर्व धर्म केवळ विडंबनाच्या रूपात उरलेत आणि हे आपण माणसांना कसे समजावून देणार, हा खरा प्रश्न आहे.’ आणि २१ मार्च १८९५ रोजी सारा ओली बूल यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘ख्रिस्ती, हिंदू, मुस्लीम असली नावे आज माणसा-माणसांमधील बंधुभाव नाहीसा करताहेत. या शब्दांमध्ये असलेल्या सर्व शुभशक्ती आता पार नाहीशा झाल्या आहेत. आता या शब्दांचा प्रभाव उरलाय भयानक स्वरूपात. या शब्दांमुळे चांगली माणसेसुद्धा आज सैतानाप्रमाणे वागताहेत. आपल्याला यातून मार्ग शोधायचाय. आपल्याला आटोकाट प्रयत्न करून यश मिळवायचंय.’ विवेकानंद ‘हिंदू धर्म’ नव्हे, तर ‘धर्म’ म्हणजे काय हे समजावून देत होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे विचार वाचून लिओ टॉलस्टॉय आणि रोमा रोला म्हणालेत : ‘या माणसाने आयुष्यात जर एवढेच केले असते, तर जगाला अ‍ॅरिस्टॉटल व प्लेटो यांच्या उंचीचा आणखी एक विचारवंत मिळाला असता.’

सुरुवातीला उल्लेख केलेल्या वाचकपत्रात- ‘विवेकानंद कसेबसे पैसे गोळा करून अमेरिकेत गेले,’ हे माझे विधान खोटे असल्याचे म्हटले आहे. पत्रलेखकाने प्रा. डॉ. वि. रा. करंदीकर यांचे ‘विश्वमानव स्वामी विवेकानंद’ या पुस्तकाचे तीन खंड वाचले, तर माझे म्हणणे शतप्रतिशत खरे आहे, हे त्यांना समजेल. हे खंड अनेक कारणांनी महत्त्वाचे संदर्भग्रंथ आहेत. करंदीकर संघ परिवारातील व खूप काळ प्रचारक होते. मग फग्र्युसन महाविद्यालयात मराठी विभागाचे प्रमुख, मग पुणे विद्यापीठात ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख असा त्यांचा प्रवास आहे. सेवानिवृत्तीनंतर रामकृष्ण मठ नागपूर यांच्या विनंतीवरून ते भारतात व भारताबाहेर हिंडले. अनेकांशी विचारविनिमय केला. प्रचंड संदर्भग्रंथ पाहिले. त्यानंतर त्यांनी लिहिलेले हे खंड रामकृष्ण मठ, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेत. त्यात त्यांनी लिहिलेय, ‘अमेरिकेत जाण्यासाठी पैसे जमवायला लागल्यावर विवेकानंदांना सर्वप्रथम रामनाडचे महाराज आठवले. एकदा भर दरबारात ‘स्वामी, तुम्ही धर्म सांगायला परदेशात जा. मी तुम्हाला दहा हजार रुपये देईन,’ असे ते म्हणाले होते. विवेकानंदांचा परमशिष्य अळसिंगा पेरुमल रामनाडच्या महाराजांना भेटावयास गेला. त्यांना दोन महिन्यांपूर्वी सांगितलेले काहीही आठवत नव्हते. ते वैतागाने म्हणाले, ‘दररोज माझ्या दरबारात अनेक साधू, संन्यासी, फकीर येतात. सर्वांचे काम एकच- पैसे मागणे! मी त्या वेळी जे बोललो ते कुणीही मनावर घ्यायचे नसते! आणि त्या विवेकानंदांबद्दल म्हणत असशील, तर तो एक भोंदू माणूस आहे. परदेशात काय, या देशातही त्याने धर्मावर बोलणे थांबवावे.’ अळसिंगाने पत्र पाठवून हे विवेकानंदांना कळविले तेव्हा विवेकानंद निराश झाले. २१ फेब्रुवारी १८९३ रोजी अळसिंगांना पत्र पाठवून त्यांनी कळविले : ‘‘माझ्या सर्व योजना धुळीला मिळाल्यात.’’

त्याच वेळी विवेकानंदांना भेटावयास हैदराबादच्या निजामाचे मेहुणे नवाब बहादूर खुर्शीद जहां आले. विवेकानंदांशी संभाषण केल्यावर ते म्हणाले, ‘स्वामी, तुम्ही अमेरिकेत जावयास हवे. पहिले हजार रुपये मी देतो.’ ते त्यांना हैदराबादला घेऊन गेले. तेथील मेहबूब महाविद्यालयात ‘मला सर्वधर्म परिषदेला का जायचे आहे?’ यावर त्यांचे भाषण ठेवले. सभागृह हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन श्रोत्यांनी गच्च भरले होते. अनेकांनी त्याच वेळी पैसे दिले. आणखीही काही लोकांनी पैसे दिले. लोकांची ऐपत चार आणे, आठ आणे, रुपया अशी असते. काही काळाने अशा जमलेल्या पैशांतून अमेरिकेत जाणे शक्य नाही. पैसे ज्यांचे त्यांना परत करा म्हणून विवेकानंदांनी शिष्यांना सांगितले. त्याच वेळी खेत्री नरेशांचा दूत विवेकानंदांना शोधत आला. खेत्री नरेशांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते. विवेकानंदांनी आपल्याला दिलेल्या आशीर्वादामुळे पुत्ररत्न प्राप्त झाले या भावनेतून त्यांच्या अमेरिका प्रवासाचा सारा खर्च खेत्री नरेशांनी उचलला!

१८९७ मध्ये परत आल्यावर विवेकानंदांचे ‘कोलंबो ते अलमोरा’ ही जी विजय रथयात्रा झाली, त्याचा उल्लेख वाचकपत्रात केलाय. परंतु श्रीलंकेत अनुराधापुरम येथे विवेकानंदांची सभा उधळण्यात आली. मद्रासच्या सभेत अध्यक्षस्थान स्वीकारायला न्या. सर एस. सुब्रमण्यम अय्यर यांनी नकार दिला; काही गावांत व संस्थानांत विजयरथ यात्रा निघाल्या हे खरे. कोणते संस्थान आणि कोणते गाव अधिक चांगली विजय रथयात्रा काढते अशी चढाओढ वाटावी असा हा प्रकार आहे! विवेकानंदांच्या कामासाठी कुणी फुटकी कवडी दिली नाही. त्यामुळे हा प्रकार थांबवून विवेकानंद कोठेही न थांबता मद्रासहून सरळ कलकत्त्याला गेले. तेथे गेल्यावर काय भयानक प्रकार आहे ते त्यांनी ६ एप्रिल, १८९७ रोजी ‘भारती’च्या संपादक सरला घोष यांना पत्र पाठवून सांगितलंय. ते लिहितात, ‘माझ्या स्वागत समारंभाचा खर्च भागविण्यासाठी कलकत्त्यातील लोकांनी मलाच एक भाषण द्यावयास लावले व त्याची तिकिटे विकली! मला असले सत्कार नको आहेत! मला माझ्या कामासाठी पैसे हवे आहेत. येथील कोणीच पैसे देतील असे वाटत नाही.’

‘हिंदू धर्माचे वेगळेपण…’ या मथळ्याखालील पत्रात हिंदू धर्मातील जातीयतेवर प्रहार करून, बौद्ध धर्म स्वीकारल्यावर तरी जातीयता नाहीशी झाली आहे का, हा दाहक प्रश्न विचारला आहे. विवेकानंदांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. ‘या देशातील धर्मांतरे ख्रिश्चन आणि मुसलमान यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हेत, तर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झालीत,’ हे २० सप्टेंबर १८९२ आणि नोव्हेंबर १८९४ मधील पत्रात त्यांनी स्पष्टपणे सांगितलेय. त्यांचे नेमके शब्द असे आहेत : ‘ही धर्मांतरे तलवारीमुळे झाली, असे म्हणणे महामूर्खपणाचे आहे. पुरोहितांच्या जाचातून मुक्त होण्यासाठी, स्वाधीनतेसाठी त्यांनी धर्मांतरे केलीत.’ मात्र पत्रलेखक सांगतात ती धर्मांतरातील मर्यादा विवेकानंद ओळखतात. २९ मार्च १८९४ रोजी केरळचे धर्मगुरू सर रेव्हरंड आर. ह््यूम यांना पत्र पाठवून त्यांनी कळवलेय, ‘तू हिंदूंना कॅथॉलिक केलेले नाहीस. तू त्यांना आपापल्या जातीत कॅथॉलिक केले आहेस.’

‘हिंदू धर्माच्या थोरवीकडे दुर्लक्ष!’ या मथळ्याखालील वाचकपत्रात- विवेकानंदांनी हिंदू धर्माच्या थोरवीबद्दल सांगितलेली अनेक वचने देता येतील असे म्हटलेय. पत्रलेखकाचे म्हणणे तसे खरे आहे. आपली रणनीती सांगताना विवेकानंदांनी सांगितलेय : ‘माझ्या देशाला व माझ्या देशातील दोन धर्मांना कमीपणा येईल, असे मी परदेशात काही बोलणार नाही.’ विवेकानंदांनी परदेशात हिंदू धर्म व इस्लाममधील प्रत्येक गोष्टीचे समर्थन केलेय! बालविवाहाबद्दल विवेकानंदांची मते जहाल आहेत. २३ डिसेंबर १८९५ रोजी सारदानंदांना पत्र पाठवून त्यांनी सांगितलेय, ‘एखाद्या कोवळ्या मुलीचा प्रौढ माणसाशी विवाह करणाऱ्याचा मी खून करू शकेन.’ आणि त्याच सुमारास विवेकानंद अमेरिकेत सांगताहेत, ‘समाजातील सतीत्वाचा दर्जा उच्च ठेवण्यासाठी हिंदूंनी बालविवाह सुरू केले होते!’ हिंदू धर्म आणि इस्लाम यांची परदेशात अशी पाठराखण करणाऱ्या विवेकानंदांनी भारतात आल्यावर ५ मे, १८९७ रोजी धीरामाता यांना पत्र पाठवून सांगितलेय, ‘आजचा हिंदू धर्म म्हणजे दुसरेतिसरे काही नसून अवनत झालेला बौद्ध धर्म आहे, हे जर आपण हिंदूंना पटवून देऊ शकलो, तर खळखळ न करता ते हिंदू धर्म सोडू शकतील.’ आणि १० जून १८९८ रोजी सर्फराज मोहम्मद हुसेन यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘जेथे वेद नाही, कुराण नाही आणि बायबलही नाही, अशा ठिकाणी आपणाला मानवजातीला घेऊन जायचंय आणि हे काम आपल्याला वेद, कुराण आणि बायबल यांचा आधार घेऊनच करावे लागेल.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 12:02 am

Web Title: understand vivekananda vivekanandas religion akp 94
Next Stories
1 समाजमाध्यम कंपन्यांचा वरचष्मा
2 वटहुकूम आणि ‘धर्मरक्षणा’चा प्रश्न
3 भागधारकांना दिलासा.. बँकांना काय?
Just Now!
X