तुर्कस्तानने रशियाचे विमान पाडल्यानंतर रशियाने तुर्कस्तानसोबतचे लष्करी सहकार्य थांबविले. तसेच आर्थिक र्निबधही लादले, मात्र याचा फटका रशियालाही बसू शकतो. एकंदर विमान पाडण्याच्या प्रकरणामुळे सीरिया आणि मध्यपूर्वेतील स्थिती अधिक धोकादायक झाली आहे..

१३ नोव्हेंबरला पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर तुर्कस्तानमध्ये झालेल्या जी-२० परिषदेमध्ये जगभरातील सर्व महत्त्वाच्या देशांनी ‘इस्लामिक स्टेट’ पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यानंतर तुर्कस्तानच्या दोन एफ-१६ लढाऊ विमानांनी रशियाचे सुखोई एसयू-२४ विमान आपल्या हवाई हद्दीचा भंग करीत आहे, या सबबीखाली पाडले आणि दहशतवादाविरुद्धच्या जागतिक एकजुटीला भगदाड पडले. ‘नाटो’ सदस्य देशाने सोव्हिएत युनियन किंवा रशियाचे विमान पाडल्याचे गेल्या ५० वर्षांतले पहिलेच उदाहरण आहे. या सर्व प्रकरणाला इस्लामिक स्टेट, सीरियातील असाद राजवट आणि मध्य पूर्वेतील भू-राजकीय समीकरणांचे कंगोरे आहेत.
सीरियामधील बशर अल् असाद सरकारला उलथवून टाकण्यासाठी गेल्या काही काळापासून अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पाश्चात्त्य देश प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे तेल आणि नसíगक वायूंचे मोठे साठे सीरियामध्ये कमी असतानादेखील मानवी हक्क उल्लंघनाच्या नावाखाली असाद यांची राजवट उलथवून टाकण्याची कारणे जागतिक आणि प्रादेशिक भूराजकारणात शोधावी लागतील. जागतिकसंदर्भात अमेरिका आणि रशियातील संघर्षांची पाश्र्वभूमी सीरियन प्रश्नाला लाभली आहे. सीरिया आणि रशिया यांचे पूर्वापार घनिष्ठ संबंध आहेत. भूमध्य समुद्रातील रशियाचा एकमेव नाविक तळ सीरियातील टार्टूस या ठिकाणी आहे. युरोप आणि मध्यपूर्वेत प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी सीरियाचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे आहे. रशियाचा सीरियातील प्रभाव अमेरिकेच्या मध्यपूर्व आणि युरोपातील हितसंबंधांसाठी धोकादायक आहे. याशिवाय प्रादेशिक पातळीवर इस्रायल आणि सौदी अरेबिया या अमेरिकेच्या दोन मित्रदेशांचे सीरियाचे संबंध तणावाचे आहेत. सुन्नीबहुल सौदी अरेबिया आणि शियाबहुल सीरियाच्या संघर्षांला पंथवादाची झालर आहे. तसेच शियाबहुल इराण आणि सीरियाची मत्री सौदीला खुपते आहे. मध्यपूर्वेतील आपले स्थान भक्कम करण्याची इराणची इच्छा आहे. रशिया, सीरिया आणि इराण या त्रिकुटाचे मित्रत्वाचे संबंध आहेत. याशिवाय शियापुरस्कृत हिजबुल्ला आणि इस्रायल यांचे कडवे संबंधदेखील सर्वश्रुत आहेत. सुन्नीबहुल तुर्कस्तानमध्ये कट्टरपंथाकडे झुकलेल्या रेसेप तायीप एडरेगन यांनादेखील असाद राजवट उलथवण्यात रस आहे. त्यामुळेच सीरियातील असादविरोधी बंडखोरांना अमेरिकेने पाठबळ दिले आहे. मात्र सुन्नीबहुल इस्लामिक स्टेटच्या वाढत्या कारवायांमुळे अमेरिकेच्या प्रयत्नांना खीळ बसली आणि जगाचे लक्ष दहशतवादाच्या भस्मासुराकडे खेचले गेले.
३० सप्टेंबरला रशियाने असाद सरकारच्या बाजूने सीरियात लष्करी हस्तक्षेप केला आणि इस्लामिक स्टेटच्या तळांवर हल्ले केले. ३१ऑक्टोबरला इस्लामिक स्टेटने मेट्रोजेट ९२६८ हे नागरी विमान इजिप्तमधील सनाईमध्ये पडून रशियाला मोठा धक्का दिला. यानंतर रशियाने सीरियामध्ये इस्लामिक स्टेटविरुद्धचे हल्ले वाढवले आहेत. ज्या अचूकतेने रशियाने इस्लामिक स्टेटवर हल्ले केले, त्यामुळे अमेरिकेला रशियाच्या वाढत्या प्रभावाची धास्ती वाटू लागली होती. अमेरिकेचा इस्लामिक स्टेटविरुद्धचा दुटप्पीपणा जगासमोर आला. तसेच पॅरिसमधील हल्ल्याने सीरियातील दहशतवादाच्या प्रकरणाला कलाटणी मिळाली. रशियाच्या वाढत्या प्रभावामुळे तुर्कस्तानमधील जी-२० परिषदेच्या वेळी ओबामा यांना पुतिन यांच्याशी चर्चा करणे भाग पडले.
२४ नोव्हेंबरला रशियाचे सुखोई एसयू-२४ विमान तुर्कस्तानने आपल्या हवाई हद्दीत शिरून सार्वभौमत्वाचा भंग केला या सबबीखाली पाडले. तुर्कस्तानने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की ५ मिनिटांत १० वेळा दिलेल्या इशाऱ्याकडे रशियन विमानांनी दुर्लक्ष केले आहे. रशियाच्या मते त्यांच्या वैमानिकांना कोणत्याही प्रकारचा इशारा देण्यात आला नव्हता. तसेच हा इशारा देण्यासाठी तुर्कस्तानने वेगळ्या व्हेवलेन्थचा वापर केला असावा. त्यामुळेच रशियन वैमानिकांपर्यंत हे इशारे पोहोचले असावेत का नाही याबाबत खुद्द तुर्कस्तानदेखील साशंक आहे. या ठिकाणी महत्त्वाचे म्हणजे संयुक्त राष्ट्र संघात तुर्कस्तानचे राजदूत हलित सेव्हिक यांनी बान-की-मून यांना उद्देशून लिहिलेले पत्र बाहेर आले. त्यानुसार दोन अपरिचित विमाने तुर्कस्तानच्या हवाई हद्दीत केवळ १७ सेकंदांसाठी (७.२४.०५ ते ७.२४.२२ ग्रीनिच प्रमाण वेळेनुसार) किमान २ कि.मी.आत शिरली. त्यापकी एक विमान पाडण्यात आले. ती विमाने रशियन होती याबाबत आपण अनभिज्ञ होतो असे तुर्कस्तानने स्पष्ट केले आहे. रशियाच्या अधिकृत पत्रकानुसार त्यांची विमाने सीरिया आणि तुर्कस्तानच्या सीमेवर (सीरियाच्या वायव्य भागात) इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करीत होती. सीरियाच्या वायव्य भागात तुर्कमान या तुर्की वांशिक गटाची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. तुर्कस्तानच्या म्हणण्यानुसार इस्लामिक स्टेटवर हल्ले करण्याच्या नावाखाली रशियाने असाद राजवटीला विरोध करणाऱ्या तुर्कमान वांशिक गटावर हल्ले केले. त्यामुळे यावर कठोर प्रतिक्रिया देण्याच्या मागणीने तुर्कस्तानमध्ये जोर धरला होता. रशियन विमानाच्या पाडावाने या मागणीला न्याय दिला, असे एडरेगन यांना वाटते. तुर्कस्तानने तुर्कमान गटाला लष्करी प्रशिक्षण दिले आहे. सीरियाच्या लष्करातील फुटीर गटाला शस्त्रपुरवठा आणि आश्रय दिला आहे. सीरियातील सर्व समस्यांचा स्रोत असाद राजवट आहे, असे अमेरिकेप्रमाणेच तुर्कस्तानचे मत आहे. त्यामुळेच असादच्या पाडावासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील मोर्चाला आपला हवाई तळ सीरियात हल्ले करण्यासाठी वापरण्याची परवानगी दिली आहे. युरोप आणि आशियात विभागलेला तुर्कस्तान मध्यपूर्वेत एक शक्ती म्हणून उदयाला येऊ इच्छितो. सुन्नी मुस्लिमांचे नेतृत्व करण्याच्या सुप्त इच्छेतून अमेरिकेच्या छुप्या पाठिंब्याने लष्करीदृष्टय़ा वरचढ रशियाच्या विमानाचा पाडाव तुर्कस्तानने केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असाद यांना वाचवण्यासाठीच रशियाने या भागात हल्ले केल्याची दाट शक्यता आहे. या सर्व प्रकरणांवर तिखट प्रतिक्रिया देताना रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ‘दहशतवाद्यांच्या मदतगारांनी रशियाच्या पाठीत खंजीर खुपसला,’ असा तुर्कस्तानवर आरोप केला आहे. थोडक्यात इस्लामिक स्टेटचे नेते आणि तुर्कस्तानचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात साटेलोटे आहे, असे रशियाला वाटते. इस्लामिक स्टेटच्या आधिपत्याखालील क्षेत्रातून तेल आणि तेलाचे पदार्थ तुर्कस्तानला पाठविले जातात आणि त्याचा आíथक फायदा इस्लामिक स्टेटला होतो, असे रशियाला वाटते. तसेच या सीमारेषेवर तुर्कस्तानने दहशतवाद्यांसाठी सुरक्षित क्षेत्र निर्माण केले आहे, ज्याचा थेट धोका रशियन हितसंबंधांना आहे. जर्मन गुप्तचर यंत्रणेनुसार तुर्कस्तान इस्लामिक स्टेटला शस्त्रपुरवठादेखील करतो. स्वत:च्या संकुचित फायद्यासाठी तुर्कस्तान नाटोला सीरियन संघर्षांत खेचत असल्याची भावना नाटो लष्करी आस्थापनांमध्ये निर्माण झाली, परंतु रशियन विमान पाडावानंतर ‘नाटो’ने तुर्कस्तानसोबत बांधिलकी व्यक्त केली आहे.
जी-२० परिषदेच्या वेळी रशिया आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील गटामध्ये सीरियातील कारवाईविषयी गुप्त करार झाला असावा. पुतिन यांच्या म्हणण्यानुसार रशियाच्या विमानांच्या स्थान आणि मार्गाविषयी अमेरिकेला आम्ही माहिती पुरवली होती आणि सुखोई एसयू-२४ विमाने नेमके त्याच वेळी आणि त्याच मार्गावर पाडण्यात आली.
या घटनेचा परिपाक म्हणजे रशियाने तुर्कस्तानसोबतचे लष्करी सहकार्य थांबविले आहे. सीरियामध्ये रशियाने विमानविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तसेच सीरियाची सीमारेषा बंद करण्याच्या फ्रान्सच्या प्रस्तावाला रशियाने पाठिंबा दिला आहे. रशियाने तुर्कस्तानवर अनेक आíथक र्निबध लादले आहेत. तुर्कस्तानच्या बांधकाम तसेच रस्तेबांधणी क्षेत्रातील कंपनीवर रशियाने बंधने आणली आहेत. रशियन चार्टर्ड विमानांना तुर्कस्तानमध्ये जाण्यास बंदी घातली आहे, याचा तुर्कस्तानच्या पर्यटनावर मोठा परिणाम होऊ शकतो. कारण किमान ३० लाख रशियन नागरिक तुर्कस्तानला भेट देतात. रशिया हा तुर्कस्तानचा दुसरा मोठा व्यापारी भागीदार आहे. अर्थात या आíथक र्निबधांचा मोठा फटका खुद्द रशियाला बसण्याची शक्यता आहे. कारण रशियाच्या नसíगक वायूची सर्वाधिक आयात तुर्कस्तान करतो आणि रशियन वायूला युरोपच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग तुर्कस्तानमधून जातो; किंबहुना याच कारणामुळे रशिया आणि तुर्कस्तानमध्ये शाब्दिक युद्ध सुरू असले तरी त्याची परिणती प्रत्यक्ष युद्धात होण्याची शक्यता नाही.
पॅरिस हल्ल्यानंतर ‘नाटो’ऐवजी संयुक्त राष्ट्र संघाच्या छत्राखाली इस्लामिक स्टेटविरुद्ध कारवाई करावी, असे रशियाचे मत आहे. रशियाच्या उपस्थितीने दहशतवादाविरुद्धच्या मोर्चातील आपला वरचष्मा कमी होण्याची धास्ती अमेरिकेला वाटते आहे. ओबामा हे असाद आणि इस्लामिक स्टेट यांना एकाच तराजूत तोलतात. त्यामुळे पॅरिस हल्ल्यानंतर एकूण कारवाईचा फोकस इस्लामिक स्टेटकडे झुकणे त्यांना नको आहे. फ्रान्सने इस्लामिक स्टेटविरुद्ध कठोर भूमिका घेण्याची मागणी केल्यानंतरदेखील ओबामांनी त्याविषयी केलेली चालढकल याकडेच दिशानिर्देशित करते. त्यामुळेच एडरेगनबद्दल वॉिशग्टनमध्ये कोणाला फारसे सख्य नसले तरी तुर्कस्तानच्या खांद्यावरून गोळी चालवण्याचे अमेरिकेने ठरवले असावे. अर्थात यामुळे रशिया तुर्कस्तानविरोधी कुर्दी बंडखोरांना मदत करण्याची शक्यता अधिक आहे. या सर्वाची अप्रत्यक्ष परिणती इस्लामिक स्टेटचा भस्मासुर वाढण्यात होऊ शकतो. विमान पाडाव प्रकरणामुळे सीरिया आणि मध्यपूर्वेतील स्थिती अधिक धोकादायक झाली आहे. यापुढे आपल्या भू-राजकीय हितसंबंधांच्या रक्षणासाठी विविध देश कोणती भूमिका घेतील यावर आताच भाष्य करणे धाडसाचे ठरेल.

लेखक आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल
aubhavthankar@gmail.com