26 February 2021

News Flash

हिंदुत्वाकडून विकासाकडे…

राज्य सरकारने २०१८ मध्ये सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये ‘एक जिल्हा, एक उत्पादन (ओडीओपी स्कीम)’ अशी प्रत्येक जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची योजना सुरू केली.

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद… ‘नव्या भारतातील नवा उत्तर प्रदेश’ हे सूत्र घेऊन महाराष्ट्रासह देशातील अन्य औद्योगिक-आर्थिकदृष्ट्या प्रगत राज्यांशी स्पर्धा करत अग्रस्थान गाठण्याचे त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट करणारा!

’ उत्तर प्रदेशमध्ये आपल्या कार्यकाळात काय बदल झाला आहे… विकासाला चालना देताना पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी कोणती पावले टाकली आहेत?

– अयोध्येसह उत्तर प्रदेशातील कोणत्याही भागात गेलात तरी परिवर्तन झाल्याचे आपल्याला खचितच जाणवेल. शांती व सौहार्दाचे नवे पर्व सुरू झाले आहे. उत्तर प्रदेश विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करीत आहे. उत्तर प्रदेशाचा प्रामुख्याने चार विभागांमध्ये विचार केल्यास लखनौ क्षेत्र समृद्ध होते, पण पूर्वांचल व बुंदेलखंड तुलनेने मागार्स किंवा पिछाडीवर राहिले होते. या परिसराला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी पूर्वांचल आणि बुंदेलखंड द्रुतगती महामार्गांची कामे सुरू करण्यात आली आहेत. सुमारे ३४१ किमी लांबीच्या पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचे बरेचसे काम पूर्ण झाले असून तीन-चार महिन्यांमध्ये काही टप्पे सुरू होतील. चित्रकूट, हमीरपूर, जालौन आदी भागांना जोडणाऱ्या ३९६ किमीच्या बुंदेलखंड महामार्गाच्या कामानेही वेग घेतला आहे. मेरठ ते प्रयागराज या सुमारे ५९४ किमीच्या व ३६ हजार कोटी रुपये खर्चाच्या द्रुतगती महामार्गाचाही प्रस्ताव तयार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्र (डिफेन्स कॉरिडॉर) विकसित करण्याचे कामही सुरू आहे. करोनाकाळातही महामार्गांची व अन्य विकास कामे वेगाने सुरू होती. त्यावर कोणताही परिणाम झालेला नाही.

 उत्तर प्रदेशात औद्योगिक विकास आणि आर्थिक गुंतवणूक वाढीच्या दृष्टीने कोणती महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत?

– औद्योगिक विकासाच्या नवीन युगाला उत्तर प्रदेशात प्रारंभ झाला आहे. राज्य सरकारने २०१८ मध्ये सर्व ७५ जिल्ह्यांमध्ये ‘एक जिल्हा, एक उत्पादन (ओडीओपी स्कीम)’ अशी प्रत्येक जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची योजना सुरू केली. तीस केंद्रीय अर्थसंकल्पातही गतवर्षी स्थान देण्यात आले. ‘आत्मनिर्भर भारत’साठीही ही योजना मुख्य आधार आहे. त्याअंतर्गत उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याकरिता शहरांमध्ये प्रदर्शने, महोत्सव आयोजित करण्यात येतात. त्यामुळे लघु-मध्यम उद्योगांनाही चालना मिळाली असून निर्यात व रोजगार वाढला आहे. एक वर्षात या क्षेत्राकडून सुमारे एक लाख १६ हजार कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. त्याचबरोबर देशी व विदेशी गुंतवणुकीतही वाढ झाली असून मोठ्या उद्योगांसाठीही राज्य सरकार प्रोत्साहने व सवलती देत आहे. एक खिडकी योजनेअंतर्गत सर्व परवानग्या तातडीने दिल्या जाताहेत. गुंतवणुकीसाठी देशातील सर्वात चांगले राज्य असा लौकिक मिळवीत उत्तर प्रदेशला देशातील मोठी आर्थिक ताकद असलेले राज्य बनविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. ‘इझ ऑफ डुइंग बिझनेस’अंतर्गत उद्योगांना अनेक सवलती, सोयीसुविधा दिल्या जाताहेत. यात उत्तर प्रदेशने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. करोनाकाळातही राज्यात ७७ गुंतवणूकदारांकडून सुमारे ५७ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव देण्यात आले असून त्यामध्ये जपान, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, दक्षिण कोरिया, सिंगापूर येथील गुंतवणूकदारांचाही समावेश आहे.

गुंतवणूक परिषदेतील चार लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या सामंजस्य करारांपैकी आतापर्यंत दोन लाख कोटी रुपयांची प्रत्यक्ष गुंतवणूक झाली आहे. करोनाकाळात सुमारे साडेआठ हजार कोटी रुपयांचे सात मोठे प्रकल्प कार्यान्वित झाले. ६,४०० कोटी रुपयांचे १९ प्रकल्प उत्पादन सुरू करण्याच्या तयारीत आहेत. घरौनी योजनेतून सातबारा नोंदी, महसूल सुधारणांना चालना देत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. सुमारे २८ लाख स्थलांतरित मजूर-कामगारांना स्वतंत्र आयोगामार्फत राज्यातच रोजगार पुरविण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आणि धार्मिक ताणतणाव याबद्दलची चर्चा नेहमी होत असते, त्याबाबत सध्या काय स्थिती आहे?

– आमच्या सरकारला १९ मार्च रोजी चार वर्षे पूर्ण होतील. राज्यातील वातावरणात खूप सकारात्मक बदल झाले आहेत. पूर्वी जातीय दंगे, हाणामाऱ्या हे नेहमीचे होते. पण गेल्या चार वर्षांत एकही दंगल झालेली नाही. हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन बांधव त्यांचे सण आनंदाने व सौहार्दात साजरे करत आहेत. महिलांसह सर्वधर्मीयांमध्ये राज्यात सुरक्षित असल्याची भावना रुजली आहे. एकदा सुरक्षिततेबाबत विश्वास वाटला की जनता सरकारला स्वीकारते. पोलिसांनीही यादृष्टीने चांगले काम केले असून गुंड, माफियांवर कठोर कारवाई केली आहे.

सुमारे २४ कोटी इतकी प्रचंड लोकसंख्या असलेल्या राज्यातील करोना परिस्थिती तुमच्या सरकारने कशा प्रकारे हाताळली?

– करोनाकालीन टाळेबंदी लागू होताच ११ ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कृतिगट तयार करून वेगवेगळ्या उपाययोजना उत्तर प्रदेश सरकारने केल्या. त्यामुळे देशातील सर्वाधिक, म्हणजे २४ कोटी लोकसंख्येच्या राज्यात करोना चाचण्या मोठ्या प्रमाणावर करूनही रुग्णांची संख्या व मृत्युदर अन्य राज्यांच्या तुलनेत कमी राहिला. परराज्यांमधून परतलेल्या लाखो मजूर व कामगारांना राज्यात सामावून घेऊन रोजगार देण्यात आला. स्थलांतरितांमुळे अन्य राज्यांत काही अडचणी आल्या असतील, पण उत्तर प्रदेशात काहीही अडचण आली नाही.

धर्मांतर बंदीसाठी कायदा करण्याची आवश्यकता का भासली?

– जनहित व जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीनेच धर्मांतर बंदी कायदा करण्यात आला असून, कोणत्याही राजकीय फायदा-तोट्याचा विचार त्याबाबत केलेला नाही. केरळ तसेच कर्नाटकच्या उच्च न्यायालयांनी असा कायदा करण्यासाठी तेथील राज्य सरकारांना १०-१२ वर्षांपूर्वी आदेश दिले होते. पण आमच्या सरकारला आदेश देण्याची आवश्यकताच न्यायालयास भासली नाही.

गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे शेतकरी वृद्ध गाईंना सोडून देत आहेत, त्यांच्यासाठी पुरेशा गोशाळा नाहीत, त्याचे काय?

– गोशाळाही वाढविण्यात येत असून सध्या सहा लाख गोवंशांचे पालनपोषण केले जात आहे. त्यांपैकी साडेपाच लाख गोवंशाचा शासकीय गोशाळेत सांभाळ करण्यात येत आहे.

’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या शासकीय समारंभात रामनामाच्या घोषणा देण्यात आल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाषण केले नाही, याविषयी आपले मत काय आहे? पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचाराला जाणार आहात का, तेथे भाजपची कामगिरी कशी राहील?

– बरेच जण एकमेकांना भेटल्यावर नमस्कार करताना प्रभू श्रीरामाचे नाव घेतात. रामनामाची कोणावरही सक्ती करण्यात आलेली नाही. मी भाजपचा कार्यकर्ता आहे आणि पक्ष मला प्रचारार्ची किंवा अन्य जी जबाबदारी देईल, ती मी निष्ठेने पार पाडीन. पश्चिम बंगालमध्ये वातावरण बदलले असून भाजपची लाट आहे. तेथे आमचा विजय निश्चित आहे.

संकलन :  उमाकांत देशपांडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2021 12:03 am

Web Title: uttar pradesh chief minister yogi adityanath towards hindutva towards development akp 94
Next Stories
1 अर्थसंकल्प घडविणारे हात…
2 चाँदनी चौकातून : मोर…
3 ‘विज्ञानाच्या बाजूने बोलणारे राजकारणी कमीच’
Just Now!
X