यंग टॅलेण्ट
विशाखा कुलकर्णी

अ‍ॅस्ट्रोसॅट हा भारतातला पहिला मल्टी वेव्हलेन्थ उपग्रह, ज्याला ओब्झर्वेटरी क्लास सॅटेलाइट म्हणतात. या उपग्रहाच्या साहाय्याने अवकाशातल्या अशा विविध वेव्हलेन्थचा अभ्यास करता येतो. अगदी क्षणिक प्रकाशाचासुद्धा वेध या उपग्रहाच्या मदतीने घेता येतो. या उपग्रहाच्या बांधणीत महत्वाचा सहभाग असणारे खगोलशास्त्रज्ञ डॉ. वरुण भालेराव यांना ‘वेणू बापू गोल्ड मेडल’ प्राप्त झाले आहे.

असंख्य ताऱ्यांनी चमचमणारे आकाश, आपल्या पोटात अनेक गूढ रहस्य घेऊन सृष्टीच्या आदी-अंताचे साक्षीदार असणारे अंतराळ विज्ञानप्रेमींना भुरळ न घालते तरच नवल. अवकाशाची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्याचा अभ्यास अविरतपणे केला तरी पूर्ण होणार नाही. नासा, इस्रोसारख्या संस्था विविध अंतराळ मोहिमा राबवून या अंतरीक्षाची नवनवी द्वारे खुली करत असतानाच पृथ्वीवरूनच दूरवर असणाऱ्या ग्रह-ताऱ्यांचा सांगोपांग अभ्यास करणारे खगोलतज्ज्ञही अवकाशासंबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन करत असतात. या संशोधनाकडे एक नजर टाकली असता लक्षात येते की, आपल्याला अजून माहीतही नसलेल्या कित्येक आश्चर्यकारक घटना अवकाशात सतत घडत आहेत, ज्यांचा अभ्यास करणे खूपच रोमांचकारी आहे.

खगोलशास्त्राचा अभ्यास करताना ग्रह-ताऱ्यांमध्ये होणारे बदल, अवकाशातील हालचाली, घटना, ग्रह-ताऱ्यांची गती, त्यांच्या कक्षा, स्थान अशा असंख्य गोष्टी विचारात घेतल्या जाऊ शकतात. त्यामुळे खगोलशास्त्राचा अभ्यास रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र अशा वेगवेगळ्या अनुषंगाने केला जातो. अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या खगोलशास्त्राच्या शाखेत ताऱ्यांच्या भौतिक आणि रासायनिक बदलांचा, रचनेचा अभ्यास केला जातो. याच क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन करणारे आणि नुकताच खगोलशास्त्रात अत्यंत मानाचे समजले जाणारे ‘वेणू बापू गोल्ड मेडल’ प्राप्त झालेले शास्त्रज्ञ आहेत डॉ. वरुण भालेराव.

आयुका या संस्थेमुळे अवकाश संशोधनात रस निर्माण झालेल्या डॉ. वरुण भालेराव यांनी आयआयटी मुंबई इथून इलेक्ट्रिकल इंजिनीयिरगची पदवी घेतली आणि त्यानंतर कॅलटेक येथून अ‍ॅस्ट्रोफिजिक्सचे शिक्षण घेतले. खगोलशास्त्रात असलेला रस आणि इंजिनीयिरगचे ज्ञान या दोन्ही गोष्टींचा वापर त्यांनी आपल्या संशोधनात केला. डॉ. वरुण भालेराव यांचा अनेक खगोलशास्त्रीय संशोधनात महत्त्वाचा वाटा आहे.

अ‍ॅस्ट्रोसॅट हा भारतातला पहिला मल्टी वेव्हलेन्थ उपग्रह, ज्याला ओब्झर्वेटरी क्लास सॅटेलाइट म्हणतात त्याचे २०१५ मध्ये प्रक्षेपण झाले. या उपग्रहाचे काम काय? तर या उपग्रहाच्या मदतीने आपल्याला ग्रह-ताऱ्यांमध्ये होणारे विविध बदल याने अभ्यासता येतात.   त्याचबरोबर अगदी दूरवरच्या ताऱ्यांचासुद्धा अभ्यास करता येतो. यातही वैशिष्टय़पूर्ण बाब म्हणजे विविध ग्रह-ताऱ्यांमध्ये होणारे सूक्ष्मात सूक्ष्म-अगदी मिलिसेकंदात होणाऱ्या बदलांपासून कित्येक दिवस होत राहणाऱ्या बदलांपर्यंत सगळ्या गोष्टींचा अभ्यास या उपग्रहाच्या माध्यमातून शास्त्रज्ञ करू शकतात.

या उपग्रहाला पाच विविध दुर्बणिी आहेत. ज्यांच्या मदतीने आपण साध्या डोळ्यांनी दिसणाऱ्या प्रकाशकिरणांचा अभ्यास करू शकतोच, त्याचबरोबर अतिनील (UV) आणि क्ष-किरणांच्या (X-ray) विविध वेव्हलेन्थ असलेल्या किरणांचा अभ्यास करू शकतो. अवकाशात प्रकाशाचे अनेक प्रकारचे स्रोत आहेत. कधी हा प्रकाश लुकलुकणाऱ्या स्वरूपात दिसतो, तर कधी प्रचंड तीव्रतेचा प्रकाश एकाच वेळी बाहेर पडतो. या प्रकाशातून बाहेर पडणाऱ्या दृश्य किरणांसोबतच साध्या डोळ्यांनी न दिसणारे अतिनील, क्ष-किरण विविध स्वरूपात बाहेर पडतात. त्यामुळे याचा अभ्यास करण्यासाठी हे सर्व किरण दिसू शकतील अशा पद्धतीने उपग्रहाची रचना करावी लागते. या उपग्रहाच्या साहाय्याने अवकाशातल्या अशा विविध तरंगलांबीचा अभ्यास करता येतो. अगदी क्षणिक प्रकाशाचासुद्धा वेध या उपग्रहाच्या मदतीने घेता येतो. विविध दीíघकांचा अर्थात गॅलेक्सीचा समूह, तारका या गोष्टींचा अभ्यास केला जातो. हे किरण उत्सर्जति करणारे तारे-तारकांचे कालानुरूप होणारे बदल या उपग्रहामुळे अभ्यासता येतात.

एखाद्या उपग्रहामुळे करता येणाऱ्या अभ्यासाची एवढी मोठी व्याप्ती खरोखर आश्चर्यकारकच आहे! याच उपग्रहाच्या बांधणीत डॉ. वरुण भालेराव यांचा महत्त्वाचा वाटा आहे. इंजिनीयिरगचे कौशल्य हाताशी असल्यामुळे हा उपग्रहाची रचना करताना हे कौशल्य उपयोगी पडले. उपग्रहाची बांधणी करताना अवकाशाच्या ज्ञानाबरोबर उपग्रहाच्या तांत्रिक बाबी माहीत असणेही गरजेचे असते. त्यामुळे डॉ. भालेराव यांच्या कौशल्याचा इथे कस लागला. त्याचबरोबर अवकाशाच्या अभ्यासात असलेल्या रसामुळे डॉ. भालेराव हे या उपग्रहातून येणाऱ्या घटनांचा, विविध खगोलीय गोष्टींचा अभ्यास करण्याचे,  मिळालेल्या माहितीवरून निष्कर्ष काढणे हा डॉ. वरुण भालेराव यांच्या संशोधनाचा एक भाग आहे.

आपल्याला आकाशात दिसणारे तारे-तारका हे पृथ्वीच्या फिरण्यामुळे सूर्यासारखेच उगवतात आणि मावळतात. त्यामुळे एखाद्या ठिकाणाहून एका विशिष्ट ताऱ्याचा अभ्यास करण्यासाठी मिळणारा कालावधी अतिशय मर्यादित असतो. मग त्या ताऱ्याचा खोलवर अभ्यास करण्यासाठी एखाद्या जागेवर तितका वेळ मिळत नाही. यासाठी ग्रोथ (GROWTH) नावाचा प्रकल्प सुरू आहे. ग्रोथ अर्थात ग्लोबल रिले ऑफ ओब्झर्वेटरीज वॉचिंग ट्रान्झियंटस हॅपन. या प्रकल्पामध्ये जगाच्या विविध भागांमधून एखाद्या ताऱ्याचे किंवा खगोलीय वस्तूचे, एखाद्या अवकाशातील घटनेचे निरीक्षण केले जाते. वेगवेगळ्या भागांत तो तारा वेगवेगळ्या वेळी दिसतो, अशा रीतीने वेगवेगळ्या भागांतून ताऱ्याचे पूर्णवेळ निरीक्षण केले जाते. यासाठी हॅन्ले (लडाख) येथे भारतातील पहिली संपूर्णपणे स्वयंचलित रोबोटिक दुर्बीण वापरली जात आहे. ही दुर्बीण भारतातून ठरावीक गोष्टीचे चोवीस तास निरीक्षण करून तो अहवाल भारतभरातील शास्त्रज्ञांना पाठवण्याचे काम करते. डॉ. वरुण भालेराव यांच्या संशोधनाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे या दुर्बणिीद्वारे मिळालेल्या माहितीवरून अवकाशात घडणाऱ्या घटनांचा अर्थ लावणे, त्यावरून निष्कर्षांप्रत पोहोचणे, जिथे वैज्ञानिकाच्या बुद्धीचा कस लागतो.

यासोबतच गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणाऱ्या लायगो (Laser Interferometer Gravitational-Wave Observatory – LIGO) या प्रकल्पामध्ये डॉ. भालेराव यांनी महत्त्वाचे संशोधन केले आहे. या प्रकल्पामध्ये गुरुत्वीय लहरींचा वापर अवकाशातील विविध गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. या अंतर्गत २०१७ मध्ये दोन न्यूट्रोन ताऱ्यांची एकमेकांना होणारी धडक आणि त्यातून येणारे विविध किरण यांचा अभ्यास केला गेला.

डॉ. वरुण भालेराव यांच्या या सर्व कार्याची दखल घेत त्यांना अनेक महत्त्वपूर्ण पुरस्कारदेखील मिळाले आहेत. यात वैद्य आणि रायचौधरी फेलोशिप (२०१२), डीएसटी इन्स्पायर फेलोशिप (२०१४) अशा काही महत्त्वपूर्ण पुरस्कारांचा समावेश होतो. विविध ऑलिम्पियाड यासह वेणू बापू गोल्ड मेडल मिळाले आहे. हे मेडल अतिशय मोजक्या, उल्लेखनीय कार्य केलेल्या तरुणांना मिळाले आहे.

एकुणात अवकाश संशोधनाच्या अवकाशात डॉ. वरुण भालेराव यांचे नाव भारतातून चमकणारे आहे असे म्हणायला हरकत नाही, भारतासाठी अर्थातच ही बाब अतिशय अभिमानास्पद आहे.
सौजन्य – लोकप्रभा