मी अभिनय करायला लागलो, तो काळ माझ्यासाठी फार मजेशीर आहे. लहानपणी शाळेत असताना मला नाटकं खूप आवडायची. शाळेत एका नाटकात भागही घेतला होता. पेरुगेटजवळची भावे हायस्कूल ही माझी शाळा. त्या वेळी आमच्या मास्तरांनी गोखले, टिळक, रानडे वगैरे पात्रं असलेलं नाटक बसवलं होतं. त्यात गोपाळ कृष्ण गोखल्यांची भूमिका माझ्या वाटय़ाला आली होती. मास्तरांनी चांगल्या तालमी घेतल्या होत्या आणि आमची भाषणंही तोंडपाठ होती. प्रयोगाचा दिवस उजाडला. सकाळपासून आम्ही गॅदिरगच्या हॉलमधील स्टेजवर बंद पडद्यासमोर तालमी केल्या. मात्र प्रत्यक्ष गॅदिरगमध्ये नाटक सुरू होऊन पडदा उघडला गेला तेव्हा मी विंगेत होतो आणि समोर मला तुडुंब प्रेक्षकवर्ग दिसला. माझ्या घशाला कोरडच पडली. मी माझी एण्ट्री विसरलो आणि तसाच विंगेतच उभा राहिलो. मला कोणी तरी स्टेजवर ढकललं; पण माझी दातखिळीच बसली होती. नंतर मी जो काही बोलायला लागलो, तो सगळ्यांची भाषणं म्हणूनच गप्प बसलो! या प्रसंगानंतर मात्र मी शपथच घेतली, की यापुढे मी अभिनयाच्या वगैरे फंदात पडणार नाही. याच जन्मी नाही, तर पुढल्या जन्मीही नाही! मग मी माझं लक्ष चित्रकलेकडे वळवलं. त्या वेळी मी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटच्या परीक्षा वगैरेही दिल्या होत्या. त्यामुळे दहावीनंतर स्वाभाविकपणे कला शाखेत प्रवेश घेण्याकडे माझा कल होता. मात्र वडील प्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांनी अक्षरश: ‘ब्रेन वॉशिंग’ करत मला विज्ञान शाखेकडे आणि वैद्यकीय अभ्यासाकडे वळवलं.

याच दरम्यान माझी ओळख भालबा केळकर यांच्याशी झाली. भालबा त्या वेळी हौशी रंगभूमीवर कार्यरत होते. माझं नाटकात काम करण्याचं वेडही मला स्वस्थ बसून देत नव्हतं. मग आम्ही एकत्र येत आमच्या कॉलेजसाठी नाटकं बसवायला आणि त्यात कामं करायला सुरुवात केली. त्या चार वर्षांत मी चार नाटकांत काम केलं; पण कॉलेज संपल्यावर आता नाटक कुठे करायचं, हा प्रश्न समोर आला आणि आपसूकच त्यासाठी काही तरी प्रयत्न करावेत, असं वाटलं. मग आम्ही ‘प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन’ अर्थात ‘पीडीए’ ही संस्था स्थापन केली. पीडीएतर्फे नाटक करताना आम्ही कोणताही प्रकार वर्ज्य मानला नाही. नाटक.. मग ते इंग्रजीत असो.. आवडलंय ना, मग ते करायचंच. सुरुवातीला आई-वडिलांनीही कौतुक केलं, पण नंतर वाद सुरू झाले. परंतु मला नाटकाची आवडच एवढी होती, की मी नाटकात काम करण्यापासून स्वत:ला कधी थांबवूच शकलो नाही. त्या वेळी ते सगळं खूपच हौशी पद्धतीचं होतं. पुढे जाऊन नाटक करण्यावर बंधनं येत गेली, तेव्हा लक्षात यायला लागलं की, नाटक हा गंभीरपणे करण्याचा आणि गंभीरपणे बघण्याचा कला प्रकार आहे. मला वाटतं, त्याच वेळी माझ्या नाटय़विषयक जाणिवा ठाम होऊ लागल्या.

त्या काळात बालगंधर्व, नानासाहेब फाटक यांसारख्या दिग्गज नटांपासून ते पार हॉलीवूडच्या नटांच्या अभिनयापर्यंत सगळं पाहिलं. नकळत मनात तुलना सुरू झाली. आपल्याकडील रंगभूमीवरचा अभिनय अतिशय बटबटीत असल्याचं जाणवलं. आम्हाला नानासाहेब फाटक आवडत नव्हते अशातला भाग नाही, किंबहुना आजही नानासाहेब हे फार थोर नट होते असंच माझं मत आहे. याच दरम्यान नाटकाच्या तालमींना, प्रयोगाला एक शिस्त हवी, हा विचारही माझ्या मनात यायला लागला. मी नाटक बसवताना मला अभिप्रेत असलेल्या शिस्तीचा आग्रह धरू लागलो आणि मला वाटतं तिथेच माझे आणि भालबांचे मतभेद सुरू झाले. कलाकार म्हणजे सैनिक नाही आणि आम्ही इथे नाटक बसवायला म्हणजे मजा करायला येतो, असं भालबांचं मत होतं. परंतु मला नेहमी वाटायचं की, नाटक म्हणजे गंमत नाही आणि नाटक बसवताना मजा करायचीच तर तीदेखील शिस्तीनेच केली पाहिजे.. आणि त्या वेळी पाश्र्वनाथ आळतेकर ही शिस्त मुरवायचा प्रयत्नही करत होते. त्यामुळे पीडीएध्येच माझा आणि भालबांचा, असे दोन गट पडले. हे प्रकरण एवढं पुढे गेलं की, ‘तू भालबावादी की लागूवादी?’ असा प्रश्नही त्यावेळी पीडीएचे कलाकार आपासात विचारत. मग संस्था फुटू नये म्हणून मी पीडीएचा राजीनामा दिला. त्याआधीच मी ‘रंगायन’साठी नाटकं करत होतो. मी जी शिस्त लावण्याचा प्रयत्न पीडीएत करत होतो, रंगायनमध्ये ती शिस्त सुरुवातीपासूनच होती. विजयाबाईंबरोबर काम करतानाही, त्यांच्याकडे प्रचंड क्षमता असल्याचं जाणवत होतं. पुढे मी अनेक दिग्दर्शकांबरोबर काम केलं. मला वाटतं की, त्यांच्या दिग्दर्शनाच्या शैलीत फरक असला, तरी शेवटी सर्वाना एक समान गोष्टच मांडायची असते. त्याहीपुढे जाऊन नटही सर्जनशीलतेच्या पातळीवर दिग्दर्शकाला खूप मदत करतो आणि त्यानं ती तशी करणं अपेक्षित आहे.