संहिता जोशी

विदाविज्ञान (डेटा सायन्स) या ज्ञानशाखेत संशोधन, अभ्यास वगैरे सुरू होतंच. पण त्यातून व्यवसायाच्या आणि पर्यायानं नफा कमावण्याच्या मोठय़ा संधी उपलब्ध होऊ लागल्या, तेव्हा हा विषय विद्यापीठांपुरता राहिला नाही. ग्राहकांना ‘ओळखण्या’साठी नवनवीन तंत्रं अवलंबली जाऊ लागली..

corruption in academic research
संशोधन कमी आणि बाजार जास्त!
course on quantum technology for the first time in the country
देशात पहिल्यांदाच क्वांटम तंत्रज्ञानावरचा अभ्यासक्रम… जाणून घ्या सविस्तर!
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Savitribai Phule Pune University
‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’मध्ये आता गुद्द्यांची नवी संस्कृती; विद्यार्थी, विद्यार्थी संघटनांतील हिंसक प्रकरणांमध्ये वाढ

विदा (डेटा) म्हणजे काय-काय असतं याची काही उदाहरणं आपण गेल्या आठवडय़ात बघितली. अँड्रॉईड फोनच्या जीपीएस किंवा लोकेशनची माहिती, गुगल सर्चची माहिती, जीमेलमध्ये आपण काय लिहितो, या सगळ्या गोष्टी गुगल विदा (डेटा) म्हणून वापरतं. त्यातून आपल्याला कोणत्या जाहिराती दाखवायच्या याचा निर्णय घेतला जातो. चहा पिणाऱ्यांना निराळ्या जाहिराती, कॉफी पिणाऱ्यांना निराळ्या. तसं केलं नाही तर नफा कमी होईल, नाही का?

किमान गेली काही दशकं विद्यापीठांमध्ये विदाविज्ञान (डेटा सायन्स) या ज्ञानशाखेत संशोधन, अभ्यास सुरू आहे. मात्र जोवर त्यातून व्यवसायाच्या आणि पर्यायानं नफा कमावण्याच्या मोठय़ा संधी उपलब्ध होत नव्हत्या तोवर हा विषय बहुतांशी विद्यापीठांपुरता मर्यादित होता. गेल्या काही वर्षांपासून हा विषय फार लोकप्रिय होत आहे; त्याचं हेच कारण. गेल्या दोनेक दशकांत फक्त संगणकांची क्षमता वाढली असं नाही; तर इंटरनेट घरोघरी आणि घरांबाहेरही पोहोचलं आणि आपले फोन स्मार्ट झाले. दोन दशकांपूर्वी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, जीमेल अशा गोष्टी जन्माला आल्या नव्हत्या; गुगल शोध (सर्च) अगदी बालवयात होतं.

वीस वर्षांपूर्वी मोबाइल फोन होते, पण ते फोन फार स्मार्ट नव्हते. फोनवर बोलणं, एसेमेस पाठवणं आणि साधेसे काही खेळ खेळणं यांपलीकडे मोबाइलचा फार फायदा नव्हता. कोणाला फोनवर खेळण्याचं व्यसन असेल किंवा कोणाला फार एसेमेस करण्याची खोड असेल तर त्याची नोंद घेण्याची सोय तेव्हाच्या तंत्रज्ञानात नव्हती.

मध्ये एकदा मला अपरात्री जाग आली. झोप येईना म्हणून मी फोनवर फेसबुक, व्हॉट्सॅप वगैरे बघत होते. तेव्हा जगाच्या दुसऱ्या टोकाला दुपारची वेळ होती; तिथले मित्रमत्रिणी जागे होते. त्यांतल्या एकीनं मला विचारलं, ‘‘एवढय़ा उशिरापर्यंत काम करत्येस का झोप येत नाहीये?’’

आपण कुठे राहतो, कधी झोपतो, किती काम करतो, याची माहिती, किंवा अंदाज मित्रमत्रिणींना असणं साहजिक आहे. मानवी नातेसंबंध, आपुलकी, प्रेम अशा भावनांमुळे आपण जवळच्या लोकांबद्दल आपसूकच विचार करतो. दुसऱ्या दिवशी डोळे ओढलेले दिसत असले तरीही पहिल्यांदाच भेटलेल्या अनोळखी व्यक्तीला याबद्दल आपण किती माहिती देऊ? ‘काल रात्री झोप नीट झाली नाही’ याचा कदाचित उल्लेख होईल. पण ‘काल रात्री दीड ते पावणेतीन मी जागी होते’, एवढी तपशीलवार माहिती अनोळखी व्यक्तीला सहज द्यावी का? अशी माहिती आपल्याला कोणी पहिल्या भेटीत दिली तर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा ‘ही व्यक्ती नको तेवढी माहिती देत्ये’ असा विचार करून सोडून देतो.

माणसं ज्या गोष्टी, माहिती, विदा सोडून देतात, त्या गोष्टी विदाविज्ञानासाठी महत्त्वाच्या असू शकतात. अपरात्री झोप येत नव्हती म्हणून फेसबुक उघडलं तेव्हा फेसबुकला जागरणाची माहिती आपसूक मिळाली. यंत्रांना, विदागारांना आणि मुख्य म्हणजे नफ्यासाठी(च) चालणाऱ्या गुगल, फेसबुकसारख्या आस्थापनांना ही माहिती मिळाली तर काय होऊ शकतं?

अर्थशास्त्राच्या प्राथमिक अभ्यासातून आपल्याला समजतं- जिथे गरज आहे तिथे सेवा किंवा वस्तू ती गरज भागवायला तयार होतात. (ही लेखमाला अर्थशास्त्राबद्दल नाही. मात्र विदाविज्ञानाचा आपल्यावर काय, कसा परिणाम होतो, हे समजून घ्यायचं असेल तर थोडं अर्थशास्त्र, मानसशास्त्र, जाहिरातक्षेत्र अशा गोष्टीही बघाव्या लागतात. विद्यापीठांत चालणारी संशोधनं आपल्यापर्यंत पोहोचायची तर त्यासाठी बहुतेकदा सक्तीच्या पोलिओ लशीसारख्या सरकारी अभियानाची गरज असते किंवा विदाविज्ञानासारख्या नफ्यासाठी चालणाऱ्या व्यवसायांची.)

जी गोष्ट आपण अनोळखी लोकांना सांगणार नाही- अपरात्री काही काळ जागं असणं- ते फेसबुक, व्हॉट्सॅपलाही सहज समजलं. अपरात्री जाग येणं नेहमीचं झाल्यावर झोपेच्या औषधांच्या जाहिराती दिसणारच नाहीत कशावरून? अपरात्री जाग आल्यावर ही माहिती आज आपल्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी बरीच विदा (डेटा) आपणच, स्वतच्या नकळत, देतो.

‘तुम्ही मागल्या जन्मी कोण होतात?’ असे प्रश्न फेसबुकवर बघितले आहेत? आपल्या मत्रयादीतलं कोणी ते अ‍ॅप वापरतं, म्हणून आपल्यालाही ही जाहिरात दिसते. ‘तुम्ही गेल्या जन्मी घूस होतात’, अशी किळसवाणी उत्तरं कधीही मिळत नाहीत. सगळ्या जाहिराती आपल्याला छान-छान वाटावं म्हणून बनवलेल्या असतात. किंवा ‘या प्रश्नांची उत्तरं देऊन तुमची खरी शैक्षणिक पात्रता समजून घ्या’, असं काही. अशा जाहिरातींची उत्तरं कधीही ‘पाचवी नापास’ अशी, नकारात्मक येणार नाहीत. तुम्ही फेसबुकला दिलेली व्यक्तिगत माहिती तुमच्यावरच वापरली जाऊ नये असं वाटत असेल, तर या जाहिरातींवर प्रयोगही करून बघू नका.

ही सगळी अ‍ॅप्स आपली माहिती गोळा करण्यासाठी तयार केलेली असतात. विदाविज्ञानाशी संबंधित बऱ्याच गोष्टी मी गुगलून पाहते, कधी कोड कसा लिहायचा याबद्दल, कधी ठरावीक संज्ञेबद्दल शंका असतात, असं काही. मात्र ही उदाहरणं साधीच आहेत. वजन कमी करणं, हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. ‘पोटाचा घेर कमी कसा करावा’, किंवा ‘चारचौघांत बोलण्याची भीती कमी कशी करावी’, अशासारख्या गोष्टीही गुगलवर शोधल्या जातात. आपल्याला कसली भीती वाटते, कशाबद्दल असुरक्षितता वाटते, अस्वस्थ वाटतं अशा गोष्टी आपण गुगलवर शोधतो, त्याच वेळी आपल्याबद्दल जास्तीची माहिती या अपरिचित, बलाढय़ प्रणालीलाही देतो. विम्याचा व्यवसाय भीतीवर चालतो, असं म्हणतात. जाहिरातींचा व्यवसाय गरजांवर चालतो; गरजा असतील तर शोधायच्या आणि नसतील तर निर्माण करायच्या. गुगल, फेसबुक यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे, जाहिराती. जाहिराती दाखवण्यासाठी ते ईमेल, आंतरजाल (इंटरनेट) शोध, किंवा समाजमाध्यमांच्या सेवा पुरवतात.

एके काळी v1@graकिंवा ph@rmacy याबद्दल ईमेल मला येत असत. विदाविज्ञानाचा वापर जाहिराती करण्यासाठी सुरू झाल्यापासून, शिस्नाचा आकार वाढवण्याच्या औषधांची एकही जाहिरात मी बघितलेली नाही. बाईला हे दाखवून काय फायदा! सेवादाते आपले ईमेल वाचतात, याचासुद्धा हा फायदा आहे. कोणती ईमेल स्पॅम आहेत याची प्रणाली आता अनेक ईमेल सेवादात्यांकडे आहे. एखादं भलतं ईमेल चुकून इनबॉक्सात घुसलं तरी ते ‘चुकलं कोकरू’ आहे, हे जीमेल किंवा इतर अनेक सेवादात्यांना सांगता येतं.

कोणाला कोणत्या जाहिराती दाखवून सर्वाधिक फायदा होईल, हे जाहिरातींवर व्यवसाय करणाऱ्या गुगल, फेसबुकला समजतं. हल्ली फेसबुक मला सडपातळ आहोत, असं दाखवणाऱ्या अंतर्वस्त्रांच्या जाहिराती दाखवतं. या जाहिराती किती उपयुक्त हा मुद्दा महत्त्वाचा नाही. हा मुद्दा आहे, आपल्या असुरक्षितता, मानसिक दुबळेपणाचा गैरफायदा घेण्याचा.

तळटीप : ‘केंब्रिज अ‍ॅनालिटिका’ हे नाव २०१६-१७ च्या सुमारास, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुका झाल्यानंतर ऐकलं असेल. या केंब्रिज अ‍ॅनालिटिकानं निरनिराळी फेसबुक अ‍ॅप्स वापरून लोकांची व्यक्तिगत माहिती जमा केली. अशा जाहिरातवजा प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या लोकांचीच नाही, तर त्यांच्या मत्रयादीतल्या लोकांचीही. फेसबुकच्या मेसेंजरमध्येही त्यांनी खिंडार शोधलं. आता म्हणे, फेसबुकनं ही खिंडारं बुजवली आहेत. तसं काही पुन्हा झालेलं नाही, हे समजण्यासाठी तसा दुसरा घोटाळा उघडकीस यावा लागेल. कारण तोवर कोणी हे कच्चे दुवे शोधायला जाणारही नाहीये.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com