संहिता जोशी

समोर असताना ज्यांच्याशी बोललो नव्हतो, त्यांना आता फेसबुकावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपण! का? न दिल्यास आपण कळपातून मागे राहू म्हणून? आपण ‘स्वेच्छे’नं केलेले हे सुखसंवाद, चर्चा, भांडणं यांतून दिवसेंदिवस ‘वाढ’ होतेय ती फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांचीच..

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Womens Health The bone brittle process will be prolonged but how
स्त्री आरोग्य : हाडं ठिसूळ प्रक्रिया लांबेल, पण कशी?
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
Why Women Become Nicotine Dependent Faster
पुरुषांपेक्षा स्त्रिया करतात जास्त धूम्रपान; सिगारेटची सवय सुटणं होतं कठीण, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

‘१४ सेकंदांपेक्षा जास्त वेळ बायकांकडे बघत बसलात तर तुरुंगात जावं लागेल’, अशा अर्थाचं विधान मध्यंतरी केरळमधल्या एका सरकारी अधिकाऱ्यानं केलं होतं. त्यावरून समाजमाध्यमांवर बरीच टिंगलटवाळीही झाली होती. दर दहा मिनिटांनी तुमच्याकडे कोणी तरी बघत बसलं तर कसं वाटेल? अचानक समजलं की बरीच वर्ष कोणी तरी आपल्याकडे लपूनछपून बघत होतं.. स्त्री असाल वा पुरुष.. हे विचित्र वाटत नाही का? एकदा फुकटात ईमेल, वायफाय, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक-ट्विटरसारखी समाजमाध्यमं वापरायला लागल्यावर, आपलं सतत निरीक्षण सुरू आहे, हे विसरता येत नाही.

‘कर नाही त्याला डर कशाला’ अशी म्हण मराठीत आहे. अशा पारंपरिक धारणा, शहाणपण नवं तंत्रज्ञान वापरताना तितक्याच ग्राहय़ असतील असं नाही. इथं इंग्लिशमधली म्हण, there is no free lunch (फुकटात काहीही मिळत नाही), विदाविज्ञानाच्या बाबतीत अत्यंत चपखल आहे. विदाविज्ञान वापरून आपल्या खिशात कधी हात घातला जाईल, किंवा कधी आपली मतं फिरवली जातील हे सांगता येत नाही. खोटी सही वापरून खात्यातून पैसे काढले किंवा मतमोजणीत घोटाळा झाला तर ते उघड होणं सोपं असतं; त्याचं गांभीर्य लगेच समजतंही. आज नसलेली गरज आहे असं आपल्याला उद्या पटवून दिलं आणि आपण आपली विचारपद्धत बदलली आहे, हे समजलंच नाही तर?

एक उदाहरण पाहा. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी, जेव्हा आंतरजाल (इंटरनेट) घरोघरी पोहोचलेलं नव्हतं, ईमेल, फेसबुक-ट्विटरसारखी समाजमाध्यमं जन्मालाही आलेली नव्हती, तेव्हा वर्षांतून किती लोकांचे वाढदिवस आपण लक्षात ठेवत होतो? किती लोकांना ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ देत होतो? आता फेसबुक वापरणाऱ्या लोकांनी स्वतलाच विचारून पाहा, महिन्यात किती लोकांचे वाढदिवस दिसतात आणि जेमतेम ओळख असणाऱ्या लोकांना आपण औपचारिक शुभेच्छा देतो?

हे उदाहरण दिसताना तसं साधंच दिसतं. कोणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, तर काय फरक पडतो? चांगलीच गोष्ट आहे की!

मुद्दा एवढा साधा नाही. कोणती गोष्ट चांगली आहे, आणि ती केलीच पाहिजे असा सामाजिक दबाव (peer pressure) आपल्यावर येतो? लोकांनी आपली स्तुती केली नाही तरी चालेल, पण किमान वाईट म्हणू नये, आपल्याला वाळीत टाकू नये म्हणून अनेकदा मनाविरुद्ध गोष्टी केल्या जातात. सगळे जण म्हणत आहेत म्हणून आपणही वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करणाऱ्या कळपामध्ये सामील होतो. मी शाळेत असताना वर्गात मुला-मुलींनी बोलण्याची पद्धत नव्हती; समोरासमोर असून मी ज्यांच्याशी कधी बोलले नाही अशा लोकांना फेसबुकाची नवी रीतभात म्हणून आता वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या का? चारचौघांत आपण कसं वागावं हे फेसबुक ठरवणार का?

बहुतेकदा घट्ट मत्री, नातं म्हणावं असं चार-सहा लोकांशी असतं. यापेक्षा जास्त लोकांशी जवळचे संबंध राखणं कठीण असतं. वीस-पंचवीस लोकांशी नियमितपणे गप्पा होत असतील; त्यापेक्षा जास्त लोकांना आपण ओळखतो, ज्यांच्याशी जेमतेम ओळख आहे असे शेकडो परिचित असतील. अनेक लोक असेही असतात, ज्यांच्याशी लहानपणी ओळख असते, आपले नातेवाईक असतात किंवा एके काळी एकाच वर्गात असतो, एकाच ऑफिसात असतो आणि अनेक वर्षांनंतर एकमेकांशी बोलण्यासारखं फार काही नसतं. हे लोक रस्त्यात कधी भेटले तर ‘काय, कसं काय’ अशा पाच-दहा मिनिटं गप्पा मारून आपल्या कामाला जायचं, अशी पद्धत होती.

आता हातात स्मार्टफोन असतो. कोणाचा वाढदिवस कधी, लग्नाचा वाढदिवस कधी, वगैरे गोष्टी फेसबुकच आपल्यासमोर आणून दाखवतं. एक बटण दाबून या लोकांना शुभेच्छा देता येतात. एक बटण दाबून, कुठला तरी असंबद्ध फोटो पाठवून ‘गुड मॉर्निंग’ म्हणता येतं. या सगळ्यात संवाद असा नसतोच, तो ‘काय, कसं काय’ यातही नव्हताच. पण स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या आधी ते शब्द खरोखरच हवेत विरून जात होते. आता सर्वशक्तिमान फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप (व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम फेसबुकचेच भाग आहेत), गुगल, अशा सगळ्यांना आपण स्वतबद्दल माहिती देत आहोत. लोक एकमेकांशी कसा संवाद साधतात, कोण खरोखरच संवाद साधतात आणि कोण फक्त काहीबाही फोटो, व्हिडीओ, फॉरवर्ड्स इकडेतिकडे ढकलत असतात, हे सगळं तपासणं अगदी सहज शक्य आहे.

विचार करा, जर आपली ईमेलं वाचून त्यानुसार दोन-चार शब्दांची उत्तरं सुचवणं ईमेल सेवादात्यांना शक्य आहे, तर कोणाकडे बोलण्यासारखं आहे आणि कोणाचा वेळ जात नाही, हे शोधता येणार नाही का?

फेसबुकमध्ये अगदी सुरुवातीच्या काळात गुंतवणूक केलेल्या शॉन पार्करनं गेल्या वर्षी आरोप केला की, फेसबुकचं व्यसन लागावं, लोकांनी खूप जास्त वेळ फेसबुकावर घालवावा, अशा रीतीनं फेसबुकची रचना केली आहे. लोक किती वेळ फेसबुकवर घालवतात; कशा रीतीनं गोष्टी फेसबुकवर मांडल्या, कोणते पर्याय दिले तर लोक फेसबुकवर जास्त वेळ घालवतील, यावरही प्रयोग केले गेले, अजूनही होत असतील. फेसबुकची मांडणी कशी असेल तर लोक जास्त वेळ फेसबुकवर घालवतील, हे शोधण्यामागेही विदाविज्ञानाचं शास्त्र वापरलं जातं. लोकांचे यादृच्छिक (रँडमपणे) दोन गट करायचे, एका गटाला एक रचना दाखवायची, दुसऱ्या गटाला दुसरी. कोणत्या गटातले लोक फेसबुकवर जास्त वेळ घालवतात याचं निरीक्षण ठरावीक दिवस करायचं. त्यातून जी रचना अधिक लोकप्रिय ठरेल, तसं फेसबुक दिसेल. आठवा, सुरुवातीला फेसबुकवर फक्त ‘लाइक’ बटण होतं; आता एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यासाठी ‘हाहा’, ‘संताप’, अश्रू ढाळणारा गोटोळा चेहरा, अशी बरीच बटणं आहेत.

गेल्या काही वर्षांत बरेच मराठी लोक फेसबुकवर आले आहेत; फक्त राजकीय हाणामाऱ्या आणि चिखलफेकच नव्हे तर चर्चा करण्याचं माध्यम म्हणूनही फेसबुक वापणारे मराठी लोक आहेत. आपण फेसबुकवर जेवढा जास्त वेळ घालवू, ते फेसबुकला हवंच आहे. तेवढंच नाही, तर बाहेरच्या बातम्या, दुवे (लिंका) फेसबुकवर चिकटवण्यापेक्षा स्वतंत्ररीत्या फेसबुकवर लिहू, ते फेसबुकच्या फायद्याचं आहे. त्यातून फेसबुकला मराठी भाषा शिकण्यासाठी कच्चा माल मिळतो; आपल्या आवडीचे विषय ठरवता येतात; त्यानुसार आपल्याला कोणत्या जाहिराती दाखवायचं हे ठरवता येतं; म्हणजे जास्त नफा. इथं नाव फेसबुकचं घेतलं असलं तरी इन्स्टाग्राम, ट्विटर अशी सगळीच समाजमाध्यमं त्यात येतात.

आपण जेवढा जास्त वेळ समाजमाध्यमांवर घालवणार, जेवढय़ा जास्त मारामाऱ्या करणार; ‘थांब, त्या मोदीभक्तांना/ मोदीद्वेष्टय़ांना दाखवतेच इंगा,’ असं म्हणत प्रतिक्रिया लिहीत बसणार, तेवढा त्या कंपनीचा फायदा जास्त आहे. पारंपरिक अर्थानं फेसबुकचं व्यसन लागलेलं आपल्याला समजणारही नाही, कारण मुळात फेसबुकचा परिणाम तंबाखू किंवा दारूसारखा होत नाही. शिवाय चार दिवस फेसबुक वापरलं नाही असं होत नाही. कुठेही जा, फोन आणि इंटरनेट पर्समध्ये असतातच.

समाजमाध्यमांवर माझा राग आहे, असं समजू नका. अप्रत्यक्षरीत्या, त्यांमुळेच ही लेखमाला लिहिण्याची संधी मिळाली. मात्र चारचौघांत आणि खासगीत व्यक्तीनं कसं वागायचं, कोणाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायच्या, हे आपलं आपण ठरवता आलं पाहिजे. कॅलिफोर्नियातले मोजके अभियंते आणि मार्केटिंगवाले लोक बीड किंवा परभणीच्या लोकांनी चारचौघांत कसं वागावं हे ठरवत आहेत. त्याचे आणखी तपशील पुढच्या भागात.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com