News Flash

चिरंतन आनंदोत्सव!

पाच वेळा जगज्जेतेपद पटकावून आणि पाव शतकाहून अधिक काळ पहिल्या दहांत राहूनही अद्यापि तो विजेतेपदासाठी भुकेला आहे.

बुद्धिबळ हा खेळ मूळ भारतातला; पण आनंदचं ग्रँडमास्टर होणं, जगज्जेता बनणं भारताच्या जागतिकीकरणाच्या आणि सक्षमीकरणाच्या प्रक्रियेशी समांतर राहिलं आहे.

सिद्धार्थ खांडेकर

येत्या ११ डिसेंबरला भारताचा अव्वल बुद्धिबळपटू, माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद ५० वर्षांचा होईल. तो पहिल्यांदा ग्रँडमास्टर बनला तो १९८८ साली. पाच वेळा जगज्जेतेपद पटकावून आणि पाव शतकाहून अधिक काळ पहिल्या दहांत राहूनही अद्यापि तो विजेतेपदासाठी भुकेला आहे. बुद्धिबळ हा खेळ मूळ भारतातला; पण आनंदचं ग्रँडमास्टर होणं, जगज्जेता बनणं भारताच्या जागतिकीकरणाच्या आणि सक्षमीकरणाच्या प्रक्रियेशी समांतर राहिलं आहे. चतुरंग वा चतरंग हा खेळ अरबांकडे गेला नि बनला शतरंज! मूर आक्रमकांनी तो स्पेनमध्ये नेला नि तेथून तो युरोपात पसरला. युरोपियनांमुळे त्याला जागतिक परिमाण लाभलं. आनंदही चेन्नई, फिलिपिन्स नि स्पेन अशा वाटेने गेला नि जगज्जेता बनला. त्याच्या या प्रवासातील काहीशा अज्ञात टप्प्यांविषयी, व्यक्तींविषयी आणि खुद्द आनंदविषयीही..!

इटलीतल्या एका शहरात..

ही गोष्ट १९९१ च्या डिसेंबरमधली. खरं तर ते वर्ष सरतानाची. इटलीतले रेगियो एमिलिया शहर. या शहरात सुरू होती जगातली एक अत्यंत महत्त्वाची बुद्धिबळ स्पर्धा. तो मोठा विचित्र काळ होता. सोव्हिएत महासंघाचं विघटन झालेलं होतं. तरीही सोव्हिएत महासंघाची बुद्धिबळातली सद्दी संपण्याची कोणतीही चिन्हं नव्हती. आणि भविष्यात रशिया विरुद्ध इतर राष्ट्रे अशी स्पर्धा सुरू होणार हे स्पष्ट होतं. रेगियो एमिलियातील या जुन्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी आलेल्या दहा जणांपैकी नऊ बुद्धिबळपटू पूर्वाश्रमीच्या सोव्हिएत महासंघातले होते. त्यावेळचा जगज्जेता गॅरी कास्पारॉव, माजी जगज्जेता अनातोली कारपॉव, उदयोन्मुख बुद्धिबळपटू व्हॅसिली इव्हानचुक आणि बोरिस गेलफँड, मुरब्बी अलेक्झांडर बेल्यावस्की, लेव्ह पोलुगायव्हस्की आणि मिखाइल गुरेविच, युवा अलेक्झांडर खलिफमान आणि व्ॉलेरी सालॉव, वगैरे. कास्पारॉव, कारपॉव हे त्यावेळचे दादा खेळाडू. मूळचे रशियन. त्यांची सद्दी मोडून काढणार अशी ज्याच्याविषयी सर्वाची खात्री होती तो इव्हानचुक हा युक्रेनियन. त्याच्याइतकाच गुणवान गेलफँड हा बेलारूसचा. आता रशिया विरुद्ध इतर सोव्हिएत राष्ट्रे अशी खुन्नस खेळाच्या मैदानांवर आणि प्रामुख्याने बुद्धिबळाच्या पटावर रंगणार अशी उपस्थितांना आशा होती. भविष्यातील या लढतींची रंगीत तालीम या स्पर्धेच्या निमित्ताने होणार होती. कारण सोव्हिएत विघटनानंतरची ती पहिलीच स्पर्धा होती.

एक दहावा बुद्धिबळपटूही तिथं आला होता. त्याची परदेशातली ती पहिलीच मोठी स्पर्धा होती. तो सोव्हिएत देशांतील नव्हता. त्याचा देश ऐकून स्पर्धेतील एका बुद्धिबळपटूनेच त्याला सुनावलं, ‘फार तर कॉफी हाऊस बुद्धिबळपटू होशील तू. कारण तुला सोव्हिएत स्कूलमध्ये ट्रेनिंग मिळालेलं नाही.’ तो खेळाडू होता भारताचा त्यावेळचा पहिलाच ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद! नंतर बऱ्याच वर्षांनी ‘टाइम’ मासिकात त्या प्रसंगाविषयी आनंदने लिहिले होते : ‘पण बुद्धिबळ हा भारतीय खेळ आहे ना? मग आपणही कधीतरी या खेळात सर्वोच्च नैपुण्य मिळवूच असे त्यावेळी वाटून गेले. कदाचित २१ व्या वर्षीचा तो तारुण्यसुलभ उद्धट आत्मविश्वास होता!’ आनंदला त्या रशियन बुद्धिबळपटूचे बोल ऐकून जे वाटले, ते त्याने कृतीतून दाखवून दिले. ती स्पर्धा आनंदने जिंकून दाखवली! बुद्धिबळ स्पर्धाचे मूल्यांकन कॅटेगरीच्या स्वरूपात केले जाते. रेगियो एमिलिया ही कॅटेगरी १८ प्रकारातली स्पर्धा होती. बुद्धिबळ इतिहासातली त्यावेळेपर्यंतची सर्वात शक्तिशाली स्पर्धा. अशा स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या आनंदने धमाल उडवून दिली. पोलुगायव्हस्की, सालॉव, बेल्यावस्की.. आणि साक्षात् तत्कालीन जगज्जेता कास्पारॉव यांना त्याने हरवून दाखवले. गुरेविच या एकमेव बुद्धिबळपटूशी तो हरला. उर्वरित डाव बरोबरीत सुटले. दहापैकी सहा गुण मिळवून आनंद जिंकला. कास्पारॉवविरुद्ध तो काळ्या मोहऱ्यांनिशी जिंकला, हे विशेष. कास्पारॉव मुळात हरायचाच नाही. त्यातही त्याच्याकडे पांढरी मोहरी असताना त्याला हरवणे जवळपास अशक्यच होते.

आनंद त्या वर्तुळात केवळ नवखाच नव्हे, तर विजोडही होता. सुटाबुटात बुद्धिबळ खेळणाऱ्यांच्या कळपात हा जीन्स-टीशर्ट आणि स्पोर्ट्स स्निकर्स घालून खेळणारा युवक वेगळा दिसायचा. क्षणार्धात आपल्या चाली रचून इतरत्र पटांवर नजर टाकण्यासाठी तो खुर्चीवरून उठून जायचा. कास्पारॉवसारख्या प्रस्थापितांना त्याचे हे सुरुवातीचे रूप थेट उद्धटपणाकडे झुकणारे वाटले. पण गडी जिंकत होता, हेही खरेच. सोव्हिएत स्कूलचे संस्कार न होताही आनंदकडे इतके तंत्र-मंत्र आले कोठून, असा प्रश्न रेगियो एमिलियाच्या निमित्ताने अनेकांना पडला होता. आणि त्याच्या भन्नाट वेगाने तर सारेच थक्क झाले. त्यातून ‘लाइटनिंग किड’ असे त्याचे नामकरण झाले. विश्वनाथन आनंद या महान बुद्धिबळपटूच्या बौद्धिक सामर्थ्यांची चुणूक जगाला दाखवणारी स्पर्धा अशीच रेगियो एमिलियाची आता ओळख बनली आहे. एखाद्या स्पर्धेने खेळाडूला ओळख देण्याऐवजी खेळाडूमुळे स्पर्धा नावाजली जाणे असा अनोखा प्रकार १९९२ च्या सुरुवातीला घडला. विश्वनाथन आनंद नावाच्या अद्भुतकथेला सुरुवात झाली. त्यामुळे रशियनांची सद्दी त्यानंतर दशकभरातच संपुष्टात आली, हा योगायोग नव्हे!

चेन्नईतल्या एका क्लबमध्ये..

६४ चौकानांच्या बुद्धिबळ खेळातला ‘ग्रँडमास्टर’ हा सर्वोच्च किताब. विश्वनाथन आनंद येत्या ११ डिसेंबरला पन्नास वर्षांचा होईल. त्याच्या जरा आधीच- म्हणजे जुलै महिन्यात भारताच्या वतीने ६४ व्या ग्रँडमास्टरची नोंद झाली. प्रिथु गुप्ता नावाच्या या ग्रँडमास्टरचा जन्मही झाला नव्हता, त्यावेळी विश्वनाथन आनंद पहिल्यांदा जगज्जेता बनला होता! विश्वनाथन आनंद १९८८ मध्ये ग्रँडमास्टर बनला. त्याच्या आधी- म्हणजे १९८७ मध्ये तो ज्युनियर बुद्धिबळ जगज्जेता बनला. तोपर्यंत भारतात थोडेफार आंतरराष्ट्रीय मास्टर होते. मग विश्वनाथन आनंद हा त्यांच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आणि सरस कसा ठरला? सोव्हिएत रशिया किंवा युरोपातील प्रशिक्षण आणि स्पर्धानुभव नसतानाही आणि क्रिकेटचं वेड वेगानं फोफावत असताना विश्वनाथन आनंद कसा काय घडत गेला, हे जाणून घेणं नक्कीच रंजक ठरेल. त्याचा जन्म तमिळनाडूत झाला आणि सुरुवातीचं बालपण चेन्नईत गेलं, हा एक महत्त्वाचा मुद्दा. बुद्धिबळाची आवड त्याला त्याच्या आईमुळे निर्माण झाली. पण त्या काळात- म्हणजे ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये सोव्हिएत रशियाने बुद्धिबळाच्या प्रसारासाठी भारतासारख्या देशांमध्ये प्रयत्न केले होते. त्याचाही फायदा आनंदला झाला. भारतातील ६४ ग्रँडमास्टरांची राज्यवार विभागणी कशी होते? ६४ पैकी २३ ग्रँडमास्टर तमिळनाडूतील आहेत. भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय मास्टर मॅन्युएल आरॉन याच राज्यातले. पहिला ग्रँडमास्टर (विश्वनाथन आनंद), पहिली महिला ग्रँडमास्टर (एस. विजयालक्ष्मी) हेही तमिळनाडूतलेच. चेन्नई आणि तमिळनाडू हे सुरुवातीपासूनच भारतीय बुद्धिबळाचे प्रमुख केंद्र बनले. याला एक तात्कालिक कारणही होते.

मॅन्युएल आरॉन १९६१ मध्ये ग्रँडमास्टर बनले. त्यांनी १९७२ मध्ये मिखाइल ताल या माजी जगज्जेत्याच्या नावे बुद्धिबळ क्लब सुरू केला. १९७२ हेच वर्ष का? तर बुद्धिबळ विश्वात या वर्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्या वर्षी सोव्हिएत रशियाचा बोरिस स्पास्की आणि अमेरिकेचा बॉबी फिशर यांच्यात जगज्जेतेपदाची बहुचर्चित लढत झाली. सोव्हिएत साम्राज्याची सगळी ताकद स्पास्कीच्या मागे होती. अमेरिकेने अशी कोणतीही ताकद फिशरच्या मागे उभी केली नव्हती. परंतु फिशर हा अमेरिकेसह पाश्चिमात्य, उदारमतवादी जगताचा प्रतिनिधी आणि स्पास्की बंदिस्त, गूढ व अन्याय्य सोव्हिएत व्यवस्थेचा प्रतिनिधी अशी अघोषित विभागणी झाली. या लढतीचे प्रतिबिंब भारतात आणि विशेषत: चेन्नईत पडले. चेन्नईत ताल चेस क्लबची स्थापना झाला. या क्लबला रशियाकडून बुद्धिबळावरील पुस्तके, पट, सोंगटय़ा, घडय़ाळे आदी सामग्री फुकटात पुरवली गेली. क्लबचे संचालक मॅन्युएल आरॉन रशियन शिकलेले होते. त्याचा फायदा झालाच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बुद्धिबळ हा त्यावेळी रशियन संस्कृतीचा अविभाज्य भाग मानला जायचा. त्याच्या प्रसारासाठी त्यावेळी सोव्हिएत सरकारकडून विशेष प्रयत्न व्हायचे. याचा फायदा झाला- चेन्नईला, ताल क्लबला आणि विश्वनाथन आनंदला! बुद्धिबळासारखा भारतीय खेळ सोव्हिएत संस्कृतीच्या प्रसाराच्या निमित्ताने भारतातच रुजविण्याचा हा अजब प्रकार होता. त्यातून विश्वनाथन आनंदच्या सुरुवातीच्या प्रवासाला सुरुवात झाली, हे तर आणखीनच अद्भुत. फिशरच्या अकल्पित विजयामुळे चेन्नईत इतर भारतीय शहरांप्रमाणेच बुद्धिबळाची लोकप्रियता वाढीस लागली होती. तोपर्यंत चेन्नईमध्ये हौशी क्लब होते. परंतु तिथं ओसरीवर बसून बुद्धिबळाचा पट मांडून खेळलं जायचं. टेबल, खुच्र्या, घडय़ाळे, प्रमाणित पट आणि मोहरी असा थाट केवळ ताल क्लबमध्येच होता. वीस रुपये महिना मेंबरशिप फी! मुंबई, कोलकाता, दिल्लीतही काही क्लब सुरू झाले होते. दिल्ली आणि कोलकातामधील क्लबांना कदाचित अधिक चांगली पुस्तके मिळाली असावीत. पण गुणवत्ता सर्वार्थानं चेन्नईत अधिक होती.

या क्लबच्या स्थापनेनंतर काही वर्षांनी आनंदही या क्लबमध्ये येऊ लागला. मॅन्युएल आरॉन बुद्धिबळावरील रशियन मासिकं वाचून तंत्रे, डावपेचांवर व्याख्याने द्यायचे. आनंद त्यांच्या जवळपास प्रत्येक व्याख्यानाला हजर राहायचा. बुद्धिबळाचं अविभाज्य अंग असलेल्या थिअरी प्रकाराशी त्याची ओळख झाली. अर्थात नुसत्या थिअरीतून भागणार नव्हते. स्पर्धानुभवही महत्त्वाचा होता. ताल क्लबमध्ये बुद्धिबळातली कोडी सोडवली जायची. त्याच्या बरोबरीने आठवडय़ाच्या अखेरीस स्पर्धाही घेतल्या जायच्या. त्या स्पर्धाचा आनंदला एक बुद्धिबळपटू म्हणून विकसित होण्यास खूपच फायदा झाला. स्पर्धा, साहित्य, थिअरीची व्याख्याने असा सगळा तो बुद्धिबळमय माहोल होता. आनंदच्या शब्दांमध्ये वर्णन करायचे झाल्यास हा क्लब म्हणजे  चेन्नईतील ‘मिनी सोव्हिएत रशिया’च होता! रेगियो एमिलियामध्ये आनंदला खिजवणाऱ्या त्या सोव्हिएत बुद्धिबळपटूला आनंदची ही पाश्र्वभूमी ठाऊक असण्याची शक्यताच नव्हती. १९८३ मध्ये १३ वर्षीय विश्वनाथन आनंदने आरॉन यांना पहिल्यांदा हरवून दाखवले. आणि पुढील पाच वर्षांमध्ये तो ग्रँडमास्टरही बनला.

फिलिपिन्सच्या एका टीव्ही स्टेशनमध्ये..

ताल क्लबच्या दिवसांमध्ये एक महत्त्वाचा कालखंड येतो. काही अडचणीचे वाटणारे योगायोग पथ्यावर पडतात, त्यातलाच हा प्रकार. आनंदचे वडील कृष्णमूर्ती विश्वनाथन भारतीय रेल्वेमध्ये कार्यकारी अभियंता होते. त्यांची एका प्रकल्पानिमित्ताने फिलिपिन्सची राजधानी मनिला इथं बदली झाली. आनंदने तोपर्यंत त्याची आई सुशीला यांच्याकडून बुद्धिबळाचे धडे गिरवायला सुरुवात केलेली होतीच. फिलिपिन्समध्येही बुद्धिबळ आणि टेनिस या खेळांमध्ये आनंदने अभ्यासाइतकेच लक्ष घालावे असा त्यांचा आग्रह होता. फिलिपिन्समध्ये बुद्धिबळासाठी पोषक वातावरण होते. कारण त्याच वर्षी- म्हणजे १९७८ मध्ये बुद्धिबळ जगज्जेतेपदाची स्पर्धा त्या देशात बॅग्वियो शहरात पार पडली होती. या खेळाच्या आकर्षणापायी अनेक उपक्रम सुरू झाले होते. बुद्धिबळाची लोकप्रियता वाढली होती. आनंदच्याही आधी युजीन टोरे हा फिलिपिनो बुद्धिबळपटू आशियातील पहिला ग्रँडमास्टर बनला, तो याच लाटेतून. आनंदचे कुटुंब जगज्जेतेपदाची ही लढत झाल्यानंतर जवळपास महिन्याभराने मनिलात पोहोचले. पण तरीही ते छोटय़ा आनंदला बॅग्वियो शहरात जगज्जेतेपदाची लढत झालेल्या रिसॉर्टमध्ये घेऊन गेले. कारपॉव-कोर्चनॉय खेळले तो प्लेइंग हॉल आनंदने पाहिला. कदाचित तो क्षण आनंदच्या कारकीर्दीला कलाटणी देणारा ठरला असावा. काही वर्षांनी याच बॅग्वियो शहरातील याच हॉलमध्ये खेळताना आनंद ज्युनियर बुद्धिबळ जगज्जेता बनला!

मनिलामध्ये टीव्हीवर बुद्धिबळावर एक कार्यक्रम व्हायचा. आनंद आणि त्याची आई हा कार्यक्रम न चुकता पाहायचे. ‘चेस टुडे’ नामक त्या कार्यक्रमात बडय़ा बुद्धिबळपटूंच्या डावांचे विश्लेषण केले जायचे. त्या विश्लेषणातून आनंद खूप काही शिकला. या कार्यक्रमाच्या शेवटी एक कोडं दिलं जायचं. त्यावेळी शाळेमुळे आनंदला तो कार्यक्रम थेट पाहता यायचा नाही. अशा वेळी आनंदच्या आई सगळ्या चाली कागदावर उतरवून काढायच्या आणि आनंद शाळेतून घरी आल्यानंतर (आणि त्याने गृहपाठ पूर्ण केल्यानंतर!) त्याच्याकडे तो कागद सोपवायच्या. आनंद ते सगळे डाव खेळून काढायचा. मग कोडय़ाकडे वळायचा. आणि प्रत्येक वेळी ते पूर्ण सोडवायचाच! सुशीला विश्वनाथन ते सोडवलेले कोडे टीव्ही स्टेशनकडे पाठवून द्यायच्या. दुसऱ्या दिवशी नवीन कोडे देण्याआधी आदल्या दिवशीच्या कोडय़ाचे उत्तर आणि ते सोडवणारा विजेता जाहीर व्हायचा. विजेत्याला बक्षीसरूपात बुद्धिबळावरील एक पुस्तक दिले जाई. अनेकदा नव्हे, बहुतेकदा नव्हे, तर दर वेळी आनंदच जिंकायचा! त्यामुळे संयोजकांची पंचाईत होऊ लागली. स्पध्रेतील इतरांचा रस संपेल की काय अशी भीती त्यांना वाटली. आनंदकडे पुस्तकांचा ढीग जमा झाला होता. एक दिवस टीव्ही स्टेशनकडून आनंदला रीतसर पाचारण करण्यात आले. तेथील ग्रंथालयात आनंदला नेण्यात आले. आणि पाहिजे तितकी पुस्तके फुकट घेऊन जा, असे सांगण्यात आले. आणि शेवटी एक प्रेमळ अट घालण्यात आली. पुन्हा कोडे सोडवण्याच्या फंदात न पडण्याची! जेणेकरून इतरांनाही कोडं जिंकण्याची संधी मिळेल.

स्पॅनिश ‘माय-बाप’ नि जर्मन मित्र..

मॉरिसियो आणि निवेस पेरेआ हे स्पॅनिश दाम्पत्य. १९७८ मध्ये स्पेनचा हुकूमशहा फ्रान्सिस्को फ्रँको जमिनीखाली सहा फूट चिरंतन विसावला तेव्हा तो शुभशकून मानून मॉरिसियो काका सपत्नीक मायदेशी परतले. बचतीतले डॉलर वापरून आपण फुटबॉल पाहायचं नि बुद्धिबळ खेळायचं अशी त्यांची निवृत्तीपश्चात साधी योजना होती. त्याकाळी स्पेनमध्ये एक प्रतिष्ठित बुद्धिबळ स्पर्धा सुरू झाली होती. लुई रेंटेरो नामक एक धनाढय़, परंतु तऱ्हेवाईक गृहस्थ तिचा प्रवर्तक होता. या लिनारेस स्पर्धेला पुढे बरीच र्वष बुद्धिबळातली विम्बल्डन स्पर्धा असे संबोधले गेले. या स्पध्रेच्या संयोजनात पेरेआ दाम्पत्य उत्साहाने सहभागी व्हायचं. त्यांनी १९९१ मध्ये सोव्हिएत मक्तेदारीशी टक्कर घेणऱ्या विश्वनाथन आनंद तथा ‘विशी’ नामक एका भारतीय बुद्धिबळपटूचं नाव ऐकलं. हा बुद्धिबळपटू कोणत्याही सोव्हिएत अकॅडमीत शिकलेला नव्हता. त्याच्याबरोबर प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक किंवा सहाय्यक असा कुणीही नव्हता. तो एकटाच स्पर्धामध्ये सहभागी व्हायचा. रेगियो एमिलियानंतर आनंदची कीर्ती युरोपातील बुद्धिबळाच्या दर्दीमध्ये पसरली होती. त्याच्याविषयी विलक्षण कुतूहल वाटणाऱ्यांपकी पेरेआ दाम्पत्यही होतं. या कुतूहलाचं प्रमुख कारण होतं- विश्वनाथन आनंदचा चाली रचण्याचा थक्क करणारा आणि काही वेळा चिंताजनक वाटणारा वेग! समोरच्या प्रतिस्पध्र्याची, त्याच्या रेटिंगची किंवा मातब्बरीची कोणतीही पत्रास न बाळगता आनंद खेळायचा. आपली चाल खेळून झाली की उठून जायचा. पुन्हा यायचा. एखादी मोहर हलवून गडी पुन्हा पसार. आनंदचं पहिलं रूप पेरेआ दाम्पत्याच्या हृदयात बेचैनी निर्माण करून गेलं. बॅगी जीन्स, स्पोर्ट्स शूज आणि कानाला वॉकमन! वॉकमनवर सतत क्रॅनबेरीज किंवा पेट शॉप बॉइज ढणढणत असायचं. दोन्ही हात पँटच्या खिशांमध्ये. तोपर्यंत मुख्य प्रवाहातील आणि मुख्य स्पर्धामध्ये त्यांनी अशा प्रकारचा बुद्धिबळपटू पाहिला नव्हता. गांभीर्य त्याच्या ठायी आहे की नाही, अशी शंका यावी असं हे ध्यान. त्या दिवशी आनंद अलेक्झांडर बेल्यावस्कीविरुद्ध खेळला. १६ मिनिटांत डाव संपला. म्हणजे बेल्यावस्की त्याच्या पटाजवळ दीडेक तास बसला असेल; पण आनंदच्या साऱ्या चाली १६ मिनिटांत आटोपल्या. आणि तरीही आनंद जिंकला. त्याच्या चाली झटपटही होत्या आणि तेवढय़ाच अचूकही होत्या. ‘थोडा विचारही करत जा चाली करण्यापूर्वी. तू आता मोठा झालायस..’ असं त्याला सांगून पाहिलं गेलं. त्या रात्री पेरेआ दाम्पत्य आनंदला एका रेस्तराँमध्ये जेवायला घेऊन गेले. तिथं मॉरिसियोंनी पोक्त सल्ला देऊन पाहिला, ‘आज जिंकलास. पण उद्या सामना कारपॉवशी आहे. जरा सावकाश खेळ पोरा. १६ मिनिटांत चाली संपवायचा प्रयत्न करू नकोस.’ आनंदचं उत्तर- ‘ठीकाय. १७ मिनिटं खेळतो!’ निवेसकाकूंनी सांगून पाहिलं, ‘उद्या कारपॉवला हरवून दाखव. माझ्यासाठी!’

‘तसं झालं तर मीच तुम्हाला शहरातल्या सर्वोत्तम चायनीज रेस्तराँमध्ये घेऊन जाणार..’ असं आनंदने तिथल्या तिथं जाहीर केलं. दुसऱ्या दिवशी आनंदनं कारपॉवला खरंच हरवलं. डाव संपवून तो धावतच निवेसपाशी आला नि म्हणाला, ‘चला जाऊ या.’ त्या दिवसापासून आनंद त्यांच्यासाठी अपत्यासमान ठरला. आणि पेरेआ दाम्पत्य म्हणजे आनंदसाठी दुसरे आई-वडील!

नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला आनंदनं काही मोठय़ा स्पर्धा जिंकल्यामुळे त्याला वारंवार युरोपातील स्पर्धाची निमंत्रणं मिळू लागली होती. दरवेळी भारतातून युरोपात जायचं तर पसाही खर्च व्हायचा नि अनेकदा व्हिसाचा प्रश्नही उपस्थित व्हायचा. आनंदची ही ओढाताण पेरेआ दाम्पत्यानं जाणली आणि त्याच्यासमोर प्रस्ताव ठेवला, की तू स्पेनमध्ये आमच्या घरी राहा. १९९२ मध्ये आनंदची एक लढत इव्हानचुकबरोबर होती. त्या लढतीसाठी आनंद आणि त्याचा अमेरिकी सहायक पेरेआ दाम्पत्याकडे राहिले. आनंदने त्यांचा प्रस्ताव फार मनावर घेतला नव्हता.

पण १९९४ मध्ये जगज्जेतेपदासाठी आव्हानवीर ठरवण्यासाठीच्या स्पध्रेत आनंदला अमेरिकेच्या गाटा कामस्कीकडून पराभव पत्करावा लागला. हा साधारण पराभव नव्हता. ही लढत झाली हैदराबादजवळील संघीनगर येथे- म्हणजे भारतात. या लढतीत आनंद सुरुवातीपासून आघाडीवर होता. जवळपास जिंकण्याच्या स्थितीमध्ये होता. पण कामस्कीने पिछाडीवरून येऊन बाजी उलटवली. हा पराभव आनंदच्या जिव्हारी लागला. अधिक खोलात विचार करता असं लक्षात आलं, की स्पध्रेदरम्यान आनंदला अनेक जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावावी लागली. त्यामुळे त्याच्या तयारीवर विपरीत परिणाम झाला. त्याच्या जागी एखादा रशियन वा युरोपियन खेळाडू असता तर तऱ्हेवाईकपणा किंवा तिरसटपणा या ‘सद्गुणां’च्या आधारे निमंत्रणं नाकारता आली असती. पण आनंदचा स्वभाव तसा नव्हता. त्या पराभवाचा आनंदपेक्षाही अधिक खोल परिणाम पेरेआ दाम्पत्यावर झाला. सहा महिन्यांनी गॅरी कास्पारॉवने स्थापलेल्या बंडखोर संघटनेंतर्गत झालेल्या आणखी एका स्पध्रेत त्याच कामस्कीला आनंदनं लीलया हरवून दाखवलं. ही स्पर्धा झाली स्पेनमधील लास पामास गावात. त्यावेळी आनंद पेरेआ दाम्पत्याच्या घरी राहिला आणि पत्रकार परिषदेव्यतिरिक्त त्यांनी आनंदला कोणाशीही संपर्क ठेवू दिला नाही. स्पध्रेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मॉरिसियो यांनी आनंदच्या समक्ष भारतीय संयोजकांना टोला लगावला, ‘आनंदला आम्ही त्याचा अवकाश (स्पेस) मिळवून दिला. आपल्या चॅम्पियन खेळाडूंना आपणच जपायचं असतं!’

पेरेआ यांच्याच आग्रहाखातर आनंदला एलिझबार उबिलावा यांच्या रूपाने एक कायमस्वरूपी सहायक (सेकंड) मिळाला. उबिलावा मूळचे जार्जियन; पण स्पेनमध्ये स्थलांतरित झाले होते. त्यांच्या मदतीचा आनंदला खूप फायदा झाला. आनंदला युरोपमध्ये हक्काचं घर मिळालं आणि मदतनीसही मिळाला. उबिलावा १९९४ ते २००५ या काळात आनंदचे सेकंड होते. खेळात व्यावसायिक चौकट आणि शिस्त ही फार महत्त्वाची बाब असते. ती शिस्त, चौकट व दिशा पेरेआ दाम्पत्यामुळे आनंदला लाभली. पुढे बरीच र्वष, वर्षांतील सहा-सात महिने आनंद त्यांच्याकडे राहायचा. चार-पाच महिने चेन्नईला परतायचा. आज हे रूटिन संपुष्टात आलंय. गेली काही र्वष आनंद केवळ स्पर्धा खेळण्यासाठी परदेशात जातो. बाकीचा काळ चेन्नईत असतो. आता स्पर्धा मर्यादित झाल्या आहेत आणि आनंदला आर्थिक स्थर्य लाभल्यामुळे युरोपात मुक्काम ठोकण्याची गरजही उरलेली नाही. तरी पेरेआ दाम्पत्याचं योगदान आनंदच्या घडणीत अनन्यसाधारण आहे. २००४ मध्ये निवेस निवर्तल्या. पण मॉरिसियोंशी आजही आनंद संपर्कात असतो. त्यानं थोडं सावकाश खेळावं, असं ते अजूनही बजावत राहतात.

फ्रेडरिक फ्रिडेल! मु. पो. हँबर्ग, जर्मनी. वावर जगभर. हे बुद्धिबळपटू नाहीत. पण बुद्धिबळात यांचं योगदान कदाचित उत्तमोत्तम बुद्धिबळपटूंपेक्षा कितीतरी अधिक. ‘डेटा इज गोल्ड’ वगरे म्हटलं जाण्याच्या कित्येक वर्षे आधी ‘चेसबेस’ नामक डेटाबेस करण्याच्या इच्छेने फ्रिडेलना झपाटून टाकलं. एका फ्लॉपी-डिस्कपासून चिपपर्यंत ‘चेसबेस’चा प्रवास ही एक स्वतंत्र कहाणी आहे. हजारो नव्हे, तर लाखो डाव, विश्लेषणे, शक्याशक्यता यांची शिबंदी ‘चेसबेस’नं बुद्धिबळपटूंपर्यंत आणली. आज ‘चेसबेस’ म्हणजे डेटाबेसपासून बुद्धिबळ न्यूज पोर्टलपर्यंत सारं काही आहे. पण हे सारं उभं करण्यासाठी फ्रिडेलना अर्थातच बुद्धिबळपटूंची- त्यातही अव्वल बुद्धिबळपटूंची मदत लागणार होती. तशी ती मिळालीदेखील. ऐंशीच्या दशकात सुरुवातीला इंग्लंडचा नायजेल शॉर्ट आणि नंतर जगज्जेता गॅरी कास्पारॉव यांच्याकडून मदत आणि अभिप्राय मिळत गेला. आज जवळपास प्रत्येक जगज्जेता फ्रिडेल यांच्या हँबर्गमधील गेस्टरूममध्ये राहून गेलेला आहे. पण त्यांची विश्वनाथन आनंदबरोबरची पहिली भेट आणि नंतरचे मत्र यांची कथा खाशी आहे. आनंद १९८६ मध्ये लंडनमध्ये एक स्पर्धा खेळण्यासाठी गेला होता. फ्रिडेलही तिथं होते. डेटाबेस तयार करणं, काही डॉक्युमेंटरीज् बनवणं वगरे सुरू होतं. कोणीतरी आनंदची फ्रिडेलशी भेट घालून दिली.

त्यांच्यातला हा संवाद :

कुठला तू?

भारत. मद्रास.

रेटिंग किती?

रेटिंग २५००.

काय? इतकी र्वष कुठे होतास? नाव काय?

मी विशी आनंद.

विशी आनंद?

फ्रिडेल यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना कळलं की, आनंद दोन आठवडय़ांनी आणखी एका स्पध्रेत खेळणार आहे.

मग काय भारतात जाऊन परत येणार?

नाही. परवडत नाही. इथंच राहणार.

इथं कुठे? एखाद्या थर्ड क्लास हॉटेलमध्ये?

नाही. नाही. फोर्थ क्लास हॉटेलमध्ये!

आनंदचा तो हजरजबाबीपणा आणि एकंदरीतच चातुर्यामुळे फ्रिडेल प्रभावित झाले. ‘युरोपात स्पर्धा खेळायची असेल तेव्हा हँबर्गला माझ्याकडे ये,’ असं त्यांनी सांगून टाकलं. दोन महिन्यांनी आनंदने फोनवरून विचारलं, की येऊ का राहायला? फ्रिडेल आनंदानं राजी झाले. आनंद हँबर्गला त्यांच्या घरी गेला. फ्रिडेलच्या पत्नीने विचारले, ‘आणखी एक बुद्धिबळपटू? हा इथं एक आठवडा राहणार? सगळं ठीक होईल ना?’

आनंद फ्रिडेल यांची पत्नी आणि दोन मुलगे यांच्यासमवेत अक्षरश: तासभर तिथे होता. आणि त्यांनी जाहीर केलं- ‘हा आमच्यासोबत कितीही दिवस राहू शकतो!’

त्या संध्याकाळी आणखी एक पेच. आनंदनं जाहीर केलं, की तो शाकाहारी आहे. मासेपण खात नाही. अंडीही खात नाही. फ्रिडेल म्हणाले, ‘बागेत जाऊन काहीतरी खाऊन ये!’ पण आनंदला खाऊ घालणं गरजेचं होतं. फ्रिडेल दाम्पत्यानं दुसऱ्याच दिवशी काही दाक्षिणात्य रेसिपीज् मागवल्या. त्या दिवसापासून आजतागायत फ्रिडेल कुटुंब दाक्षिणात्य पदार्थाचे आणि मसाल्यांचे भक्त बनले आहेत. आनंदला फ्रिडेल यांनी मोठय़ा विश्वासानं डेटाबेस वापरू दिला. त्यामुळे सगळीकडे जाडजूड बाडं घेऊन तयारी करण्याचे दिवस आनंदसाठी तरी संपुष्टात येऊ लागले होते. एक दिवस फ्रिडेलच्या घरी असताना आनंदने सांगितलं की, या डेटाबेसमध्ये काही चुका आहेत. फ्रिडेल म्हणाले की, शक्य आहे. अजून तो संपादित व्हायचाय. तू फक्त कागदावर लिहून ठेव- कोणत्या चुका आहेत ते. आनंद तिथल्या तिथं सांगू लागला, १०० व्या पानावर ही चूक. २७३ व्या पानावर ही नोटेशन चुकलीय. ३०० व्या पानावर आणखी काहीतरी. त्याच्या अफलातून स्मरणशक्तीचा अनुभव त्या दिवशी फ्रिडेलना आला. त्यांचं नातं परस्परविश्वासाचं आणि प्रेमाचं होतं. गॅरी कास्पारॉवच्या बरोबरीनं आनंदला डेटाबेसमधील प्राचीनतम डावही अभ्यासता येऊ लागले. हा फायदा युरोपमध्ये आणि फ्रिडेल यांच्या घरी राहण्याचा होता.

बुद्धिबळ व्यवस्था वि. विश्वनाथन आनंद

प्रत्येक व्यक्तीला कुटुंबीयांची साथ आयुष्याच्या हरएक वाटेवर मिळतेच. आनंदच्या वाटचालीत त्याची आई सुशीला आणि पत्नी अरुणा यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पण कुटुंबापलीकडेही काहीजण भेटावे लागतात. काही गोष्टी घडून याव्या लागतात. आनंदच्या बाबतीत चेन्नई, फिलिपिन्स, स्पेन, जर्मनी येथील वास्तव्य अत्यंत महत्त्वाचं ठरलं. त्याचबरोबर पेरेआ दाम्पत्य किंवा फ्रेडरिक फ्रिडेल त्याला न भेटते तर कदाचित आजचा आनंद जसा आहे तसा तो घडला नसता. तरीही कारकीर्दीतली मुख्य लढाई स्वतच लढायची असते. आनंद हा सोव्हिएत व्यवस्थेच्या चौकटीबाहेरचा होता. तो काही त्या व्यवस्थेशी टक्कर घेण्यासाठी निघालेला नव्हता. पण बुद्धिबळात उत्तम काहीतरी करून दाखवण्यासाठी त्याला टक्कर ही घ्यावीच लागणार होती. १९९२ मध्ये तो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ क्षितिजावर झळकला. त्यावेळेपर्यंत त्याची ख्याती केवळ एक चांगला बुद्धिबळपटू म्हणून होती. रेगियो एमिलियानंतर तो धोकादायक बुद्धिबळपटू बनला. धोकादायक.. प्रस्थापित रशियनांसाठी. बॉबी फिशरनंतर प्रथमच सोव्हिएत मक्तेदारीला आव्हान देणारा कोणी उभा राहिला होता. इंग्लंडचा नायजेल शॉर्ट- जो १९९३ मध्ये कास्पारॉवचा आव्हानवीर होता किंवा अमेरिकेचा गाटा कामस्की- जो नंतर कारपॉवचा आव्हानवीर ठरला, ही अशी मोजकीच उदाहरणं. पण शॉर्ट नंतर फार टिकला नाही, किंवा त्याच्या उमेदीच्या काळातही कारपॉवला हरवण्यापलीकडे त्याची मजल गेली नाही. कामस्की हा तर मूळचा सोव्हिएत कुळातलाच. कास्पारॉवला आनंदने हरवल्यापासून त्याचा पाणउतारा करण्याची एकही संधी तो सोडत नसे. याच कास्पारॉवला त्याच्या बंडखोर संघटनेची प्रतिष्ठा जपण्यासाठी सर्वाधिक गरज आनंदचीच भासायची. १९९३ मध्ये बुद्धिबळ विश्वात उभी फूट पडली. कास्पारॉव आणि त्याचे मित्र एकीकडे आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना (फिडे) आणि तिचे समर्थक दुसरीकडे. १९९५ मध्ये न्यूयॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवरमध्ये १०८ व्या मजल्यावर पीसीए या कास्पारॉवच्या बंडखोर संघटनेंतर्गत जगज्जेतेपदाची लढत आनंद आणि कास्पारॉव यांच्यात झाली. पहिले आठ डाव बरोबरीत सुटले; जो त्यावेळी एक विक्रम होता. नवव्या डावात आनंदने कास्पारॉवला हरवलं. दहाव्या डावात कास्पारॉवनं रौद्रावतार धारण केला. घडय़ाळ जोरात आपटणं, सोंगटय़ा आपटून पटावर ठेवणं, लढतीच्या कक्षात येता-जाताना दार मुद्दामहून जोराने लावणं असले बालिश प्रकार कास्पारॉवनं केले. विचलित झालेल्या आनंदनं तो डाव गमावला. पुढील आणखी तीन डाव गमावले. ती लढतही गमावली. पुढची अनेक र्वष कास्पारॉव हा धागा पकडून आनंदच्या तथाकथित कमकुवत मानसिकतेबद्दल बोलत राहायचा. आनंदने याबद्दल फारच क्वचित मत व्यक्त केलं असेल.

कारपॉवला कास्पारॉवच्या अनुपस्थितीचा आणि कामस्की-आनंद यांच्या नवखेपणाचा फायदा मिळाला. १९९३ पासून जनमानसात नाही तरी कागदावर तो पुन्हा जगज्जेता बनला. तेही अधिकृतपणे. १९९८ मध्ये त्याला पुन्हा एकदा आव्हान देण्याची संधी आनंदला मिळाली. परंतु तोपर्यंत विविध प्रतिस्पध्र्याशी खेळून झाल्यामुळे आनंद थकलेला होता. याउलट, कारपॉवला मात्र सर्वाच्या इच्छेविरुद्ध आणि सार्वत्रिक शहाणपणाला झुगारून थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला. ‘शवपेटीतून मी कारपॉवशी खेळायला गेलो नि हरलो,’ असं आनंद नंतर उद्वेगाने म्हणाला.

नव्वदच्या दशकात कास्पारॉव, कारपॉव, कामस्की यांच्या जोडीला क्रॅमनिकही आला. त्याबरोबरीनं इव्हानचुक, गेलफँड होते. लाटव्हियाचा अलेक्सी शिरॉव, बल्गेरियाचा व्हेसेलिन टोपालोव हेही चमकू लागले होते. या सगळ्यांशी बिगर-युरोपिय, बिगर-श्व्ोतवर्णीय आनंदला टक्कर घ्यावी लागायची. पण तो पहिल्या पाचाबाहेर कधी पडला नाही.

२००० पासून फिडेने प्रदीर्घ लढतींऐवजी नॉकआउट स्वरूपात जगज्जेतेपद स्पर्धा भरवण्यास सुरुवात केली होती. ती पहिल्यांदा आनंदनं जिंकली. ते जगज्जेतेपद साजरं कराव असं आनंदलाही वाटलं नाही. कारण कास्पारॉव त्या वर्तुळाबाहेर होता. त्याचे काही साथीदार- उदा. शॉर्ट किंवा क्रॅमनिक हेही त्याच्याबरोबर होते. पण २००२ मध्ये कास्पारॉवला त्याच्याच पठ्ठय़ानं- क्रॅमनिकनं जगज्जेतेपदाच्या लढतीत हरवून दाखवलं. तो चमत्कार होता. आणि निव्वळ क्रॅमनिक रशियन असल्यामुळे कास्पारॉवला तो पराभव थोडा सहन झाला. कास्पारॉव अशा प्रकारे पराभूत झाल्यानंतर आणि २००३ मध्ये निवृत्त झाल्यानंतर फिडेला एकत्रिकरणाचे वेध लागले. यानंतर २००५ आणि २००७ अशा वेगवेगळ्या वर्षी जगज्जेतेपदाच्या लढती झाल्या- राउंडरॉबिन स्वरूपात. प्रत्येक वेळी आनंदचा अभिप्रायही विचारात घेतला गेला नाही किंवा त्यानं तक्रारही केली नाही. एव्हाना फिडेची सूत्रं किर्सन इल्युमझानॉव या रशियन व्यक्तीकडे आली होती. क्रॅमनिकला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. त्यांच्या दुर्दैवाने २००५ मध्ये टोपालोवनं आणि २००७ मध्ये आनंदनं जगज्जेतेपद मिळवून वादातीत जगज्जेते अशी पावतीही मिळवली. अखेर २००८ मध्ये क्रॅमनिक आणि आनंद यांच्यात एकत्रिकरणासाठी जगज्जेतेपदाची लढत होईल, असा अजब फतवा निघाला. विशेष म्हणजे २००७ मधील स्पध्रेत क्रॅमनिकला खेळू दिले गेले, तो हरला, तरी २००८ मध्ये पुन्हा संधी मिळेल, या अटीवर क्रॅमनिक संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर राहिला. आनंद जिंकला, जगज्जेता बनला. तरीदेखील २००८ मध्ये क्रॅमनिक पुन्हा थेट आव्हानवीर! त्या लढतीत आनंदनं त्याच्या कारकीर्दीतील आजवरचा सर्वोत्तम खेळ केला असं म्हणावं लागेल. कास्पारॉवला हरवण्याचा चमत्कार करणारा क्रॅमनिक आनंदच्या तावडीत सापडला. तुल्यबळ मानल्या गेलेल्या (कास्पारॉवच्या मते, क्रॅमनिकचं पारडं जड होतं. कारण- आनंदची कमकुवत मानसिकता!) या लढतीचा निकाल विलक्षण एकतर्फी ठरला. त्या लढतीनंतर उर्वरित बुद्धिबळ समुदायानं- म्हणजे रशियन मंडळी आणि विशेषत: कास्पारॉवनं आनंदचं महानपण मान्य केलं. त्या लढतीनंतर कोणाच्याही मनात आनंदच्या गुणवत्तेबद्दल किंतु राहिला नाही. ‘आनंदनं क्रॅमनिकच्या डोळ्यांत वाळू उडवली आणि त्याला जागं केलं,’ असं या लढतीचं वर्णन खुद्द कास्पारॉवनं केलं. अमेरिका आणि पश्चिम तसेच उत्तर युरोपातील बुद्धिबळपटू आणि बुद्धिबळप्रेमी, इतकंच नव्हे तर माध्यमांनीही आनंदचं कौतुक केलं. त्या विजयाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे रशियन जगज्जेता त्यानंतर आजतागायत दुसरा कुणी झालेला नाही.

तरीही २०१० मध्ये आनंदचा आव्हानवीर ठरवताना फिडेनं शहाणपणापेक्षा मनमर्जी दाखवली. काहीतरी विचित्र तर्कटं लढवून आनंदचा आव्हानवीर ठरवण्यासाठी विश्वचषक विजेता वि. व्हेसेलिन टोपालोव अशी लढत ठेवली गेली. एकत्रिकरणाच्या प्रक्रियेअंतर्गत २००६ मध्ये त्यावेळचा फिडे जगज्जेता बल्गेरियाचा टोपालोव आणि बंडखोर जगज्जेता क्रॅमनिक यांच्यात एक लढत झाली. तीत क्रॅमनिक जिंकला. म्हणून २००८ मध्ये तो थेट आव्हानवीर ठरला. म्हणजे २००७ मधील स्पर्धा जगज्जेता ठरवण्यासाठी झाली, तरी त्या जगज्जेत्यासाठी पुढील आव्हानवीर क्रॅमनिकच्या रूपात आधीच तयार होता! टोपालोव २००६ मध्ये हरला, तरी २०१० मध्ये आनंदचा आव्हानवीर ठरवण्यासाठी त्याला थेट अंतिम फेरीत प्रवेश. क्रॅमनिक आणि टोपालोव यांच्यावर इतकी मेहेरबानी करण्याचे हे प्रकार अक्षरश: विनोदी होते. रशियन आणि बल्गेरियन बुद्धिबळ संघटनांनी आपापल्या बुद्धिबळपटूंमागे वाट्टेल तितकी ताकद लावून ते विजयी ठरावेत यासाठी जंग जंग पछाडले. आनंदच्या मागे भारतीय बुद्धिबळ संघटनेनं काहीच जोर लावला नाही. कारण आनंदने तशी मागणीच कधी केली नाही. त्या काळातील मुलाखतींमध्ये आनंद स्वतचं परखड मत नेहमीच व्यक्त करायचा. मात्र, कोणत्याही लढतीपासून, आव्हानापासून त्यानं स्वतला कधीही दूर ठेवलं नाही. २०१० मध्ये जगज्जेतेपदाची लढत बल्गेरियाला बहाल करण्यात आली. यजमान असल्याचा शक्य तितका फायदा उपटण्याचा प्रयत्न व्हेसेलिन टोपालोवनं केला.

एप्रिल महिन्यात बल्गेरियाची राजधानी सोफियात झालेल्या या लढतीसाठी आनंद, त्याची पत्नी अरुणा आणि त्यांच्या सहायकांनी फ्रँकफर्ट-सोफिया विमान घेण्याचे ठरवले. पण त्याच काळात ‘आयलाफ्यालालोकुल’ अशा भीषण नावाचा तितकाच भीषण ज्वालामुखी उफाळल्यामुळे आणि त्यातून उठलेल्या राखेच्या ढगामुळे युरोपात विमानसेवेची दाणादाण उडाली. शेकडो उड्डाणं रद्द झाली. आनंदच्या टीमनं संयोजकांना लढत तीन दिवस पुढे ढकलण्याची विनंती केली, जी अमान्य झाली. लक्षात घ्या, आनंद त्यावेळी जगज्जेता होता. टोपलोव आव्हानवीर. तरीही आनंदच्या विनंतीला फिडे किंवा बल्गेरियन संघटना यांच्यापैकी कोणीही किंमत दिली नाही. लढतीच्या ठिकाणी पोहोचायचं कसं, हा आनंदसमोर मोठा पेच होता. तो सोडवण्याचा कोणताही प्रयत्न फिडे किंवा बल्गेरियन संघटनेनं केला नाही. फार तर एक दिवस लढतीचा कार्यक्रम पुढे ढकलला जाईल, त्यापलीकडे नाही, असं त्याला सांगण्यात आलं. अखेरीस आनंद आणि त्याचे सहकारी एक एसयूव्ही भाडय़ानं घेऊन चार देश ओलांडून बल्गेरियात पोहोचले. या ४० तासांच्या प्रवासात आनंद मागील सीटवर बसून त्याच्या लॅपटॉपवर डावपेचांची आखणी करत होता! या लढतीत टोपालोवच्या मदतीला होते- बल्गेरियन संरक्षण खाते आणि सोफिया विद्यापीठानं विकसित केलेला एक सुपर कम्प्युटर. सहसा असा शक्तिशाली कम्प्युटर किंवा सॉफ्टवेअर दोन्ही प्रतिस्पध्र्यासाठी उपलब्ध असावे, हा साधा संकेत आहे. पण आनंदला हा कम्प्युटर उपलब्ध करून देण्यात आला नाही. यावर आनंदने काय करावं? त्याने सहायकांबरोबरच आजी-माजी बुद्धिबळपटूंची मदत घेतली. व्लादिमीर क्रॅमनिक, मॅग्नस कार्लसन आणि साक्षात गॅरी कास्पारॉव! एक चक्र पूर्ण झालं होतं. आनंदने ते फिरवलं होतं. स्काइपवरून आनंदला काही सल्ले, कानमंत्र कास्पारॉवनंही दिले. टोपालोवच्या सुपर कम्प्युटरविरुद्ध आनंदनं ‘ह्य़ुमन क्लस्टर’ वापरून दाखवलं! पुढे २०१२ मध्येही जगज्जेतेपदाच्या लढतीत आनंदनं बोरिस गेलफँडला हरवलं.

याच काळात विद्यमान जगज्जेता मॅग्नस कार्लसनचा उदय होऊ लागला होता. तो मिलेनियल पिढीचा प्रतिनिधी. नवीन सहस्रकाच्या पहिल्या दशकाअखेर अद्ययावत झालेली बुद्धिबळ सॉफ्टवेअर्स लीलया हाताळणारा बुद्धिबळपटू. हल्ली जगज्जेतेपदाच्या लढती याच्याच पिढीतील बुद्धिबळपटूंमध्ये होतात. आनंदला कार्लसनने २०१३ आणि २०१४ अशी पाठोपाठची र्वष हरवून दाखवलं. कार्लसननं पूर्वी आनंदला मदत केली होती. माँटी पायथन हे कार्टून पात्र हा दोघांच्या समान आवडीचा विषय. काही वर्षांपूर्वी गॅरी कास्पारॉवनं स्वतहून कार्लसनला कोचिंगही दिलं होतं. कार्लसन आनंदला भारी पडू लागला, याची काही कारणं आहेत. आनंद यंदा डिसेंबरमध्ये ५० वर्षांचा होईल. कार्लसन भरात आला, त्यावेळी आनंदनं चाळीशी ओलांडली होती. तरुण बुद्धिबळपटूंसारखी ऊर्जा, स्मरणशक्ती, इच्छाशक्ती, चिकाटी वयपरत्वे कमी होत जाते. पण आणखी एक घटकही निर्णायक होता. २००५ पर्यंत एलिझबार उबिलावा आनंदचे सहायक होते. २००५ पासून ही जबाबदारी स्वीकारली पीटर हायने नील्सन यानं. हा डेन्मार्कचा ग्रँडमास्टर. आनंदचा मित्र. त्यानं सहायकाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. २००७, २००८, २०१०, २०१२ या वर्षी आनंदनं जगज्जेतेपद पटकावलं, यात नील्सनचा वाटाही मोठा होता. पण हा नील्सन २०१३ मधील लढतीपूर्वी कार्लसनला जाऊन मिळाला! कार्लसन नॉर्वेचा, नील्सन डेन्मार्कचा. त्यामुळे हे स्कँडेनेव्हियन भ्रातृभावामुळेही घडलं असेल. नील्सनचा निर्णय आनंदनं मोकळेपणानं स्वीकारला. वास्तविक किमान वर्षभर तरी नील्सननं थांबायला हवं होतं. तसं झालं नाही. नील्सनच्या जाण्याचा मोठा फटका आनंदला नक्कीच बसला. कारण आनंदच्या सर्व सहायकांमध्ये समन्वयकाची महत्त्वाची भूमिका नील्सन पार पाडायचा. आनंदला नंतर कायमस्वरूपी सहायक असा मिळालेला नाही.

अजुनि खेळतो आनंदापुरता…

नॉकआउट, राउंड रॉबिन आणि दीर्घ लढत अशा तिन्ही प्रकारांतील जगज्जेतेपदांच्या लढती खेळून जिंकलेला एकमेव बुद्धिबळपटू, गेली २८ र्वष पहिल्या दहात किंवा बारांत राहिलेला बुद्धिबळपटू, लिनारेस, कोरस किंवा विक आन झी आणि डॉर्टमुंड या तिन्ही महत्त्वाच्या स्पर्धा जिंकलेला बुद्धिबळपटू, पन्नाशीला स्पर्शूनही त्याच्यापेक्षा अध्र्या वयाच्या बहुतेक बुद्धिबळपटूंशी टक्कर देणारा बुद्धिबळपटू, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, चेस ऑस्कर असे विविध पुरस्कार गेली ३४ र्वष आनंदला मिळाले आहेत. पारंपरिक बुद्धिबळातील जगज्जेतेपदाबरोबरच जलद (रॅपिड) आणि अतिजलद (ब्लिट्झ) जगज्जेतेपदंही त्यानं मिळवली आहेत. फिलिपिन्स ते अमेरिका आणि नॉर्वे ते अर्जेटिना अशा विस्तीर्ण जगात त्यानं मुशाफिरी केली आहे. तरीदेखील त्याची खेळाची आवड किंचितही कमी झालेली नाही. त्यानं बुद्धिबळात कमावण्यासारखं, मिळवण्यासारखं आता काहीही राहिलेलं नाही. तरीदेखील पुढील जगज्जेतेपदाच्या लढतीकडे तो डोळे लावून आहे. निवृत्त कधी होणार, असा प्रश्न भारतात त्याला आजही विचारतात. हा प्रश्न त्याच्यासाठी सर्वाधिक वैतागवाणा असतो. बुद्धिबळ आवडतं तोपर्यंत खेळणार, आवडेनासं झालं की थांबवणार. पण आवडेनासं कधी होईल, असं वाटत नाही, इतकंच आनंद सांगतो. भारतातील निष्णात बुद्धिबळपटूंच्या युवा ब्रिगेडला तो हल्ली मार्गदर्शन करतोय. त्याचे जगभर मित्र आहेत. हल्ली वयामुळे त्याची स्मरणशक्ती, डावपेच क्षमता तितकीशी तीक्ष्ण राहिलेली नाही. पण तरीही जगात पहिल्या दहांत तो आहे. त्याच्यानंतर आलेला क्रॅमनिक जाहीररीत्या निवृत्त झाला. शॉर्ट, कामस्की, गेलफँड, इव्हानचुक अधूनमधून खेळतात. टोपालोव, शिरॉव, लेको खेळतात, पण त्यांचं रेटिंग घसरलं आहे. कास्पारॉव केवळ अमेरिकेत थोडंफार खेळतो. आनंदसमोर आता तिसरी पिढी खेळतेय. प्रज्ञानंद, निहाल सरीन यांना धरल्यास चौथी पिढी. मॅग्नस कार्लसन आता पूर्वीसारखा आनंदचा मित्र राहिलेला नाही. पण तरीही अगदी अलीकडे तो आनंदविषयी म्हणाला होता, ‘आनंद हा असा बुद्धिबळपटू आहे, ज्याच्याशी खेळून नव्हे, तर बोलून तो किती महान आहे, हे कळतं!’ ऑगस्टमध्ये अमेरिकेत संपलेल्या एका स्पर्धेत आनंद दुसरा आला. त्याचं अभिनंदन करणाऱ्याला आनंदनं सांगितलं, ‘मी इतक्या चुका केल्या की माझीच मला लाज वाटते. कार्लसननं ते सगळे डाव सहज जिंकले असते!’

स्वतच्या खेळाविषयी कठोर वस्तुनिष्ठता आणि दुसऱ्याच्या क्षमतेविषयी मनमोकळे कौतुक.. बुद्धिबळ विश्वात हे रसायन तसे दुर्मीळ. म्हणूनच चिरंतन टिकून राहणारे! टिकून राहिलेले!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 12:48 pm

Web Title: viswanathan anand loksatta diwali issue 2019 dd 70
टॅग : Diwali Issue
Next Stories
1 स्थलांतर.. : भारत कधी कधी(च) माझा देश आहे..!
2 स्थलांतर.. : स्थलांतर व भारतीय
3 स्थलांतर.. : विदेशी ‘क्लासि’फिकेशन
Just Now!
X