07 April 2020

News Flash

दुरून साजरी अमुची धरती!

आज ‘वोयजर १’ हे मानवनिर्मित सर्वात दूर अंतरावर पोहोचलेली व सर्वात जास्त गतीने प्रवास करणारी वस्तू ठरले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रसाद जगताप

१९७७ साली अंतराळात झेपावलेल्या ‘वोयजर १’ या अवकाशयानाने १४ फेब्रुवारी १९९० रोजी सूर्यमालेतील सर्व ग्रहांचे एकत्रित छायचित्र टिपले, त्या घटनेस ३० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने..

प्राचीन काळापासून मानवजातीला या अथांग पसरलेल्या विश्वातील आपल्या स्थानाबद्दल नेहमीच कुतूहल वाटत आलेले आहे. अवकाश विज्ञान क्षेत्रातील प्रगती हाही त्या कुतूहलाचाच एक भाग. या क्षेत्रात मानवी बुद्धिमत्तेने भरारी घेतली आणि विश्वाबद्दलचे कुतूहल भागविण्याचे काम काही प्रमाणात तरी केले आहे, होत आहे. या क्षेत्रातील काही महत्त्वाच्या प्रयत्नांपैकी एक म्हणजे, अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने १९७७ साली आपल्या सौरमालेतील ग्रहांचे निरीक्षण करण्यासाठी अवकाशात सोडलेले ‘वोयजर १’ हे अवकाशयान! या मोहिमेचा मुख्य उद्देश पार पडला तेव्हा या ‘वोयजर १’ यानाने काय करावे किंवा या मोहिमेत आणखी काय करता येईल, असा वैज्ञानिकांना प्रश्न पडला. त्या वेळी असा निर्णय घेण्यात आला की, या अवकाशयानाने असेच पुढे जात राहावे. या यानाने आपल्या सौरमालेच्या कक्षा कुठपर्यंत आहेत, याचा अभ्यास करावा तसेच पुढे आपण ज्यास इंटरस्टेलर स्पेस अर्थात आंतरतारकीय अवकाश म्हणतो अशा अथांग पसरलेल्या विश्वाचा अभ्यास करावा आणि ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवावी, असे ठरले. याप्रमाणे ‘वोयजर १’ने आपला प्रवास सुरू झाला आणि शांतपणे तसेच स्वत:च्या पोटात खूप सारी गुपिते साठवून ठेवलेल्या अंतराळात कायमचे नाहीसे झाले, ते कधीही न परतण्यासाठीच!

आज ‘वोयजर १’ हे मानवनिर्मित सर्वात दूर अंतरावर पोहोचलेली व सर्वात जास्त गतीने प्रवास करणारी वस्तू ठरले आहे. ४३ वर्षांपासून (आजही) ते आपला प्रवास करतच आहे. विश्वास बसणार नाही, परंतु ‘वोयजर १’ हे यान एका तासात ६४ हजार किलोमीटर प्रवास करते आहे आणि ही गती वाढतच आहे. आपल्याशी संपर्कात राहण्यासाठी ‘वोयजर १’ हे यान ‘डीप स्पेस नेटवर्क’ या तंत्रज्ञानाचा उपयोग करते. यानातून निघणारे संदेश प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात, तरीही त्यांना पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल पाच-सहा तासांचा वेळ लागतो. यावरून आपण कल्पना करू शकतो, की हे यान आपल्यापासून किऽती दूर आहे!

या ‘वोयजर १’ अवकाशयानाला अद्ययावत कॅमेरा यंत्रणा बसवलेली आहे. १९९० मध्ये कार्ल सेगन या वैज्ञानिकाने विनंती केली की, अवकाशयानाचा कॅमेरा उलटय़ा दिशेला फिरवून आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रहांचा एक ‘फॅमिली फोटो’ घ्यावा. पण अवकाशयान इतक्या दूरवर प्रवास करत आहे की, त्या ठिकाणी सूर्यापासून निघालेली ऊर्जा पोहोचू शकत नाही. त्यामुळे थोडय़ाच प्रमाणात साठवलेली ऊर्जा कॅमेरा फिरवण्यात घालवावी की नको, यावर बरेच वादविवाद झाले. परंतु शेवटी कार्ल सेगन यांच्या म्हणण्याप्रमाणे १४ फेब्रुवारी १९९० रोजी तसे छायाचित्र घेण्यात आले. या घटनेला शुक्रवारी ३० वर्षे पूर्ण झाली.

सोबत दिलेले छायाचित्र (क्र. १) पृथ्वीपासून सहा अब्ज किलोमीटर एवढय़ा विक्रमी अंतरावरून घेतले आहे. चित्रात दिसणाऱ्या गोलात निळसर पांढऱ्या रंगाचा छोटासा बिंदू/ ठिपका दिसतो, ते आहे आपले घर- आपली पृथ्वी! या अथांग पसरलेल्या विश्वात आपले स्थान किती नगण्य आहे, हे दाखवून देणारे हे छायाचित्र! कार्ल सेगन यांनी या बिंदूला ‘पेल ब्ल्यू डॉट’ असे नाव दिले आहे.

सेगन त्यांच्या पुस्तकात (‘पेल ब्ल्यू डॉट : अ व्हिजन ऑफ द ह्य़ुमन फ्यूचर इन स्पेस’) म्हणतात, ‘या बिंदूकडे निरखून पाहा.. इथे आपण आहोत, हे आपले घर आहे.. आपले ज्या कोणत्या माणसावर प्रेम, ज्या कोणालाही आपण ओळखत असू, आपण ज्या कोणत्याही माणसाबद्दल ऐकले असेल, तो व प्रत्येक जन्माला आलेली व्यक्ती व आयुष्य जगलेला माणूस इथेच राहिलेला आहे.. आपली सगळी सुख-दु:खे, हजारो धर्म व जाती, विचारधारा व अर्थव्यवस्था, प्रत्येक शिकारी आणि रक्षक, प्रत्येक धाडसी आणि भेदरट, प्रत्येक मानवतावादाला चालना देणारा व प्रत्येक विध्वंसक, प्रत्येक राजा आणि शेतकरी, प्रेमात आकंठ बुडालेले प्रत्येक प्रेमी युगुल, प्रत्येक आई-वडील, प्रत्येक आशावादी मूल, प्रत्येक सर्जनशील व संशोधक, नीतिमत्तेचे धडे देणारा शिक्षक, प्रत्येक बेईमान अधिकारी, प्रत्येक लोकप्रिय कलावंत, प्रत्येक महान नेता, मानव इतिहासातील प्रत्येक महात्मा आणि पापी.. या सर्वानी इथेच जन्म घेतला, इथेच वस्ती केली होती – सूर्याच्या एका किरणावर लटकलेल्या या सूक्ष्म धुलिकणावर!

आपले जग हे ब्रह्मांडाच्या तुलनेत छोटासा रंगमंच आहे. विचार करा त्या सम्राटांचा आणि सेनापतींचा, ज्यांनी क्षणभंगुर असलेला विजय आणि कीर्तीची ओढ या दोन गोष्टींच्या हव्यासाने रक्ताचे पाट वाहायला लावले. आकाशाच्या विस्तीर्ण पटलावर पसरलेल्या, मुश्किलीने दिसणाऱ्या या छोटय़ाशा बिंदूवर एका प्रदेशातल्या लोकांनी दुसऱ्या प्रदेशातल्या लोकांवर अनन्वित अत्याचार केले. या चिमुरडय़ा विश्वाकडे न्याहाळून पाहतो तेव्हा मला जबाबदाऱ्यांची जाणीव होते- आपण दुसऱ्यांशी कसे चांगले वागू शकू, या जगाचे रक्षण कसे करू शकू.. जे आपले एकमेव घर आहे?’

सेगन यांचे हे लिखाण वाचताना आठवण झाली ती वसंत बापट यांच्या एका कवितेची.. ‘साजरी’ ही ती कविता! तिच्या सुरुवातीला ते म्हणतात, ‘अवकाशातून जाता जाता, सहज पाहिले मागे वळुनी, मिसळून गेले साती सागर, पाची खंडे गेली जुळुनी!’ आणि त्या कवितेच्या शेवटी ते सांगतात, ‘अमुच्या ऐसे कुणी बिचारे, असतील जे ग्रहगोलांवरती, कधी न यावे त्यांनी इकडे, दुरून साजरी अमुची धरती!’

हा लेख आपण वाचत असतानाही, सुसाट वेगाने ‘वोयजर १’ हे ब्रह्मांडाच्या कक्षा भेदत प्रवास करत आहे आणि या अथांग पसरलेल्या अवकाशाला जाणीव करून देत आहे मानवजातीच्या अस्तित्वाची!

(लेखक अणुविद्युत अभियंते आहेत.)

prasadjagtap5252@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 1:05 am

Web Title: voyager 1 spacecraft took photos of all the planets in the solar system abn 97
Next Stories
1 चाँदनी चौकातून : पाणीपुरी खा, घरी जा!
2 विजय आपचा, पण खेळ भाजपचाच..
3 ‘गुजरात प्रतिमान’ आणि ‘दिल्ली प्रारूप’
Just Now!
X