निवासी डॉक्टरांचा मुख्य उद्देश काय? तर अनुभवासह प्रशिक्षण घेऊन आपल्या विषयात प्रावीण्य मिळवायचे व भविष्यात ‘तज्ज्ञ’ बनायचे. अभ्यासू वृत्तीने आपली चार वष्रे महाविद्यालयाच्या रुग्णालयात त्यांनी घालवावीत हे त्यांच्या व रुग्णांच्याही हिताचे आहे.

निवासी डॉक्टरांनी अनेक मागण्यांसाठी संप केला. सुरक्षा, कामाचे तास, अपुरे वेतन अशा बऱ्याच मागण्या होत्या. महाराष्ट्र राज्य सरकारने थोडीशी पगारवाढ दिली व नेहमीप्रमाणे इतर मागण्याही पूर्ण करू, असे आश्वासन दिले. थोडक्यात वेतनवाढीचे लोणी लावून तोंडाला पाने पुसली व वादळ शांत झाले. निवासी डॉक्टरांचा मुख्य उद्देश काय, तर अनुभवासह प्रशिक्षण घेऊन आपल्या विषयात प्रावीण्य मिळवायचे व भविष्यात ‘तज्ज्ञ’ बनायचे. मुळात निवासी डॉक्टरांना ‘शिकाऊ डॉक्टर’ म्हणणे हा त्यांचा अपमान आहे. ते ‘शिकाऊ तज्ज्ञ’ आहेत. नुकतेच रुग्णाच्या नातेवाईकांनी लोखंडी सळ्यांनी के.ई.एम. रुग्णालयात एका डॉक्टरवर हल्ला केला. तेव्हा हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे वेतनवाढ हा गौण मुद्दा ठरतो. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, त्यांचे शिक्षण व सुरक्षा, त्यांच्यावरचा कामाचा ताण हा रोजचाच विषय आहे. तो कमी व्हावा व बेसुमार रुग्णांऐवजी प्रमाणित रुग्ण नीट तपासून, त्यांच्या नोंदी ठेवून, त्याच्यावर इलाज करणे व नंतरही त्यांचा मागोवा ठेवून आपण योग्य उपचार दिलेत की त्यात आणखी काही सुधारणा करायला पाहिजेत, अशा अभ्यासू वृत्तीने आपली चार वष्रे महाविद्यालयाच्या रुग्णालयात घालवावीत हे खरे त्यांच्या व रुग्णांच्याही हिताचे आहे.

आठवडय़ातून दोन दिवस शस्त्रक्रिया करायच्या असतात. हा खरा अनुभव, पण वस्तुस्थिती काय? दोन टेबलवर, तर कधी कधी सर्वाना मिळून एकाच टेबलवर शस्त्रक्रिया. तीन ज्येष्ठ सर्जन आणि सहा निवासी डॉक्टर. दोन ते तीन जणांना संधी मिळते. बाकीचे असाच वेळ घालवतात. वैद्यक/औषधशास्त्र विभागात तर बारानंतर कामच नसते; पण कुणी अचानक गंभीर झाला तर निवासी डॉक्टरची धावपळ उडते. खरे तर त्यांना सल्ला देण्यासाठी तीन-तीन ज्येष्ठ शिक्षक आहेत, पण ते कुठे असतात? ते एक तर घरी गेलेले असतात किंवा खासगी व्यवसाय करायला जात असावेत.  सर्व रुग्णालय निवासी डॉक्टरच चालवतात अशी जनतेची, नगरसेवकांची आणि महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीसुद्धा ठाम समजूत झाली आहे. प्रत्यक्षात हे खरेही असेल, पण त्याचे मुख्य कारण ढिला कारभार व प्रत्येकाचे कार्यक्षेत्र आखून न देणे हे आहे.  सर्व विद्यार्थ्यांनी व निवासी भावी तज्ज्ञ डॉक्टर वर्गाने रुग्णालयातील कामाचे योग्य नियोजन झालेच पाहिजे असा ध्यास घेतला पाहिजे.  वेतनवाढ हा गौण मुद्दा आहे.

निवासी डॉक्टर रुग्णांशी नीट बोलत नाहीत म्हणून त्यांचे वाक्चातुर्य वाढवण्यासाठी खास वर्ग घेतले पाहिजेत अशी नवी टूम निघाली आहे.  वरिष्ठ प्राध्यापक वर्ग जसा रुग्णांशी वागेल, बोलेल तसे हे निवासी डॉक्टर आपोआप बोलायला शिकतील; पण इथे काय अवस्था आहे? वरिष्ठ डॉक्टर रुग्णाशी बोलतच नाहीत; त्यांना रोगाविषयी, त्याच्या गांभीर्याची माहिती द्यायची निवासी डॉक्टरनेच. ते घाईत असले आणि वरिष्ठांना काही काम नसले तरीही. असे का? तशातही अनेक निवासी चांगले बोलतात हे कौतुकच म्हणायला पाहिजे; पण त्यांनी आवाज उठवला पाहिजे. सर्व गंभीर रुग्ण, मोठय़ा शस्त्रक्रियांसाठी वरिष्ठांनी समजावले पाहिजे, अशा नियमाची त्यांनी मागणी केली पाहिजे.

ज्यांचे उपचार प्राथमिक केंद्रात सहज होऊ शकतील असे निदान ३० टक्के लोक विनाकारण महाविद्यालयीन रुग्णालयात जातात. तसेच आणखी ५-१० टक्के रुग्णांवर महापालिकेच्या दुय्यम रुग्णालयात उपचार/शस्त्रक्रिया सहज होऊ शकतील. म्हणजे ४० टक्के रुग्ण कमी झाले व रुग्णालयाचे वेळापत्रक सुधारले, तर गर्दी आपोआप कमी होईल व पदवी व पदव्युत्तर दोघांचेही शिक्षण दुपटीने सुधारेल. म्हणून भावी तज्ज्ञ डॉक्टरांनी स्वत:च्या हिताकरता या मागण्या केल्या पाहिजेत. १) रुग्णालयाचे वेळापत्रक बदलून, एका वेळी एकच काम अशी वर दर्शविलेली कामाची आखणी केली पाहिजे. बाहय़रुग्ण तपासणीच्या दिवशी, आपत्कालीन सेवेची जबाबदारी नको. हा दिवस आणि शस्त्रक्रियेचे दोन दिवस (पहिला, तिसरा व पाचवा) सोडून, कमी कामाच्या चौथ्या दिवशी आपत्कालीन सेवा ठेवावी. तसेच छोटय़ा शस्त्रक्रिया सहाव्या दिवशी ठेवाव्यात.  पुनर्तपासण्याही वेगळ्या वेळी असाव्यात.

२) अधिव्याख्याता, सहप्राध्यापक व प्राध्यापक असे तीन वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी /शिक्षक प्रत्येक युनिटमध्ये असतात. त्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट ठरवल्या पाहिजेत.

३) पी.एस.एम. विभागातर्फे रुग्णालयात प्राथमिक केंद्रे उभारून, सर्व रुग्णांनी प्रथम तिथे तपासणी करून घेतलीच पाहिजे व त्यांनी स्पेशालिस्टकडे पाठवल्यासच, रुग्णांना मोफत कागद मिळेल, अन्यथा त्यांना फी भरून स्वतंत्र वेळी (समजा १२ ते अडीच वाजेपर्यंत) यावे लागेल व त्याकरता २० टक्के खाटा निर्धारित करण्यात येतील. असे केल्यास या प्राथमिक केंद्रात पदव्युत्तर वर्गात प्रवेश न मिळालेले पदवीधर दोन वष्रे प्राथमिक डॉक्टर बनण्याचे शिक्षण घेतील.

यातून सुरक्षेचा प्रश्नही काहीसा सुलभ होईल. या व्यवस्थेमुळे, फक्त आपत्कालीन रुग्णसेवेचा कक्ष तेवढाच असुरक्षित राहील. बाहय़रुग्ण कक्ष आणि वॉर्डमधील तक्रारी बव्हंशी थांबतील. अशा तऱ्हेच्या सूचना मांडून रुग्णालयाच्या कामात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न मार्डसारख्या संघटनांनी केल्यास, त्यांना अधिक चांगला अनुभव मिळेल, त्यांचे प्रत्यक्ष शिक्षण सुधारेल व ते परिपक्व तज्ज्ञ म्हणून बाहेर पडतील. अशा कारणाकरता, त्यांनी संप केल्यास, न्यायालयदेखील आक्षेप घेणार नाही. मध्यमवर्गाची थोडीफार मदत होईल. तसेच त्यांच्यामुळे उत्पन्न मिळून रुग्णालयाची वाढ होईल. त्याऐवजी आमचे कामाचे तास आठवडय़ाला ४८ तास करा, अशी नोकरशाहीसारखी मागणी निवासी डॉक्टरांनी केल्याचे वाचून फार दु:ख झाले. उरलेसुरले शिक्षणही संपेल व बाहेरच्या जगात व्यवसाय करायला नालायक व्हाल. म्हणून म्हणतो,  निवासी डॉक्टरांनो, जागे व्हा! स्वत:च्या हिताकरिता..
– डॉ. सदानंद नाडकर्णी   sadanadkarni@gmail.com