‘गावापासून दुधना नदी गेलेली. एके काळी पाण्याची मुबलक समृद्धी. पण आहे त्या पाण्याची किंमत कळली नाही. नदी कधी आटली त्याची जाणीवच झाली नाही. दुष्काळाच्या गत्रेत गाव अडकले आणि गहू, ज्वारी, कांदा, ऊस अशा पिकांवर पाणी सोडावे लागले. अनेक वष्रे दुष्काळाच्या चटक्यांनी गाव भाजून निघाले तेव्हा ज्या नदीकडे दुर्लक्ष झाले ती पुन्हा वाहती व्हावी, यासाठी गाव एकत्र आले.. पावसाने साथ दिली. यंदा ७५ टक्के ग्रामस्थांच्या शेतात गव्हाचे पीक बहरले..’ औरंगाबादपासून जवळ असलेल्या पाडळीचे (ता. बदनापूर) काकासाहेब सिरसाट गावची पालटलेली आíथक स्थिती, मन:स्थिती, याबाबत सांगत होते.

दुधना नदीच्या काठी पाडळी हे बाराशे-पंधराशे लोकसंख्येचे गाव. बारा-पंधरा वर्षांपर्यंत नदी वाहत होती. अर्धचंद्राकार आकाराचे नदीचे वाहते रूप पाहणे मोठे नयनरम्य होते. दुधनाचे हे पाणीदार मोहक रूप अगदी दृष्ट लागण्यासारखेच होते. इतर गावांना हेवा वाटायचा. जमीन काळीकुट्ट होती. सपाटही होती. विहिरींनाही पाणी असायचे. अगदी जलसमृद्ध असे हे गाव होते. नदीमध्ये हळूहळू वेडय़ा बाभळी, झाडे-झुडपे वाढू लागली. त्या कोणी काढायच्या म्हणून दुर्लक्ष होत गेले. कालांतराने नदी आटत गेली. नदीसोबत गावची पीकविषयक, अर्थविषयक, जलविषयक समृद्धीच लोपली. गेल्या काही वर्षांत गव्हाचे पीक जवळपास गावातून हद्दपारच झाले. बारा वर्षांपूर्वी उसाकडे शेतकरी वळले. पण काही वर्षांतच उसावरही पाणी सोडावे लागले. अशीच गत मोसंबीची. कांदा, कांद्याचे बी याचीही लागवड व्हायची. हे सर्व सोडून केवळ आहेत त्या जमिनीवर काही तरी पीक दिसावे म्हणून कापूस, बाजरी, मूग असे पीक घ्यावे लागत होते. गतवर्षी जलयुक्तसारखी कामे इतरत्र सुरू झाली. तेव्हा मात्र पाण्यासाठी गावानेही एकमुठीने पुढे यावे, असा विचार सुरू झाला.

यादरम्यान महात्मा फुले कृषी विकास प्रतिष्ठानसारखी संस्था, अन्य काही सामाजिक कामाच्या भावनेने प्रेरित झालेल्या काही लोकांचे पाय गावाला लागले. त्यांनी ग्रामस्थांची बठक घेऊन पाण्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मदतीपेक्षा लोकसहभागाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. एकरी ४०० रुपये याप्रमाणे पसे शेतकऱ्यांनी खिशातून काढून दिले. त्या पशातून दुधना नदीच्या खोलीकरणाचे काम सुरू झाले. खोदकामातून निघालेली माती, दगड-गोटे, मुरूम याची विक्री केली. त्यातूनही काही रक्कम जमा झाली. गतवर्षीच्या उन्हाळ्यात केलेल्या कामाचे चांगले परिणाम पावसाळ्यात दिसले. नदीत अनेक वर्षांनी पाणी साचलेले पाहिले. अर्धचंद्राकार नदीचे पाण्याने भरलेल्या रूपाने गावची समृद्धी पुन्हा प्राप्त होऊ शकते हा विश्वास दिला. यंदाच्या रब्बीत पूर्णपणे सोडून दिलेले गव्हाचे पीक ग्रामस्थांनी घेतले. गावात या वर्षी ७५ शेतकऱ्यांनी गहू पिकवला आणि तो पाण्यामुळे बहरलाही. काहींनी उसाचीही काही प्रमाणात लागवड केली. यंदा मोसंबीचेही क्षेत्र वाढले आहे. कांदाही लागवड केला होता. कांदा बियांचा फुलोरा सध्या गावात डोलताना दिसतो आहे. दुष्काळाशी एकटय़ाने नाही तर एकीने लढायचे असते हाच संदेश आम्हाला मिळाला आहे, असे काकासाहेब सिरसाट सांगतात.

पाडळीसारखीच परिस्थिती घनसावंगीतील खापर देवहिवरा गावची. या गावापासून हिवरा नदी वाहायची. दुष्काळामुळे तीही आटलेली. दुष्काळी परिस्थितीतून गाव कसे बाहेर निघाले याबाबत गावचे भीमराव रोडे, प्रकाश परदेशी सांगतात, गावात पूर्वी पिण्याच्या पाण्याचे वांदे. माणसांना जिथे पाणी नाही तिथे ढोरा-जनावरांना कुठून पाणी पाजायचे. पाण्याविना मोसंबीच्या बागा जळाल्या. साखर कारखाना जवळ असताना उसाची लागवड करता येत नव्हती. गावच्या गाव पिण्याच्या पाण्यासाठी भर पावसाळा, हिवाळ्यात भटकताना दिसायचे. दुष्काळी गाव म्हणून शिक्का बसला. शेतकरी आत्महत्या झाली नसली तरी कर्जफेडीची नियत मात्र ग्रामस्थांकडे होती. काही संस्थांनी गावात येऊन बठक घेतली. पाण्यासाठी काम करायचे आहे, काय सहकार्य करता, हे विचारले. मुंबईच्या महाजन ग्रुपने तांत्रिक मदत केली. ग्रामस्थांनी एकरी काही रक्कम देण्याची तयारी केली. आज गावावरील दुष्काळाचा कलंक जवळपास मिटला आहे. मुबलक पाणी आले. आता सिमेंट बंधारे बांधायचा प्रश्न आहे. पण निघेल त्यातून मार्ग. आज गावात पुन्हा उसाचे काही प्रमाणात पीक आहे. मोसंबी आहे. आताही गावातील मोसंबीला देण्यासाठी पाण्याची मुबलकता आहे, यावरून तीन वर्षांपूर्वीची आणि आताची परिस्थिती बरेच काही सांगून जाते. गावाने मूठ वळवली आणि जल-एकी केली की काय होते याचेच हे उदाहरण.