25 September 2020

News Flash

बंगळूरुवर जलसंकट

बंगळूरुवर ही अवस्था कोसळण्याचे कारण काय?

जगातील ११ शहरांची एक यादी बीबीसीने गेल्या महिन्यात प्रसिद्ध केली. ही यादी होती अशा शहरांची, जेथे लवकरच पाण्याचा ठणठणाट होणार आहे. तेथील पेयजलाचा पुरवठा आटणार आहे. या यादीत पहिल्या स्थानावर होते ब्राझीलमधील साओ पावलो हे शहर आणि दुसऱ्या क्रमांकावर होते बंगळूरु. बीजिंग, कैरो, जकार्ता, मॉस्को, इस्तंबुल, मेक्सिको सिटी, लंडन, टोक्यो आणि मायामी ही अन्य शहरे. त्यांचेही ‘केपटाऊन’ होण्याची शक्यता असल्याचे हा अहवाल सांगत होता. दक्षिण आफ्रिकेतले केपटाऊन हे शहर आधुनिक जगातील पहिले ‘कोरडे’ शहर ठरण्याचे भय निर्माण झाले आहे. या यादीत आज तरी एकाच भारतीय शहराचा समावेश आहे.

  • बंगळूरुवर ही अवस्था कोसळण्याचे कारण काय?

बीबीसीच्या या अहवालानुसार या शहरातील निम्म्याहून अधिक पाणी वाया जात आहे ते जुन्या-पुराण्या वाहिन्या आणि नळांमुळे. या शहराला तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. परंतु त्यातील ८५ टक्के तलावांतील पाणी हे केवळ शेतीसिंचन आणि औद्योगिक वापरासाठी उपयोगात आणले जाऊ शकते. पण पिण्यासाठी किंवा न्हाण्यासाठी म्हणून या एकाही तलावातील पाणी वापरण्यायोग्य नाही. हे अर्थातच बंगळूरुच्या पाणीपुरवठा विभागाला नामंजूर आहे. त्यांचे म्हणणे हा अहवाल उगाच भय निर्माण करणारा आहे. तो ज्या माहितीवरून तयार करण्यात आला आहे, ती सगळी जुनी आहे, वस्तुस्थितीशी तिचा संबंध नाही. तेव्हा प्रश्न असा पडतो, की मग बंगळूरुमधील जलसमस्या खरोखरच किती गंभीर आहे. आपली अनेक शहरे बंगळूरुच्या वाटेने निघालेली असल्याने, ते समजून घेणे आवश्यक आहे.

विविध स्रोतांतून म्हणजे दोनशेहून अधिक तलाव, विहिरी, अरकावती नदीच्या खोऱ्यातील जलसाठे यांद्वारे बंगळूरुला पाणीपुरवठा होत असे. पण तो कोणे एके काळी असेच म्हणावे लागेल. कारण आता ते स्रोत कोरडे पडत चालले आहेत. कारण बेसुमार वाढलेले बांधकाम. त्यावर कोणाचे नियंत्रणच नाही. त्यामुळे बंगळूरुला कावेरीच्या किंवा पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहण्याखेरीज अन्य पर्यायच नाही. आज बंगळूरुची तहान भागवत आहे ती शहरापासून सुमारे १०० किमी अंतरावर असलेली ही नदी.

साधारणत: शहरातील एका व्यक्तीला रोज १५० लिटर पाणी लागते. आजमितीला बंगळूरुकरांना मिळते फक्त ६५ लिटर. म्हणजे जवळजवळ निम्मे. १५० लिटरच्या हिशेबाने बंगळूरुची गरज आहे प्रतिवर्षी सुमारे २४ टीएमसी. २०२५ पर्यंत ती वाढून ३० टीएमसी फूटवर जाण्याची शक्यता आहे. बंगळूरुपुढे भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे यातून दिसते.

शहरावरील या पाणीटंचाईला अनेक घटक जबाबदार आहेत. त्यातील एक म्हणजे भूगर्भातील पाण्याचा बेसुमार उपसा. शहराच्या मुख्य भागांमध्ये एवढय़ा विंधणविहिरी खणण्यात आल्या की त्यांनी आतील सारे पाणी ओरपून काढले. शहरात आणि शहराबाहेर पूर्वी २७२ तलाव होते. गेल्या चार दशकांत उरले आहेत फक्त ७० तलाव. बाकीचे कुठे गेले? तर त्यातील काही तलावांवर सरकारनेच अतिक्रमण करून बस स्थानके बांधली, क्रीडांगणे तयार केली. गृहनिर्माण प्रकल्पासाठी त्या जागा दिल्या. त्याचा फायदा झाला बांधकाम व्यावसायिकांना. पुढे या अतिक्रमणांमुळे निर्माण झालेल्या कचऱ्याने आणि सांडपाण्याने त्या तलावांचा गळा घोटला. दुसरीकडे शहरातील भूगर्भातील पाण्याचा दर्जाही खराब झाला.

  • यावर बंगळूरु कशी मात करणार आहे?

शहराचा पाणीपुरवठा विभाग म्हणतो, पुढच्या काही दशकांत आम्ही सध्याच्या जलसाठय़ाचा व्यवस्थित वापर करू. पर्जन्य जलाची ‘लागवड’ करू आणि सांडपाण्याचा पुनर्वापर करू. शिवाय बंगळूरुवर पावसाची तशीही कृपा असते. गेल्या १०० वर्षांची तेथील पावसाची आकडेवारी पाहिली, तर या शहरात ५७हून अधिक दिवस सरासरी ९२९ मिमी पाऊस पडतो. तेव्हा पर्जन्य जल संवर्धनासाठी ही चांगलीच परिस्थिती असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कावेरीचे पाणीही आहेच. यातून पेयजलाची समस्या कमी होऊ शकते.  परंतु हे उपाय आधीच सुचले असते तर? बंगळूरुला ते आधी सुचले नाहीत, हे दिसतेच आहे, पण बाकीच्या शहरांना तर त्यापासून धडा घेता येईल.

– प्रतिनिधी

(स्रोत – ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या २६ फेब्रुवारीच्या अंकातील ‘इज बंगलुरू अबाऊट टू रन ड्राय?’ हा लेख.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2018 2:44 am

Web Title: water scarcity in bangalore
Next Stories
1 मध्य प्रदेशातील शेतकरी तुपाशी, महाराष्ट्रातील उपाशी
2 माकड, माणूस, डार्विन आणि विज्ञान
3 जंगलवाढीचा भ्रमाचा भोपळा
Just Now!
X