News Flash

आठवड्यातील आठवावेसे

तीन भाषांतील चित्रवाणी वाहिन्या, अनेक संकेतस्थळे, फेसबुक-ट्विटरसारखी समाजमाध्यमे आणि व्हॉट्सअ‍ॅप आदी संवादमाध्यमे..

| October 12, 2014 02:28 am

तीन भाषांतील चित्रवाणी वाहिन्या, अनेक संकेतस्थळे, फेसबुक-ट्विटरसारखी समाजमाध्यमे आणि व्हॉट्सअ‍ॅप आदी संवादमाध्यमे.. माध्यमांच्या या महापुरातही दररोजचा ‘लोकसत्ता’- सोमवार ते शुक्रवार या ‘नेहमीच्या’ दिवसांतही लक्षात राहतो. पत्रकारिता, आत्मपरीक्षण, अभ्यास, निर्भीड मतप्रदर्शन हे सारे कोठेही असले तरी आठवावेसे असतेच.. पण ‘लोकसत्ता’ अशी आठवावीशीत काही भर घालतो का, केले असल्यास कोणती, याचा हा लेखाजोखा.. दर आठवडय़ाला! अर्थात, इथे शब्दमर्यादा पाळून केलेल्या या नोंदी स्वत: पडताळून पाहण्याचे आणि त्यानंतरच्या मतप्रदर्शनाचे स्वातंत्र्य वाचकांना आहेच..
हरित अर्थकारणाची दिशा..
पर्यावरण आणि समाज या विषयाचे अभ्यासक अतुल देऊळगावकर यांचा हा दोन भागांतील लेख (८ आणि ९ ऑक्टोबर). श्रीमंत आणि विकसित देशांवर पर्यावरणाच्या हानीची अधिक जबाबदारी असल्याचे आरोप केले जात असतानाच त्या देशांनी केलेले जलनियोजन, विकासाच्या पर्यावरण केंद्री प्रारूपांची मांडणी, शहर नियोजनाची हरित प्रारूपे, पर्यटनाकर्षी नगररचना आदी मुद्दय़ांकडे आजवर दुर्लक्ष झाले. मात्र आता त्यात कसे बदल करता येतील, पर्यावरणस्नेह ही सरकारची जबाबदारी ही नागरिकांचीही, राजकीय पर्यावरण आणि पर्यावरणीय राजकारण यांच्यातील नाते उलगडून दाखवणारा हा लेख होता.
गुंतवणूक फराळ
वाचकांनी अधिकाधिक अर्थसाक्षर व्हावे, गुंतवणुकीच्या बाबतीत चोखंदळ असलेल्या वाचकांना गुंतवणुकीचे विविध पर्याय निदर्शनास आणून द्यावेत यासाठी दर सोमवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अर्थवृत्तान्त’ मधून खास दिवाळीनिमित्त ‘गुंतवणूक फराळ’ आयोजित करण्यात आला आहे. गेल्या सोमवारपासून (६ ऑक्टोबर) सुरू झालेल्या या सदराच्या माध्यमातून विविध दलाली पेढय़ांतील विश्लेषकांकडून वर्षभरात संशोधन केलेल्या कंपन्यांतून एखादी कंपनी निवडून ती का आवडली, हे थोडक्यात सांगितले जाईल. दर सोमवारच्या ‘अर्थवृत्तान्त’ मध्ये हे सदर येईल.
सेना-मनसेसोबत पवारांची नवी आघाडी?
राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या आखाडय़ात उतरल्याने यंदाची विधानसभा निवडणूक अनेक अर्थानी लक्षवेधी ठरली आहे. युती-आघाडी तुटल्या-फुटल्यामुळे अनेक राजकीय समीकरणांची जुळवाजुळव पडद्यामागून चालू आहे. लोकसभेपासून चौखूर उधळू पाहणारा भाजपचा रथ थोपवण्यासाठी शिवसेना व मनसे यांच्यासोबत आघाडी करण्याचा शरद पवारांचा छुपा प्रयत्न ही ‘लोकसत्ता’मधील ७ ऑक्टोबरची बातमी सर्वात वाचनीय ठरली.
राज्यात सरकारी
कंपन्यांचे खासगीकरण..
राज्यात विधानसभा निवडणुकीचे रण पेटलेले असताना व माजी मुख्यमंत्र्यांवर स्वाक्षरी प्रक्रियेतील दिरंगाईचे आरोप केले जात असतानाच, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि राज्यातील सरकारी मालकीच्या कंपन्यांच्या खासगीकरण प्रक्रियेने वेग धरल्याची बाब पुढे आली. ‘महाराष्ट्र सरकारच्या कंपन्यांचे खासगीकरण’ या शीर्षकाअंतर्गत संबंधित वृत्त मंगळवार, ७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाले. राज्य सरकारच्या अखत्यारीतील ४० कंपन्यांपकी अनेक कंपन्या तोटय़ात आहेत, त्यामुळे त्यांच्या निर्गुतवणूक आराखडय़ावर राष्ट्रपतींच्या राजवटीत हात फिरवला जात आहे. राज्य बीज महामंडळ मर्यादित, कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित, ज्ञान महामंडळ मर्यादित, राज्य सहकारी साखर कारखाने महासंघ मर्यादित अशा अनेक कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे.
एक तरी परदेशी पदवी मिळवावी!
चांगल्या कंपनीतील नोकरी हे तर प्रत्येक घरातील युवक-युवतीचे स्वप्न असते. मात्र उत्तम नोकऱ्या मिळविण्यासाठीचे निकष कसे बदलत चालले आहेत, आपल्या परिचय पत्रकात किमान एक तरी परदेशी विद्यापीठातील पदवी कशी लाभदायक ठरू लागली आहे, कौशल्य आणि परदेशी विद्यापीठांमधील अभ्यासक्रमांना विविध कंपन्यांकडून उमेदवार निवडीदरम्यान कशी पसंती दिली जात आहे, याचे सर्वेक्षण नुकतेच प्रसिद्ध झाले. त्याचा हा वृत्तवेध. (८ ऑक्टोबर) विषय जिव्हाळ्याचा आणि म्हणूनच वाचनीयही.
वेगळेपण देगा देवा..
लोकसभा असो वा विधानसभा.. निवडणुकीचे बिगूल वाजले की ‘मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव’, असा प्रचार विरोधकांकडून केला जातो. त्या आधारावर मतांचा जोगवा मागला जातो. दर निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा विरोधकांकडून पोतडीतून बाहेर काढला जातो. पुढे काही होत नाही. याही निवडणुकीत हा मुद्दा चर्चेला आलाच. त्याचबरोबर मोदींनीही मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार नाही, असे सांगतानाच वेगळ्या विदर्भाबाबत मात्र मौन बाळगले. या सर्व पाश्र्वभूमीवर ‘वेगळेपण देगा देवा..’ या ९ ऑक्टोबरच्या अग्रलेखात मुंबई, विदर्भ वेगळा करण्याबाबतच्या मुद्दय़ांचा ऊहापोह करण्यात आला. त्यावर वाचकांच्या प्रचंड प्रतिक्रिया आल्या.
अभिनव बिंद्रा नेमबाज घडवणार
अभिनव बिंद्रा याने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावल्यानंतर नेमबाजीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला. राज्यासह देशातील अनेक पालक आपल्या पाल्याने या खेळाकडे वळावे म्हणून प्रयत्नशील झाले. याच टप्प्यावर िबद्रा याने केलेली निवृत्तीची घोषणा, त्याने नेमबाजांना घडविण्याचे ठेवलेले उद्दिष्ट, या नेमबाजांमध्ये राज्यातील चार होतकरू खेळाडूंचा असलेला समावेश या सर्व घडामोडींचा वेध घेणारे हे वृत्त (९ ऑक्टोबर). ‘नेमबाजीतील आश्वासक भविष्याचा वेध’ या बातमीत घेतला गेला.
वेड पांघरून ‘पेड’गावला..
निवडणुका म्हटल्या की त्यांतील पेड न्यूज हा कायमच चवीने चíचला जाणारा विषय. यंदाही राज्यात लक्ष्मीदर्शनाने व्यापक रूप धारण केले असतानाच ठिकठिकाणाहून पेड न्यूजविषयी तक्रारींना वेग आला आहे. त्याबाबत देण्यात आलेले हे सविस्तर वृत्त. (शुक्रवार, १० ऑक्टोबर) त्यामध्ये पक्षाला, उमेदवारांना तसेच प्रथमच थेट वृत्तपत्रांनाही पेड न्यूजप्रकरणी देण्यात आलेल्या नोटिसांविषयी माहिती देण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2014 2:28 am

Web Title: weekly important events and news in loksatta
Next Stories
1 हरित अर्थ-राजकारणाची संधी
2 हरित अर्थकारणाची दिशा..
3 निवडणुकीतला कांदा!
Just Now!
X