गार्गी
समाजातील विविध विकृतींचा तसेच समाजातील प्रकृतींचा शोध घेणाऱ्या व मन हेलावून टाकणाऱ्या त्याचप्रमाणे मन पुलकित करणाऱ्या विविध विषयांवरील कथांचा समावेश असलेला ‘गार्गी’ दिवाळी अंक यंदाही दर्जेदार झाला आहे. हावरट बापाच्या इच्छेमुळे जिचे जीवनगाणं विस्कळीत झाले अशा मुलीची म्हणजे ‘मी शुभांगी’ ही प्रवीण दवणे यांच्या ह्रदयस्पर्शी कथेसह ‘दार’ ही सुरेश पाचकवडे यांची कथाही मनाला चटका लावणारी आहे.
त्याचप्रमाणे ’भिंतीवरील फोटो’ अनिल जावकर, ‘एकेकाचे फंडे’ सुधीर सुखठणकर, ‘रेड सिग्नल’ अजय जयवंत, ‘धडा’ मंगला गोडबोले, ‘आभास हा ’ शुभदा साने यांच्या कथा वाचनिय आहेत. ‘मराठी महिला माऊंट एव्हरेस्टवर’ हे कॅ.प्राची गोळे तनेजा हिची आणि तिच्या समूहाची चित्तथरारक एव्हरेस्ट मोहीमेचे प्रासंगिक चित्रण या अंकात करण्यात आले आहे. २०१२ मध्ये दिवाळी अंकाने घेतलेल्या कथा स्पर्धेतील उत्कृष्ट पाच कथांचा या अंकात समावेश आहे. सुनील सरमळकर, दिगंबर जोशी, बाळ बागवे, अशोक गुप्ते, अरुण देशपांडे आदी लेखकांच्या कथाही वाचनीय आहेत. दिवाळी अंकाच्या पहिल्या भागात कथांच्या समावेश असून दुसऱ्या भागात आरोग्य धन संपदाचा मंत्रघोष अंकाने केला आहे. त्यात विस्मृती एक आजार, सर्व काही ह्रदयासाठी, फॅट टू फीट, आव आदी आजार व त्यावरील उपायांचा समावेश आहे. रुद्राक्षाचे मानवी जीवनातील महत्वही या  अंकात अधोरेखीत केले आहे. ‘यंदा कर्तव्य आहे ? सावधान’ हा विवाहपद्धतीवर चर्चात्मक असा उमा देसाई यांचा लेखही प्रबोधनात्मक आहे. त्याचप्रमाणे कविरसिकांसाठी ‘काव्यकुंज’ही या अंकात आहे.
संपादक – श्रीनिवास शिरसेकर
पृष्ठे – २००,किंमत – ७० रुपये

सृष्टिज्ञान
विज्ञान विषयाला वाहिलेल्या सृष्टिज्ञान या मासिकाचा यंदाचा दिवाळी अंक हा विविध विषयांनी परिपूर्ण आहे. अवकाश, जैवविज्ञान, वनस्पतिशास्त्र, पर्यावरण अशा अनेक विषयांवरील माहितीपूर्ण लेख हे या अंकाचे वैशिष्टय़ आहे. अनुभवी लेखकांबरोबरच सध्या संशोधन करीत असलेल्या काही तरुण लेखक-लेखिकांना लिहिते करण्याचा प्रयत्नही या निमित्ताने केला आहे, तो प्रशंसनीय असाच आहे. यंदाच्या वर्षी जी नोबेल पारितोषिके जाहीर झाली त्यांचा सचित्र आढावा नवीन संशोधन व त्यांचा उपयोग याची झलक देऊन जातो.
देवकणाच्या प्रयोगात काम करणारे वैज्ञानिक डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी त्यांच्या मातोश्री माणिक कोतवाल यांनी लिहिलेला लेख वैज्ञानिक घडवताना पालकांना नेमके काय करावे लागते याची माहिती देणारा आहे. अलिकडेच निवर्तलेले अमेरिकेचे पहिले चांद्रवीर नील आर्मस्ट्राँग यांच्या विषयीचा लेख असाच उल्लेखनीय आहे. आपण विवाह जुळवताना नेहमी पत्रिका जुळवत बसतो पण त्यापेक्षा रक्तगट जुळवणे किती महत्त्वाचे आहे यावर डॉ. दिलीप वाणी यांनी टाकलेला प्रकाशझोत, नोबेल पारितोषिक विजेते-सर जॉन गर्डन हे लेख विशेष   उल्लेखनीय.
संपादक- राजीव विळेकर,
पृष्ठे-८०, किंमत- ५० रुपये

श्रमिक एकजूट
माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर राज्य काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. या विषयावरील विशेष लेखांचा ’ या दिवाळी अंकात समावेश आहे. राज्य काँग्रेसमध्ये धडाडीच्या नेतृत्वाची कमतरता आहे. त्यामुळे विलासारावांच्या तोडीचे नेतृत्व शोधण्याची कसरत काँग्रेसला करावी लागणार आहे, असे विश्लेषण  चंद्रहास मिरासदार यांनी ‘विलासरावांची जागा कोण भरून काढणार?’ या लेखात केले आहे.‘विलासराव आणि राजकीय पोकळी’ या लेखात शरद कारखानीस यांनी केलेले राजकीय विश्लेषण वाचनीय आहे.
लोकशाहीपुढील आव्हाने या सदरात अशोक चौसाळकर, भाई वैद्य,  माधव गोडबोले, जयदेव डोळे यांचे लेख वाचनीय आहेत. लढा जलसंकटाशी या संदर्भातील डॉ. माधव गाडगीळ, डॉ. माधवराव चितळे, डॉ. दि.बा. मोरे आदींचे लेख उल्लेखनीय आहेत.
संपादक- कृष्णा शेवडीकर
पृष्ठे -१७६, किंमत – ५० रुपये

लाजरी
 संपूर्ण अंक कृष्णधवल असूनही सुंदर मुखपृष्ठचित्र आणि सुबक सजावट आणि त्याचबरोबर वैविध्यपूर्ण मजकूर हे ‘लाजरी’ अंकाचे यंदाचे वैशिष्टय़ आहे. मुखपृष्ठ चित्र सत्यजित वरेकर यांचे आहे. गेल्या वर्षी निधन झालेल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंत देव आनंद, शम्मी कपूर, राजेश खन्ना यांचे स्मरण करणारे वाचनीय लेख आहेत. मराठी साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले आयडियल बुक कंपनीचे कांताशेठ नेरुरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नाटक-साहित्य विभागात हमीदाबाईची भूमिका साकारणारी अभिनेत्री नीना कुलकर्णी यांची मुलाखत, नाटय़गुरू  इब्राहिम अलकाझी यांच्याविषयीचे लेख आहेत. मुंबई-ठाण्यातल्या ग्राहकप्रिय ठरलेल्या खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्या ठिकाणांविषयी, विक्रेत्यांविषयी चटपटीत हा आगळावेगळा विभागही वाचनीय आहे. म्यानमारच्या लढाऊ नेत्या आँग सान स्यू की यांच्या विषयीचा माहितीपूर्ण लेख न्यूजमेकर्स या विभागात आहे हेही यंदाच्या दिवाळी अंकाचे वैशिष्टय़ आहे.
संपादक – अजित पडवळ,
पृष्ठे – १४८, किंमत  – १००