बिटकॉइनवर नियंत्रण कोणाचे?

खरे तर या चलनावर कोणाचेही नियंत्रण नाही. म्हणजे कोणत्याही देशाच्या मध्यवर्ती बँकेने ते जारी केलेले नाही. शिवाय अन्य कोणी ते तयार केले म्हणून त्याला सरकारी वैधता नाही. मात्र जगभरात त्याचा वापर थोडय़ा-अधिक प्रमाणात होत आहे. खुद्द बिटकॉइन कंपनीही चलन व्यवहारातील नुकसानाकरिता गुंतवणूकदारांनी स्वत: जोखीम बाळगावी अशा पूर्वसूचनेने हात झटकते.

व्यवहार कसे होतात?

बिटकॉइन या आभासी चलनाद्वारे थेट व्यवहार करता येतात. म्हणजे त्यात कुणीही मध्यस्थ यंत्रणा नाही. नोड्सच्या जाळ्यांमार्फत या व्यवहारांवर देखरेख ठेवली जाते. त्याबाबतच्या नोंदी ब्लॉकचेनद्वारे प्रसारित केल्या जातात. ओपन सोर्स सॉफ्टवेअरवरून हे चलन जारी करण्यात आले. अशा सॉफ्टवेअरसाठी परवान्याची गरज नसते. शिवाय या सॉफ्टवेअरच्या मंचावर बिटकॉइनचे व्यवहार सार्वजनिक स्तरावर करता येतात. १० मिनिटाला एकदा यामार्फत व्यवहार होतात. असे तासाला सहा व्यवहार करण्याची मुभा त्यावर आहे. एक्स, वाय आणि झेड या सांकेतिक अक्षरांनी व्यवहारातील महत्त्वाचे दुवे एकत्र येतात. म्हणजे आभासी चलन पाठविणारा एक्स, आभासी चलनाचे मूल्य वाय व ज्याला पाठवायचे तो झेड. बिटकॉइन खरेदीदार व्यापारी हे साधारणत एक लाखाच्या पुढे आभासी चलन घेतात. त्यापेक्षा कमी आभासी चलनाचा ते व्यवहार करत नाहीत. यासाठी दोन टक्क्यांपर्यंत अतिरिक्त रक्कम आकारतात. म्हणजे क्रेडिट कार्डाद्वारे होणाऱ्या व्यवहारांकरिता जसे मूळ व्यवहाराव्यतिरिक्त शुल्क लागते तसे. विविध मंचांवर प्रक्रिया पूर्तता केल्यानंतर ठरावीक मर्यादेच्या प्रमाणात बिटकॉइन दिले जातात. त्याकरिता भिन्न शुल्क आकारले जाते.

अज्ञात आणि असंख्य चलनदार

बिटकॉइनसह एकूण आभासी चलन वापरणाऱ्यांची जगभरातील संख्या सध्या ६० लाखांच्या वर असल्याचे सांगितले जाते. २०१३ मध्ये ही संख्या १३ लाख होती. वॉलेट म्हणून बिटकॉइनचे जवळपास १०,००० वापरकर्ते आहेत. त्यामार्फत १० कोटी डॉलरच्या बिटकॉइनचे व्यवहार होतात. बिटकॉइन वापरणाऱ्यांची संख्या, या आभासी चनलामार्फत होणारे व्यवहार व व्यवहारांची संख्या याबाबत कुठेही अधिकृत माहिती नाही.

सुरुवातीला एका बिटकॉइनचे असे कोणतेही निश्चित मूल्य नव्हते. मात्र यामार्फत खऱ्या अर्थाने पहिला खरेदी व्यवहार झाला तो पिझ्झाचा. पापा जॉन्सच्या दालनातून दोन पिझ्झा १०,००० बिटकॉईच्या बदल्यात विकले गेले होते.

काही बडय़ा विदेशी कंपन्यांमध्ये या चलनातील व्यवहारांना मान्यता आहे. एका जागतिक वित्तसंस्थेने तिच्या चीनमधील कार्यालयातून अशा व्यवहारांना नुकतीच परवानगी दिली आहे. अमेरिकेच्या वायदा बाजार आयोगानेही या माध्यमातील व्यवहारांना प्राथमिक मंजुरी दिली आहे.

मूल्यही चंचल

आभासी चलनाच्या मूल्यातही स्थिरता नाही. २०११ मध्ये एका बिटकॉइनची किंमत ३२ डॉलर होती. या वर्षांत त्याचा प्रवास अगदी पाव डॉलरहून सुरू झाला होता. २०१२ तसेच २०१४ मध्ये त्याने मूल्य गटांगळीही अनुभवली. २०१७च्या सुरुवातीपर्यंत आभासी चलनात प्रचंड अस्वस्थता होती. लंडनच्या बाजारातील सोने, अमेरिकेच्या भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक यांच्या तुलनेत तर या आभासी चलनातील गटांगळी सात ते १८ पट अधिक होती.

२०१७च्या अखेरीस बिटकॉइनचे मूल्य पुन्हा झेप घेऊ  लागले. वर्षांच्या सुरुवातील १,००० डॉलरचे बिटकॉइनचे मूल्य १३,००० डॉलपर्यंत झेपावले. वर्षभरात बिटकॉइनचे व्यवहार दीड कोटींनी वाढले.

२०१० पर्यंत या आभासी चलनाने लोकप्रियता मिळविली होती. बिटकॉइनच्या प्रवर्तकाने २.१० कोटी आभासी चलन जारी केले आहेत. पैकी १० लाख बिटकॉइन स्वत:कडे आहेत. बिटकॉइनच्या सध्याच्या सर्वोच्च मूल्यानुसार तो १,३०० कोटी डॉलर म्हणजेच (प्रति डॉलर ६४ रुपयेप्रमाणे) ८३,२०० कोटी रुपयांचा धनी आहे.

काय आहे बिटकॉइन?

बिटकॉइन हे एक आभासी चलन आहे. विविध देयकांसाठी (पेमेंट) ते एक विनिमय माध्यम म्हणून वापरले जाते. जागतिक स्तरावरील आभासी चलन विश्वातील ते पहिले चलन ठरले आहे. ३ जानेवारी २००९ मध्ये बिटकॉइन हे आभासी चलन म्हणून ओळखले जाऊ लागले. डॉलर, रुपया याप्रमाणे ते एक विनिमयाचे मात्र कोणत्याही वैधतेचे कोंदण नसलेले माध्यम आहे. व्यापारी, दुकानदार, कंपन्या अशा निवडक यंत्रणांची मात्र त्याला स्वीकृती आहे.

निर्माताही आभासीच

बिटकॉइन.ऑर्ग नावाच्या संकेतस्थळावर सॅतोशी नाकामोटोच्या नावाने एक लेख झळकला होता. त्यानंतर २००९ मध्ये सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ५० बिटकॉइनचे व्यवहार सुरू झाले. अर्थात तेही या उद्गात्याने सुरू केले, असे म्हटले जाते. हॅल फिन्नेने हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून त्याच दिवशी १० बिटकॉइन कमाविल्याचे मानले जाते. यानंतर या प्रक्रियेत सहभागी झालेला व नंतर बिटकॉइन फाऊंडेशन स्थापन करणाऱ्या गॅव्हीन अ‍ॅण्डरसनने ही प्रक्रिया विकेंद्रित केली. बिटकॉइन सर्वप्रथम कुणी जारी केले किंवा त्यामागे कोणता व्यक्तिसमूह होता, याबाबत कुठलीही वैध माहिती उपलब्ध नाही. मात्र काही ठिकाणी सॅतोशी नाकामोटो हे नाव आढळते. अर्थात ते व्यक्ती, कंपनी अथवा कुणा गटाचे आहे, यावर अद्याप स्पष्टता नाही.

संकलन : वीरेंद्र तळेगावकर