30 October 2020

News Flash

नैराश्यग्रस्तांचे ‘अच्छे दिन’ दूरच!

मंजिरीच्या वागण्यात बदल होत होता. तिच्या वागण्याचे कोडे घरच्यांना उलगडत नव्हते.

जगात सुमारे ३२ कोटी नैराश्यग्रस्त लोक असून त्यातील सात कोटी म्हणजे १८ टक्के लोक आजघडीला एकटय़ा भारतात आहेत.

देशात सुमारे चार हजार मानसोपचारतज्ज्ञ उपलब्ध असून रुग्णांची संख्या लक्षात घेता किमान ६६ हजार तज्ज्ञांची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. ऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीत मुंबई महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांमध्ये सर्वाधिक ३१ टक्के रुग्ण हे मनोविकारांशी संबंधित होते. वेगवेगळ्या कारणांमुळे आज विद्यार्थी, शेतकरी ते नोकरदार यांच्यात नैराश्य वाढत चालले आहे. या निमित्ताने या गंभीर विषयाचा घेतलेला वेध..

मंजिरीच्या वागण्यात बदल होत होता. तिच्या वागण्याचे कोडे घरच्यांना उलगडत नव्हते. वागण्यात सातत्य नव्हते. कधी निराशेच्या एका टोकाला असलेले मानसीचे एक रूप तर कधी अतिउत्साह, अतिखर्चीक आणि बेछूट आत्मविश्वासाने वागणे यामुळे आई-वडील चिंताग्रस्त झाले होते. शाळेतही शिक्षकांना तिच्या वागण्याचे कोडे उलगडत नव्हते. अखेर फॅमिली डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला. मानसीच्या तपासणीत तिला ‘बायपोलार मूड डिसऑर्डर’ (एकाच वेळी नैराश्य व अतिरेकी उत्साह) असल्याचे निदान झाले. योग्य उपचारानंतर थोडय़ा दिवसांनी मंजिरीचे वागणे सामान्य झाले. दुसरीकडे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होऊन हाताशी आलेला राजेश खचल्यासारखा दिसत होता. खाणे-पिणे कमी झाले होते. झोपही कमी झाली होती. दिवसेंदिवस निराश व हताश होऊन खचत चालल्याचे पाहून त्याचे पालक अस्वस्थ झाले. नैराश्यावस्थेकडे (डिप्रेशन) त्याचा सुरू असलेला प्रवास हा एक मानसिक आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले व उपचाराला सुरुवात केली. गेल्या दशकभरात भारतात नैराश्यग्रस्त मानसिक आजाराच्या रुग्णांचे प्रमाण चिंता करावी या वेगाने वाढत चालले आहे. मात्र उपचारासाठी पुरेसे मानसोपचारतज्ज्ञ देशात उपलब्ध नाहीत, हे चित्र असून नैराश्यग्रस्तांना ‘अच्छे दिन’ कधी येणार हा कळीचा प्रश्न बनून राहिला आहे.

भारतात वेगवेगळ्या कारणांमुळे मानसिक आजारांच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर केंद्र सरकार थोडय़ाफार प्रमाणात जागे झाले होते. या दुर्घटनेत वाचलेल्या अनेकांचे मानसिक खच्चीकरण होऊन त्यांना नैराश्याने ग्रासले होते. याबाबत तेव्हा काही तज्ज्ञ डॉक्टरांनी इशारेही दिले होते. भविष्यात अशा प्रकारच्या घटना अथवा नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्ती उद्भवल्यास मानसोपचारतज्ज्ञांची आवश्यकता भासणार असून त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मानसोपचार डॉक्टरांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर लातूर येथे किल्लारी आणि गुजरातमधील भूजच्या भूकंपानंतर उद्ध्वस्त झालेल्या अनेकांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांच्यावर मानसोपचार करण्याची गरज निर्माण झाली होती. हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब याचबरोबरीने नैराश्य हाही एक महत्त्वाचा आजार ठरला आहे. बदलती जीवनशैली, राहणीमानातील बदल, वाढती स्पर्धा, वाढते आयुर्मान, बेरोजगारी, अस्थिरता यातून मानसिक आजाराचे प्रमाण वाढू लागल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नैराश्य तसेच मानसिक अस्वस्थता यातून आत्महत्या करण्याच्या प्रमाणातही देशात मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून महाराष्ट्रातही आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रात गेल्या दशकात झालेल्या शेतकरीआत्महत्या हा चिंतेचा विषय असून गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही गेल्या पाच महिन्यांत एक हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून तीव्र नैराश्य हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या या आत्महत्या थांबविण्यासाठी आरोग्य विभागाने २०१५ मध्ये १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्य़ांमध्ये शेतकरी कुटुंबांसाठी मानसोपचाराची विशेष मोहीम हाती घेण्याचे जाहीर केले. याअंतर्गत ‘प्रेरणा प्रकल्पा’च्या माध्यमातून त्यानंतर या चौदा जिल्ह्य़ांमध्ये अशा कर्मचाऱ्यांकडून जवळपास २५ लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात गेल्या वर्षभरात एक लाखाहून अधिक शेतकरी व कुटुंबीयांवर मानसोपचार करण्यात आल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे. आरोग्य विभागाच्या १०४ क्रमांकावर ३७ हजार शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आला तर २३ जिल्हा रु ग्णालयांत प्रत्येकी दहा खाटा मानसिक उपचारासाठी राखीव ठेवून त्याच्या माध्यमातून उपचार केल्याचा दावा आरोग्य विभागाच्या डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांत सुमारे सात लाखांहून अधिकांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले तर सुमारे २३ लाख नैराश्यग्रस्त शेतकऱ्यांवर बाह्य़रुग्ण विभागात उपचार केल्याचा आरोग्य विभागाचा दावा आहे. प्रत्यक्षात आरोग्य विभागाकडेच मानसोपचारतज्ज्ञांची मोठय़ा प्रमाणात कमतरता असून उपचार केल्यानंतर त्यातील किती रुग्णांना नेमका काय फायदा झाला याची कोणताही माहिती आरोग्य विभागाकडे आज उपलब्ध नाही हे कटुसत्य आहे.  महाराष्ट्रात पाच मनोरुग्णालये असून ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि रत्नागिरी या चार मनोरुग्णालयांत मिळून एकूण ५६९५ खाटा आहेत. या चार मनोरुग्णालयांमध्ये २०१६-१७ मध्ये सुमारे तीन लाख ४० हजार मनोरुग्णांनी बाह्य़रुग्ण विभागात उपचार घेतले तर सुमारे आठ हजार रुग्ण दाखल होते. याशिवाय २३ जिल्हा रुग्णालयांमध्ये प्रत्येकी दहा खाटा मनोरुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असून तेथे सव्वा लाख मनोरुग्णांवर बाह्य़ रुग्ण विभागात उपचार करण्यात आले तर साडेसात हजार आंतररुग्णांवर उपचार केल्याचे आरोग्य विभागातील ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

देशातील जवळपास निम्मी लोकसंख्या ही महिलांची असून या महिलांच्या मानसिक आरोग्याकडे पाहण्यासाठी केंद्र अथवा राज्य शासनाकडे पुरेशी व्यवस्थाच नाही. आजघडीला देशात शासनाची ४३ मनोरुग्णालये असून जवळपास सहा कोटी लोकांना मानसिक आजारावरील उपचाराची आवश्यकता असल्याचे ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या अहवालातच नमूद करण्यात आले आहे. जगात सुमारे ३२ कोटी नैराश्यग्रस्त लोक असून त्यातील सात कोटी म्हणजे जागतिक नैराश्यग्रस्तांच्या १८ टक्के लोक आजघडीला एकटय़ा भारतात आहेत. यातील जवळपास ८० टक्के नैराश्यग्रस्तांना कोणत्याही प्रकारचे उपचार अथवा तपासण्याची व्यवस्थाच उपलब्ध नाही, ही गंभीर बाब आहे. आजघडीला भारतात सुमारे चार हजार मानसोपचारतज्ज्ञ उपलब्ध असून एकूण मानसिक रुग्णांची संख्या लक्षात घेता किमान ६६ हजार मानसोपचारतज्ज्ञांची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. मनोरुग्ण आणि त्या विषयातील डॉक्टर यांचे प्रमाण भारतात कायमच व्यस्त राहिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार दर लाख लोकसंख्येमागे किमान ५.६ एवढे डॉक्टरांचे प्रमाण असणे आवश्यक आहे. मात्र आपल्याकडे हे प्रमाण लाख लोकांमागे अवघे ०.०६ एवढेच आहे. त्याचप्रमाणे  जवळपास सव्वादोन लाख परिचारिकांची कमतरता भारतात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

दोन वर्षांपूर्वी भायखळा येथील शासनाच्या जे.जे. रु ग्णालयातील तज्ज्ञांच्या माध्यमातून एक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात महाराष्ट्रासह मुंबईकरांना मानसोपचाराची सर्वाधिक गरज असल्याचे दिसून आले. विविध प्रकारच्या मानसिक आजारांमध्ये महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून महाराष्ट्रात मुंबईचा क्रमांक पहिला लागतो. एकटय़ा मुंबईत ३८ हजार ५८८ व्यक्ती मानसोपचार घेत असल्याचे या सर्वेक्षणात नमूद केले आहे. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे उपचारच न घेणाऱ्यांची संख्या किती तरी मोठी असून जवळपास निम्म्याहून अधिक लोक मानसोपचारापासून आज संपूर्ण देशात वंचित आहेत.

  • भारतात सात कोटी लोक नैराश्यग्रस्त तर तीन कोटी ८० लाख चिंताग्रस्त.
  • नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ अ‍ॅण्ड न्युरोसायन्सेस, बंगलोर यांच्या २०१६ च्या अहवालानुसार देशातील १३.७ टक्के लोक मानसिक आजारी.
  • नैराश्यग्रस्त लोकांच्या संख्येत २००५ ते २०१५ दरम्यान १८.४ टक्के वाढ
  • कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे जवळपास ४२.५ टक्के नैराश्यग्रस्त
  • जवळपास ३८.५ टक्के लोक सहा तासांपेक्षा कमी झोपत असल्यामुळे नैराश्य, उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास
  • ३६ टक्के भारतीयांना आयुष्यात कधी तरी मोठय़ा नैराश्याचा सामना करावा लागला आहे.
  • भारतात चार हजार मानसोपचारतज्ज्ञ असून गरज ६६ हजार मानसोपचारतज्ज्ञांची आवश्यकता आहे.
  • भारतात आरोग्याच्या एकूण अर्थसंकल्पापैकी मानसिक आरोग्यावर ०.०६ टक्केच खर्च होतो जो बांगलादेशापेक्षा कमी असून बांगलादेशात ०.४४ टक्के खर्च होतो.
  • मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषध दुकानातून सर्रास मनोरुग्णांना औषधे दिली जातात.

 

नैराश्यावरील औषध विक्रीत १८ टक्क्यांनी वाढ!

भारतात मानसिक आजाराच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत असून २०३० पर्यंत जवळपास तीस टक्के भारतीयांना मानसिक आजाराचा त्रास होईल, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.  मानसिक आरोग्याला केंद्राने किमान कागदोपत्री महत्त्व दिले आहे. एकीकडे मानसिक रुग्णांची संख्या वाढत असताना या आजाराची वाढती बाजारपेठ लक्षात घेऊन अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मानसिक आजारांवरील औषधे बनविण्याकडे लक्ष वळवले आहे.

मानसिक आजारात नैराश्यग्रस्तांचे प्रमाण मोठे असून स्किझोफ्रेनिया म्हणजे दुभंगलेले व्यक्तिमत्त्व, मूड स्टॅबिलायझर ज्यात बायपोलर (नैराश्य आणि अतिरेकी उत्साह), चिंताग्रस्त असे वेगवेगळे प्रकार असतात. यासाठीची औषधेही वेगवेगळी असून गेल्या पाच वर्षांत मानसिक आजारावरील औषधांच्या बाजारपेठेत जवळपास १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते ही बाजारपेठ २२ ते २५ टक्के एवढी वाढली असून आकडेवारीच्याच भाषेत बोलायचे झाल्यास मार्च २०१८ मध्ये मानसिक आजारांवरील औषध विक्रीची उलाढाल ही सुमारे सात हजार कोटी रुपयांची झाली आहे. यात नैराश्यावरील औषधांच्या विक्रीचा वाटा खूपच मोठा म्हणजे १०५८ कोटी रुपयांचा असून आगामी काळात भारतात नैराश्यावरील औषधांच्या विक्रीत आणखी वाढ झालेली दिसेल, असे  ‘ओपीपीआय’ संघटनेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

गेल्या काही वर्षांत मानसिक आजारासाठी डॉक्टरांकडे जाण्याच्या प्रमाणात हळूहळू वाढ होत आहे. मानसोपचारतज्ज्ञाकडे जाणे याचा अर्थ वेड लागले असा समज गेल्या दशकापर्यंत रूढ होता. त्यात अलीकडच्या काळात मोठय़ा प्रमाणात बदल होत आहे. नोकरदार महिला तसेच वृद्धही आपल्या मानसिक प्रश्नांसाठी डॉक्टरांकडे जाणे पसंत करू लागले आहेत.  बदलत्या जीवनशैलीमुळे येणारी निराशा, चिंता, अस्वस्थता आदी कारणांसाठी आता सामान्य लोक डॉक्टरांकडे जाऊन मानसिक आजारावर उपचार घेताना दिसत असून या बदलाची दखल मनोविकारावर औषधे करणाऱ्या बडय़ा कंपन्यांनीही घेण्यास सुरुवात केली आहे. अर्थात या कंपन्यांच्या लेखी मनोविकारावरील औषधांचे मार्केट खूप मोठे असून अजूनही भारतात जवळपास ८० टक्के लोक नैराश्य अथवा मानसिक आजारावरील उपचारापासून कोसो दूर आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत मानसिक आजाराबाबत ग्रामीण भागातील लोकांमध्येही जागरूकता येत असून पूर्वी सायकोटिक आजारावर मंत्रिक-तांत्रिक तसेच बुवा-बाबांचे उपचार घेणारे आता मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारासाठी येऊ लागले आहेत असे प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप जाधव यांनी सांगितले.

सायकोटिकमध्ये संशय, झपाटल्यासारखे वागणे आदी लक्षणे असून लहान मुलांमध्ये चंचलता हाही एक मानसिक आजार दिसून येतो. या चंचल मुलांचे अभ्यासात लक्ष नसणे, हुशार असूनही मस्तीत वेळ घालवणे, एकाग्रतेचा अभाव असणे अशी लक्षणे असून यावर वेळीच उपाय केल्यास मुलांमध्ये निश्चित सुधारणा होऊ शकते, असेही डॉ. जाधव यांनी सांगितले. यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे अलीकडे इंटरनेटमुळे पालक अधिक हुशार झाले असून वैद्यकीय सल्ल्याशिवाय थेट औषध दुकानात जाऊन परस्पर मानसिक आजारावरील औषधे घेण्याकडे कल दिसतो. याला आळा घालणे अत्यंत आवश्यक असून अर्धवट ज्ञानावर अथवा औषध विक्रेत्याच्या सल्ल्याने औषध घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, असेही डॉ. जाधव म्हणाले.

मानसिक आजारावरील औषध बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने सनफार्मा, इंटास फार्मा, टोरेंट फार्मा, अलकेम, ल्युपीन, अरीवा लाइफ सायन्सेस, फायझर, अ‍ॅबेट इंटरनॅशनल, सीप्ला, वॉखार्ट आणि युनिकेम यांचा समावेश आहे. नैराश्यावरील एससीटालोप्राम, डेसव्हेनफ्लॉक्सिन, व्हेनलाप्रॅक्झीन, अ‍ॅमीट्रिप्लिन, पॅरोक्झीटीन ही प्रमुख औषधे आहेत. नैराश्यावरील औषधांची २०१८ मध्ये १०५८ कोटी रुपयांची उलाढाल झाली असून मानसिक आजारावरील औषधांची ही बाजारपेठ वाढतच जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2018 1:59 am

Web Title: what is mental illness
Next Stories
1 आरोग्य सेवेचे खासगीकरण कुणाच्या भल्यासाठी?
2 मित्रहो, बोलते व्हा..
3 डॉ. आंबेडकर आणि ‘ग्रामस्वराज्य’
Just Now!
X