संसदेवर हल्ला करण्यासाठी ज्या गाडीचा वापर करण्यात आला त्या गाडीमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट का झाला नाही, हा प्रश्न अफझल गुरूला अखेपर्यंत भेडसावत होता, असे तिहार कारागृहाच्या अधीक्षकांनी आपल्या १८० पानांच्या हस्तलिखितामध्ये म्हटले आहे.
संसदेवर डिसेंबर २००१ मध्ये करण्यात आलेला हल्ला यशस्वी झाला असता तर दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला असता आणि सरकारशी चर्चा करण्याची तयारी केली असती, असेही गुरूने म्हटल्याचे मनोज द्विवेदी या तिहार कारागृहातील तीन क्रमांकाच्या कोठडीच्या अधीक्षकांनी म्हटले आहे. सदर हस्तलिखित हे सहा प्रकरणांचे असून त्याची सुरुवात प्रत्यक्ष हल्ल्याने करण्यात आली आहे. पहिल्या प्रकरणात १३ डिसेंबर रोजी घडलेल्या सर्व घडामोडींचे वर्णन आहे. अफझल गुरूला पोलिसांनी प्रत्यक्ष पकडले तेथे हे हस्तलिखित समाप्त करण्यात आले आहे.
गाडीमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होईल, याबद्दल त्याला खात्री होती. हल्ल्याच्या आधीच्या रात्री बॉम्ब आणि स्फोटकांनी भरलेली गाडी पोलिसांच्या समोरच उभी करण्यात आली होती. ती चोरीला गेली असावी, अशी भीती गुरूने व्यक्त केली. मात्र या गाडीचा तपास करावा, असे कोणत्याही पोलिसाला वाटले नाही, ही आश्चर्याची बाब आहे. आजमितीपर्यंत गाडीतील त्या बॉम्ब आणि स्फोटकांचा स्फोटच का झाला नाही त्याबद्दल गुरूच अनभिज्ञ होता. हल्ला यशस्वी झाला असता तर चर्चा कोणत्या व्यक्तींशी करावयाची याची तयारीही त्यांनी केली होती, असे द्विवेदी यांनी हस्तलिखितामध्ये म्हटले आहे. मात्र तिहार प्रशासकांनी द्विवेदी यांना हे हस्तलिखित प्रकाशित करण्यास मज्जाव केला होता. मार्च २००० ते डिसेंबर २०१० या कालावधीत आपण स्वत: अफझल गुरूशी जवळपास २०० तास संभाषण केले त्यावरून हे हस्तलिखित तयार करण्यात आले आहे, असे द्विवेदी म्हणाले. यापैकी एका प्रकरणात द्विवेदी यांनी अफझलच्या बालपणाचे वर्णन केले असून तो पाकिस्तानात कसा पोहोचला तेही स्पष्ट केले आहे. अफझल पाकिस्तानात का गेला आणि दहशतवादी प्रशिक्षण का घेतले, तेही द्विवेदी यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. मात्र आपला वापर करून घेण्यात आल्याचा साक्षात्कार त्याला भारतात परतल्यावर झाला आणि त्याने पूर्वीचे सर्व विसरून सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगण्याचे ठरविले. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षांचा अभ्यासक्रमही त्याने पूर्ण केला. इतकेच नव्हे तर आयईएसची परीक्षाही देण्याची तयारी केली होती, असे द्विवेदी यांनी म्हटले आहे.
गुरू हा मूळचा ब्राह्मण कुटुंबातील असून त्याच्या पूर्वजांनी इस्लामचा स्वीकार का केला आणि तो राष्ट्रविरोधी शक्तींकडे का परतला त्याची कारणेही या पुस्तकात आहेत. एक प्रकरण पूर्णत: अफझल याच्यावर बेतलेले आहे. स्फोटके, आरडीएक्स आणि चिनी बनावटीचे पिस्तूल त्यांना कसे मिळाले आणि ते का पकडले गेले नाहीत. त्यांनी दिल्लीत वास्तव्य मिळविण्यासाठी काय केले. ज्यांनी संसद आणि परिसराची रेकी केली ते भारतीय नव्हते आणि त्यांना भारतामधील कोणतीही भाषा येत नव्हती, असेही द्विवेदी यांनी म्हटले आहे.