‘हिंदू तितुका मेळवावा’ अशा प्रकारे मतविभागणी टाळण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या मनसेमुळे झालेले मतविभाजन दिसते आहे. ‘टाळी’ची भाषा सुरू होण्याअगोदरच राज यांच्या साथीसाठी गेल्या दीड वर्षांपासून भाजपचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत..

सुमारे दीड वर्षांपूर्वी, ३० डिसेंबर २०११ या दिवशी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची मुंबईतील संघाच्या मुख्यालयात भेट घेतली. गेल्या आठवडय़ात मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड झालेले आशीष शेलार हे त्या वेळी मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. शेलार विद्यार्थी परिषदेचे काम करीत होते, तेव्हा राज ठाकरे शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचे नेते होते. सरसंघचालकांना कधीतरी भेटावे असे राज ठाकरेंच्या खूप मनात होते. तसे त्यांनी आशीष शेलार यांच्याकडे अनेकदा बोलूनही दाखविले होते आणि ३१ डिसेंबर २०११ला शेलारांनी या भेटीचा योग घडवून आणला. त्या वेळी कोणत्याही राजकीय मुद्दय़ावर चर्चा झाली नाही, मात्र संघाचे काम कसे चालते, शाखा म्हणजे काय, संघटनात्मक फळीची रचना अशा काही शंका राज ठाकरे यांनी सरसंघचालकांकडून समजावून घेतल्या असे नंतर सांगितले गेले. तरीही प्रसार माध्यमांच्या भुवया या भेटीनंतर उंचावल्याच. राज ठाकरे आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीत काहीच घडले नाही असे सांगितले गेले तरी आपापल्या परीने ‘आतली माहिती’ काढण्यासाठी सगळे कामाला लागले आणि चर्चेचा एक धागा माध्यमांच्या हाती लागलाच.. ‘राजकीय पक्ष कोणताही असो, आपापल्या परीने प्रत्येकाने हिंदुत्वासाठी काम करीत राहिले पाहिजे’, असा सल्ला याच भेटीत मोहन भागवत यांनी राज ठाकरेंना दिला, ही बातमी लपून राहिली नाही. जवळपास पाऊण तासांची ही भेट आटोपून राज ठाकरे तेथून बाहेर पडले, तेव्हा भागवत यांनी भेटीदाखल दिलेले, द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे ‘विचारधन’ राज ठाकरे यांच्या हातात होते..
या घटनेला आता दीड वर्ष उलटले आहे. जनतेची स्मरणशक्ती दीर्घकाळ टिकत नसते, यावर राजकारण्यांचा विश्वास असतो असे म्हणतात. सत्ताधीशांनी दिलेली आश्वासने आणि केलेल्या घोषणा तात्पुरत्या गाजल्यानंतर कालांतराने त्या विस्मृतीतही जातात. तसे होणार याविषयी सत्ताधारी नि:शंक असतात. पण राजकारणात काहीतरी करून दाखविण्याच्या ईष्र्येने शिवसेनेतून बाहेर पडून स्वत:चा पक्ष स्थापन करणाऱ्या राज ठाकरे यांच्याबद्दल मात्र तसे झालेले नाही. राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यापासूनच्या अनेक घोषणा, दिलेली आश्वासने आणि जनतेसमोर उभी केलेली सारी स्वप्ने अजूनही जनतेच्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी ताजी आहेत. म्हणूनच, महाराष्ट्राच्या विकासाचा मुद्दा येतो, तेव्हा मनसेची विकासाची ‘ब्लू प्रिंट’ कुठे आहे, असा प्रश्न आजही राज ठाकरे यांना हमखास केला जातो. कारण विकासाची ‘ब्लू प्रिंट’ तयार करण्याची राज ठाकरे यांची घोषणा अन्य राजकीय नेत्यांच्या घोषणांप्रमाणे जनतेच्या आठवणीतून पुसली गेलेली नाही. त्यामुळेच, राज ठाकरे यांच्याकडून, त्यांच्या पक्षाकडून जनतेच्या अपेक्षा अजूनही पहिल्याइतक्याच ताज्या आहेत. अपेक्षापूर्ती किंवा अपेक्षाभंगाचा अनुभव घेण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दिली गेली पाहिजे. राज ठाकरेंच्या पक्षाकडे सत्ता नसल्याने, अपेक्षापूर्तीचे समाधान त्यांच्याकडून जनतेला मिळालेले नाही, पण अपेक्षाभंगाचा ठपकाही त्यांच्यावर ठळकपणे ठेवता येत नाही.
अशा परिस्थितीत सापडलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाची जबाबदारी साहजिकच वाढलेली असते. जनतेच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत, या जाणिवेचे ओझे वाहणे त्या राजकीय पक्षाच्या नेत्यासाठी वाटते तितके सोपेही नसते. त्यात, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष म्हणजे राज ठाकरे यांचा एकखांबी तंबू असल्याने अपेक्षांचे हे ओझेदेखील त्यांना एकटय़ालाच वाहावे लागणार आहे, हे स्पष्टच आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांचे बोट धरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत अनेक जण दाखल झाले. त्यापैकी काहींना आमदारकी मिळाली, काही जण नगरसेवकही झाले, नाशिकसारख्या महापालिकेत सत्ताही मिळाली तर काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसेला डावलून सत्ताकारण करता येणार नाही अशी ताकदही पक्षाला मिळाली. तरीही, राज ठाकरे हाच संपूर्ण राज्यातील मनसेचा एकमेव चेहरा राहिला. पक्षाची सारी सूत्रे आपल्या हाती ठेवण्याच्या उद्देशातून हे घडू शकते किंवा स्थानिक पातळीवर पक्षाची प्रतिमा भक्कमपणे उभी करील, असा सक्षम नेता नसल्यामुळे असे होऊ शकते. मनसेमध्ये यापैकी नेमके कोणते कारण आहे, हे जनताही जाणते. पण या परिस्थितीमुळे पक्षातील त्याच त्या कार्यकर्त्यांची स्थिती अढीत पिकत घातलेल्या आंब्यांसारखी असते. वेळीच लक्ष न दिल्यास, अतिउबेमुळे आंबे नासू लागतात आणि नासके आंबे वेळीच बाजूला न केल्यास सर्वच आंबे नासण्याची भीती असते. मनसेमध्ये आताशी नासके आंबे वाढू लागल्याचे राज ठाकरे यांच्याच लक्षात आल्याने, राजकारणाचा बाज बदलण्याची अपरिहार्यता कदाचित त्यांना प्रकर्षांने जाणवू लागली असावी, असे मानले जाते.
नेमकी हीच वेळ साधून, राज ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युतीसोबत यावे यासाठी आग्रही असलेली भाजप पुन्हा सक्रिय झाली आहे, हा केवळ योगायोग मानता येणार नाही. हिंदू तितका मेळवावा, अशाच उद्देशाने समाजकारण करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भाजपवर पकड आहे, हे आता कोणीही नाकारत नाही. भाजपची राजनीती कशी असली पाहिजे, भाजपने कोणत्या वेळी कोणती खेळी केली पाहिजे, हे सारे संघाच्या तंबूत ठरते आणि भाजपमधील कोणाही नेत्याचे पाऊल त्याला आखून दिलेल्या मार्गाबाहेर पडले, तर त्याला पुन्हा त्याचा नेमका मार्ग दाखविण्याचे कामही संघच जबाबदारी समजून पार पाडतो, हेही अलीकडच्या घडामोडींवरूनच स्पष्ट झाले आहे. भाजपप्रणीत रालोआमधील घटक पक्षांना पचणार नाही याची स्पष्ट जाणीव असतानादेखील, कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या हाती आगामी निवडणुकांच्या प्रचाराची सारी सूत्रे सोपविण्याचा निर्णय भाजपने घेतला, हा एका रात्रीत झालेला निर्णय नाही. मोदी यांच्या निवडीअगोदरच्या अनेक घटना पाहता, भाजपनेदेखील काही आडाखे बांधून परिणामांची पूर्वतयारी केली होती, हे सहज लक्षात येऊ शकते. राज ठाकरे यांच्या पक्षाने महायुतीसोबत यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचे सुरू असलेले प्रयत्न हा त्याचाच एक आखणीबद्ध भाग असू शकतो, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. गोपीनाथ मुंडे यांनी ही इच्छा पहिल्यांदा जाहीरपणे बोलून दाखविली, तो प्रतिक्रिया अजमावण्याचाच एक भाग होता. त्या वेळी शिवसेना किंवा राज ठाकरे यांच्याकडून तीव्र विरोधाच्या प्रतिक्रिया उमटल्या नाहीत, त्यामुळे या इच्छेला खतपाणी घालण्यायोग्य वातावरण असल्याचा अंदाज आला आणि भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. विनोद तावडे यांनी तर एकदा राज ठाकरे यांना पक्षाच्या प्रदेश कार्यालयात नेले आणि तेथे चहापाण्यासोबत गप्पाही रंगल्या. शिवसेनेतील याबद्दलच्या प्रतिक्रियांचा अंदाज घेणे हाच त्यामागील उद्देश होता. नितीन गडकरी यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडल्यानंतर राज ठाकरे यांच्या घरी जाऊन दीर्घ गप्पा मारल्या. राजकारणात गप्पा आणि चर्चा यांमध्ये नेमका फरक असतो. गडकरींनी त्या दिवशी चर्चा केली नाही, तर गप्पा मारल्या, याकडे भाजप वर्तुळातून जाणीवपूर्वक लक्ष वेधले गेले. त्यानंतरही भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी होतच राहिल्या. राज ठाकरे यांची सरसंघचालकांशी भेट घडवून आणणारे आशीष शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष झाल्यानंतर युतीचा सहभागी पक्ष असलेल्या शिवसेना नेत्यांआधी, राज ठाकरे यांनाच भेटावयास गेले.
भेटीगाठींतून वातावरणनिर्मितीच्या या गदारोळातच, उद्धव ठाकरे यांच्या टाळीचा मुद्दा पुढे आला. राज ठाकरे यांच्याकडून मात्र फारसा प्रतिसाद न मिळाल्याने, शिवसेना आणि मनसे यांचे निवडणुकीचे राजकारण फारसे जमणार नाही याचा अंदाज भाजपला आला असावा. याच काळात आता, संघाचा हिंदूुत्ववादी चेहरा असलेले नरेंद्र मोदी यांची पक्षाच्या प्रचार प्रमुखपदी निवड झाली आहे. रालोआची पडझडही सुरू झाली. पण लोकसभा निवडणुकीत त्यावर मात करण्याचा संघाचा आग्रह आहे. राज ठाकरे हे नरेंद्र मोदींचे कट्टर चाहते आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशासाठी महाराष्ट्राचे ४८ मतदारसंघ भाजपला खुणावताहेत. २००९च्या निवडणुकीत भाजपने २५ जागा लढविल्या, पैकी नऊ पदरात पडल्या. शिवसेनेला २२ पैकी ११ जागांवर विजय मिळाला. पराभव झालेल्या अनेक जागा मनसेच्या उमेदवारांमुळे गमवाव्या लागल्या, हे त्या निकालांवरून स्पष्ट दिसते. याच निवडणुकीत मनसेनेदेखील ११ जागा लढविल्या, पण विजय कोठेही नाही. सेना-भाजपला काही जागांवर मनसेमुळे झालेल्या मतविभागणीचा फटका बसला, तसा मनसेच्या दोन जागांनाही सेनेच्या उमेदवारीमुळे मतविभागणीचा फटका बसला. आगामी निवडणुकीत मनसे पुन्हा नव्या ताकदीनिशी उतरेल, तेव्हा राज ठाकरे यांना मागील निवडणुकीच्या या निकालांचे संदर्भ लक्षात घ्यावेच लागतील. महाराष्ट्राच्या राजकारणाची त्यांची नीती स्वतंत्र असली, तरी राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळविण्यासाठी संख्याबळच आवश्यक असते, याचेही भान त्यांना ठेवावे लागेल. महाराष्ट्रातील एक भक्कम मतपेढी सेना-भाजप-मनसे यांच्यात विभागली गेली आहे. त्या निवडणुकीत सेनेला राज्यभरातून ६२.८८ लाख मते मिळाली होती, तर मनसेला १५.०४ लाख मते मिळाली होती. मतविभागणीमुळे होणारे नुकसान टाळण्यावर महाराष्ट्रात मोदी यांचा भर राहणार हे स्पष्ट आहे. राज ठाकरे यांच्या पक्षाकडून जनतेच्या अपेक्षा अजूनही ताज्या असल्याने त्यांचा करिश्म्याचा फायदा मिळविण्याचे प्रयत्न भाजपकडून होणार हेही स्पष्ट आहे. गेल्या चार वर्षांत लढविलेल्या वेगवेगळ्या निवडणुकांत राज ठाकरे यांनी काय कमावले त्याची मूठ अजूनही झाकलेलीच आहे. ती सव्वा लाखाची, नव्हे तर दीड लाखाची आहे, असे भाजपला वाटते. ही झाकली मूठ दीड लाखाची आहे, हे राज ठाकरेंना समजावण्यासाठीच दीड वर्षांपासून सुरू झालेले प्रयत्न वेगवान करणे ही भाजपसाठी काळाची गरज ठरणार आहे.