महिलेला हे जमेल का, अशा शंकेतून तिला महत्त्वाच्या कामापासून दूर ठेवले जाते. महिलेलाही चांगले प्रशिक्षण मिळाले, तिला संधी दिली तर ती निश्चितच त्यात यशस्वी होईल. महिला म्हणून अधिकारपदावर नियुक्ती झाल्यानंतर आपले काम ठोसपणे करणे आवश्यक असते. अशा वेळी तुम्ही समस्त महिला वर्गाचे प्रतिनिधित्व करीत असल्याचे भान ठेवावे लागते. त्यात आपण अयशस्वी झालो तर केवळ आपल्यालाच नव्हे, तर महिला वर्गालाच दूषणे दिली जाण्याचे ओझे सतत वागवावे लागते.

प्रशासनात महिलांना उज्ज्वल भविष्य

महिला सक्षमीकरण आता एका दिवसापुरते मर्यादित राहिलेले नाही. बैलपोळ्याप्रमाणे एक दिवस महिला दिन साजरा करण्यापेक्षा वर्षभर आचरणातून महिलांबाबत न्याय्य भूमिका घ्या आणि समानतेची संधी द्या, हीच महिलांची अपेक्षा असते. समाज आणि पुरुष सहकारी ‘स्त्री अधिकारी’ म्हणून आपली अदृश्य परीक्षा घेत असतात. मात्र एकदा ही कसोटी पार केली की तोच समाज आणि सहकारी आपल्यासोबत राहतात. गेली २२ वर्षे प्रशासनात विविध ठिकाणी काम करताना हिला हे जमणार आहे का, अशा शंका कुशंकांचा सामना करावा लागला. उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले तेव्हा एक महिला, तीही उपजिल्हाधिकारी हे लोकाना रुचले नव्हते. अमरावतीत पालिका आयुक्तपदी बदली झाली तेव्हा तर महापालिकेत महिला अधिकाऱ्याला कसे जमणार म्हणून नियुक्तीचा फेरविचार करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला. काही ठिकाणी तर महिला अधिकारी आहे ना, मग त्यांना कसेही फसवू शकतो किंवा कारवाई रोखू शकतो म्हणून लोक रडण्याची नाटकं करीत. मात्र कर्तव्यापासून कधीच ढळले नाही. त्यामुळेच आधी बाईमाणसाला कितपत जमेल अशी शंका घेणाऱ्या मंत्र्यांनाही जाहीरपणे दाद द्यावी लागली. आधीच्या काळात प्रशासनातील महिलांना सन्मानासाठी खूप संघर्ष करावा लागत असे. मात्र आता परिस्थिती बदलली असून काम करण्यासाठी महाराष्ट्रासारखे दुसरे चांगले राज्य नाही. प्रशासनात महिलांचे भविष्य उज्ज्वल आहे.

मनीषा म्हैसकर, सचिव, नगर विकास

भारतीय शिक्षण सेवासारखे केडर हवे!

आजची आकडेवारी पाहिली तर ती फारच निराशाजनक आहे. शिक्षण क्षेत्रात विविध पदांवर ६१ टक्के पुरुष आणि ३९ टक्के महिला असल्या तरी त्यापैकी फक्त १.३ टक्के महिला प्राध्यापकपदापर्यंत पोहोचल्या आहेत. महिलांनाही प्रशिक्षणाची गरज असून त्यासाठी आयएएस, आयपीएसप्रमाणे शिक्षणासाठीही ‘भारतीय शिक्षण सेवा’ असे केडर हवे. या मार्गातून अनेक महिलांना चांगले प्रशिक्षण मिळून त्या थेट सेवेत नियुक्त होऊ शकतात. देशातील अनेक विद्यापीठांपैकी ४०० विद्यापीठे ही अनुदानित आहेत. परंतु यापैकी फक्त १३ विद्यापीठांमध्ये महिला कुलगुरु आहेत. त्यापैकी सहा तर महिला विद्यापीठे आहेत. देशभरातील कुलगुरुंपैकी तीन टक्के  कुलगुरूही महिला नाहीत. किंबहुना उच्च पदावर बऱ्याच वेळा महिलेला डावलले जाते. अशा पदांवर नियुक्ती करण्यासाठी जी समिती असते त्यावर पुरुषांचे प्राबल्य असते. अशा समितीची एखादी महिला अध्यक्षा असेल तर महिलेला न्याय मिळतो.

डॉ. वसुधा कामत, कुलगुरू, एसएनडीटी विद्यापीठ

नोकरीत कधीही सवलत मागितली नाही

पोलीस दलात आपण स्वेच्छेने आलो. त्यामुळे आपण महिला आहोत, असे सांगत कधीही सवलत मागितली नाही. उलट माझे काम निष्ठेने केले.  सुरुवातीला नियुक्ती होते तेव्हा आपले वरिष्ठ कोण असतात, यावर बरेच काही अवलंबून असते. मला सुरुवातीला वरिष्ठ म्हणून महिला अधिकारीच होत्या. त्यांनी महिला म्हणून मला कुठलीही सवलत घेऊ दिली नाही. किंबहुना ज्या ठिकाणी इतर पुरुष काम करू शकतात त्या ठिकाणी त्यांनी जाणूनबुजून मला पाठविले. त्यावेळी मला राग यायचा. परंतु त्यामागील त्यांची भूमिका मला नंतर समजून आली. एवढे केल्यानंतर जेव्हा सुटीचा दिवस असेल तेव्हा याच महिला अधिकाऱ्याने आस्थेने जेवणही देऊ केले. समस्त महिला वर्गाची प्रतिनिधी म्हणून माझ्यावर जबाबदारी होती.  या प्रत्येक प्रवासात भेटलेले पुरुष वरिष्ठ अधिकारीही खूप चांगले होते. महिला अधिकारी संवेदनाक्षम असते. त्यामुळे गुन्ह्य़ांची विशेषत: महिलेशी संबंधित गुन्ह्य़ाची उकल करताना खूप फायदा होतो. सॅनिटरी नॅपकीन व्हेिडग मशिनसारख्या चांगल्या योजनांसाठी पुरुष अधिकारीही मदत करतात, असा आपला अनुभव आहे.

डॉ. रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा

पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली

जगात दोनच ठिकाणी नॅशनल फायर सव्‍‌र्हिस कॉलेज आहेत. त्यामध्ये एक लंडनमध्ये तर दक्षिण आशियामधील एकमेव असे नागपूरचे नॅशनल फायर सव्‍‌र्हिस कॉलेज. १९५६ साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयात, तब्बल ४६ वर्षांनंतर २००२ या वर्षांत प्रवेश घेणारी आणि हा अभ्यासक्रम पूर्ण करणारी मी पहिलीच महिला. महाविद्यालयात ‘वर्दी पहनना है’ या एकाच कल्पनेने आम्ही भारावून गेलो होतो.  तुला हे जमणार नाही, तू दुसऱ्या क्षेत्राकडे वळ असे सांगत अनेकांनी संभावना केली. अग्निशमन अधिकारी होताना अगदी महाविद्यालयात प्रवेश घेण्यापासून अधिकारी होईपर्यंत पदोपदी बाईपणाची जाणीव करून दिली जात होती. म्हणूनच या सेवेतील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढण्याचा निर्धार केला. महिला म्हणून कधीच कसलीही सवलत घेतली नाही किंवा कुठेच खच खाल्ली नाही. आपल्या एका चुकीमुळे महिला वर्गाची मान खाली जाणार नाही याची सतत दक्षता घेतली आणि संधी मिळाली तर महिला काहीही करू शकते,  हे दाखवून दिले.

हर्षिणी कान्हेकरदेशातील पहिली महिला अग्निशमन अभियंता