पत्रकार व संगीत समीक्षक रामकृष्ण बाक्रे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू असून त्याची सांगता  येत्या १३ जुलै रोजी होत आहे. त्या निमित्त त्यांच्या कार्याची ओळख..

पत्रकार व संगीत समीक्षक असे दुहेरी व्यक्तिमत्त्व असलेले रामकृष्ण (तात्या) धोंडो बाक्रे आज हयात असते तर १३ जुलै रोजी १०० वर्षांचे झाले असते. प्रत्यक्षात त्यांच्या वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी इहलोक सोडला. कालौघात त्यांची स्मृती पुसट होत जाणे साहजिक आहे. तथापि वयाने थोडे अधिक असणाऱ्या बऱ्याचशा पत्रकारांना त्यांची आठवण ताजी असेल. तीच गोष्ट शास्त्रीय संगीतातील गायकांच्या बाबतीतही म्हणता येईल. आजही त्यातील कित्येक गायक उमेदीतील आहेत.

sanjay raut
“मी त्याचक्षणी राजकारणासह पत्रकारिता सोडेन”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार नेमकं काय म्हणाले?
marathi actress Amruta Subhash and sandesh kulkarni Love story Entdc
पहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी
Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding Photos Out
पिवळी नऊवारी, सातफेरे अन्…; पूजा सावंतच्या लग्नाचा मराठमोळा थाट, अभिनेत्रीने शेअर केले विवाहसोहळ्यातील खास क्षण
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !

रामकृष्ण बाक्रे यांच्या जीवनाचा आणखी एक पैलू म्हणजे ते भूमिगत स्वातंत्र्यसैनिक होते. सानेगुरुजींच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी ते एक. काही काळ ते मुंबईचे राष्ट्र सेवादल प्रमुखही होते. यामुळे समाजवादी कार्यकर्त्यांमधील एस्. एम्. जोशी, ना. ग. गोरे, मधू दंडवते, मृणालिनी गोरे आदींशी त्यांची घनिष्ठ मैत्री.  एस्. एम्. जोशी यांचे गाजलेले आत्मवृत्तपर पुस्तक ‘मी एस्. एम्’ हे बाक्रे यांनी त्यांच्या पाठीमागे लागून लागून, त्यानी सांगितलेल्या हकीगती जुनी वृत्तपत्रे काढत कालक्रमाशी जुळवून घेत घेत शब्दांकित केले. म्हणून ते प्रसिद्धीपर्यंत पोहोचले. साधना साप्ताहिकांतही कित्येक वर्षे ते स्तंभ लेखन करीत.

रामकृष्ण बाक्रे हे माझे चुलते. माझे वडील लहानपणीच वारल्याने माझ्या आई भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर पडली. माझे हायस्कूल शिक्षण तर ठाण्याला त्यांच्या घरी राहूनच झाले. त्यामुळे त्यांच्या या साऱ्या जीवनपैलूंची मला ओळख जवळून झाली. त्यांच्या शिक्षण काळातील आयुष्याचा बराचसा भाग मात्र आम्हाला गूढ राहिला. त्यांचा जन्म, लहानपण पंढरपुरातील. वडील कट्टर सनातनी. व्यवसायाने पुराणिक. अयाचितवृत्तीने पुराणापुढे येईल त्यावर गुजराण. मिळकत बेताचीच. तथापि वडिलांना आपल्या मुलाने आपली गादी पुढे चालवावी ही इच्छा. आधुनिक काही शिकायला मिळणार नाही, हे त्या वयातही रामकृष्ण यांना जाणवले. घरातील व एकूण समाजातील वातावरण याचा त्यांना उबग आला असावा व ते सरळ घरातून पळून गेले. पुण्याला येऊन त्यावेळच्या इतरांप्रमाणे माधुकरी मागून व कोणाकोणाच्या आश्रयाने त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण बी. ए. टी. डी. (टीचर्स डिप्लोमा) पूर्ण केले. पण या काळात ते कोठे राहिले, काय हाल सोसले इत्यादी तपशील शेवटपर्यंत त्यांनी आम्हा कोणालाच काय, पत्नीलाही कधी मोकळेपणाने सांगितला नाही. आधीच्या पंढरपुराच्या वास्तव्यात मात्र वडिलांनी त्यांना काही काळ शास्त्रीय गायनाच्या वर्गात घातले होते. कीर्तनाला उपयोगी पडेल म्हणून थिटेबुवा्रंचा तो क्लास होता. तेथे पुढे नामवंत सिने-नाटय़-अभिनेत्री झालेल्या शांता आपटे त्यांच्या सहाध्यायी होत्या. ही शिदोरी मात्र त्यांना संगीत समीक्षक म्हणून नाव मिळवायला उपयोगी पडली. संगीत समीक्षा लिहिणारे मराठीतील पहिलेच पत्रकार ठरले. अनेक गायकांची त्यांची वैशिष्टय़े सांगणारी चरित्रे रसाळ भाषेत लिहिली. त्यांची अनेक पुस्तके ‘बुजुर्ग, भिन्नषड्ज, सुरीले’ इत्यादी प्रसिद्ध आहे. या त्यांच्या व्यासंगातून अनेक नामवंत शास्त्रीय गायकांशी घनिष्ठ मैत्री झाली. थोडीच नावे सांगतो. कुमार गंधर्व, किशोरी अमोणकर, सुरेश हळदणकर, श्रुती सडोलीकर व त्यांचे वडील गायक वामनराव, देवकी पंडित, प्रभाकर कारेकर, पद्मा सुरेश तळवलकर इत्यादी. प्रसिद्ध संगीत समीक्षक घरंदाज गायकी या पुस्तकाचे लेखक वामनराव देशपांडे हे तर माझ्या विवाह संबंधातून त्यांचे व्याहीच झाले. रामकृष्ण बाक्रे यांना एकच कन्या वीणा. श्रीकांत देशपांडे हे तिचे पती गायक नाही, पण रसिक दिलदार श्रोते आहेत. सध्या ही मंडळी सिडनी येथे ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहेत. तिकडे जाणाऱ्या कित्येक गायकांचे ते तेथे आधारस्थान आहेत. त्यांच्या कन्या-जावयांनी मुंबईत रामकृष्ण बाक्रे यांचा पंचाहत्तरी समारंभ आयोजित केला होता. इतर अनेक मित्र गाणारे होते. किशोरीताई आमोणकरांना आमंत्रण होते. पण नावाचा इतका दबदबा असणाऱ्या गायिकेला गायक म्हणून कसे बोलवावे, त्यांची व्यवस्था आपण कशी सांभाळू म्हणून त्यात त्यांचे नाव नव्हते. किशोरीताईंना हे कळल्यावर त्या रागावल्या. माझ्या भावासारखा तो. माझे गाणाऱ्यात नाव असू दे असे म्हणाल्या आणि त्या अनौपचारिकपणे तेथे गायल्या. असे ते हृद्य नाते!

बाक्रे यांची व्यावसायिक सुरुवात मात्र हायस्कूलमधील शिक्षक म्हणून झाली. त्यावेळी ते राष्ट्र सेवादलाचेही कार्यकर्ते होते. सानेगुरुजींनी काढलेल्या कर्तव्य या दैनिकातही काही काम बघत असत. त्यावेळी सेवादल कार्यकर्ती सुशीलाताई जोशी यांच्याबरोबर विवाह झाला. त्या काळात जातीतल्या जातीत प्रेमविवाह जमला तरी घरच्यांची माथी भडकत. (बहुधा आम्हाला न विचारता हे काय म्हणून अशी एकूण समाजाची वृत्ती होती.) पुढे त्यावेळच्या लोकमान्य या दैनिकात त्यांची नोकरी सुरू झाली. पां. वा. गाडगीळ त्याचे संपादक. ते नेहरू व काँग्रेसप्रेमी. परंतु ते पत्र एकांगी होऊ नये म्हणून रामकृष्ण बाक्रे या समाजवादी कार्यकर्त्यांला आपणहून त्यांनी बोलावून घेतले.

चांगले चाललेले हे वृत्तपत्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत गुजराथी मालकाने आकसाने बंद केले. पुढे त्याचा त्यांना पश्चात्ताप झाला ही गोष्ट वेगळी. लोकमान्यात काम करीत असताना मुंबई परिसरात खूप मोठे वादळ झाले. सर्व तऱ्हेची वाहतूक बंद पडली. त्यावेळी आपल्या कर्तव्यनिष्ठेपायी (पेपर एक दिवस बंद पडू नये म्हणून) बाक्रे त्यावेळी ठाणे येथे राहत असत तेथून ते चालत फोर्टमधील ऑफिसमध्ये पोहोचले. पुढे या त्यांच्या पत्रकारितेच्या निष्ठेपायी मुंबई पत्रकार संघाने त्यांना आचार्य अत्रे यांच्या नावे असलेले पारितोषिक दिले होते.

आयुष्याच्या उत्तरकाळात ते दैनिक नवाकाळचे अग्रलेख लिहीत. तसेच आधी सांगितल्याप्रमाणे एस्. एन्. डी. टी.मध्ये अंशकालीन पत्रकारिता विद्येच्या त्यांनीच आखलेल्या अभ्यासक्रमाचे व्याख्याता व संयोजक म्हणून काम करीत. यातले अनेक विद्यार्थी आज पत्रकार म्हणून नावारूपाला आले आहेत.

 – अ. वि. बाक्रे