अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सुवर्णमहोत्सवी अधिवेशन २४ ते २६ डिसेंबर या काळात मुंबईत होत आहे. यानिमित्ताने या संघटनेच्या कार्याचा आढावा..

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना होऊन ६६ वष्रे होऊन गेली. भारतातील सामाजिक चळवळींच्या कुठल्याही निरीक्षकाला विद्यार्थी परिषदेची ओळख करून देण्याची गरज नाही. रा. स्व. संघाच्या मोजक्या काही स्वयंसेवकांनी १९४९ मध्ये अभाविपची स्थापना केली आणि आता ‘संघपरिवार’ म्हणून ज्ञात असलेल्या संघटनांपकी बहुचíचत असलेली अभाविप ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संघटना जन्माला आली. स्थापनेच्या वेळी सहभागी असलेले हे तरुण स्वयंसेवक देशाच्या विविध भागांतील होते. एका अर्थाने स्थापनेपासूनच ‘अखिल भारतीय’ तोंडवळा असलेली ही संघटना होती. नागपूरचे प्रा. दत्ताजी डिडोळकर या संस्थापकांपकी एक होते. स्वातंत्र्यानंतरच्या काळात तसेही मॅट्रिकोत्तर शिक्षणाच्या संधी आजच्यासारख्या सर्वदूर उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे देशभरातील मोजक्या काही शहरांत ही संघटना सुरू झाली. सामाजिक चळवळींची परंपरा असल्यामुळे आणि शिक्षण प्रसारात व महाविद्यालयांच्या संख्येत अग्रणी असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राच्या अन्य शहरांत अभाविपची वाढ जोमाने झाली.

सुरुवातीची काही वष्रे ‘विविध शहरांत चालणारे सुटे-सुटे काम’ असे अभाविपच्या कामाचे स्वरूप होते. १९६०च्या दशकात महाराष्ट्रात यशवंतराव केळकर, सुरेशराव मोडक असे प्राध्यापक-शिक्षक कार्यकत्रे, बाळ आपटे, पद्मनाभ आचार्य, अनिरुद्ध देशपांडे असे धडाडीचे विद्यार्थी कार्यकत्रे, मदनदास यांच्यासारखे पूर्णवेळ कार्यकत्रे यांची एक टीम झपाटल्यासारखी कामाला लागली. महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठ विभागांत प्रवास, गाठीभेटी, बठका असा क्रम सुरू झाला. मदनदास यांच्यासारखे कार्यकत्रे मुख्यत: अखिल भारतीय प्रवास करू लागले. त्यातूनच नावात ‘अखिल भारतीय’ असलेल्या, पण काहीशा विस्कळीतपणे चाललेल्या सुटय़ा-सुटय़ा प्रयत्नांना एक अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले. याच दशकात अनुक्रमे राष्ट्रीय अधिवेशने, राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या बठका, प्रदेश अधिवेशने, प्रदेश कार्यकारिणी आदी रचना सुरू झाल्या ज्या आजवर सुरू  राहिल्या आहेत. याच सुमारास पदवी/ पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही वष्रे संघटनेसाठी पूर्णवेळ काम करण्याची पद्धत सुरू झाली.

अभाविपच्या सुरुवातीच्या काळात सर्वप्रथम विद्यार्थी सत्कार, संगीत, शास्त्रीय संगीत, वक्तृत्व, क्रीडा आदी विविध प्रकारच्या स्थानिक व राज्यस्तरीय स्पर्धा, विविध स्थानिक प्रश्नांवर विद्यार्थ्यांची आंदोलने, महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्र असे विविध कार्यक्रम व आंदोलने विविध शाखांत चालत असत. अनेक ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पेढी, मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पेढी असे अनेक उपक्रम सुरू झाले. त्यातील काही चांगल्या शाखांत सातत्याने टिकले. या कार्यक्रम उपक्रमांमुळे सकारात्मक चळवळीवर विश्वास असलेल्या कार्यकर्त्यांच्या पिढय़ा निर्माण झाल्या. अधिवेशन, कार्यकारिणी, प्रवास अशा प्रयत्नांमुळे अशा कार्यकर्त्यांचा एक अखिल भारतीय संच ठिकठिकाणी तयार झाला जो अभाविपच्या पुढील कालखंडासाठी एक पायाभूत ढाचा म्हणून किंवा एक ‘बेस’ म्हणून अस्तित्वात आला आणि स्थिर झाला. एका सूत्राने बांधलेली ही आजी-माजी कार्यकर्त्यांची देशव्यापी साखळी हे अभाविपच्या पुढील कालखंडातील यशाचे गमक ठरले.

१९८३-८४च्या आसपास महाराष्ट्रात विना-अनुदानित व्यावसायिक शिक्षण संस्थांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तशा प्रयत्नांची गरज होती हे जरी खरे असले तरी निर्णय घेताना केलेली घाई, विचारविनिमयाचा अभाव यामुळे हा निर्णय शैक्षणिक कमी आणि राजकीय अधिक होता. अभाविपने त्या वेळी केलेला विरोध हा प्रामुख्याने घिसाडघाई आणि विचारविनिमयाचा अभाव या मुद्दय़ांवरच केला, पण त्याचबरोबर उच्चशिक्षणात खासगी संस्थांच्या सहभागाचे स्वागत केले. त्यासाठी विद्यार्थी संघटना, प्राध्यापक संघटना, संस्थाचालक आणि राजकीय नेते अशा सर्वाना एकत्र आणून एका चर्चासत्राचे आयोजन केले. इतकेच नाही तर त्यावर शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थी हित अशा दृष्टीने आग्रहाने मांडलेल्या मुद्दय़ांचा त्यानंतरच्या वर्षांत सातत्याने पुरस्कार केला. आज उत्तर मुंबईत अनेक शैक्षणिक/ सामाजिक संस्थांशी संबंधित असणारे आणि त्या वेळी अभाविपचे कार्यकत्रे विलास भागवत त्यानंतर जवळजवळ दहा वष्रे तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ आणि तंत्रशिक्षण संचालनालयात सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्याचा परिणाम म्हणून अशा संस्थांची अ, ब, क, ड अशा गटांत गुणात्मक क्रमवारी करण्यात आली जी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांला बहुमोल मदत ठरली आणि संस्थांनादेखील आपापला कारभार गुणात्मकदृष्टय़ा वाढवण्याची संधी ठरली.

अभाविपने १९८४ साली प्रायोगिक स्वरूपात सांगली जिल्ह्य़ासाठी आणि १९८५च्या युवक वर्षांपासून महाराष्ट्र स्तरावर ‘डिपेक्स’चे आयोजन केले. शेवटच्या वर्षांत डिग्रीच्या आणि डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना वìकग मॉडेल करावी लागतात, काही पेपर लिहावे लागतात, प्रोजेक्ट करावे लागतात. शेवटच्या वर्षांतील मुलांसाठी अशा प्रोजेक्ट, वìकग मॉडेल्सचे प्रदर्शन व ‘शोध’ ही संशोधन पेपरच्या मांडणीची स्पर्धा आयोजित करण्यास सुरुवात केली. त्यात विद्यार्थी, प्राध्यापक, संस्थाचालक, तंत्रशिक्षण संचालनालय आणि उद्योगजगत यांचा सहभाग उत्तरोत्तर असा काही वाढत गेला की, आज अशा प्रकारचा हा एकमेव राज्यव्यापी उपक्रम झाला आहे आणि कित्येक प्रकल्पांना उद्योग जगताने ‘प्रॉडक्ट’ म्हणून स्वीकारले आहे. विद्यार्थी परिषदेच्या शैक्षणिक परिवार या कल्पनेवरील निष्ठा इतकी प्रामाणिक होती की, वेळोवेळी प्रखर आंदोलनाचा, अगदी घेरावाचा प्रसाद मिळालेले प्रा. जी. एस. कडू किंवा डॉ. बी. बी. चोपणे यांच्यासारखे राज्य तंत्रशिक्षण संचालक, डी. वाय. पाटील यांच्यासारखे संस्थाचालक आणि अगणित आमदार, राजकारणी या सकारात्मक कार्यक्रमात अभाविपच्या बरोबरीने सहभागी झाले. १८ वष्रे वयाच्या युवकाला मताधिकार मिळायला हवा हेही अभाविपने आग्रहाने मांडले. त्यानंतर जवळपास १८ वर्षांनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर मताधिकार मिळण्याचे वय २१ वरून १८ वर आणण्यात आले.

आणीबाणीविरोधी संघर्षांतही अभाविप सक्रिय राहिली. नंतर आसाममध्ये उभे राहिलेले बांगलादेशी घुसखोरी विरोधीचे जनांदोलन, १९८०च्या दशकात खलिस्तानवादी चळवळीचा भाग, श्रीलंकेतील तमिळवंशीय आंदोलनाचा प्रश्न, उत्तरार्धात आणि त्यानंतर उग्र रूप धारण केलेला काश्मीर प्रश्न आणि दहशतवादाचा प्रश्न अशा विविध राष्ट्रीय प्रश्नांवर विद्यार्थ्यांच्या प्रबोधनाचे आणि प्रातिनिधिक सहभागाचे प्रयत्न अभाविपने सातत्याने केले. ईशान्य भारतातील राज्यात आणि भारताच्या अन्य भागांत असणाऱ्या भौगोलिक अंतरामुळे आणि सुरुवातीच्या काळातील दळणवळणाच्या सोयींच्या अभावामुळे निर्माण झालेला मानसिक अंतराय आणि माहितीचा अभाव भरून काढण्याचे काम अभाविपने सुरू केलेला ‘आंतरराज्य छात्र जीवनदर्शन’ गेली पन्नास वष्रे सातत्याने करीत आला आहे. आज ईशान्य भारताच्या सर्व राज्यांत या प्रकल्पातून भारताच्या अन्य भागांत आलेल्या व अन्य भागांतून तिथे गेलेल्या शेकडो तरुणांच्यामुळे एकात्मतेचे, समन्वयाचे आणि प्रेमाचे शेकडो पूल उभारले गेले आहेत. या सर्वामुळे अभाविपचे स्थापनेच्या काळातील ‘संस्थागत’ स्वरूप कालसंगत आणि क्रमश: विकसित होत तिला जनसंघटनेचे स्वरूप आले. प्रारंभीच्या काळात पायाभरणी झालेला केडर बेस्ड कार्यपद्धतीचा आणि समíपत कार्यकर्त्यांचा पाया जनसंघटन या शब्दात येणारा विस्कळीतपणा, काहीशी बेशिस्त वगरे गोष्टींना सक्षमपणे आळा घालू शकला. सातत्यपूर्ण केलेल्या प्रयत्नांमुळे अभाविपचा सामाजिक आधारही विस्तारत गेला. सामाजिक समता, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा- वसतिगृहांचा प्रश्न, मराठवाडय़ाचे जनजीवन ढवळून काढणारा नामांतराचा प्रश्न वगरे प्रश्नांवर सातत्यपूर्ण चर्चा-विमर्श-आंदोलन अशा विविध मार्गाने ठाम भूमिका मांडत राहिली. आरक्षणाच्या प्रश्नांवरही कधीही बोटचेपी भूमिका न घेता घटनेने दिलेल्या आरक्षण आदी उपायांचे सुस्पष्टपणे समर्थन अभाविपने केले. त्यासाठी शांतपणे आणि प्रदीर्घ काळ चालणारी प्रबोधन, जागरण, गरसमजांचे निराकरण अशी सकारात्मक प्रक्रिया अभाविपने अंगीकारली. विशीच्या आत-बाहेर असणाऱ्या युवकाच्या तोंडात ‘आपण’ आणि ‘ते’ असली भाषा रुजणार नाही याची काळजी घेतली. भाषा, जात, धर्म यात युवकाच्या सकारात्मकतेचा आणि भविष्याबद्दल असलेल्या आशावादाचा बळी जाणार नाही यासाठी अभाविप गेली सहा दशके जागरूकपणे उभी ठाकली आहे.

आज अभाविपच्या छत्राखालून गेलेले प्रमुख कार्यकत्रे समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. कदाचित अरुण जेटली, नितीन गडकरी, विनय सहस्रबुद्धे, चंद्रकांत दादा पाटील, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे वगरे नावे राजकारणाच्या अपरिहार्य प्रसिद्धी झोतामुळे अनेकांना माहीत असतील, पण वैद्यकीय सेवा क्षेत्रात काम करणारे डॉ. अनंत पंढरे, मेळघाटात कार्यरत असणारे निरुपमा आणि सुनील देशपांडे हे दाम्पत्य, खादी आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. महेश शर्मा, रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मििलद कांबळे, मुस्लीम राष्ट्रीय मंचचे महाराष्ट्र संयोजक इरफानअली पिरजादे, एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे अशा अनेक प्रतिभावंतांची नावे सांगता येतील ज्यांनी त्यांच्या तरुणपणात सामाजिक चळवळीच्या आयुष्याचा श्रीगणेशा अभाविपपासून केला. त्याव्यतिरिक्त भारतीय जनता पार्टी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, केशवसृष्टी, रा. स्व. संघ, विश्व िहदू परिषद, सहकार भारती व विविध सहकारी संस्था, हेडगेवार हॉस्पिटल, नाना पालकर स्मृती समिती, विविध रक्तपेढय़ा, आयुर्वेदिक उपचाराच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्था व प्रकल्प, एकात्मिक ग्रामविकासाच्या क्षेत्रात कार्यरत असणारे विविध प्रयोग, विविध शिक्षण संस्था, महिलांच्या सहकारी संस्था, पतपेढय़ा, वनवासी भागात कल्याण आश्रमाच्या माध्यमातून वा स्वतंत्रपणे चालू असणारे प्रकल्प अशा विविध संस्थांत कार्यरत असणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांची संख्या अक्षरश: हजारोंच्या घरात जाईल.

विस्तारणारी प्रसार माध्यमे, आंतरजालावर उपलब्ध असणारे ‘नेटवìकग’चे विविध पर्याय, शालेय स्तरापासूनच एकेका विषयावर निष्ठेने कार्यरत असणारे विद्यार्थी युवकांचे समूह, तरुण नोकरदारांच्या व व्यावसायिकांमध्ये सामाजिक उपक्रमाबद्दल वाढती उत्सुकता/ जागरूकता या साऱ्यामुळे थोडय़ाशा पुढाकाराला चांगला प्रतिसाद मिळण्याचे वातावरण आज निर्माण झाले आहे. योग्य दिशेने केलेले प्रामाणिक प्रयत्न आज मोठे कार्य सहजपणे उभे करू शकेल असे आज पोषक वातावरण आहे. या साऱ्याचा सुयोग्य उपयोग करून घेत आपल्या अंगीच्या स्वाभाविक चळवळेपणामुळे व नेतृत्वगुणांमुळे एक परिणामकारक सामाजिक काम आपला माजी कार्यकर्ता उभे करू शकेल, असे आश्वासन देण्याच्या स्थितीत अभाविप आहे का? तसे घडण्यातच अभाविपसारख्या चळवळीचे फलित सामावले आहे.

शरदमणी मराठे

sharadmani@gmail.com