News Flash

स्वच्छतेच्या अंतरातील अस्वच्छता!

काँक्रीटपेक्षाही टणक असणारा वज्रासमान ‘फॅटबर्ग’ विरघळवण्यासाठी विविध रसायने वापरली जात आहेत.

१) मुंबईत नालेसफाई कशी होते त्याचे हे प्रातिनिधिक पण तितकेच भयावह चित्र.. २)लंडनमध्ये सफाई कामगारांना सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविल्या जातात..

ब्रिटनसह अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया यांसारख्या श्रीमंत राष्ट्रांमधील अनेक महानगरांना ‘फॅटबर्ग’ने ग्रासले आहे. जनतेच्या आरोग्याशी हा प्रश्न निगडित असल्याने अब्जावधी रुपये यावर खर्च केले जात आहेत आणि अफाट मनुष्यबळ व तंत्रज्ञ यातून मार्ग काढण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे आपल्याकडे नालेसफाईची कंत्राटे निघतात. ठेकेदार व त्यांचे पाठीराखे मालामाल होतात आणि मुंबईतील जागतिक कीर्तीचा एक शल्यक मात्र मॅनहोलमधून वाहून जातो.. वर्षांनुवर्षे हे असेच चालू आहे. मळमिश्रित पाणी व सांडपाण्याच्या अद्ययावत व्यवस्थापनाकडे आपल्या शहरांची वाटचाल झालेली नाही. तशी इच्छाही दिसत नाही. स्वच्छता करणाऱ्यांना अजिबात न मोजणारा आणि अस्वच्छता करणाऱ्यांना प्रतिष्ठा देणारा ‘भारत’ स्वच्छ होईलच कसा?

हॉलीवूडला काळानुरूप खलनायक व खलकृत्ये यांची नितांत गरज असते. लंडन (अथवा) न्यू यॉर्क महानगरीच्या नाल्यांना तुंबवून संपूर्ण शहरभर मळाचे पाणी पसरवून जनजीवन मोडकळीस आणावे हा अतिरेक्यांचा कट उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी अर्थातच जेम्स बॉण्डवर येते, असा चित्रपट कधी आल्यास तो अतिशयोक्त मानू नका. सध्या असे एक स्वनिर्मित आक्रीत लंडन नगरीवर आले आहे. त्यामुळे ‘थेम्स वॉटर’ कंपनीचेच नव्हे तर ब्रिटनमधील उच्चविद्याविभूषित व अनुभवी अभियंते अतिशय हैराण आहेत. आणीबाणी समजून युद्धपातळीवर हे संकट निवारण्याचे अथक प्रयत्न चालू आहेत. नाल्यांमधील ‘फॅटबर्ग’ कसा घालवायचा, यावर अखंड मंथन चालू आहे. चरबी (फॅट), वंगणयुक्त तेल (ग्रीस) आणि लहान बाळांची व वृद्धांची फेकून दिलेली मुतेली, सॅनिटरी नॅपकिन, कंडोम हे सारे एकवटून त्यांचा घट्ट व अभेद्य ढिगारा तयार होतो त्याला ‘फॅटबर्ग’ म्हणतात.

वरवर पाहता सोपे वाटणाऱ्या हिमनगाचा अंदाज घेणे व त्याचा सामना करणे अतिशय जिकिरीचे व जीवघेणे असू शकते. अगदी त्या धर्तीचे आव्हान हा अभेद्य ढिगारा करीत आहे. ‘फॅटबर्ग’ भेदता आला नाही तर वाहिन्या फुटून मळमिश्रित पाणी रस्त्यांवर पसरण्याचा, पुराचा व घरात व हॉटेलमध्ये घुसण्याचा धोका आहे. लंडनमधील सफाई व्यवस्थापकांना आईसबर्गशी साधर्म्य वाटले म्हणून त्यांनी २०१३ साली पहिल्यांदा ‘फॅटबर्ग’ ही साज्ञा वापरली. ‘ऑक्स्फर्ड डिक्शनरी’ने २०१५ मध्ये या संज्ञेची भर घातली आणि तिचा वापर रूढ झाला. अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया यांसारख्या श्रीमंत राष्ट्रांमधील अनेक महानगरांना ‘फॅटबर्ग’ने ग्रासले आहे.

लंडनमधील ‘थेम्स वॉटर’ हा अत्याधुनिक प्रकल्प ९० लक्ष रहिवाशांना दररोज २.६ अब्ज लिटर स्वच्छ पाण्याचा पुरवठा करतो आणि ४ अब्ज लिटर मळमिश्रित पाण्यावर प्रक्रिया करतो. लंडनमध्ये मळमिश्रित पाणी वाहून नेण्याकरिता १ लक्ष ८ हजार किलोमीटर लांबीची स्वतंत्र वाहिनी असून त्यावर २,५३० पंपिंग ठिकाणे व १२ लाख मनुष्य उतरण्यासाठी उघडी तोंडे (मॅन होल) आहेत. ‘थेम्स वॉटर’ मळमिश्रित पाण्यापासून वीजनिर्मिती करून ४० हजार घरांना वीज पुरवते. ‘थेम्स वॉटर’ने जल व मळवाहिनीमध्ये कॅमेरे लावले असून नियंत्रण कक्षातील संगणकांवर पाण्याच्या गळतीचे नेमके ठिकाण समजू शकते. तात्काळ यंत्रमानवाकडून छिद्र बुजवले जाते. १५० वर्षे वयाची लंडनमधील विटांनी बांधलेली भुयारी गटारे आजही भक्कम अवस्थेत आहेत. गटारांच्या छताला इंटरनेट केबलचे जाळे आहे. उंदरांपासून सुरक्षित राहू शकणाऱ्या केबल्स ‘फॅटबर्ग’मुळे तुटू शकतात. या सर्व शक्यता लक्षात घेऊन ‘थेम्स वॉटर’ला नालेसफाईसाठी दरमहा १० लक्ष पाऊंड खर्चावे लागतात.

यंदा सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात ‘फॅटबर्ग’मुळे लंडनची मळमिश्रित पाणी वाहणारी वाहिनी तुंबण्याचा धोका निर्माण झाला होता. वरचेवर ‘फॅटबर्ग’चे घनफळ हे कमालीच्या वेगाने व अशक्य वाटावे अशा रीतीने वाढत आहे. २०१३ साली आढळलेला ‘फॅटबर्ग’ हा २५ मीटर व १५०० किलो वजनाचा होता. तर यंदाच्या ‘फॅटबर्ग’ची व्याप्ती ही २५० मीटर लांब असून त्याचे वजन १ लाख ३० हजार किलो एवढे आहे. ‘बीबीसी’, ‘द गार्डियन’पासून ‘नॅशनल जिओग्राफिक’ इ. सर्व प्रसारमाध्यमांकरिता ही बातमी प्राधान्याची झाली आहे. आजमितीला लंडनच्या नाल्यांमध्ये १० महाकाय आणि शेकडो छोटे ‘फॅटबर्ग’ अडकून बसले आहेत. न्यू यॉर्क, अटलांटा, मेलबर्न या शहरांमध्येही ‘फॅटबर्ग’ समस्या वाढतच आहे.

‘फॅटबर्ग’ हा काही नैसर्गिक नाही. आधुनिक जीवनशैलीचे ते उपउत्पादन आहे. काँक्रीटपेक्षाही टणक असणारा वज्रासमान ‘फॅटबर्ग’ विरघळवण्यासाठी विविध रसायने वापरली जात आहेत. त्यापासून खत वा ऊर्जा निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. तो फोडण्याचा व नष्ट करण्याचा रामबाण उपाय शोधणे हा लंडनसमोरचा यक्षप्रश्न झाला आहे. ‘फॅटबर्ग’ला जबाबदार असणाऱ्या हॉटेलपासून वसाहतींना या समस्येचे गांभीर्य समजावून सांगितले जात आहे. ‘फॅटबर्ग’ची निर्मिती होऊ नये व झाल्यास नष्ट करण्यासाठी अनेक जणांचा सहभाग घेऊन कल्पक उपाय योजले जात आहेत.

लंडनमधील नालेसफाई करणारा कर्मचारी हा अंतराळवीरासारखा नखशिखान्त संरक्षक कवचकुंडले घालून ‘फॅटबर्ग’ निवारणाकरिता तयार होतो. युरोप, अमेरिका, जपान या राष्ट्रांमधील सफाई कर्मचाऱ्याला कुठल्याही प्रकारच्या कचऱ्याला स्पर्श करावा लागत नाही अथवा दुर्गंधी सहन करावी लागत नाही. एवढी बारकाईने काळजी घेतली जाते. त्यांना कमालीची प्रतिष्ठा दिली जाते व ती जपली जाते. अत्याधुनिक क्रेनच्या साहाय्याने तंत्रज्ञ १२ फूट खोल नालीत उतरतो त्या वेळी श्वसनास बाधा येऊ नये यासाठी वरून प्राणवायूचा पुरवठा केला जातो. विषारी वायूंची तात्काळ जाणीव करून देणारे सेन्सर सोबत असतात. नालीमध्ये उजेड पडावा यासाठी उत्तम सोय केली जाते. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेले तंत्रज्ञ त्यामुळेच स्वत:ला कामात पूर्णपणे झोकून देतात. तीन वा चार तासांत बदली तंत्रज्ञ पाठवला जातो. सातत्याने संपर्कात राहून तज्ज्ञांच्या सल्लामसलतीने ‘फॅटबर्ग’ नाहीसा करण्यासाठीची लढाई चालू राहते. कित्येक विज्ञान व पर्यावरणविषयक पत्रकार स्वत: आत जाऊन याचे वार्ताकन करतात. ‘‘हा ‘फॅटबर्ग’ दोन बोइंग एवढय़ा वजनाचा आणि दोन फुटबॉल मदानांइतका आहे,’’ हे वर्णन सांगितले गेले. अनेक प्रकारच्या कुदळी, पहारी आणि मोठमोठी यंत्रे लावून हा महाकाय ‘फॅटबर्ग’ फोडण्यासाठी अखंड प्रयत्न चालू आहेत. तंत्रज्ञांच्या कार्याचा गौरवपूर्वक उल्लेख केला जात आहे. वृत्तपत्र व दूरचित्रवाहिन्यांवरून ‘‘धीरोदात्तपणे आमचे बहादूर तंत्रज्ञ दिवसरात्र लढत आहेत. तरीही हा राक्षसी ‘फॅटबर्ग’ कशालाही दाद देत नाहीय,’’ असे उल्लेख होत आहेत.

सफाई आपली..

तिकडे ‘फॅटबर्ग’ अवतरण्याआधी सालाबादाप्रमाणे २९ ऑगस्ट रोजी पावसाने मुंबई तुंबली. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या १ कोटी २५ लाख लोकांच्या मुंबापुरीच्या नालेसफाईची हकिकत ऐकायची?

‘‘आता तो चड्डीवरच उघडाभप्प होता. त्याचं अनावृत काटकुळं शरीर शेकडो माणसांच्या नजरांसमोर गटारात उतरण्याच्या पवित्र्यात होतं. पदपथावरून ये-जा करणारे सुटाबुटातले पुरुष, शाळेत जाणारी लहान मुलं, रंगीबेरंगी साडय़ांतल्या स्वरूपसंपन्न स्त्रिया त्याच्याकडं पाहून नापसंतीभाव दर्शवीत दुरून चालल्या होत्या. लेबर पाण्यात उतरला. त्यानं जाळीला कुत्रं लावून तिला सहज वर उचललं. जाळीच्या तोंडाचा ठाव घेतला आणि आकडा वरखाली गोल फिरवत राहिला. क्षणार्धात पाणी गपकन खाली बसलं आणि घाणप्रचूर पाणी जोरदारपणे प्रवाहित होऊ लागलं. घाणमिश्रित पाण्याचा पूर्ण निचरा झाला होता. चिखलाची दलदल इतस्तत: पसरली होती. जाळीत थांबलेला मला त्याला आव्हान देत होताच. पापी माणूस मृत्यूनंतर नरकात जातो अशी दंतकथा आहे; परंतु तो या किशोरवयातच ते अनुभवीत होता. आपल्या निष्कलंक हातांनी तो मानवी मला उपसणार होता. तो जाळीत उतरणार तोच त्याचे पाय जागच्या जागी थबकले. सर्वाग शहारून आलं. जाळीत एक लठ्ठ उंदीर कुजून पडला होता. त्याच्या शरीरात असंख्य किडय़ांचा बुजबुजाट होता. तो फावडय़ानं बाहेर काढताना आलेल्या उग्र भपकाऱ्यानं तो भिरभिरला. त्याचा जीव गुदमरू लागला. त्यानं भेदरलेल्या नजरेनं जाळीत डोकावलं. मल्यात अद्यापही किडे वळवळत होते.

‘‘खाली उतरूचा हा की नाय? नाय उतरूचा तर घराक चालू लाग,’’ मुकादम ओरडला. बाकीचे लेबर गालभर हसले. त्याचा क्षोभ, त्वेष लाव्हारसागत अंगात उकळी मारू लागले. डोळ्यातून अश्रू. त्याच अवस्थेत काळजीने तो जाळीत उतरला. वरती दगड, काच, खिळे, लोखंडी पत्रेमिश्रित गाळाचा खच पडला होता. एक लहानसा डोंगरच! जाळी साफ करून धापा टाकीतच तो वर आला. त्याची छाती शीघ्रगतीनं वरखाली होत होती. जाळीच्या थोडय़ा अंतरावर बूड टेकून तो जोरजोराने नि:श्वास टाकू लागला. संपूर्ण शरीर गलिच्छ ढिगाऱ्याखाली परून काढल्यागत माखलं होतं. अंगाला मला चिकटून राहिल्यामुळे अंगाला दुर्गंधी येत होती. मुकादम वसकला, ‘‘काय रे बराबार तरी साफ केलीस? मग पुढची खोला रे, अजून तीन-चार तरी जाल्या काढूक हव्याहेत.’’

मुंबईला स्वच्छ ठेवण्याकरिता आणि मुंबईच्या नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरू नये यासाठी हजारो जीवांना सहन कराव्या लागणाऱ्या नरकयातनांचे धावते वर्णन सिद्धार्थ देवधेकर यांनी ‘कधीही न सांगितलेली गोष्ट’ या कथासंग्रहातून सांगितले आहे. अंतराळ युगात वावरणाऱ्या मुंबईत दडलेले हे मध्य युग आहे.

मुंबईतील ३० हजार सफाई कर्मचारी दररोज अंदाजे १० हजार टन कचऱ्यापैकी सुमारे २ हजार टन कोरडा कचरा उचलण्याचे कार्य करतात. भल्या पहाटे पाच फुटी झाडूने कचरा साफ करायचा. ते ढिगारे उचलून ट्रकमध्ये टाकायचे व तो कचरा डेपोमध्ये उतरवायचा. सार्वजनिक ठिकाणे व संडास स्वच्छ करायचे. कडाक्याची थंडी, पावसाचा मारा, भाजून काढणारे ऊन अशा तिन्ही ऋतूंच्या फिक्या व गडद रंगात त्यांचे हे काम चुकत नाही. कधी प्रलयकारी पाऊस तर कधी चक्रीवादळाचा तडाखा बसतो. अशी ‘प्रेक्षणीय’ आपत्ती पाहण्यास झुंबड उडते. तेव्हा काळ, काम व वेगाचे अंकगणित पूर्णपणे चुकवत सफाई चालूच असते. अतिशय कमी वेळेत मुंबई पूर्ववत होते. बडे बडे नेते व अधिकारी त्याचे श्रेय घेत चॅनेलवर मिरवतात. प्रत्यक्ष सफाईचे कष्ट  उपसणाऱ्यांविषयी माणुसकीच्या ओलाव्याने एकही शब्द निघत नाही. त्यांच्या वाडय़ाला केवळ तुच्छता, अपमान व अवहेलना येत असते.

आपल्या सफाई कामगारांकडे हातमोजे, पायात बूट, अंगात कोट वा डोक्यावर शिरस्त्राण काहीही नसते. डिस्पोजेबल इंजेक्शन्स, सलाइनच्या सीरिजेस, कात्र्या, सुऱ्या, सुया, ब्लेड्स यामुळे हातापायाला, अंगाला जखमा होतच राहतात. असंख्य प्रकारचे रोग जडतात. काम आटोपल्यावर जेवायच्या आधी हातपाय धुवायला नळावर कोणीही येऊ देत नाही. त्यांना वेळेवर साबण मिळत नाही. त्यांना ठरावीक हॉटेलमध्येच प्रवेश मिळू शकतो. आजारी पडले तर औषध नाही. वेळेवर डॉक्टर नाही. आजारपणाची रजा नाही. इतर कामगारांना मिळतात तशा कुठल्याही सोयीसुविधा त्यांच्या भाळी असत नाहीत. कंत्राटी कर्मचारी हे पुरते वाऱ्यावर असतात. मुकादमांच्या लेखी शून्य किंमत असणारी व पशुवत व्यवहार सहन करणारी ही माणसे! अशा भीषण विषारी परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दारू जडते! वयाच्या १२व्या वर्षीपासूनच दारू साथीला येते. काही काळ दु:खापासून दूर जाता येण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना व्यसने जडतात. वयाच्या ४५ ते ५०च्या पुढे आयुष्यमान जाऊच शकत नाही, असे जीवन हे कर्मचारी कंठत असतात. आर्थिक आणि सामाजिक शिडीच्या तळ आणि गाळातील ही हाडामांसाची माणसे उपेक्षित आणि अघोषित बहिष्कृत जीणे मरेपर्यंत जगत असतात. दमा, क्षय, विषारी वायूमुळे अंधत्व, अपघातात हातापायाचे अपंगत्व, मणक्यांचे रोग, अर्धागवायू अशा कित्येक दुर्धर आजारपणांचा मुकाट सामना करणारे कित्येक जण आहेत. त्यांच्या एकूण मिळकतीपैकी २५ ते ३० टक्के रक्कम दवाखाना व औषधांवरच खर्च होते. एकविसाव्या शतकाच्या पहिल्या १५ वर्षांत केवळ मुंबईत पाच हजार सफाई कर्मचाऱ्यांचे काम करताना बळी गेले आहेत. दर वर्षी देशभरात सुमारे २५ हजार सफाई कर्मचाऱ्यांचा बळी जातो. विंदा करंदीकर यांनी सांगितल्याप्रमाणे, या सर्वाकरिता

हा रस्ता अटळ आहे

अन्नाशिवाय, कपडय़ाशिवाय

ज्ञानाशिवाय, मानाशिवाय,

ऐन रात्री होतील भास

छातीमध्ये अडेल श्वास

विसर यांना, दाब कढ

माझ्या मना बन दगड!

लंडन आणि मुंबईमधील ‘अंतर’

संपूर्ण जगभर कचऱ्याच्या नवनवीन समस्या अक्राळविक्राळ रूप धारण करीत आहेत. विल्हेवाट लावता येणे शक्य नाही इतका कचरा निर्माण होणे, ही प्रचलित संस्कृती झाली असून ते मानवी सभ्यतेसमोरील महाभयंकर आव्हान आहे. आर्थिक स्तर उंचावत गेला की त्या प्रमाणात घरातून बाहेर पडणारा कचरा वाढतच जात आहे. लातूरसारख्या छोटय़ा छोटय़ा शहरात कचऱ्याची टेकडी ४० फूट आहे. मुंबईच्या देवनारमध्ये १५० फूट उंचीचा कचऱ्याचा डोंगर ३२६ एकरांवर पसरला आहे. तर जगातील सर्वात उंच ४५० फूट उंचीचा कचऱ्याचा पर्वत अमेरिकेच्या लॉस एंजेलिसजवळ असून तो ७०० एकरभर पसरलेला आहे. सारांश एवढाच की, कचऱ्याची निर्मिती करून त्रिभुवन (आकाश, जमीन व पाताळ) व्यापून टाकण्याचे ऐतिहासिक कार्य मानवजात करीत आहे. तो कचरा नष्ट करता येईल की तोच कचरा पृथ्वीच्या मुळावर उठेल हे सांगता येणे कठीण आहे. (अ‍ॅण्ड्रय़ू स्टँटन यांनी २००८ साली ‘वॉल इ’ चित्रपटात भविष्यवेध घेऊन २८०५ साली पृथ्वीवर केवळ कचऱ्यांचे गगनचुंबी पर्वत असतील आणि मानवजात वस्तीसाठी दुसऱ्या ग्रहावर गेली असल्याचे दाखवले आहे.)

लंडनमधील एकत्रित व शर्थीच्या प्रयत्नांमुळे यथावकाश ‘फॅटबर्ग’ निघेल, अशी आशा करता येते. सुमारे १५० वर्षांपूर्वी युरोप व अमेरिकेतील वैयक्तिक व सार्वजनिक आयुष्याला आधुनिकतेचा स्पर्श झाला आणि आजही त्याचे मनोमन पालन केले जाते. भारतामधील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक व उद्योग या क्षेत्रांतील सर्व जातीधर्माचे व सर्व वयोगटांतील नेतृत्व हे सरंजामी धाटणीचे आहे. सर्वाना समान प्रतिष्ठा हे मूल्य आपण मनातून मानतच नाही. त्यामुळे परस्परसंबंधांमध्ये आधुनिकतेचा लवलेश नाही. स्वत:ला समाजापासून अलग करण्याची प्रक्रिया (अभिजन होण्याची) म्हणजे आधुनिकीकरण असा अर्थ लावला जातो. भारतीय उच्चभ्रू हे वंचितांचा यित्कचित विचार करीत नाहीत. त्यांना सार्वजनिक सुविधांसाठी पसा वा वेळ घालवायचा नाही. अ‍ॅडम स्मिथ यांचे ‘‘सभ्यता व विवेक ही मूल्ये पशापेक्षा नेहमीच मोठी असतात. मूल्य, विवेक, न्याय आणि परोपकार हे विकासाचे महत्त्वाचे पलू आहेत. माणूस हा स्वार्थी असला तरीही त्याने हे सदैव ध्यानात ठेवले पाहिजे,’’ हे विचार आजही तंतोतंत लागू पडतात.

मळमिश्रित पाणी व सांडपाण्याच्या अद्ययावत व्यवस्थापनाकडे आपल्या शहरांची वाटचाल झालेली नाही. तशी इच्छाही दिसत नाही. स्वच्छता करणाऱ्यांना अजिबात न मोजणारा आणि अस्वच्छता करणाऱ्यांना प्रतिष्ठा देणारा ‘भारत’ स्वच्छ होईलच कसा? त्यात सहभागी आहेच कोण? या व अशा प्रश्नांची उत्तरे लंडन आणि मुंबईमधील ‘अंतरात’ आहेत. आपल्याकडे गावोगावी हजारो कामगारांचे खोदकाम काही तासांत करणारे यंत्र पोहोचले आहे. निधीची ददात नाही व तंत्रज्ञानदेखील उपलब्ध आहे. हे सारे परदेशात पाहून येणारे नेते व अधिकारीदेखील आहेत; परंतु सफाईसाठी सहज व स्वस्त मजूर उपलब्ध होत असल्यामुळे तशी गरज कुणाला वाटत नाही. त्यामुळे भारताची चांद्रमोहीम झाली, बुलेट ट्रेन धावली, सेन्सेक्सचा निर्देशांक १००,००० आणि विकास दर २० टक्केझाला तरी मानवी गुणवत्तेच्या पातळीवर आपण जगाच्या तळातच शोभत आहोत आणि ही शोभा अशीच राहील.

अतुल देऊळगावकर  atul.deulgaonkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2017 1:46 am

Web Title: workers risking their lives for cleaning drainage in india
Next Stories
1 शेतमालाची ‘महागाई’ नाहीच!
2 प्रश्नांचीच ‘सुगी’
3 लोकप्रभा दिवाळी २०१७ : ड्रॅगन डायरी
Just Now!
X