News Flash

.. आणि ती बातमीही जनतेने शांतपणे पचविली !

नेल्सन मंडेला यांच्या निधनाची बातमी स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री साडेआठ वाजता देशभर पोहोचली, आणि दक्षिण आफ्रिकेतील तमाम नागरिकांना शोक अनावर झाला. मात्र, गेल्या जवळपास आठ

| December 7, 2013 03:05 am

नेल्सन मंडेला यांच्या निधनाची बातमी स्थानिक वेळेनुसार गुरुवारी रात्री साडेआठ वाजता देशभर पोहोचली, आणि दक्षिण आफ्रिकेतील तमाम नागरिकांना शोक अनावर झाला. मात्र, गेल्या जवळपास आठ महिन्यांपासून ब्रेन डेड स्थितीत असलेला आपला हा नेता आपल्यात नसल्याची बेचन करणारी बातमी कधीतरी कानावर पडणार अशी मानसिक तयारीही झाली असल्याने, दक्षिण आफ्रिकेत उमटलेल्या प्रतिक्रियेला केवळ शोकाचीच किनार दिसत आहे.
असे म्हणण्याचे कारण, मंडेला यांच्या निधनानंतर देशात अंदाधुंदी माजेल, दंगेधोपे होतील, भारतीय नागरिकांना देशातून हाकलून दिले जाईल, दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वेच्या मार्गावर जाईल आणि आथिर्क स्थर्य खालावेल, अशा भीतीदायक चर्चा देशात सुरू होत्या. मात्र अशी कोणतीही परिस्थिती उद्भवू नये यासाठी गेल्या एप्रिल २०१३ पासून अत्यंत सुबुद्धपणे केलेल्या नियोजनाचा अपेक्षित परिणाम कालच दिसून आला.
काल संध्याकाळपासून मी शहरात फेरफटके मारले, अनेकांशी बोललो, त्यांच्या भावना जाणून घेतल्या, दूरचित्रवाणीवरील वृत्तांकनदेखील मी नीट पाहात आहे. सगळीकडे शोक आहे, पण त्या शोकातही शांतता आहे. लोकांना दु:ख झाले आहेच, पण त्याच वेळी, आपल्या या नेत्याला प्रदीर्घ यातनांमधून मुक्तता मिळाल्याचे समाधानही आहे.
एप्रिल २०१३ मध्येच मंडेला यांची प्रकृती कमालीची खालावली होती. तेव्हापासून त्यांचा मेंदू मृतावस्थेतच होता. मात्र, त्याच्या निधनाचा धक्का जनतेस सहन होणार नाही आणि दंगली होतील या भीतीने त्यांना तेव्हापासून कृत्रिम जीवनप्रणालीवर ठेवण्यात आले होते. तेव्हापासून कालपर्यंतचा काळ हा प्रशासन आणि प्रसारमाध्यमांचीदेखील कमालीची कसोटी पाहणारा होता. मंडेला यांची प्रकृती सुधारत असली तरीही त्यांचा मृत्यूशी संघर्ष सुरू आहे, हे जनतेला वारंवार समजावण्यात येत होते. त्याचा अपेक्षित असा मानसिक परिणाम साधला. मंडेलांच्या निधनाची बातमी केव्हाही कानावर पडू शकते, याची जाणीव होऊन, ती ऐकण्याची मानसिक तयारीही जोपासली गेली. जनतेच्या भावनांचा उद्रेक होऊ नये, यासाठी केलेला हा एक नियोजनबद्ध मनौवैज्ञानिक प्रयोग असल्याचे मानले जाते. याचा अपेक्षित परिणाम झाल्याची खात्री झाली, तेव्हा मंडेला यांच्या निधनाचे वृत्त जाहीर करण्यात आले, आणि आपल्या नेत्याच्या यातना संपल्याच्या भावनांनी शोकमग्न जनतेने एक सुस्काराही सोडला.. गेल्या जवळपास आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या यातनांपासून मंडेला यांना मुक्ती मिळावी, अशी भावना याच काळात प्रसारमाध्यमे आणि प्रशासनाकडूनही रुजविली गेली होती.
.. आता परिस्थिती पूर्ण नियंत्रणाखाली आहे. कोणत्याही अनुचिताचे सावटदेखील देशावर नाही, आणि देशाबाहेर हाकलले जाण्याची भीतीदेखील उरलेली नाही. दंगलींची शक्यता तर दूरच गेली आहे. मंडेला यांच्या पश्चात देशासमोर जे काही भविष्य येईल, त्याचा स्वीकार करण्याची पूर्ण मानसिकता आता रुजलेली दिसते. मंडेला यांच्या नियोजनबद्ध मृत्यूचा अपेक्षित परिणाम साधला जावा, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रसार माध्यमांमध्ये सातत्याने त्यांच्या खालावत्या प्रकृतीच्या बातम्या दिल्या जात होत्या, त्याबरोबरच, मंडेला यांच्यावरील मंडेला : लाँग वॉक ऑफ फ्रीडम हा चित्रपटही प्रदíशत करण्यात येत होता. हा शोक झेलण्याची आणि त्या बातमीला सामोरे जाण्याची मानसिक शक्ती यातूनच जनतेला मिळत गेली..
दक्षिण आफ्रिकी जनतेच्या काही प्रतिक्रियांमध्ये अनावर शोकभावना आहेच, पण मंडेला यांच्या कार्याविषयीचा अभिमानदेखील ओसंडताना दिसतो. मंडेला हा आमच्या देशाचा अभिमानिबदू होता. त्यांच्यामुळेच स्वातंत्र्याचे दिवस आम्ही पाहू शकलो.. जो स्वातंत्र्यासाठी लढला तो मात्र गेले काही महिने जगण्यासाठी संघर्ष करतो आहे.. नाऊ ही विल रेस्ट इन पीस.. आमच्या पुढच्या अनेक पिढय़ा त्यांचे उपकार विसरणार नाही.. अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करताना एका कृष्णवर्णीयाचे डोळे भरून आलेले मला जाणवत होते..
हुश्श.. शहरात दंगली उसळतील अशा भीतीने आम्ही हैराण झालो होतो, कारण दंगलींच्या काळात साऱ्या भावनाच गोठलेल्या असतात. माणसेच माणसांना मारून टाकतात. मंडेला यांच्या नावाने अशा दंगली होऊ नयेत अशी आमची मनोमन इच्छा होती. तसेच झाले आहे. सर्वत्र शांतता आहे, आणि आपण शांततामय रीतीने जगू शकतो, या जाणिवेने आम्ही आश्वस्त आहोत. अशी भावना आणखी एका कृष्णवर्णीयाने व्यक्त केली.
दक्षिण आफ्रिकेतील गौरवर्णीयांमध्येही मंडेलांविषयीची आदरभावना जागोजागी व्यक्त होत होती. मंडेला हे महान नेते होते. राष्ट्राध्यक्ष होऊन त्यांनी इतिहास घडिवला, तेव्हाही गौरवर्णीयांसोबतचे त्यांचे वर्तन अत्यंत सुसंस्कृत, सभ्य आणि आदराचे होते. त्यांच्या निधनामुळे आपले काय होणार अशी भीती वाटत होती, पण ती आता उरलेली नाही. त्यांच्या निधनाआधी जनतेला हा धक्का सहन करण्याची शक्ती देण्याचा नियोजनपूर्वक प्रयत्न करण्यात आला नसता, तर कदाचित तसे झाले असते, असे एका गौरवर्णीय दक्षिण आफ्रिकी नागरिकाने बोलून दाखविले. मंडेला यांचे विचार आमच्या मनात सदैव जागे राहतील, अशा शब्दात त्याने आदरभावनाही व्यक्त केली.  मंडेला यांच्यामुळेच आम्हा गौरवर्णीयांना दक्षिण आफ्रिकेत शांततेने राहता आले. यापुढेही आम्ही तसेच येथे राहू अशी आमची खात्री आहे. नो फायटिंग, नो रायट्स, नो डिस्क्रिमिनेशन.. सॅल्यूट टु द ग्रेट मॅन..
दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या मनातही नेल्सन मंडेला यांच्याविषयी आपुलकीची वेगळी आणि उत्कट भावना रुजलेली आहे. नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेतील शांतिदूत होतेच, पण त्यांच्या कार्याला भारतानेही गौरविले होते. नेल्सन मंडेला भारतरत्न होते, हा या आपुलकीचा धागा.. बिगर कृष्णवर्णीयांसंबंधीच्या तीव्र भावनांमुळे जेव्हा समस्या उग्र होत गेल्या होत्या आणि देशात काय घडणार याचीच शाश्वती वाटत नव्हती, तेव्हा आमच्या आशा मंडेला यांच्यामुळेच जिवंत राहिल्या होत्या.. त्यांनी देशात शांततेचा मार्ग आखला नसता, तर झिम्बाब्वेसारखे अराजक येथेही माजले असते, ही एका स्थानिक भारतीयाची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आणि मंडेला यांच्या कार्याबद्दल आदरभाव व्यक्त करणारी होती..
 गेल्या काही महिन्यांपासून नेल्सन मंडेला मृत्युशय्येवर होते, आणि त्यांचे कुटुंबीय मात्र लहानलहान मुद्दय़ांवरून झगडत होते. त्यांची भांडणे अगदी न्यायालयापर्यंत पोहोचली होती. आता मंडेला मुक्त झाले आहेत. त्यांना शांती लाभेल, याची आम्हा भारतीयांना खात्री आहे.. मंडेला यांच्या आत्म्यास शांती लाभावी अशीच प्रत्येकाची भावना आहे. आयुष्याच्या अखेरच्या दिवसांतही त्यांना जगण्याचा संघर्ष करावा लागला ही दु:खाची बाब आहे, पण हा संघर्ष इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे.
काही भारतीयांनी मजूर म्हणून दक्षिण आफ्रिकेत पाऊल ठेवले. त्यापकी अनेकांचा आज स्वत:चा यशस्वी व्यवसाय आहे. याचे सारे श्रेय मंडेला यांच्या शांततेच्या प्रयत्नांना जाते. आता मंडेलांसारखे नेतृत्व कदाचित पुन्हा मिळणार नाही, पण त्यांच्या नेतृत्वामुळे निर्माण झालेले शांततामय वातावरण आणि स्थर्य यांमुळे येथील जनता आश्वस्त आहे. कारण त्याचीच या देशात खरी गरज होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 3:05 am

Web Title: world media in thrall as mandela passes away
टॅग : Nelson Mandela
Next Stories
1 नेतृत्वाचे अष्टपलू
2 वैचारिक वारशाची कसोटी..
3 उपचारचाचण्यांना बाधा
Just Now!
X