देशांतर्गत यादवींमधून, तसेच भूप्रदेशांच्या मालकी हक्कावरून दोन देशांमध्ये गेल्या सात-आठ महिन्यांत चाललेल्या संघर्षांतून नवीन स्वतंत्र देशांची निर्मिती होण्याची चिन्हे दिसू लागल्यावर माझे लक्ष आणखी काही नवीन देश शोधण्याकडे लागले.. मग चालू शतकात २०११ साली नवनिर्मित ‘साऊथ सुदान’ आणि त्यापूर्वी- २००२ साली निर्माण झालेला ‘टिमोर लेस्ट’ हे दोन देश गवसले. या दोन नवनिर्मित देशांची माहिती वाचताना अशा आणखी दोन-चार देशांची नावे पुढे आली. त्यामुळे कुतूहल वाढले आणि गेल्या ५०-६० वर्षांतल्या नवनिर्मित देशांची यादी उत्सुकता म्हणून करायला घेतली. आश्चर्य म्हणजे, पाहता पाहता अशा स्वातंत्र्य, सार्वभौमत्व प्राप्त केलेल्या आणि नवोदय झालेल्या शंभरएक देशांची यादी झाली. हे पाहून स्तिमित झालो. पण माझी हाव काही कमी होईना. आणखी काही वर्षे मागे जाऊन विसाव्या शतकात, १९१८ (म्हणजेच पहिल्या महायुद्धाचा काळ) ते २०१८ या शंभर वर्षांतल्या नवराष्ट्रनिर्मितीची यादी केली. ती मोठीच मोठी यादी पाहून डोके सुन्न झाले!

ही संख्या दीडशेच्या आसपास पोहोचली होती! या काळात हे नवदेश निर्माण झाले, त्याचप्रमाणे काही देशांचे अस्तित्वच संपले. अशा अस्तित्व अस्त पावलेल्यांपैकी आपल्या शेजारच्या तिबेटचे उदाहरण ताजेच आहे. जगाच्या नकाशावरून तिबेटसारख्या देशांचे नावच पुसले गेले. विशेष म्हणजे, एखाद्या चांगल्या किंवा वाईट गोष्टीची साथ भराभर पसरावी, त्या पद्धतीने विसाव्या शतकाच्या अखेरच्या ५०-६० वर्षांत स्वातंत्र्यप्राप्ती करून भराभर नवदेश जन्माला आले!
यांतील अनेक देशांनी इतर साम्राज्यांचे त्यांच्या मानेवर असलेले जोखड झुगारून देऊन एक स्वतंत्र, सार्वभौम अशी नवीनच ओळख करवून घेतली. या सर्वासाठी हे काही सुखासुखी झालेले नाही. जगासमोर येण्यासाठी त्यांनी दिलेले लढे, केलेले उठाव, स्वातंत्र्यानंतरची तेथील राजकीय परिस्थितीची माहिती वेधक वाटल्याने, या लेखमालेतून आपल्याला ती अवगत करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

– सुनीत पोतनीस
sunitpotnis94@gmail.com