सव्वाबारा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्राने दहा कोटी लसमात्रा देण्याचा टप्पा ९ नोव्हेंबर रोजी ओलांडला.

‘प्रौढांचे १०० टक्के लसीकरण’ हे उद्दिष्टही लवकरच पूर्ण होऊ शकते, असा विश्वास या कामगिरीमुळे वाढला आहे. आधी लोकांचीच अनास्था, मग लसटंचाई, ‘कोविन अ‍ॅप’विषयीच्या तक्रारी, अनेक ठिकाणी संगणकाचे सर्व्हर पुरेशा क्षमतेने न चालणे… अशा अडथळ्यांवर मात करण्यासाठी उपयोगी पडला, तो लसीकरणाचे काम पुढे नेण्याचा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा निर्धार! ‘इच्छा तेथे मार्ग’ म्हणतात, त्या प्रमाणे अनेकांनी आपापल्या पातळीवर- अर्थातच नियमांच्या चौकटीत राहून- लसीकरणाला गती देण्याचे मार्ग शोधले. त्यापैकी काहींचे हे अनुभव… ही मनोगते निव्वळ प्रातिनिधिक आहेत, राज्यभरच्या अनेकांचे अनुभव असेच आहेत, ‘दशकोटी’च्या रथाची चाके असंख्य आहेत, म्हणून तर महाराष्ट्राची उमेद वाढते आहे!

परीक्षा घेणारा अनुभव!

धारावीमध्ये सुरुवातीला नागरिक लसीकरणासाठी येण्यास फारसे तयार होत नव्हते. त्यामुळे अगदी घरोघरी जाऊन आम्ही नागरिकांना लस घेणे का महत्त्वाचे आहे समजावत होतो. त्यातही काही जण आमचे म्हणणे ऐकून तरी घेत होते; परंतु काही घरांत आम्हाला दरवाजातून माघारी पाठविले जात होते. अखेर काही आठवड्यांनंतर का होईना आमच्या मेहनतीला फळ आले आणि धारावीतील जनता लसीकरणासाठी यायला सुरुवात झाली. जूनपासून धारावीतील लसीकरण केंद्रावर गर्दी व्हायला लागली. अगदी मध्यरात्रीपासून नागरिक लसीकरणासाठी रांगा लावत होते. परंतु लशीचा साठाच पुरेसा उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना परत जावे लागत होते. एकदा तर पाच दिवस लशींचा साठाच आलेला नव्हता आणि नागरिक तर दररोज मध्यरात्रीपासून रांगा लावत होते. दररोज आम्ही त्यांना उद्या येण्यासाठी सांगत होते. शेवटी नागरिक वैतागले आणि आमच्याशीच भांडू लागले. त्या वेळी नागरिकांना समजावणे अधिक आव्हानात्मक होते. ऑगस्टपासून मात्र साठा मोठ्या प्रमाणात येऊ लागला आणि लसीकरण वेगाने व्हायला सुरुवात झाली. आता बऱ्यापैकी नागरिकांचे लसीकरण झाल्यामुळे नागरिकांची गर्दीही पुन्हा कमी झाली आहे. गेले ११ महिने सुरू असलेला लसीकरणाचा अनुभव खूप काही शिकविणारा तर होताच, परंतु परीक्षा घेणाराही होता. माझा मुलगा एक वर्षाचा असल्याने मी धारावीत घरोघरी फिरताना मला खूप काळजी वाटायची. भीतीने मी त्याला चार महिने गावीच ठेवला होता. परंतु हळूहळू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत गेल्यावर ही भीतीही कमी झाली – डॉ. अमृता सुपाळे,  धारावी लसीकरण केंद्र

मुंबई

विश्वास वाढत गेला!

नागपूर :- नागपुरात करोनाचा शिरकाव झाल्यावर मार्च २०२० मध्ये माझी सेवा इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) कोविड वॉर्डात लागली. येथे करोनाची दाहकता जवळून बघितली. मेयोला कोव्हिशिल्ड लशीचे केंद्र्र मिळाल्यावर लस टोचण्याचे काम माझ्यावर आले. ही लस नवीन असल्याने ती टोचल्यावर काय होईल, याची माहिती नव्हती. दरम्यान इतरांना लशी देताना थेट लोकांच्या संपर्कात येऊनही आता पीपीई किट्सऐवजी मुखपट्टी व हातमोजे एवढेच सुरक्षेचे साधन होते. पहिल्या दिवशी मेयोतील अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्यासह इतरही वरिष्ठ निवडक अधिकाºयांसह इतर आरोग्य कर्मचाºयांना लस दिली. ही संख्या खूप कमी असली तरी लस टोचण्यामुळे संबंधिताच्या चेहऱ्यावर त्या वेळी पुढे काय होणार याची चिंता मला स्पष्ट दिसत होती. परंतु काही तासांनी कुणाला काही झाले नसल्याचे दिसल्यावर विश्वास वाढला.

पहिल्या दिवशी माझेही लसीकरण झाले नव्हते. नंतर मी स्वत: लसीकरणासाठी गेल्यावर घाबरले. समाजमाध्यमांवर या वेळी लशींबाबत विविध गैरसमज पसरले होते. मला काही झाले नसल्याने विश्वास वाढला. त्यातच आरोग्य कर्मचाºयांत लसीकरणात आम्हाला प्रथम घेऊन आमच्यावरच वैद्यकीय चाचणी करता काय? म्हणून प्रश्न विचारायचे. त्यांची आम्ही समजूत काढायचो.

सुरुवातीला सर्व्हर डाऊन असल्याने कोविन अ‍ॅपवर नोंदीच न होणे, काहींचे नाव व क्रमांक महापालिकेच्या यादीत न सापडणे असे प्रकार होऊन गोंधळ उडाला; पण नंतर सर्व सुरळीत झाले. दुसऱ्या टप्प्यात वृद्ध आणि सह-आजार असलेल्यांचा लसीकरणात समावेश झाला. ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह होता. आरोग्य कर्मचारी एकीकडे लशीला घाबरत असताना वृद्धांचा विश्वास पाहून मनात लशीविषयीचा विश्वास आणखी वाढला. त्यातच अधूनमधून लशींच्या तुटवड्याने पुरवठा थांबून केंद्र बंद ठेवावे लागत होते. या वेळी लाभार्थी लशीशिवाय जाणार नसल्याचे सांगत येथेच गोळा होत असल्याने पोलिसांना मदतीसाठी पाचारण करावे लागत होते. बघता बघता मेयो रुग्णालयात सुमारे २२ हजारांच्या जवळपास लसीकरण झाले. पैकी पंधरा हजारांच्या जवळपास लशी मला देता आल्याचा अभिमान आहे.  – अनिता मोहन कनोजिया,  अधिपरिचारिका, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), नागपूर</strong>

सोलापूर

‘स्वयंसेवी’  सहभाग…

केवळ कागदी शिक्षण नाही म्हणून कुणाला अडाणी समजू नये, याचा प्रत्यय सोलापुरात लसीकरणाच्या निमित्ताने आला! येथील करोना प्रतिबंधक लसीकरणात ‘सुशिक्षित- मध्यमवर्गीय’ लोकांपेक्षा ‘गलिच्छ वस्ती’ म्हणून हिणवल्या गेलेल्या वस्तीमधील अशिक्षित माणसांनी आघाडी घेतली आहे. लसीकरणासाठी ‘स्मार्टफोन’च्या माध्यमातून ‘ऑनलाइन’ नोंदणी करणे हे सामान्य, अशिक्षितांना कसे शक्य आहे? पण भवानी पेठेतील साबळे नागरी आरोग्य केंद्राने स्वत: मनुष्यबळ वापरून हे शक्य करून दाखविले आणि झोपडपट्ट्यांमधील व्यक्तींना लसीकरणासाठी उद्युुक्त केले. सोलापूर शहरात आजतागायत ६५ टक्के, तर जिल्हा ग्रामीणमध्ये ७५ टक्के लसीकरण झाले असताना साबळे नागरी आरोग्य केंद्राने तब्बल ८५ टक्के लसीकरण करून उच्चांक गाठला आहे. एक लाख ३० हजार लोकसंख्येच्या एकूण परिसरात ७० टक्के लोकसंख्या गलिच्छ झोपडपट्ट्यांमधील आहे. यात सफाई कामगारांपासून विडी कामगारांपर्यंत अनेक गरीब, श्रमिकांमध्ये लसीकरणाबाबत अनेक गैरसमज पसरलेले. परंतु डॉ. सायली साबळे यांच्यासारख्या संवेदनशील वैद्यकीय अधिकाऱ्याने मनावर घेतले आणि आशा सेविका आदींच्या माध्यमातून घरोघरी संपर्क साधून त्यांना लसीकरणासाठी घराबाहेर काढले. एकेका दिवशी ७५० पर्यंत लसीकरण करता आले. त्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची ठरली. सुरुवातीला पसरलेले गैरसमज दूर होऊ न लसीकरणासाठी नागरिकांच्या नागरी आरोग्य केंद्रात अगदी पहाटेपासून रांगा लागल्यावर त्याचे योग्य पद्धतीने नियोजन करता आले. ‘ऑनलाइन’ नोंदणीसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाले. लशींचा तुटवडा होता; पण त्यावर मात करता आली. याकामी वरिष्ठ अधिकाºयांनी प्रोत्साहन दिले आणि नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहून लशींच्या मात्रा पुरेशा प्रमाणात उपलब्ध केल्या. देहविक्रय करणाऱ्या वंचित महिलांचेही लसीकरण करणे शक्य झाले.

काळी मशिदीजवळचा शहर दवाखाना असो की शुक्रवार पेठेतील शेठ सखाराम नेमचंद आयुर्वेद रुग्णालय असो, अशी गर्दीने भरलेली बहुसंख्य लसीकरण केंद्रे आता ओस पडली आहेत; हे या वेगवान लसीकरणाचे यशच! लाजरस अडाकूळ हे चतुर्थश्रेणी कर्मचारी सांगतात की, आता काही दिवसांपूर्वी या केंद्रावर गर्दी होती. या गर्दीत काम करताना करोनाची भीती वाटायची. त्यात तंत्रज्ञानाचाही गोंधळ रोज सुरू असायचा. डॉ. विजयश्री देवताळे म्हणतात की, या अशा वस्तीत पाय रोवून हे काम केल्याने आज लसीकरणाचा मोठा टप्पा गाठू शकलो. कधीकाळी गर्दीने भरलेल्या या केंद्रावर आज लस देण्यासाठी नागरिकांची वाट पाहावी लागते, यातच या कष्टाचे फळ आहे!

अमरावती: – जनसेवेचा आनंद

लसीकरणाबाबत सुरुवातीच्या काळात लोकांमध्ये भीती होती. आपल्याला अपाय होईल, अशी गैरसमजूत अनेकांना होती. ते भय दूर करण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. लस सुरक्षित आहे. त्यातूनच आपण करोनावर मात करू शकतो, हे लोकांना समजावून सांगावे लागले. आम्ही आरोग्य कर्मचाºयांनी अगदी सुरुवातीलाच लस घेतली होती. त्यातून आलेला विश्वास लोकांची समजूत काढण्यासाठी उपयोगी ठरला. याला वेळ लागला; पण लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटल्यानंतर केंद्रांवर गर्दी वाढू लागली. लशींचा साठा मर्यादित आणि प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांची संख्या मोठी असे चित्र बरेच दिवस होते. टोकन पद्धतीमुळे गर्दी टाळणे शक्य झाले. पण, त्या वेळी लोकांची समजूत काढताना चांगलीच दमछाक झाली. लशींचा तुटवडा निर्माण झाला, तेव्हा संयम ठेवून परिस्थिती हाताळावी लागली. लोक पहाटेपासून केंद्राबाहेर गर्दी करून उभे राहात होते. ‘कोविन अ‍ॅप’चा वापर करण्याचे प्रमाणही सुरुवातीला कमी होते; नंतर जागरूकता वाढली. वेळ निश्चित करून लोक येऊ लागल्याने गर्दी कमी होत गेली.

रुग्णालयाबाहेर गर्दी होऊ नये म्हणून त्यांची रांग लावणे, क्रमाक्रमाने नोंदणी करून घेणे, लसीकरण केल्यावर काही काळ विश्रांतीसाठी बसवणे, त्यांचे समुपदेशन करणे, लशीचा काही परिणाम तर होत नाही ना याची तपासणी करून पुढील लसीकरणाची वेळ देणे या गोष्टी कराव्या लागतात. ही संपूर्ण प्रक्रिया सकाळीच सुरू होते. त्याचे नियोजन करावे लागते. या संपूर्ण प्रक्रियेत स्वत:चे स्वास्थ्यही जपणे महत्त्वाचे असते. मात्र आम्हा कर्मचाºयांना, कुटुंबाच्या सहकार्यामुळे कामात लक्ष देणे शक्य होते. यशस्वी होत असलेल्या लसीकरण मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होता आले, याचा आनंद आहे.  – बबिता गुलाबराव राठोड, परिचारिका (एएनएम), आयसोलेशन रुग्णालय, अमरावती</strong>

पालघर : – नियमित सर्वेक्षण आणि पाठपुरावा

करोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी सुरुवातीला नागरिकांमध्ये निरुत्साह; तर दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरण केंद्रांवर झालेली गर्दी अशा दोन वेगवेगळ्या परिस्थितीला हाताळत चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील १७ गावे व ८८ पाड्यांवरील अधिकांश लसीकरण आमच्या पथकाने पार पाडले. नागरिकांना लसीकरण केंद्रावर येण्याऐवजी गट प्रवर्तक, आशा सेविका, आरोग्यसेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, स्वयंसेवक, सहकारी कर्मचारी व सहायक आरोग्य अधिकारी यांनी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा उपक्रम राबविल्याने तसेच जिल्हा प्रशासनाकडून सहकार्य मिळाल्याने चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे आम्ही पालघर जिल्ह्यात सरस कामगिरी करू शकलो.

लसीकरण प्रोत्साहित करण्यासाठी मी व आमच्या आरोग्य कर्मचाºयांनी प्रथम लस घेऊन त्याची छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करून नागरिकांमध्ये असणारी भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. १८ वर्षांवरील वयोगटासाठी लसीकरण खुले झाल्यानंतर केंद्रांवर अचानक गर्दी उफाळून आली.  ग्रामीण भागात ‘को-विन अ‍ॅप’द्वारे नोंदणी करण्यास कमी प्रतिसाद असल्याने, त्याऐवजी प्रत्यक्षात लसीकरण केंद्रात बाहेर रांगेत उभ्या राहणाऱ्या नागरिकांना टोकन देऊन लसीकरण करण्याची पद्धत अवलंबली. त्यामुळे क्षेत्राबाहेरून येणाऱ्या नागरिकांचा लोंढ्यावर नियंत्रण मिळवता आले. शिवाय एकाच वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात सहा ठिकाणी लसीकरण सत्र सुरू ठेवल्याने गर्दीसुद्धा आटोक्यात ठेवता आली. दररोज प्राथमिक आरोग्य क्षेत्राच्या कार्यक्षेत्रात २२०० नागरिकांना लस देणे व सातत्याने दररोज एक हजारपेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करणे अशी कामगिरी आमच्या पथकाने यशस्वीरित्या बजावली. त्यामुळे १३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत बाडापोखरण उपकेंद्रातील शंभर टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले होते; जिल्ह्यातील ही एक मोठी उपलब्धी होती.

आधी हाताने, मग संगणकावर!

लसीकरण सत्र आयोजित करताना इंटरनेटची उपलब्धता अडचणीची ठरत असल्याने अनेकदा नागरिकांचा तपशील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मागवून घेऊन अथवा इंटरनेट उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी थांबून कर्मचाºयांनी लसीकरण झाल्यानंतर उशिरा पर्यंत माहिती अपलोड करण्याचे काम केले. आरोग्य पथकातील विविध घटकांनी गाव-पाड्यात फिरून लसीकरण न झालेल्या नागरिकांच्या याद्या तयार केल्या व नागरिकांना प्रोत्साहित करून लसीकरण पूर्ण करण्यात आले. या कामात नियमितपणा व पाठपुरावा महत्त्वपूर्ण ठरला असून एखाद्या दुर्गम भागात दहा नागरिक एकत्र आले तर आरोग्य कर्मचाºयांना पाठवून लसीकरण पूर्ण करून घेतले जात असे. – डॉ. शरद गायकवाड,  वैद्यकीय अधिकारी,  चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्र

औरंगाबाद:- कधी दुचाकीवर,

कधी पायीच…

औरंगाबादपासून १५० किलोमीटरवर आहे माझे सोयगाव तालुक्यातील सावदबारा प्राथमिक आरोग्य केंद्र! काही दिवसांपूर्वी आम्ही दोघी परिचारिका म्हणून काम पाहात होतो. एकीची बदली झाली, आता १८ गावांसाठी मी एकटीच आहे. पूर्वी एकच बस असायची. त्यातूनच जायचो. लसमात्रा आणि कागदपत्रे घेण्यासाठी माझा मुलगा दुचाकीवर येत असतो. रोज तीन गावांना जायचो. पिंपळा उपकेंद्रावरून येण्या-जाण्यासाठी तशी वाहने कमी आहेत. पण मी नेहमी दुचाकीवरून लसमात्रा घेऊन जायचे. पहिल्या टप्प्यात कोणी लस घ्यायला पुढे येत नव्हतं. याच काळात जामडी नावाच्या गावात तिघा जणांचा मृत्यू झाला. तो लशीमुळे झाला असा गैरसमज झाला. तो घालवायला सरपंच विलास राठोड यांनी पुढाकार घेतला आणि मग लोक पुढे येऊ लागले.

आता लसीकरण वाढले आहे. सोयगाव तालुका तसा दुर्गम आहे. म्हणजे वाहतूक खूपच कमी. मोबाइलची रेंज मिळत नाही. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी करताना अडचणी येतात. पण आम्ही लोकांना याही कामात मदत करतो. लस घ्यायला आता लोक तयार होऊ लागलेत. पण अजून काम करावंच लागणार आहे. इथलं एक चारू तांडा नावाचं गाव आहे. अतिवृष्टीमुळे खूप पूर आला तेव्हा या गावाला जायचे कसे, असा प्रश्न होता. पण आम्ही पाण्यातून वाट काढून गेलो. फार प्रतिसाद मिळाला असं नाही. पण एवढ्या अडचणीत वाट काढून आलो म्हणून काही जणांनी आवर्जून लस घेतली! – शेख एन. एम., आरोग्यसेविका

सलग ७५ तास लसीकरण!

वडगाव कोल्हाटी या अडीच लाख लोकसंख्येच्या आणि औरंगाबाद शहराजवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करते. इथे बहुतेक सगळी कामगार वस्ती. बजाजनगरला कामावर जाणारे अधिक. त्यामुळे सकाळी लोक जातात ते रात्रीच येतात. पहिल्या टप्प्यात कोणी लस घ्यायला तयार नव्हते. प्रत्येकाला मजुरी बुडेल याची भीती आणि भ्रांत असते. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण कमी. बहुतांश कामगार परराज्यातील. त्यामुळे लसीकरण करायचे तर वेगळा विचार करायला हवा असे जाणवत होते. वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना काही तरी नवे करावे असे वाटत होते.

स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करताना लसीकरण सलग ७५ तास उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला. तीन आरोग्यसेविकांची नेमणूक केली. नोंदणीसाठीही कर्मचारी बोलावले. आशा कार्यकर्तींना बोलावून घेतले. दिवसभरात न येणारी अनेक मंडळी लस घेण्यासाठी आवर्जून आली. रात्रभर लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, डॉ. सावरगावकर यांनी मदत केली आणि ७५ तास लसीकरण केंद्र सुरू ठेवल्याचा परिणाम म्हणून, नंतरही प्रतिसाद वाढू लागला!  – डॉ. पुष्पलता सावंत, प्राथमिक आरोग्य केंद्र- खुलताबाद

केंद्राच्या वेळा बदलल्या!

लसीकरण कमी असल्यामुळे सर्व प्रकारच्या उपाययोजना सुरू झाल्या. पेट्रोलपंपावरही लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासावे असेही आदेश दिले. अगदी सरकारी कर्मचाºयांनी दोन मात्रा घेतल्या नसतील तर त्यांचे वेतन रोखण्यापर्यंतची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिल्यानंतर माझी जिल्हा स्तरावरील अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. भेंडाळा गावात तपासणी केल्यानंतर कळाले की बहुतांश जण शेतात काम करायला जातात. घरी येतात तेव्हा लसीकरण केंद्र सुरू नसते. मग लसीकरण केंद्राच्या वेळाच बदलल्या. संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत रस्त्याच्या बाजूला असलेल्या ठिकाणी लसीकरण सुरू केले. त्याची जाहिरात केली आणि २२ लसमात्रा गेलेल्या ठिकाणी एका दिवसात १३८ लसमात्रा दिल्या गेल्या. हा प्रयोग आता अनेक ठिकाणी करण्याचे ठरविले आहे. आता घरोघर जावे लागणार आहे. कामाची पद्धत बदलली आहे. आता बघू काय होते ते. – डॉ. उल्हास गंडाळ

संकलन:   नीरज राऊत  ऐजाजहुसेन मुजावर, महेश बोकडे  सुहास सरदेशमुख  शैलजा तिवले