– अभिजित बेल्हेकर abhijit.belhekar@expressindia.com

‘‘परमेश्वराने मला थोडंथोडकं नाही तब्बल शंभर वर्षांचं आयुष्य दिलं. या सबंध आयुष्यात मी खूप काही करू शकलो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या अलौकिक जीवनकार्याचा वेध घेता घेता माझ्याही जगण्याचं सोनं झालं. अजून काय हवंय, आता मरण आलं तरी ते ‘पावनखिंडी’तील असेल! मी या साऱ्या जगण्याबद्दल कृतज्ञ, कृतार्थ आणि समाधानी आहे !! ’’

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

शिवशाहीर बाबासाहेब ऊर्फ ब. मो. पुरंदरे यांचे सोमवारी निधन झाले. आपले सबंध आयुष्य इतिहास आणि त्यातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा शोध घेण्यासाठी व्यतीत करणाऱ्या शिवशाहिरांची ही अखेरची भावना. घरातील एका छोटय़ा अपघाताने रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी एकच दिवस अगोदर त्यांनी ती बोलून दाखवली आणि आज त्यातील एकेका शब्दाला एखाद्या खंडकाव्याचे मोल आले आहे.

बाबासाहेबांशी माझे गेल्या अनेक वर्षांचे मैत्र. इतिहासाचा अभ्यासक, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या काळाविषयी असलेले प्रचंड आकर्षण यातून ही ओळख तयार झाली. त्याचे रूपांतर मैत्र आणि पुढे अतूट नात्यात झाले. यातूनच दर पंधरवडय़ातून एकदा तरी भेटायचे आणि एखादा विषय निवडून गप्पा मारायच्या, असा आमचा शिरस्ता बनला होता. बाबासाहेब बोलत राहायचे आणि मी केवळ त्यांना शोषून घेण्याचे काम करायचो. नुकतीच वीसेक दिवसांपूर्वी त्यांची अशी भेट घडली, अखेरची! आणि या भेटीतच बाबासाहेबांनी हे भैरवीचे सूर आळवले!

बाबासाहेब बोलत होते.. ‘‘मी शंभरी गाठली म्हणजे काय..? केवळ शंभर वर्षे जगलो किंवा केवळ त्या आकडय़ाचे कौतुक आहे का..? नक्कीच नाही. त्या आकडय़ातील त्या शेवटच्या दोन शून्यांना मोठा अर्थ आहे. जगण्यातील त्या संवेदनेच्या अर्थाने मी हा भलामोठा काळ जगलोय. कदाचित त्यामुळंच मला आज ही कृतार्थता आणि कृतज्ञतेची जाणीव होत आहे!

‘शिवाजी महाराज’ ही सात अक्षरे तर माझ्यासाठी पंचप्राण ठरलीत. कदाचित या अक्षरांचा जो ध्यास मी  घेतला त्यानंच मला एवढी वर्ष जगवलं..!

अजूनही काही स्वप्नं आहेत, नवे ध्यास आहेत. मनाची खूप इच्छा आहे. पण आता असं वाटतं, गात्रे थकलीत. तिसरी घंटा वाजली आहे. ‘कुठं थांबावं’ हे ज्याला समजतं, त्याच्याच चालण्याला अर्थ असतो!’’

बाबासाहेब बोलत होते, पण या गप्पांचा पट काहीसा अस्वस्थ करणारा होता. काहीशी जाणीव करून देणारा. एरवी चर्चेचा विषय मी ठरवायचो आणि बाबासाहेब त्यावर बोलायचे. पण त्या अखेरच्या भेटीवेळी विषय आणि सूत्रे दोन्हीही जणू त्यांनी आपल्या हाती घेतली होती.

‘‘मी केलेलं काम कुणाला द्रोणागिरीसारखं वाटतं, पण मी ते केवळ अंधारात प्रकाशलेल्या एखादा दिव्याप्रमाणे समजतो. या दिव्यातून आणखी ज्योती तयार व्हाव्यात. त्यांनी आपापल्या परीने शिवचरित्राचा वेध घ्यावा. या ‘सात अक्षरां’चा जो जो कुणी शोध घेईल त्याच्या हातून केवळ राष्ट्र कार्य घडल्याशिवाय राहणार नाही! ’’

काही काळ शांत जात ते पुन्हा बोलू लागले, ‘‘या जगण्यावर मी भरभरून प्रेम केलं, त्यानंही मला भरभरून दिलं. त्या अर्थानं मी आज समाधानी आहे. खरंतर या शिवचरित्रानेच माझ्या जगण्याला काही अर्थ दिला. माझ्या आयुष्यातून ‘शिवाजी महाराज’ ही सात अक्षरे काढली तर या शंभर वर्षांच्या प्रवासात काहीच उरणार नाही!

पुनर्जन्म असतो का ते माहीत नाही पण तो असला तर मला पुन्हा याच शिवकार्याचा पाईक व्हायला आवडेल. आमचे वडील नेहमी म्हणायचे, ‘बेचैनीत जगा आणि चैनीत मरा !’ त्या अर्थाने आज ही ‘चैन’ मी अनुभवतोय. आज मी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. समाजाप्रति कृतज्ञ आणि जगण्याप्रति  कृतार्थ!

थकलेल्या शरीरातून जणू एक शांत, विश्रांत, समाधानी मन व्यक्त होत होते. एरवी भरभरून आनंदाने ग्रहण करणाऱ्या माझ्या मनाची अवस्था मात्र केवळ अस्वस्थ बनली होती. दुसऱ्याच दिवशी समजले बाबासाहेब घरात पडले, त्यांना रुग्णालयात दाखल केले. पुढे ‘न्यूमोनिया’चेही निदान झाले. आजार बळावत गेला. हळूहळू बोलणे बंद झाले, केवळ हावभाव उरले आणि शेवटी आज ती बातमी आली!