बहुसंख्य आदिवासी, पारधी समाज आजही सामाजिक कलंक, दारिद्र्य, वंचितता, अज्ञान, अंधश्रद्धा यामध्येच गुरफटलेला आहे. ना कोणाच्या जन्माचा दाखला, ना मृत्यूची नोंद, ना रेशनकार्ड. त्यामुळे सर्वच प्रकारच्या योजनांपासून कायमस्वरूपी वंचित. परिणामी मुलांनी कधी शाळेचे तोंड पाहण्याचा प्रश्नच येत नाही. अशा या वंचित समाजातील मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना त्यांची स्वत:ची आणि कुटुंबाची ओळख पटवणारी कागदपत्रे मिळवून देण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील राशीन (ता. कर्जत) येथील ‘आदिवासी पारधी समाज विकास संस्था’ गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्न करत आहे. संस्थेने सुरू केलेल्या ‘संकल्प वसतिगृहा’त सध्या ४१ मुले-मुली शिक्षण घेत आहेत. याशिवाय वसतिगृहाबाहेरील अन्य ३० मुलांच्या शिक्षणासाठीही संस्था आधारवड ठरली आहे.

केवळ पारधी समाजातीलच नव्हे तर भटक्या, वंचित समाजातील काही मुलेही या वसतिगृहात राहून शिक्षणाच्या प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक मुले वसतिगृहात प्रवेश मिळावा या प्रतीक्षेत आहेत, मात्र जागेअभावी त्यांना प्रवेश देणे शक्य झालेले नाही. अधिकाधिक मुलांना प्रवेश देता यावा यासाठी वसतिगृहाची भक्कम इमारत उभारणे, स्वयंपाकगृह व भोजन कक्ष उभारणे, दैनंदिन गरजा भागवणे, कौशल्य विकासाची साधने व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, खेळात प्राविण्य मिळवणार्‍या मुलांना क्रीडा साहित्य व प्रशिक्षण देणे यासाठी लोकांचा सहयोग मिळवण्यास संस्था प्रयत्नशील आहे.

जन्मत:च गुन्हेगारीचा शिक्का बसलेल्या पारधी समाजातूनच शिक्षण घेऊन पुढे आलेले, विजय भोसले व त्यांची पत्नी प्रणिता भोसले हे तरुण दाम्पत्य संस्था व वसतिगृहाची जबाबदारी सांभाळत आहेत. या दोघांचे बालपणही अतिशय कष्टमय होते. परंतु पुढच्या पिढ्याही याच दाहकतेत होरपळू नयेत, त्यांना तरी सुरक्षित बालपण मिळावे, प्रगतीच्या सर्व संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी या संस्थेची स्थापना केली.

राशीन जगदंबा देवीच्या पुरातन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या गावाच्या पुढे दीड-दोन किलोमीटर अंतरावर, उजाड माळरानावर ‘संकल्प वसतिगृह’ स्थापन करण्यात आले. त्यासाठी विजय भोसले यांनी स्वत:ची १० गुंठे जमीन दिली. तिथे लोकसहभागातून चार खोल्या बांधून आणि प्राथमिक सुविधा निर्माण करून वसतिगृह सुरू करण्यात आले. आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी विजय भोसले यांच्या वडिलांनी पानटपरी सुरू केली होती, मात्र समाजाच्या नजरा आणि पोलिसांचा दूषित दृष्टिकोन त्यांच्या कुटुंबाला एका जागी स्थिर राहू देत नव्हता. पोलिसांच्या छळापासून कुटुंबाला वाचवण्यासाठी त्यांच्यावर परागंदा होण्याची वेळ ओढवली होती. मात्र गावाजवळील देविदास महाराज भोंडवे यांनी कुरणवाडीच्या राखणदारीची जबाबदारी कुटुंबावर सोपवली. त्यातूनच विजय भोसले यांच्या भावंडांचे शिक्षण झाले. विजय यांनीही याच परिस्थितीत बी. ए., बी. एड.चे शिक्षण पूर्ण केले. मात्र शिक्षकाची नोकरी मिळत असूनही त्यांनी वसतिगृहाच्या कामात स्वत:ला झोकून दिले.

महाविद्यालयीन जीवनापासूनच विजय भोसले चळवळींकडे ओढले गेले. ‘स्नेहालय’चे डॉ. गिरीश कुलकर्णी, ‘शांतीवन’चे दीपक नागरगोजे यांच्या संपर्कातून, हेमलकसा शिबिरातून समाजासाठी, शाळाबाह्य मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यातूनच संस्था आणि वसतिगृह आकाराला येत गेले. सुरुवातीच्या काळात ‘देणे समाजाचे’ उपक्रमाच्या वीणा गोखले, ‘वुई टुगेदर फाउंडेशन’च्या उज्वला बागवडे यांनी मार्गदर्शन केले. गावातीलच डॉ. पंकज जाधव यांनी स्वत:चे सभागृह वापरण्यास देऊन अन्य प्रकारेही मदत केली.

बहुसंख्य पारधी आजही पालांमध्ये राहतात, मात्र पालांमध्येही जागा नसलेली, झाडाखाली राहणारी कुटुंबेही असतात. अशा कुटुंबांतील पाच मुलांपासून वसतिगृहाची सुरुवात झाली. अशा मुलांचा शोध घ्यायचा, त्यांच्या कुटुंबाला, आई-वडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचे आणि मुलांना वसतिगृहात आणायचे अशी प्रबोधन चळवळ विजय भोसले यांनी सुरू केली. अलीकडे पारधी समाज ऊसतोडणी मजूर म्हणून काम करू लागला आहे. दारिद्र्यामुळे मुलांना शिक्षण देण्याऐवजी त्यांना मजुरीसाठी नेण्याकडे कुटुंबाचा कल असतो. त्यामुळे आई-वडील मुलांना वसतिगृहात पाठवण्यास सहजी राजी होत नाहीत. त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी भोसले यांनी हरतर्‍हेचे प्रयत्न केले.

वसतिगृहापासून जिल्हा परिषदेची शाळा दोन-अडीच किलोमीटरवर आहे. विजय भोसले यांची धडपड पाहून दोन वर्षांपूर्वी ‘स्व. रतिबाई जैन पब्लिक ट्रस्ट’ व किशोर बाफना यांनी मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी स्कूल बस दिली. इंधनाच्या खर्चाची व्यवस्थाही लोकसहभागातूनच केली जाते. वसतिगृहाच्या खर्चाची तजवीज करण्यासाठी विजय भोसले दिवसभर पायपीट करतात आणि त्यांच्या पत्नी प्रणिता सकाळी मुलांना उठवण्यापासून, त्यांचे आवरून शाळेत पाठवण्यापर्यंत आणि त्यांच्यासाठी स्वयंपाक करण्यापासून ते रात्री मुलांना अभ्यासाला बसवण्यापर्यंतच्या दिनक्रमात व्यग्र असतात.

जी मुले घरीच राहून शिक्षण घेऊ इच्छितात, मात्र बिकट आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे कुटुंब हतबल झालेले आहे, अशा मुलांच्या शिक्षणासाठीही संस्था गणवेश, शैक्षणिक साहित्याच्या स्वरूपात मदत करते. अशा सुमारे ३० मुलांना सध्या मदत केली जात आहे. यापैकी एका तरुणाने नुकतेच एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. याशिवाय परिसरातील वीटभट्ट्यांवरील कुटुंबांतील मुलांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठीही संस्था मदत करते.

पुण्यातील एका खासगी कंपनीने सीएसआर फंडातून वसतिगृहात संगणक उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे मुले संगणकाची ओळख करून घेऊ लागली आहेत. संस्थेला ‘इन्स्पायरर्स ट्राईब प्रकाशवाटा फाउंडेशन’, ‘रेल्फॉर फाउंडेशन’, ‘चमनलाल गोविंददास सेवा ट्रस्ट’, ‘ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’, मुंबईतील ‘अमरहिंद मंडळ’ यांच्याकडून विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

‘‘पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची नितांत आवश्यकता आहे. हे काम ‘आदिवासी पारधी समाज विकास संस्था’ करत आहे. संस्थेच्या ‘संकल्प वसतिगृह’त विजय भोसले आणि प्रणिता भोसले अत्यंत निष्ठेने पारधी व वंचित समाजातील मुलांचा सांभाळ करत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी उत्तम काम केले असून त्यांना पुढील कामासाठी लोकसहभागाची गरज आहे,’’ असे राशीन गावातील रहिवासी डॉ. पंकज जाधव यांनी सांगितले.

बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न

पारधी समाजात जशी शाळाबाह्य मुले ही प्रचंड मोठी समस्या आहे तशीच दुसरी समस्या म्हणजे बालविवाह. बालविवाह होऊ नयेत, यासाठी विजय भोसले व प्रणिता भोसले हे दाम्पत्य पालांवर जाऊन प्रबोधन करते. मुलांना शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी दाखल्यांची आवश्यकता असते, योजनांचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रे हवी असतात. ती मिळवून देण्यासाठी दोघे सरकारी यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा करतात.

वसतिगृहातील मुलांचे यश

वसतिगृहातील मुलांना बाह्य जगात काय सुरू आहे याची माहिती मिळावी, यासाठी दर रविवारी परिसरातील एखाद्या कारखान्याला भेट दिली जाते. मुंबईतील बुद्धिबळपटू प्रीती देशमुख यांनी तीन दिवस वसतिगृहात राहून मुलांना बुद्धिबळाचे प्रशिक्षण दिले आहे. वसतिगृहातील मुलांनी धावणे, लांब उडी क्रीडा प्रकारांत विविध स्तरांवर पारितोषिके मिळवली आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेतही काहींनी यश संपादन केले आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल?

संस्था राशीन गावापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे. अहिल्यानगर- सोलापूर महामार्गावर कोंभळी किंवा मिरजगावमार्गे राशीनला जाता येते. किंवा पुणे- सोलापूर महामार्गावर भिगवणमार्गे राशीन (१२५ ते १३० किलोमीटर)़

ऑनलाइन देणगीसाठी तपशील

बँकेचे नाव : द कॉसमॉस सहकारी बँक, अहिल्यानगर
चालू खाते क्रमांक : ११३१००१०६१३२
आयएफएससी : सीओएसबी००००११३

धनादेश येथे पाठवा…

आदिवासी पारधी समाज विकास संस्था Adivasi Pardhi Samaj Vikas Sanstha या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्याबरोबर देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच भ्रमणध्वनी क्रमांक लिहावा. संस्था ८० जी करसवलत पात्र आहे.

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणार्‍यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय : लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय : संपादकीय विभाग, फ्लॅट नं.५, तिसरा मजला, होशबानो मॅन्शन, तनिष्क शोरूमच्या वर, गोखले रोड, नौपाडा ठाणे (प.) ४००६०२. ०२०-२५३८५१३२

पुणे कार्यालय : संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे- ४११००४. ०२०-६७२४११२५

नागपूर कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, ॲडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ – २२३०४२१

दिल्ली कार्यालय : संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१. ०१२०- २०६६५१५००