प्रमोद पाटील

शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटीया संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळीतील शब्दांचा पुन्हा-पुन्हा विचार करावा, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. केवळ चांगल्या दर्जाचे बियाणे नसल्यामुळे शेतीतील उत्पादनात सध्या मोठी घट होत असल्याचे दिसून येत आहे. शेती करताना बियाणे निवडीपासून ते वापरापर्यंत काय काळजी घ्यावी हे सांगणारा हा लेख..

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
Home alone safety tips
मुलांना घरी एकटे ठेवण्याशिवाय पर्याय नाही? नोकरी करणाऱ्या पालकांनी मुलांना शिकव्यात ४ महत्त्वाच्या गोष्टी
Danger from electric wires on footpaths Inexcusable negligence of the Municipal Corporation after entrusting the work to the contractors navi Mumbai
पदपथांवरील विद्युत तारांमुळे धोका; कंत्राटदारांकडे काम सोपवल्यावर महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

करोनाच्या बिकट संकटात सारे जग थांबलेले होते. अशा परिस्थितीत देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचे काम शेती आणि शेतकऱ्यांनी केले आहे. मात्र गेल्या काही दिवसात शेती आणि शेतकरी अनेक समस्यांच्या फेऱ्यात अडकले आहेत. हवामान बदलाचा मोठा परिणाम शेतीवर होत असतानाच शेतीमधील कुशल मजुरांची कमतरता निर्माण होऊ लागली आहे. शिवाय वरचेवर शेती उत्पादनात घट होऊ लागली आहे. त्यामुळे शेतीक्षेत्रात निराशेचे वातावरण निर्माण होत आहे. शेती उत्पादनातील होत चाललेली घट या गंभीर समस्येच्या मागे अनेक कारणे असली तरी त्याचे प्रमुख कारण आहे ते शेतीमध्ये वापरले जाणारे बी-बियाणे !

‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळीतील शब्दांचा पुन्हा-पुन्हा विचार करावा, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. यामुळे सरकारने आम्हाला शुद्ध बियाणे द्यावे हा हक्क समजणाऱ्या शेतकऱ्यांनीही स्वत: जागृत राहून आपलेही कर्तव्य ओळखण्याची वेळ आता आली आहे.

राज्य सरकारने त्यांच्या पातळीवर यंदा नियोजनबद्ध खरीप हंगामाची पूर्वतयारी केली आहे. कृषी विभागाने विभागनिहाय, जिल्हानिहाय आणि आणि तालुकानिहाय खरीप हंगमाच्या पूर्वतयारीच्या बैठका यशस्वीपणे घेतल्या आहेत. संबंधित यंत्रणेला योग्य त्या सूचनाही दिल्या आहेत. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दर्जेदार खते, बियाणे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विभागवार नियोजन करण्यात आले आहे. साठेबाजी आणि बोगसगिरी करणाऱ्यांविरुद्ध भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यामुळे बोगस बियाणे आणि बोगस औषधांच्या कंपन्या कृषी विभागाच्या धाडसत्रात सापडतही आहेत. शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी सर्व पातळीवर प्रयत्नशील आहेच,पण शेतकऱ्यांनीही स्वत: आपली फसवणूक होवू नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे कृषी विभाग, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ, शास्त्रज्ञ यांनी सांगितलेल्या काही गोष्टींचे पालन करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांनी आता स्वीकारायला हवी. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्यासाठी महत्त्वाचे कारण ठरणारे शुद्ध बियाण्याबाबत आता शेतकऱ्यांनी स्वत: सजग होण्याची वेळ आली आहे.

यंदा सोयाबीन बियाण्याची कमतरता

ऐन खरिपाच्या तोंडावर बाजारात महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचा अभूतपूर्व तुटवडा झाला आहे. सध्या बाजारात १० लाख क्विंटल सोयाबीन बियाण्याला मागणी आहे. २०१९ मध्ये ५.२५ लाख क्विंटल सोयाबीन बियाणे बाजारात आणणाऱ्या महाबीजने मात्र यंदा केवळ ४२ हजार क्विंटलच बियाणे बाजारात विक्रीसाठी आणले आहे. त्यामुळे बाजारात यंदा सोयाबीन बियाणाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. तुटवडय़ामुळे महाबीजने बियाण्याचे दरही वाढवले आहेत. त्यामुळे खासगी कंपन्यांचेही दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत चालली आहे. बियाण्याच्या या तुटवडय़ामुळे यंदा बोगस बियाणे बाजारात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांना सूक्ष्मदृष्टीने बियाणे खरेदी करावे लागणार आहे.

दरम्यान, कृषी विभागाच्या अहवालानुसार यंदा महाराष्ट्रात खरीप हंगामात सुमारे १४६.८५ लाख हेक्टर क्षेत्रावर प्रमुख अन्नधान्य पिकांची लागवड अपेक्षित आहे. यासाठी सुमारे १७.९५ लाख क्विंटल बियाण्याची गरज भासणार आहे. त्यासाठी महाबीजकडून १.७२ लाख क्विंटल, राष्ट्रीय बीजनिगमकडून ०.१५ लाख क्विंटल व खासगी उत्पादकांमार्फत १८.०१ लाख क्विंटल असे एकूण १९.८८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. राज्यात बियाणे उपलब्धतेसाठी २५ बीज प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर घरचे सोयाबीन बियाणे मोहिमेद्वारे ४८,१७,४८३ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असल्याचे कृषी विभागाने अहवालात म्हटले आहे.

यंदा मान्सून वेळेआधी दाखल होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. मात्र यंदा काही भागात पूर्वमोसमी पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढताना दिसत आहे. मान्सूनच्या आगमनाच्या आणि वाटचालीच्या बातम्या शेतकऱ्यांची धावपळ वाढवत आहेत. सध्या राज्यातील शेतकरी पेरणीपूर्व मशागतीमध्ये व्यस्त दिसत आहेत. यंदा उन्हाच्या तीव्रतेमुळे उन्हाळी हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने येणारा खरीप हंगाम अतिशय महत्त्वाचा आहे. राज्यात मान्सूनचे आगमन झाले,की वेगवेगळय़ा भागांमध्ये पेरणीला सुरुवात होते. पेरणीसाठी उत्कृष्ट व प्रमाणित बियाणे असणे अतिशय महत्त्वाचे असते. पेरणी केलेले बियाणे जर निकृष्ट दर्जाचे निघाले तर पूर्ण हंगाम वाया जातो, शिवाय त्याचा फार मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. गेल्यावर्षी सोयाबीन पट्टय़ामध्ये निकृष्ट दर्जाच्या बियाणामुळे पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे बियाणे खरेदी करताना सर्वपातळीवर काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

पेरणीची योग्य वेळ कोणती ?

मान्सूनचा पाऊस पडला रे पडला,की शेतकरी पेरणीची गडबड सुरू करतात. मात्र हे साफ चुकीचे आहे. कृषितज्ज्ञांच्या मते मान्सूनचा पाऊस ७५ ते १०० मि. मी. झाल्यानंतरच पेरणी करणे उचित ठरते. मात्र तसे होताना दिसत नाही. शेतकरी पहिल्या पावसावरच पेरणी उरकतात आणि पावसाचा खंड पडला की निकृष्ट बियाण्याची चर्चा सुरू होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. कधी कधी पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड पडण्याची शक्यता असते. पावसाचा खंड पडल्यास दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. त्यामुळे जमिनीत चांगली ओल असताना आणि पेरणीनंतर पावसाची शाश्वती असतानाच पेरणी करणे योग्य ठरते. विशेष म्हणजे योग्य वेळी पेरणी झाल्यास अपेक्षित उत्पन्न मिळते, तसेच कीड-रोगाच्या प्रादुर्भावापासून पिकाचे संरक्षणही होते.

पेरणीच्या वेळेबाबत सल्ला

कृषी विद्यापीठाने पेरणीच्या वेळेबाबत केलेल्या अभ्यासानुसार पीकनिहाय पेरणीचे वेळापत्रक वेगवेगळे आहे. त्याशिवाय पीक आणि त्याचे विविध वाण त्यांचा कालावधी विचारात घेऊन पेरणीची वेळ ठरवावी लागते. सर्वसाधारण मूग, उडीद, तीळ व ज्वारी या पिकांची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत करावी. सोयाबीन, तूर, मका या पिकाची पेरणी जुलै महिन्याच्या १५ तारखेपर्यंत करावी. तर कापसाची लागवड १५ ते ३० जूनपर्यंत करावी अशी शिफारस कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी अभ्यासांती केलेली आहे. त्याचे पालन करण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांवर आहे.

बियाणे खरेदी करतानाची काळजी

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, या संदर्भात शेतकऱ्यांना काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. त्याचे पालन करणे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरते. त्यामुळे त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून बियाण्याची खरेदी करावी. सर्वप्रथम शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना खरेदीची पक्की पावती घ्यावी. त्यावर बियाणे खरेदी करणाऱ्याचे नाव, पिकाचे व जातीचे नाव, गट क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, विक्रेत्याची सही इत्यादी नोंदी असाव्यात. कोणतेही बियाणे घेताना परवानाधारक कृषी केंद्रधारक विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे. बियाण्याची वैधता तपासणी दिनांकापासून ९ महिने असते तर नूतनीकरण केलेल्या बियाण्याची वैधता ६ महिने असते. याबाबी पाहूनच बियाण्याची खरेदी करणे महत्त्वाचे असते. बियाणे खरेदी करताना पिशवीच्या लेबलवर दिलेली माहिती तपासून पहावी. त्यामध्ये प्रामुख्याने बियाण्याची उगवणक्षमता, भौतिक शुद्धता, बियाण्याची चाचणीची तारीख इत्यादी काळजीपूर्वक वाचावे. प्रमाणित बियाण्याच्या खुणचिठ्ठीवर (टॅगवर) अधिकाऱ्यांची सही असल्याची खात्री करून घ्यावी. या कृषी विभागाच्या सूचना शेतकऱ्यांनी लक्षात घ्याव्यात म्हणजे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक होणार नाही.

पेरणी करतानाची काळजी

बियाण्याची पेरणी करताना काय काळजी घ्यावी याबाबतही कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणीसाठी पिशवीतील बियाणे काढताना पिशवीच्या तळाकडील बाजूस छिद्र पाडून बियाणे बाहेर काढावे. बॅगवरील टॅग काढू नये. रिकामी पिशवी आणि त्यामध्ये काही बियाणे शिल्लक ठेवून खरेदी केलेली पावती जपून ठेवावी. विशेष म्हणजे, पेरणी करताना शक्यतो दोन वेगवेगळय़ा लॉटचे बियाणे एकत्र करून पेरणी करू नये. पहिल्या शेजारी दुसरा लॉट पेरावा. महत्त्वाचे म्हणजे, जमिनीत योग्य ओलावा असताना पेरणी करावी. पेरणी केलेली तारीख नोंद करून ठेवावी. पेरणीनंतर ४ ते ७ दिवसात बियाण्याची उगवण लक्षात येते. बॉक्समधील बियाणे पेरणीसाठी वापरताना विशेष काळजी घ्यावी. बॉक्स फोडताना त्यावरील माहिती व्यवस्थित राहील याची काळजी घ्यावी. शिवाय बॉक्समध्ये बियाण्याचा थोडासा नमुना राखून ठेवावा. बियाणे सदोष निघाल्यास तक्रार केल्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांना या बियाण्याचा नमुना देता येतो.

देशातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय बियाणे कायदा १९९६ करण्यात आला आहे. १ ऑक्टोबर १९६९ पासून तो अमलातही आला आहे. या कायद्यानुसार देशातील विविध भागासाठी किंवा स्थानिक दृष्टय़ा महत्त्वाच्या जाती अगर पिके अधिसूचित जाती (नोटीफाईट व्हरायटी) म्हणून जाहीर केल्या आहेत. त्या जातींच्या उत्पादन आणि विक्रीकरीता हा कायदा लागू आहे. बियाणे सदोष निघाल्यास शेतकऱ्यांना या कायद्यान्वये न्याय मागता येतो. मात्र त्यासाठी वरील काही मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे असते.

बीजप्रक्रिया प्रक्रिया महत्त्वाची

ज्या वेळी शेतकरी कंपनीचे बियाणे पेरणीसाठी वापरतो त्या वेळी बहुतांशवेळा कंपनीकडून येणारे बियाणे हे बीजप्रक्रिया करूनच बाजारात विक्रीसाठी आलेले असते. मात्र ज्या वेळी आपण घरचे बियाणे वापरत असतो त्या वेळी मात्र त्यावर बीजप्रक्रिया करणे अतिशय महत्त्वाचे असते. दर्जेदार उत्पादनाच्या दृष्टीने बियाण्यावर संस्कार करणे ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करणे अतिशय महत्त्वाचे आहे. बीजप्रक्रिया केल्यामुळे जमिनीतील नत्राचे स्थिरीकरण सहज होते. पिकाला जमिनीतील स्फुरद उपलब्ध होतो तसेच विविध रोगांपासून पिकाचे संरक्षणही होते.

कृषी विद्यापीठाने सांगितलेल्या सूचनांचा वापर करून लागवडीचे क्षेत्र आणि त्याला लागणाऱ्या बियाण्याचे प्रमाण ठरल्यानंतर पेरणीपूर्वी तीन ते चार दिवस अगोदर बीजप्रक्रिया करावी. यासाठी थायरम किंवा बाविस्टीन २ ते ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात घेवून बीजप्रक्रिया करावी. तसेच ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची ४ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. बुरशीनाशकाच्या प्रक्रियेनंतर विविध जिवाणू खतांची बीजप्रक्रिया करावी. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे. प्रक्रिया केल्यापासून २४ तासाच्या आत त्या बियाण्याची पेरणी करावी. असे केल्याने विविध रोगांच्या प्रादुर्भावापासून पिकाला संरक्षण मिळते.

किती शेतकरी या गोष्टीचे पालन करतात, हा एक प्रश्नच आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठे संशोधनाच्या पातळीवर शेतकऱ्यांना अनेक सल्ले देत असतात. तसेच कृषी विभागही वारंवार मार्गदर्शक सूचना करत असतो. या सूचना आणि सल्ले नक्कीच शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असतात त्यामुळे त्याचे पालन करणे शेतकऱ्यांचे कर्तव्य आहे. बियाण्याच्या बाबतीत वरील गोष्टीचे पालन केले तर सदोष बियाण्याचे आणि दुबार पेरणीचे संकट निर्माणच होणार नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी बियाण्याच्या बाबतीत स्वत: सजग होण्याची गरज निर्माण झाली आहे. सारी जबाबदारी सरकारचीच नाही, तर आपलेही काही कर्तव्य आहे हे लक्षात घ्यावे लागणार आहे.

घरच्या घरी बियाणे कसे तपासावे

पेरणीपूर्वी आपल्याकडे असलेल्या बियाण्याची उगवणशक्ती किती आहे, हे तपासणे अतिशय महत्त्वाचे असते. घरच्या घरी बियाण्याची उगवणशक्ती तपासण्याची पद्धत साधी आणि अतिशय सोपी अशी आहे. त्याकरिता आपल्याकडे उपलब्ध मागील हंगामातील घरचे बियाणे किंवा बाजारातून विकत आणलेल्या बियाण्यामधील १०० दाणे निवडून ते ओल्या कपडय़ात किंवा गोणपाटामध्ये किंवा मातीच्या कुंडीत टाकून त्यापैकी किती दाणे जोमदार उगवतात याची टक्केवारी काढावी. त्या प्रमाणात किती बियाणे लागते हे ठरवावे.

बियाणे खरेदी पावतीचे महत्त्व

बियाण्याच्या पिशवीला लावलेल्या टॅगवरील सर्व माहिती वाचून त्याविषयी खात्री झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्रेत्यांकडून बियाणे खरेदीची पक्की पावती म्हणजे बिल घ्यावे. या बिलावर बियाण्याचा वाण तसेच गट क्रमांक, बियाणे खरेदीची तारीख लिहिली आहे की नाही याची खात्री करावी. पुढे जर बियाण्यात काही दोष आढळल्यास तक्रार करताना या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्याशिवाय तक्रार ग्राह्य मानली जात नाही. त्यामुळे बियाणे खरेदीची पक्की पावती अतिशय महत्त्वाची असते.

बियाणे महोत्सव नवी क्रांती

यंदा राज्य़ाचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी विदर्भात सुरू केलेला ‘बियाणे महोत्सवा’चा क्रांतिकारी उपक्रम ठरला आहे. अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवला आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून आर्थिक उन्नती साधता यावी, तसेच त्यांची बियाणे खरेदीमध्ये होणारी फसवणूक व शोषण टाळता यावे, या उद्देशाने केलेला हा उपक्रम नक्कीच लक्षवेधी ठरला आहे. यामुळे शेतकऱ्यांना घरगुती बियाणे स्वस्त दरात उपलब्ध झाले. शिवाय बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना आयता ग्राहक मिळाला. नक्कीच हा आदर्श उपक्रम पुढील वर्षी राज्यभर राबवल्यास बियाणे कंपन्यांची मक्तेदारी कमी होण्यास मदत होणार आहे. शिवाय बियाण्याच्या तुटवडय़ाचा प्रश्नही निकाली निघू शकतो.

शुद्ध बियाण्याची निवड करताना.

* आपल्या परिसरातील कृषी विभागातील कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ यांच्यासमोबत चर्चा करून नवीन तसेच सुधारित, संकरित वाणाची माहिती घ्यावी.

* उत्तम प्रतीचे खात्रीशीर व नोंदणीकृत नावाजलेल्या कंपनीचे बियाणे विक्रेत्यांकडून खरेदी करावे.

* पूर्वीच्या हंगामात अन्य शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्याच्या अनुभवाची माहिती करून घ्यावी.

* शक्यतो कृषी विद्यापीठे किंवा विद्यापीठाचे संशोधन केंद्राकडे बियाणे उपलब्ध असेल तर तिथून ते बियाणे खरेदी करावे.

* बियाण्याच्या पिशवीला प्रमाणीकरण यंत्रणेने बियाण्याच्या गुणवत्तेविषयी (खुणपट्टी) टॅग लावलेला असतो तो तपासून बियाण्याची खरेदी करावी.

* बियाण्याच्या बॅगवर माहिती छापलेली असते. त्यावरील माहिती व्यवस्थित वाचून तपासून मगच बियाणे खरेदी करावे.

ppramodpatil22 @gmail.com