पीटीआय, अहमदाबाद
सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांमध्ये लंडनकडे निघालेले ‘एअर इंडिया’चे विमान गुरुवारी दुपारी नागरी वस्तीत कोसळले. या भीषण अपघातात विमानातील २३० प्रवासी आणि १२ कर्मचाऱ्यांपैकी बहुतेक जण मृत्युमुखी पडले असा प्राथमिक अंदाज आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. विमान नजीकच्या वैद्याकीय महाविद्यालयाच्या परिसरात कोसळल्यामुळे अनेक इमारतींना आग लागली असून त्यातही अनेक जण दगावल्याचे सांगितले जात आहे. मृतांचा नेमका आकडा रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकला नाही. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या ‘एआय१७१’ (बोइंग ड्रीमलायनर ७८७-८) विमानाने दुपारी १.३९ वाजता लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाण्यासाठी धावपट्टी क्रमांक २३वरून उड्डाण केले. त्यानंतर काही मिनिटांतच वैमानिकाने वाहतूक नियंत्रण कक्षाला (एटीसी) ‘मे डे कॉल’ (आपत्कालीन परिस्थितीची सूचना देणारा संदेश) पाठविला. मात्र काही सेकंदांमध्ये संपर्क तुटला आणि विमान वेगाने खाली येत मेघानीनगर येथील बीजे वैद्याकीय महाविद्यालयाच्या वसाहतीवर कोसळले. मुंबईचे रहिवासी असलेले सुमीत सभरवाल या विमानाचे कॅप्टन तर ब्रिटनचे क्लाईन्ह कंदर हे फर्स्ट ऑफिसर होते. त्यांच्यासह १२ कर्मचारी अपघातावेळी विमानात होते.
अवघ्या काही सेकंदांमध्ये विमानाचा प्रचंड मोठा स्फोट झाला. यामुळे वसाहतीतील इमारती, झाडांना आग लागली. परिसरातील अनेक वाहनांनीही पेट घेतला. अपघातानंतर अहमदाबाद विमानतळावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. संध्याकाळनंतर वाहतूक अंशत: सुरू झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी समाजमाध्यांवरून शोक व्यक्त केला.
वसतिगृह, वाहनांना आग, प्रत्यक्षदर्शींचा दावा
‘‘एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर लगेच खाली आले आणि मेघानीनगर भागातील बी. जे. वैद्याकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळले. ज्यामुळे परिसरातील इमारतींचे मोठे नुकसान झाले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हरीश शहा नावाच्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, विमान खूपच कमी उंचावरून उडत असल्याचे पाहिले. ते वसतिगृहावर कोसळल्यानंतर पाच मजली इमारतीला आणि परिसरातील वाहनांना आग लागली.
मृतदेह ओळखणेही कठीण
अपघातानंतर अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयातील ट्रॉमा केंद्रात मृतदेह आणण्यात आले. भाजलेल्या स्थितीतील अनेक मृतदेह ओळख पटण्यापलीकडचे तसेच काही सीटबेल्टही लावलेले होते, अशी माहिती डॉ. प्रांजल मोदी यांनी दिली. विमातळानजीकचे हे सर्वात मोठे सरकारी रुग्णालय आहे. येथील बीजे वैद्याकीय महाविद्यालय परिसरातील वसतिगृह तसेच डॉक्टरांची निवासस्थाने असलेल्या भागात अपघातग्रस्त विमानाचे अवशेष विखुरले होते. आणंद व गुजरातच्या अन्य जिल्ह्यांतून या विमानातून जाणाऱ्या अनेक प्रवाशांचे नातेवाईक त्यांना सोडण्यासाठी आले होते. दुर्घटनेनंतर त्यांनीही रुग्णालयात धाव घेतली.
भोजनकक्षावर विमान कोसळले
अपघातग्रस्त विमान हे वसतिगृहाच्या भोजनकक्षावर कोसळले. त्या वेळी तेथे अनेक जण उपस्थित होते. त्यामुळे जखमींचा आकडा वाढल्याचे प्रत्यक्षदर्शींनी नमूद केले. तसेच वैद्याकीय महाविद्यालय परिसरातील अनेक वाहनांना आग लागली. मदतकार्य वेगाने सुरू असल्याचे अहमदाबाद शहर पोलीस आयुक्त जी. एस. मलिक यांनी सांगितले. लष्कर, सीमा सुरक्षा दल, स्थानिक पोलीस व राज्य राखीव पोलीस दलाचे जवान मदतकार्यात सहभागी झाले.